आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदिवासी वेदनेचे दृश्‍यकाव्‍य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगण्याचा परिसर अभावग्रस्त. दारिद्र्य आणि गरिबीने वेढलेला. शिक्षण-एम.ए. बीएड (मराठी). नोकरी-आदिवासी आश्रमशाळेत स्वयंपाकी. अभिव्यक्तीचे माध्यम कविता आणि मोबाइलचा कॅमेरा. या दोन गोष्टींच्या बळावर अनिल साबळे नावाचा हा आंतरिक कळवळ्याचा कवी आदिवासींच्या वेदनांचं दृश्यकाव्य निष्ठेने संवदेनशील मनांपर्यंत पोहोचवतोय... 


वाङ््मयीन नियतकालिकांतून मन अस्वस्थ करणाऱ्या कविता लिहिणारा आणि फेसबुकच्या माध्यमातून नि:शब्द करणारी छायाचित्रं दुसऱ्यापर्यंत पोहोचवणारा अनिल साबळे ठावुक नाही, असा साहित्यरसिक विरळा.  स्वत: अभावाचं जगणं जगत आपला भोवताल, तिथली माणसं, त्यांच्या जगण्याच्या रीती-भाती आपल्या कवितेमधून प्रभावीपणे मांडणाऱ्या अनिलने आदिवासी जीवनाचे दर्शन घडवणारी टिपलेली छायाचित्रं सारख्याच तीव्रतेने काळजाचा ठाव घेतात. अतिशय बुजरा आणि संवेदनशील कविमनाचा हा मित्र. त्याची साधी राहणी नजरेत भरते. कवी, छायाचित्रकार, कथाकार असलेला अनिल उत्तम आचारीसुद्धा आहे. गेल्या दहा वर्षंापासून तो एका आदिवासी आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून नोकरी करतो आहे. एम. ए. बीएड. (मराठी) असे उच्च शिक्षण असूनही स्वयंपाक्याचे काम करतो म्हणून अनेकांनी त्याला नावेही ठेवली आहेत. पण त्यांना न जुमानता या नोकरीत तो समाधानी आहे. 


कारण, पुस्तकं हीच आपली मोठी संपत्ती आहे, असे मानतो. त्याच्या या पुस्तकवेडाचे अनेक सुरस किस्से आहेत. काही वर्षांपूर्वी भंगार बाजारातून जुने पुस्तक विकत घेण्यासाठी तालुक्याच्या गावी चकरा मारत, हाती येईल ते पुस्तक वाचणारा अनिल कधी या तर कधी त्या वाचनालयाच्या आणि लेखक-कवींच्या संग्रहालयातली पुस्तकं मागून आपली वाचनभूक भागवायचा. अशातच त्याच्या हाती ‘कोसला’ पडली. ‘कोसला’ ते ‘हिंदू’ अशा नेमाडेंच्या कादंबऱ्या त्याने झपाटल्यागत वाचल्या. न राहवून नेमाडेसरांना फोन लावला. नेमाडेंनी त्याचं वाचनवेड हेरलं आणि त्याच्या पत्त्यावर त्याने न वाचलेली काही पुस्तकं पाठवली. साहित्यजगताला पूर्णत: अपरिचित असलेल्या अनिलसाठी ही विलक्षण आनंददायी घटना होती. ‘आपले वाङ््मयवृत्त’ या नियतकालिकाची वर्गणीसुद्धा सरांनी भरली. त्यामुळे अनिलला मराठी नियतकालिकांचा परिचय झाला. २०१४ मध्ये याच अंकात सतीश काळसेकरांनी अनिलच्या आठ कविता प्रसिद्ध केल्या आणि अनिल साबळे हे नाव सर्वदूर पोहोचलं. रंगनाथ पाठारे, नितीन रिंढे, बळवंत जेऊरकर, श्रीधर नांदेडकर, अशोक कोतवाल यासारख्या महत्वाच्या साहित्यिकांनी प्रत्यक्ष संवाद साधून, अनेकांनी पत्र लिहून अनिलचं कौतुक आणि स्वागत केलं. याच कौतुकाचा लक्षवेधी भाग म्हणजे, नेमाडेसरांचं पत्र. सरांनी या पत्रात कविता आवडल्याचं तर लिहिलंच, शिवाय दि.पू. चित्रे, अरुण कोलटकर, तुलसी परब, नामदेव ढसाळ, अरुण काळे हे कवीसुद्धा आवर्जून वाचायला सांगितले. त्यानुसार अनिलने या सर्व कवींचे संग्रह मिळवून वाचण्याचा सपाटा लावला. केवळ पुस्तकासाठी पुण्याला त्याच्या फेऱ्या वाढल्या. कवी श्रीधर नांदेडकरांच्या घरी तीन दिवस मुक्कामी थांबून त्याने कितीतरी कवितासंग्रह अधाश्यासारखे वाचून काढले. काही पुस्तकं चाळली. काही झेरॉक्स करून घेतली.  


