आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारा जुळणं महत्‍त्‍वाचं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही नात्यातल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादावर खूप काही अवलंबून असतं. कशा पद्धतीनं आपण व्यक्त होतो त्यावर ते नातं जुळणं वा न जुळणं अवलंबून असतं. पण एकदा तारा जुळल्या की, नात्यांचा सूर लागलाच म्हणून खुशाल समजा...


कानात इअरफोन घालून गाणे ऐकणारे आपण अवती भोवती पाहतो. आपणही फिरताना, प्रवासात, काम करताना, कधीही कुठेही आपल्या हवी असलेली, आवडणारी गाणी ऐकत आपला एक मूड जपत असतो, जो कदाचित आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंगांपेक्षा एकदम भिन्न असतो. गाणे ऐकता ऐकता कधी त्यात तल्लीन होतो आणि हात पाय थिरकू लागतात, कधी आपलाही सूर लागतो हे लक्षात येत नाही. कुणी तरी आपल्याकडे पाहून हसू लागलं, कुणी हटकलं की लक्षात येतं आणि आपली समाधी भंग होते.


असंच एक संगीत आपल्या आत सतत सुरू असतं. प्रत्येकाचं वेगळं, प्रत्येकाची लय वेगळी, प्रत्येकाचे सूर वेगळे, प्रत्येकाचे राग वेगळे, प्रत्येकाची शैलीही वेगवेगळी. मनातल्या या गाण्याचा त्रास तोपर्यंत स्वतःला आणि इतरांना होत नाही जोपर्यंत ते आत बारीक आवाजात सुरू असतं. पण जेव्हा तुमच्यातल्या रेडिओ, म्युझिक सिस्टीमचा ‘डीजे’ होतो आणि कोणत्याही प्रसंगात ढाणढाण वाजतो तेव्हा तो नकोसा वाटायला लागतो.


अर्थात हे गाणं म्हणजे आपले विचार आणि डीजे म्हणजे आपल्या टोकाच्या प्रतिक्रिया. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची आणि त्याला प्रतिसाद देण्याची स्वतःची एक पद्धत असते, त्यांचा एक पिंड असतो. एकसुरी, धीरगंभीर, सतत विनोद करणारे, वेगवेगळे मूड जपणारे, इतरांना पाण्यात पाहणारे, कायम खिल्ली उडवणारे, खिलाडूवृत्ती जपणारे असे अनेक प्रकारचे लोक अवतीभवती असतात. जे संयमित, विचारपूर्वक, गरज असेल तिथेच प्रतिक्रिया देतात त्यांची कुणाला अडचण नसते. मात्र ज्यांना आतल्या आणि बाहेरच्या संगीतासोबत स्वत:ला जोडता येत नाही त्यांना आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना याचा त्रास सोसावा लागू शकतो. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचं काय गाणं सुरू आहे याचा विचार न करता आपण आपलं संगीत त्याला लावत असतो अर्थात आपल्या प्रतिक्रिया देत असतो. आणि मग सगळं गाणं बेसूर होऊ लागतं. रेडिओची फ्रीक्वेन्सी जुळली नाही तर आवाज सुस्पष्ट मिळत नाही आणि ती खरखर आपण सहन करू शकत नाही अशीच काहीशी अवस्था नात्यांमध्ये आपल्या प्रतिक्रियांमुळे होते.


प्रत्येक व्यक्ती आपल्या लयीत रोजचे काम करत असते, त्याचा क्रम ठरवलेला असू शकतो. जसे सकाळी घाईची वेळ असते एखाद्या स्त्रीला पटकन आवरून कामाच्या ठिकाणी  पोहचायचे असते. ती तिच्या गतीने काम आटोपत असते, घरातले इतर सदस्य देखील त्यांच्या त्यांच्या लयीत काम करत असतात. मध्येच कुणीतरी काहीतरी सूचना देतं, क्रम बदलतो, लय बिघडते, नवीन काम अंगावर पडतं. सगळे एकमेकांची लय बिघडवत राहतात. पण पुन्हा त्या लयीशी जुळवून घेतलं जातं आणि कामं पूर्ण केली जातात. हे रोजचं आहे, हा दिनक्रम असतो आणि समोरून येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रतिक्रिया संयमित आणि आवश्यक असल्याने त्या खटकत नाहीत. त्याचा त्रास होत नाही. मग त्रास कधी होतो? सतत एकसुरी येणाऱ्या, नन्नाचा पाढा असणाऱ्या, नकोशा वाटणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया वर्षानुवर्षं मिळत राहतात तेव्हा त्यांचा त्रास होऊ लागतो. कुणी दिवसरात्र फक्त ढिनचॅक किंवा फक्त दर्दभरी गाणी असं एकाच मूडचं गाणं ऐकत बसत नाही ना? एका विशिष्ट कालावधीनंतर ते नकोसं वाटू लागतं तसेच प्रतिक्रियांच्या बाबतीतही असतं.


