आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजिदींची आभाळभर आशा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक सिनेमात नाव कमावलेले माजिद माजिदी. त्यांना आकर्षण बॉलीवूडचं नव्हे, तर बॉलीवूडचा सांभाळ करणाऱ्या व्यामिश्र, ऊर्जाप्रवाही मुंबईचं. सिनेमाच्या निमित्ताने याच मुंबईत त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आणि शोध घेतला स्वत:चा, मुंबईचा आणि मानवी भावभावनांचा... त्याचीच उकल करणारा हा मुलाखतवजा लेख... 

 

What's there beyond the clouds?
HOPE

माजिद माजिदी आणि माझ्यातला थेट संवाद इथंच संपला. यानंतर दुभाषीच्या मदतीनं गप्पा सुरू झाल्या. ‘बियाँड द क्लाऊड’ या नवीन सिनेमात काय आहे, याचं नेमकं उत्तर त्यांनी दिलं, ते असं "आशा आहे जगण्याची, नात्यांची हळुवार गुंफण आहे, असंख्य स्वप्नं आहेत, अनोळखी व्यक्तीमध्ये तयार होणाऱ्या नात्यांमधले सर्व कंगोरे आहेत. मैत्री आहे. अव्यक्त पण सदा ओसंडून वाहणारं प्रेम आहे. उमेद आहे नवी, गुंतागुत असली, ती सहज उलडणारी आहे. कितीही परिस्थिती वाईट असली, तरी काही तरी नक्की चांगलं घडेल हा आशावाद आहे. तुमच्या मुंबईचा आशावाद...’


मुंबईबद्दल माजिदी भरभरून बोलतात. कारण सिनेमाचं प्रत्यक्ष शूटिंग   सुरू  होण्यापूर्वी  तीन-साडेतीन महिने  ते मुंबईत मनसोक्त भटकले.  शूटिंगसाठी जागा शोधणं, हा त्यामागचा उद्देश होताच, पण त्यापेक्षा जास्त हे शहर, यातली माणसं त्यांना अनुभवायची होती. ‘मी यापूर्वी अनेकदा मुंबईत आलोय. फिल्म फेस्टिव्हल आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं. पण माझा सिनेमा जिथं घडतोय, त्या शहराचं व्यक्तिमत्त्व जाणून घेणं खूप गरजेचं होतं. या शहराचा वेग प्रचंड आहे. इथल्या गर्दीइतकाच, या गर्दीत हे शहर मी शोधत होतो. मुंबईबाहेरचा मी, या गर्दीत जेवढा जास्त शिरत गेलो तेवढं हे शहर मला जास्त उलगडत गेलं. इथल्या अरुंद गल्ल्यांमध्ये एक ऱ्हिदम आहे. तेच माझ्या सिनेमात मला हवं होतं. या शहरात अशक्य असं काहीच नाही. या शहरानं आपलंसं केलेल्या लोकांच्या असंख्य गोष्टी मी या तीन महिन्यांत ऐकल्या. त्यातूनच माझं कथानक घडत गेलं. माझ्या सिनेमाचं मुख्य पात्र मुंबई शहरच आहे.’


माजिदींच्या सिनेमांची कथानकं जागतिक असतात. जगात कुठेही त्यांची गोष्ट घडू शकते. ‘बियाँड’साठी मुंबईचीच निवड का केली, याचं उत्तर देताना त्यांनी केलेलं, हे मुंबईचं विश्लेषण आणि मांडणी फार महत्त्वाची आहे. सिनेमात टोलेजंग इमारती नाहीत, तर बॉलीवूडच्या सिनेमात कधीही न दिसणाऱ्या गल्ल्या आहेत, कामगार वस्ती आहे. विस्तीर्ण समुद्र नाही, पण किनाऱ्यावरची कोळी वस्ती आहे. महालक्ष्मी स्टेशनच्या पुलावरून परदेशी व्यक्तींना दाखवला जाणाऱ्या धोबीघाटाचं ‘स्काय व्ह्यू’ नाही, तर तिथली दाटीवाटी आणि एकूणच इथल्या असंख्य दोरखंडांवर टांगलेल्या कपड्यांपलीकडे जाऊन तिथली माणसं, तिथली मुंबई शोधण्याचा माजिदींचा प्रयत्न आहे.