एका लयीत त्याचं वाचन होत राहिलं. लेखनही जोमाने होत राहिलं. आणि पाहता-पाहता अनिल मराठीतल्या महत्वाच्या नियकालिकांतून प्रकाशित होऊ लागला. आजवर नव-अनुष्टुभ, प्रतिष्ठान, कवितारती, मुक्तशब्द, मुराळी, नवाक्षरदर्शन, अक्षरगाथा, युगांतर, वैनतेय, वाघूर, गंधाली, अक्षरलिपी, छंद, पृथा, मीडिया वॉच यासारख्या नियत आणि अ-नियतकालिकांतून अनिलच्या कविता घराघरांत पोहोचल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, यातल्या अनेक नियतकालिकांच्या मुखपृष्ठांवर अनिलच्या छायाचित्रांनाही स्थान मिळालेलं आहे. अनिलने लिहिलेल्या मोजक्या कथा, ललितगद्य आणि इतर स्फूट गद्यात त्याच्यात मोठा लेखक असल्याच्या खाणाखुणा सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. कवितासंग्रह प्रकाशित नसलेल्या परंतु वाड्यमयीन नियतकालिकांतून सातत्यपूर्ण दर्जेदार कविता लिहिणाऱ्या कवीला दिला जाणारा साहित्यविश्वातला मानाचा ‘कविवर्य नीळकंठ महाजन काव्य पुरस्कार’ २०१६ मध्ये अनिलला मिळाला आहे. 


साहित्य अकादमीच्या युवा काव्योत्सवात त्याची कविता एकत्र ऐकण्याची संधी समकालिन मराठी काव्य समीक्षक व कवींना मिळाली आहे. राष्ट्रीय स्तरावर अकादमीने आयोजित केलेल्या एका चर्चसत्रात ‘आदिवासी साहित्य आणि अस्मिता’ या विषयावर अभ्यासपूर्ण निबंध त्याने सादर केला आहे.  अॅथोर ट्रॅव्हल ग्रँट फेलोशिप अंतर्गत हिंदी साहित्यविश्वातल्या नामांकित कवींना भेटण्याची संधीही त्याला साहित्य अकादमीने उपलब्ध करून दिली आहे. या शिवाय मराठीतल्या अनेक महत्वाच्या संस्थांनी काव्यवाचनासाठी अनिलला निमंत्रित केले आहे. कविता लिहिणाऱ्या व दर्जेदार कवितांवर चर्चा करणाऱ्या महाराष्ट्रातल्या कितीतरी काव्यप्रेमींच्या गोतावळ्यात अनिलचा सहभाग उत्तरोत्तर वाढू लागला आहे.  


