आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानवाटेवरचा तुका!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कविता काय करते तर प्रसिद्धी देते, अाजकाल थाेडा पैसासुद्धा देते, पण कविता जीवनाचा उद्धार करते, असे जर काेणी म्हणत असेल तर अापल्याही भुवया उंचावतात. असंच म्हणणारा एक बाेलीभाषेतील रानकवी तुकाराम धांडे! नावातच तुकाराम असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान. ‘रानावनातले माझे शब्द, मी तसेच व्यक्त हाेणार ते कळाे वा न कळाे, पण माझ्या भावना माझ्या देहबाेलीतून, कळकळीतून कळल्या तरी माझे शब्द अचूकपणे पाेहाेचणारच...’ असा िवश्वास ठेवत गेल्या ४० वर्षांपासून डोंगरदऱ्यातील शब्दांचा साज लेवत त्यांची कविता फुलत गेली अाणि महाराष्ट्राचे काय पण देशात जिथे जिथे मराठी माणूस अाहे तिथे त्या कवितेने काव्यरसिकांचा ठाव घेतला ... 
 

पाेरं डाेंगराव भाळली, त्याच्या नादी लागुनिया 
अाख्या रानात पांगली, रानगवताची फुलं 
तिच्या कानामंदी डुलं, अन् जाईचा माेहर 
गळ्यामंदी ग सर... 
अहाे टनटनी फुलली, तिच्या नाकामंदी फुली 
अन् बुरांडीची फुलं, ितने केसात माळली 
पाेरं डाेंगराव भाळली... 


...अशा रानवट कवितांमधून तुकाराम धांडेंच्या राेजच्या जगण्यातले शब्द, जेव्हा प्रकट हाेतात, तेव्हा ती कविता अधिक अापलीशी वाटते. अत्यंत साधी राहणी, पायजमा, पांढरा शर्ट, केस थाेडे वाढलेले, दाेन्ही बाजूंनी वर गेलेले (अब्दुल कलामांसारखे!) पायात चप्पल अाणि खांद्याला शबनम किंवा एखादी जुनी पिशवी असा हा कवी रानवाटा धुंडाळताे अाणि जगण्याचं मर्म शाेधत कडेकपाऱ्यांचा हाेऊन जाताे. एखाद्याच्या घरातच कविता असते, म्हणून ती पुढे येते, असं म्हणतात, पण तुकारामदादांचं तसं नव्हतं. ते म्हणतात की, घरात वातावरण अध्यात्माचं अाणि गावात लहानपणापासून तमाशा. अशा दाेन टाेकाच्या गाेष्टींचा मनावर संस्कार हाेताेच की. किंबहुना याच गाेष्टींमध्ये अाम्ही ठेचकाळत रडलाे, हसलाे, पडलाे अाणि शिकत गेलाे. सकाळी कीर्तनं एेकली, तर रात्री तमाशातला वग एेकायचाे. तेव्हाचे वगही खूप काही शिकवून जायचे. त्यावेळी व्यक्त हाेण्याची ही जवळची साधनं हाेती. तीच अाम्ही अापलीशी वाटायची. तेव्हाचं वाटायचं की, अापल्याला काहीतरी जमतंय. मात्र लिहिलं, तेव्हा नव्हतं. 


पण अशा वातावरणातून अापल्यावर जे संस्कार हाेत असतात त्यातून माणूस घडत असताे हे कळू लागलं हाेतं.  अामचं शेतावर प्रचंड प्रेम, काडीकाडीवर प्रेम, यावरूनच तुमच्या बाेलण्यात जसे काही शब्द येतात, तसे अामच्या बाेलीतले काही शब्द अाहेत, ते अामचे शब्द अाहेत. इरनं, अावनी, इरन्याखाली डालून असे जे शब्द अाहेत, ते माझ्या कवितांमध्ये अापसूकच यायला लागले. वर म्हणायचं असेल तर फक्त व म्हटलं जायचं. खाली म्हणायचं असे तर खालल्या अांग असं अाम्ही म्हणताे. त्यानं फरक काहीच पडत नाही. पण ती भाषा माझ्या रानावनातल्या, काट्यकुट्यातल्या माणसांना अापली वाटते. नाहीतर त्यांना काय माहिती कविता म्हणजे काय? पण त्यांच्या भाषेत त्यांना काही एेकवलं. तर त्यांना हा काहीतरी सांगताे अाहे एवढी तर कळतं, नव्हे कळलं अाणि हेच माझ्यासाठी खूप हाेतं. 