बऱ्याच व्यक्तींना प्रतिक्रिया देण्याची खूप घाई असते, समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण होण्याआधी, समजून घेण्याच्या आधीच ते प्रतिक्रिया देतात. शाब्दिक आणि अशाब्दिक दोन्ही प्रतिक्रियांच्या बाबतीत हे लागू होतं. हे फक्त घरीच होतं का? तर नाही. कामाच्या ठिकाणी, बाहेर, मित्रमंडळी कुठेही अशा प्रतिक्रिया दिल्या जातात आणि त्रासासोबत अशा अनावश्यक प्रतिक्रिया खूपदा अंगलट देखील येतात. मुलेही खूपदा आईवडलांना खूप गोष्टी न सांगता करत असतात कारण त्यांच्याकडून सतत हे करू नको, इथे जाऊ नको, हे खाऊ नको, याच्यासोबत राहू नको, असंच ऐकायला मिळत असतं. काही सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याचं बोलणं पूर्ण ऐकून न घेता मध्येच खोडून सूचनात्मक प्रतिक्रिया दिल्या जातात. सततच्या नकारात्मक प्रतिक्रिया कोणत्याही नात्यात अंतर निर्माण करतात. घरात एखादी व्यक्ती सारखी नकारात्मक प्रतिक्रिया देणारी असेल तर त्या व्यक्तीजवळ मन मोकळं करणाऱ्यांची संख्या नगण्य असते, त्या व्यक्तीशी कामापुरता संवाद साधण्याकडे जास्त कल असलेला दिसून येतो. अति काळजी करणाऱ्या, अति विचार करणाऱ्या, घाबरणाऱ्या, भीतीतून नकारात्मक सूचना देणाऱ्या, शीघ्रकोपी व्यक्ती त्यांच्या सततच्या नको वाटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे कंटाळवाण्या, नकोशा वाटायला लागतात. 


हे सगळं कुणी मुद्दाम करत नसतं, बऱ्याचदा व्यक्तीच्या नकळत होतं.  प्रत्येकाने स्वतःच्या प्रतिक्रियांचं थोडं निरीक्षण करून बघायला हवं. आपल्याकडून वारंवार एखाद्या गोष्टीसाठी कशा प्रतिक्रिया दिल्या जातात. त्याची तीव्रता खूप आहे का? आपल्या प्रतिक्रियांना समोरून कसा प्रतिसाद येतो, त्या जर नकारात्मक असतील तर त्यात बदल करता येईल का, याचा विचार केला जावा. आवाजाची, शब्दांची तीव्रता कमी करता येईल का, धारदार शब्द बदलून त्या जागी सौम्य शब्द वापरता येतील का, याचा विचार करावा. शब्दांना जोडले गेलेले अर्थ जास्त परिणामकारकतेने टोचतात, लक्षात राहतात. त्यामुळे शारीरिक आणि शाब्दिक दोन्ही प्रतिक्रिया देताना जरा थांबून विचार केला गेला पाहिजे. एकसुरी प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यात कसे न कुठे बदल करता येतील, हे आपल्या पातळीवर शोधलं गेलं पाहिजे, कारण आपण दिलेल्या प्रतिक्रियेवर समोरच्या व्यक्तीचा प्रतिसाद अवलंबून असतो.

 

-डॉ. निशिगंधा व्यवहारे, औरंगाबाद
v.nishigandha@gmail.com

बातम्या आणखी आहेत...