अनिल साबळे कवी म्हणून ज्या गतीनं मराठी काव्यप्रांतात परिचित झाला, तितक्याच गतीनं किबहुना, त्याहून किंचित जास्त गतीनं तो सर्वदूर पोहोचला तो, त्याच्या फेसबूकवरील फोटोग्राफीमुळे. आदिवासी जीवनाच्या विविध छटा तो ज्या पद्धतीने आपल्या कॅमेरात टिपतो,  ते पाहून आपल्या संवेदना थरारून  जातात. खरं तर त्याचा प्रत्येक फोटो ही एक स्वतंत्र कविताच असते. फोटोग्रोफीचे रीतसर प्रशिक्षण नाही की, जवळ प्रोफेशनल कॅमेरा नाही. तरीही केवळ आंतरिक उर्मी, संवेदनशील कवीमन आणि उपजत प्रतिभा या बळावर त्याने आपल्या मोबाइल फोनच्या कॅमेऱ्यात अव्यक्त राहिलेलं आदिवासी जगणे उभे केले आहे. वसंत आबाजी डहाके, हरिश्चंद्र थोरात, प्रवीण दशरथ बांदेकर, प्रज्ञा दया पवार, कविता महाजन, अरुण शेवते यांसारख्या मराठी साहित्यविश्वातल्या साहित्यिकांना अनिलच्या फोटोग्राफीने वेड लावलं आहे. थोरातांनी तर या फोटोग्राफीला ‘दृश्यकाव्य’ संबोधले आहे. 


आतूनच आदिवासी जगण्याविषयीचा कळवळा असलेल्या अनिलने टिपलेल्या छायाचित्रांमध्ये हिरडा पकडताना झाडावरून पडलेली मुलगी आहे, शेकडो बाळंतपण करत जंगलात पायी फिरणारी सुईण आहे, कातकरी जमातीतली भुकेनं व्याकूळलेली लेकरं आहेत, तापानं फणफणलेली आदिवासी मुलगी आहे, आयुष्यभर अनवाणी फिरणारे भेगाळेलेले पाय आहेत, आदिवासींची अभाग्रस्त पोरं आहेत, एका वेळच्या भाकरीसाठी हातपाय गमावणारी माणसं आहेत, वाघानं खाल्लेली गाभण गाय आहे... हे सारे फोटो पाहून काळजाच्या ठिकऱ्या उडतात. मन इतकं सर्द होऊन जातं की, फोटोंना लाइक वा कॉमेंट करण्याची हिंमतच होत नाही. या फोटोंमुळे अभावग्रस्त आदिवासी माणसं जगापुढे येतात, ते पाहून असंही आयुष्य आदिवासींच्या वाट्याला येतं याची अस्वस्थ जाणीव तेवढी होत राहते. 


खरं तर अनिलच्या फोटोग्राफीने जाणीवा पेरल्या आहेत. शासनस्तरावर अथवा संस्थास्तरावरसुद्धा याला प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. परंतु, ती वाट न पाहता भारतातल्या आणि भारताबाहेरील अनेक फेसबुक मित्रांनी अनिलच्या बँक खात्यात त्या-त्या आदिवासी कुटुंबासाठी आर्थिक मदत द्यायला सुरूवात केलेली आहे. याचाच परिणाम अनवाणी पावलांना आयुष्यात पहिल्यांदा चपला मिळाल्या आहेत. जर्जर आजाऱ्याला औषधे मिळाली आहेत. सुईणीने पहिल्यांदा एक हजार रुपये डोळ्यांनी पाहिले आहेत. पोलिस भरती करणाऱ्या युवकाला स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांना अनेक उपयुक्त पुस्तकं मिळाली आहे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी गावात वाचनालये रुजली आहेत. उन्हाळ्यातही गावात पाणीपुरवठा मुबलक व्हावा म्हणून स्वखर्चाने भूमिगत बंधारा उभारण्यासाठी अनेक जलप्रेमी युवक एकत्र येऊन अनिलला मदत करीत आहेत. 