 
एरवी, माझ्या कवितांमध्ये भाषा अाणि शब्द मी जे वापरताे, ते माझ्या अाईचे अाहेत असं मला नेहमी वाटतं. कारण तिच्याबराेबर शेतात, रानावनात काम करताना तिचं बाेलणं, त्यातून येणारे शब्द, तीची वेगळी बाेलीभाषा हे कायमच कानावर पडत हाेते अाणि तेच माझ्या कवितेतून प्रकटले, असं मला वाटतं. माझी ही भाषा अाहे त्यातून मी व्यक्त हाेताे. अाता ते शब्द लाेकांना अावडले, हे माझं सुदैव. नसते अावडले, तर माझी कविता राहिली असती, माझ्या घराच्या एखाद्या काेनाड्यात. मला काहीच वाटलं नसतं. 


खरं तर लाेकांना माझी कविता अावडावी, त्यांनी ती डाेक्यावर घ्यावी, असा माझा प्रयत्न कधीच नव्हता. असं म्हणतं, तुकारामदादा मग टेकडीवरच एखादा दगूड बघून अापन इथच बुडं टेकू अन् गप्पा मारू म्हणतात... स्वत:च अाधी बसतात अाणि मग त्या टेकडीवरच सुरू हाेते, बाेलीभाषेची एक शब्दमैफल. 


दादा पण अशा वातावरणात कविता अालीच कशी, यावर ते म्हणतात की, मलाबी नाही माहिती पण, काॅलेजला असताना नाटकात-बिटकात मी काम करायचाे. अभ्यासही बरा हाेता. बाेलण्याची एक लकब, शब्द जाऊ द्या पण, अापण जे बाेलताेय, ते काळजापासून बाेलावे म्हणजे एेकणाऱ्याच्या थेट काळजात पाेहाेचते हे काहीतरी कळलं हाेतं. ‘नटसम्राट’ वगैरे केलं मी त्या काळात, दादा अभिमानाने सांगतात. तेव्हा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावतो. पुढे ते म्हणतात, शिक्षकांना ते अावडलं अाणि मग मलाही ते नाटकात-बिटकात घेऊ लागले हाेते. मुलींना माझं बाेलणं फारच अावडायचं. त्यात काही कविता नव्हती. पण काहीतरी असं बाेलायचं की, त्या एकदम फिदाचं. कारण, त्या बाेलण्यात राताेरात चंद्राच्या उजाडात जागून काढलेल्या रात्री हाेत्या. डोंगरमाथा हाेता. अाभाळ, धरती, पृथ्वी, कडेकपार असं सगळं हाेतं. मी दाेस्तांसह एवढा डाेंगरवाटा धुंडाळल्या अाहेत की, फक्त नजरेनं काेणत्या झाडाला काय म्हणतात अाणि त्याचा उपयाेग काय? हे सांगू शकताे. संस्कृतमध्ये वा तुमच्या भाषेत पंचतत्व असतीलही पृथ्वी, जल वायू वगैरे, पण अामचे तत्वज्ञान अामच्या डाेंगरवाटा, अाभाळ, झाडंझुडपं अन् अाख्खा निसर्गच अाहे. पण, पुढं असं लक्षात अालं की, निसर्गाबद्दल खूप-खूप अालं अाहे. प्रेमकविता, निसर्गकविता खूप वाचल्या अाणि खूप जणांनी लिहिल्याही. पुढे त्या विसरल्याही गेल्या. त्यात नुसती हिरवळ, झुळझुळ झरे अाणि बटा, पदर अाला. माझ्या बाेलीभाषेतून मी वेगळं वर्णन करूच शकताे, मी वेगळा व्यक्त हाेऊ शकताे हेे मला बीएत असताना प्रकर्षाने कळलं. हिरवळ अन् झुळझुळ झऱ्यांच्या पुढेही निसर्ग असताे हे जाेपर्यंत कळत नाही ताे पर्यंत तुमचे हे जागतिक शांतता-बिंतता चाललेले प्रयत्न अाहेत त्याचा काहीच उपयाेग नाही असं मला नेहमीच वाटतं. मानवजात विनाशाच्या टाेकावर येऊन पाेहाेचली अाहे. वाऱ्याच्या छाेट्या झुळूकीनहीं नष्ट हाेऊ असं सगळं सुरू अाहे. निसर्गातील हे जे काही सगळं दिसतं, त्याच्या सहित अापण अाहाेत, हे अापण कधी स्विकारणार अाहाेत. स्विकारणार अाहाेत की, नाही की सिमेंटच्या जंगलात स्वत:चाच ऱ्हास करून घेणार अाहाेत. म्हणूनच मला एकट्यालाच नाही जगायचंय, सगळ्यांना घेऊन जगायचं अाहे. जिथे अापण जन्माला येताे, तिथला निसर्ग हा त्याला पाेसायला समर्थ असताे. म्हणूनच हा ऱ्हास हाेऊ नये, त्यासाठीच माझ्या शब्दांचा, भाषेचा मी अधिकाधिक प्रयत्न करत असताे. ताे कसा, तर भाषा ही संवादाचं माध्यम अाहे, अादान-प्रदानाचं माध्यम अाहे. ती वापरली, त्यातून अापण काही चांगलं सांगू शकलाे तर काहीतरी उपयाेग हाेईल म्हणून मी प्रमाणभाषेत कविता लिहिणं प्रकर्षाने टाळताेच, असं तुकारामदादा ठामपणे सांगतात. तेव्हा ते अापल्यालाही पटू लागतं.   