"व्यक्तिरेखा ही जिवंतच वाटली पाहिजे, म्हणून मी नेहमी अभिनयाचा अनुभव नसलेल्या आणि ते आयुष्य जगत असलेल्या लोकांसोबत काम करतो. तो त्यांच्या जगण्याचा भाग असतो, म्हणून  त्या ठिकाणी ते परफेक्ट वाटतात. तिथं मोठा कलाकार असण्याची गरज नसते. ‘बियाँड’मधली छोटी मुलगी ही शूटिंगदरम्यान सापडलेली. तिच्या डोळ्यांत वेगळीच चमक आहे. गर्दीतून ते डोळे माझ्याशी बोलत होते. मी तिला सिनेमात घेतलं. तिनं खूप छान काम केलंय.’ माजिदींचा हा सिनेमा त्यांच्या आधीच्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. मुख्य पात्र आमीर बारानमधल्या मोहंमदसारखं आहे. प्रचंड बेदरकारी. परिस्थितीशी थेट भिडण्याची त्याची सवय, जे जसं समोर येईल, त्याला भिडायचं आणि पुढे जायचं, असा हा आमीर. तरीही हे पात्र भावूक आहे. मुंबईच्या वस्तीत वाढलेल्या असंख्य मुंबईतल्या तरुणांसारखं आहे. 
‘बियाँड’मध्ये माजिदीच्या अन्य सिनेमात वापरला जाणारा नॅट साऊंड नाही, त्याची जागा ए. आर. रहमानच्या पार्श्वसंगीताने घेतलीय. हे माजिदी प्रेमींसाठी खटकणारं असलं तरीही त्यात विथ स्पेशल ‘माजिदी टच’ आहेच. ‘बियाँड’ पाहायला जाणारे माजिदीच्या सिग्नेचर स्टाइलसाठी जात असतील, तर त्यांच्यासाठी एक स्पॉयलर अलर्ट आहे. त्यात तसं काहीच नाही. हा माजिदीचा बॉलीवूडसाठी केलेला सिनेमा आहे. काही ठिकाणी खास ‘माजिदी इफेक्ट’ दिसतो, पण त्यांच्या आधीच्या सिनेमांचा तुलनेत थोडा कमी आहे. काही दृश्यांवर पक्की माजिदी छाप आहे जरूर. त्यातूनच माजिदी फॅन्सला आनंद मिळू शकतो. "मी बॉलीवूडसारखा सिनेमा बनवू शकत नाही. माझा सिनेमा इथल्या लोकांना जास्तच संथ वाटेल, पण मला तसंच माझी गोष्ट सांगायला, आवडतं. तुम्ही त्या सिनेमांत गुंतला पाहिजेत. त्यासाठी कथानक हृदयस्पर्शी असायला हवं. त्यातली पात्र लक्षवेधी हवी. ती ‘बियाँड’मध्ये आहेत. हा पात्रांचा सिनेमा आहे. त्यांच्या नात्यातला सिनेमा आहे. तरीही थोडासा बॉलीवूड टच दिलाय असं, तुम्ही म्हणू शकता. पण त्याच्याकडून हिंदी सिनेमासारख्या अपेक्षा करू शकत नाही." माजिदी पुन्हा मुंबईबद्दल बोलू लागतात. "मी जेव्हा मुंबईत भटकत असताना शहराचा अंदाज घेत होतो. मला मरीन ड्राइव्ह किंवा जुहू चौपाटी अशी पर्यटन स्थळं दाखवायची नाहीत, हे मी आधीच ठरवलं होतं. या शहरात जिथं जिथं गर्दी आहे आणि तिथं तिथं मला माझं पात्र न्यायचं होतं. काही ठिकाणी ते शक्य नव्हतं. लोकलच्या गर्दीत तर नक्कीच नाही. शिवडी, मुंबईपासून काही अंतरावर असलेलं ऐरोली, मनोरी बीच असं सर्व काही तुम्हाला दिसेल. या शहरात नवखा म्हणून मला जे काही दिसलं ते मी टिपत गेलो. सिनेमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला मुंबईची सैर घडेल. ती मुद्दामच तशी ठेवलेय. कारण, या सिनेमाचं सर्वात मोठं पात्रं हे शहर आहे. या शहराबद्दल मला एक वेगळीच आपुलकी निर्माण झालीय. मला जेवढं शक्य होतं तेवढं मी त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अनेक गोष्टी राहून गेल्यात माझ्याकडून.’


जाता जाता माजिदींनी दुभाष्याला काही तरी सांगितलं, खूप वेळ काही तरी ते त्याला सांगत होते. ते म्हणाले, "मला सत्यजित रे यांचे सिनेमे आवडतात. ‘पाथेर पांचाली’ माझा सर्वात आवडता सिनेमा आहे. रे यांच्या सिनेमातली पात्र खरी वाटतात. जणू ती तुमच्याशीच बोलतात. त्यांच्या सिनेमाचा कॅन्व्हास मोठा आहे. मला तसा सिनेमा भारतात बनवता आला तर मी स्वत:ला भाग्यशाली समजेन.’


माजिदींशी गप्पा मारताना इराणमधल्या सिनेमा चळवळीचा विषय निघणं आपसूकच होते. मोहसिन मखमलबाफ, असगर फरहादी, (ऑस्कर मिळालेले पहिले इराणी दिग्दर्शक) दिवंगत अब्बास किओरस्तमी आणि आता स्वत: माजिदी इराणबाहेरच सिनेमा करताना दिसतात. यावर माजिदी म्हणतात, "सर्वांनी आपला प्रेक्षक तयार केलाय, आता जगभरातून त्यांना मागणी येतेय, याचा अर्थ असा, की इराणी सिनेमा आमच्या माध्यमातून जगभरात पोहोचवला. पण आता जग आम्हाला नवीन प्रयोग करायला देतंय. हे विशेष आहे.’


माजिदींचे मित्र असलेले दिग्दर्शक जफर पनाही, गेली अनेक वर्षे नजरकैदेत आहेत. त्यांच्यावर सिनेमाशी संबंधित कुठलंही काम  करण्यावर इराणमध्ये बंदी घातलीय. त्यावर माजिदी म्हणतात, "कलाकार म्हणून काम करताना मला जहाल होऊन चालणार नाही. कारण माझा जीव माझ्या कलेत आहे. मला त्यातून व्यक्त होता येतं. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी थेट टीका करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही ते सांगण्याचे मार्ग बदलू शकता. जेणेकरून माझी कलाही जोपासता येते आणि आपलं म्हणणही मांडता येतं. संघर्ष अटल आहे, पण त्यातूनही मार्ग निघतो...’ 


- नरेंद्र बंडबे
narendrabandabe@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ९८२०४७००७२

बातम्या आणखी आहेत...