  
अनिल मूळचा तिगांवचा (ता. संगमेश्वर).वडील दादासाहेब साबळे जिल्हा बँकेतून तुटपुंज्या पगाराच्या नोकरीतून निवृत्त झालेले. आता घरीच दोन एकर कोरडवाहू जमीन कसतात. अनिलला त्याच्या आवडीनुसार शिक्षण तसे साहित्यलेखन करण्यात घरातून मोठं पाठबळ आहे. मंगला या अनिलच्या कुटुंबनायिका. तो एस.वाय.ला असताना, त्याचं लग्न झालं. कोणतेही महत्वांकाक्षी स्वप्न नसलेल्या व अभावात जगणाऱ्या अनिलच्या आयुष्यात त्यांनी कोणतीही तक्रार न करता मोलाची साथ दिली आहे. मधू ही या साबळे दाम्पत्याची एकुलतीएक कन्या. एका मुलीनंतर दोघांनी ठरवून पाळणा थांबवला. तर अनिलच्या मोठ्या भावाने व बहिणीनेही मुलीच्या जन्मानंतर ठरवून पाळणा थांबवला आहे. साबळे कुटुंबियांनी इतर समाजापुढे मोठा आदर्श उभा केलेला आहे.  


तो गेल्या दहा वर्षापासून जुन्नर तालुक्यातील मुथावळे येथील आदिवासी आश्रम शाळेत स्वयंपाकी म्हणून निष्ठेनं काम करतोय. केवळ मुलांशी त्याचा दोन वेळच्या जेवणापुरता सबंध नाहीये, तर घरापासून, गावापासून, मायेपासून तुटलेल्या लेकरांसाठी अनिल मित्र, शिक्षक, डॉक्टर, आई-बाप असा सारा काही आहे. या लेकरांची होणारी घुसमट, त्यांचे निरागस भावविश्व अनिल आपल्या लेखणीतून ताकदीने पोहचवतो आहे. अभावग्रस्त जगण्याला  नवा अर्थ मिळवून देतो आहे... 


> ही सापासोबतची मैत्री
सर्पदंश झालेला हात आवळून 
मी झालोय अतिदक्षता विभागात दाखल 
छातीच्या घनदाट केसांत कसले ठसे 
तोंडावर खळ्यातल्या बैलांसारखे मुसके 
बोटा-बोटांवर झोंबलेले चिमटे 
ही सापासोबतची मैत्री 
मला कुठे घेऊन आलीय 
पुन्हा पुन्हा चाचणी रक्त लघ्वीची 
पुन्हा पुन्हा कोपरा-गुडघ्यावर 
लाकडी हातोडा मारून 
केली जातीय खात्री 
मला लकवा पसरला नसल्याची 
डॉक्टरच्या उभ्या बोटांवर 
डोळे फिरवून केली जातीय खात्री 
मी दीर्घ निद्रेत गेलो नसल्याची 
मला गुंगीत ठेवून त्यांनी 
कविता लिहिणारा हातच छाटला तर 
नव्या हाताने लिहिलेली 
गिचमीड कविता 
तुम्हाला वाचता येणार नाही 
“मुख्याधापक सांगून गेले 
एका हाताने तुला स्वयंपाक जमणार नाही. 
नवा शिपाई तर आलाय,  
टोल देण्याचं कामही तुला मिळणार नाही.” 
औषधांच्या गुंगीत मला तर 
बोलताही आलं नाही 
दोन्ही हात जुळवून 
त्यांना थांबवताही आलं नाही 
तुला म्हणून सांगतोय, हे विष जर मला 
नाहीसं करून गेलं तर 
माझ्या विषारी अस्थी 
कोणत्याही नदीत सोडू नकोस 
माझ्याच जागेवर तु रूजू हो 
सोईस्कर शाळेचा आग्रह न धरता 
उपाशी लेकरं चौफेर आहेत 
घरात सापडलेल्या कविता 
वाचेल त्याला दाखव 
तोणत्याही मासिकाला पाठव 
नाही तर आपल्या मुलीसाठी साठव. 


> सुसाट विमानांच्‍या पंखाखाली 
सुसाट विमानांच्या पंखाखाली 
आमची ठाकरवाडी झाकाळून गेली तर 
ओळीदार आमराया साकं बांधण्याआधीच 
उतरवून घ्याव्या लागतील 
घनदाट सागाच्या बुंध्यावरून 
गरगर करवती फिरत राहतील 
चराईचे डोंगर तर सपाट होतील 
विमानाच्या धावपट्टीसाठी 
अवेळीच सूरपारंब्या खेळणाऱ्या मुली 
घेतील हात माखून, मेंदीच्या रंगात 
अंगही माखून घेतील 
हळदीच्या पिवळ्या रंगात 
कुठल्याही व्याधीचं औषध सापडतं 
आजोबा जंगलातून हिंडत राहतात 
खांद्यावरल्या कुदळीचे रानकंद 
खोदत राहतात... 
त्यांना तर तुमच्या विमानाचा 
आवाज ऐकू येणार नाही 
गिधाडांच्या झुंडीची सावली समजून 
ते हताशपणे बसून घेतील जमिनीवर 
त्यांना वाटेल, म्हाताऱ्या हाडाचं 
मांस खातील ही गिधाडं 
औषध शोधणारे डोळे 
आपल्या हातांनी ते झाकून घेतील 
वडील तर सांगत राहतात 
अंगणातल्या वडाची आठवण 
किती पिढ्या पाखरांच्या 
वडाच्या उदरातून आभाळात उडून गेल्या 
पाखरांच्या शिटेने भरलेला वड 
स्वच्छ होईल का पुन्हा एकदा 
परतीच्या पावसात 
का त्याआधीच तो होईल जमीनदोस्त? 
डोंगरभर विखुरलेले लांडग्यांचे कळप 
तर गजबजलेल्या शहरात 
कसे दाखल होतील आपले हिंस्र जबडे घेऊन  
त्यांना टिपण्याचे जाहीर आदेश दिले 
जातील वर्तमानपत्रांतून... 
अव्वल नेमबाज सज्ज राहतील रायफल भरून 
नाहीतर... 
विष कालवून कापलेल्या 
शेळ्या-मेंढ्या टाकल्या जातील 
उपाशी लांडग्यांच्या वाटेवर 
तडफडून मरण्यासाठी 
आणि त्यांना दया आलीच तर 
पिंजरे लावून पकडलेले लांडगे 
ठेवले जातील राणीच्या बागेत 
रविवारच्या सहलीसाठी 
वखारीत कामाला गेलेली माणसं 
कोणत्या भयाने लाकडं कापत होती 
कापलेल्या बोटात घावटीचा पाला 
भरण्याचं त्यांना भान उरत नाही 
सुसाट विमानांच्या गोंगाटानं... 
अंगणातल्या पिकलेल्या बोरी 
हिंदकळत राहतात सडा संपेपर्यंत 
ओठांतून ओघळलेल्या गठुळ्या 
आता मातीत रुजून गेल्या तरी 
उगवून आलेली रोपं 
नव्या जागेत कुठे उगवणार? 
कोंबडीच्या पंखाखालून उबवलेले मोर 
कुणाला हाका घालत होते 
सांजवलं तेव्हा ओंजळीत दाणे धरून 
तुम्ही त्यांचे निळेभोर कंठ 
घट्ट आवळून टाकले प्राण जाईपर्यंत 
सावळ्या बैल तर चरत असतो 
अगदी बिनघोरपणे वडिलांचं उघडं अंग 
खरखरीत जिभेनं चाटत 
त्याचे पाणीदार डोळे माझी सोबत करतात 
कुठल्याही पायवाटेवर 
त्यांच्या खांद्यातलं बळ तर  
एकमेव आधार आहे 
आमच्या पायवाटा तुम्ही  
डांबर ओतून काळ्या केल्या 
तेव्हाच आम्हाला चाहूल लागली होती 
पाठीतल्या टोकदार खंजिराची 
तुमच्या तोंडाला येत होता  
गिधाड चोचीचा जीवघेणा दर्प 
आमच्या हातातल्या गोफणगुंड्यांनी 
सुसाट विमानांच्या काटा फुटणार नाहीत 
गलोलीतले खडे पोचणार नाहीत  


- नामदेव कोळी
kolinamdev@gmail.com 
लेखकाचा संपर्क - ९४०४०५१५४३ 
अनिल साबळे यांचा संपर्क -  ९५६१८९०४४४

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...