याबद्दल ते एक किस्सा सांगतात. एकदा मी अादिवसी, ठाकरी भाषेत काॅलेजात एक नाटुकली केली हाेती. ती काॅलेजातच नव्हे तर बाहेरही प्रचंड गाजली. मग फक्त तेवढ्यासाठी मला पंचक्राेशीतून बाेलवणं येऊ लागलं. हे का घडलं की, त्यांच्या भाषेतील व्यथा, वेदना मी मांडली ती मुळात त्यांना स्वत:ला कळली म्हणून त्यांना अावडू लागली म्हणण्यापेक्षा अापल्या भाषेतूनही काहीतरी माेठ्या लाेकांपर्यंत पाेहाेचू शकत याची त्यांना जाणीव झाली, यातच माझं जिंकणं अालं. अापल्या भाषेत, शब्दांमध्ये अापण व्यक्त झालाे की, ते जास्त भिडतं या मताचा मी अाजही अाहे. 


हीच बाेलीभाषा अाणि माझे रानावनातले शब्द घेऊन मी मराठी मातीच्या कान्याकाेपऱ्यात गेलाे, कनार्टक, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात यासह जिथं जिथं मराठी माणूस अाहे तिथं तिथं गेलाे. त्यांना माझी कविता एेकवली अाणि त्यांना ती कळली. शब्द वेगळे असूनही त्या शब्दांमधील भावना कळल्या. गंमत सांगताे, एकदा मुंबईत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बहुभाषी कवी संमेलन हाेतं. मला वाटलं नेहमीप्रमाणे मराठी, हिंदी, उर्दु कवी असतील. जाऊन बघताे तर तिथं इंग्रजी, जर्मनी अाणि अशा काेणत्या-काेणत्या भाषेतील कवी अाणि मराठीचा मी! अाता काय यांना कळणार वा मला तरी त्यांच काय कळणार. पण तरी त्यांनी माझ्या कवितेचा उदाेउदाे केला. काहींनी तर मला मिठीच मारली. हे कशामुळं झालं. तर बोली भाषेतल्या शब्दांमुळं अाणि ते व्यक्त हाेण्याच्या अविर्भावामुळं.  


असं सगळं नाॅनस्टाॅप तुकारामदादा बाेलत राहतात. अापण मध्ये काहीच बाेलायचे नाही. त्यांचं भाषिक तत्वज्ञान अाणि बाेलीभाषेतील शब्दांचं प्रेम किती बाेलू अाणि किती नाही असंच असतं. ते थांबले की, उगीच काहीतरी विचारावं की, दादा मग कवितेचा पहिला कार्यक्रम कधी केला. मग पुन्हा ते भूतकाळात जातात अाणि पहिला कार्यक्रम देवीच्या वणीला केला. ९०ची गाेष्ट असेल ही. अामचे कवी स्व. कैलास पगारे यांनी मला एकदा इगतपुरीला पाहिले हाेते, त्यामुळे त्यांनी मला त्या कार्यक्रमाला निमंत्रित केले हाेते. त्या कार्यक्रमानंतर मग मी अाजपर्यंत कार्यक्रम करतोच अाहे अाणि माझी बाेलीभाषेतील कविता लाेकांना एेकवताेच अाहे. त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले, पण मला माझ्या मातीत माझ्या अाजुबाजूच्या संस्थांनी, लाेकांनी दिलेले पुरस्कार खूप जवळचे वाटतात. त्यांनी जर त्यावेळी माझी कविता नाकारली असती, तर मग हे रानावनातले शब्द पुढे अालेच नसते. त्याहीपुढे जाऊन मला असं वाटतं की, निसर्ग हाच सगळ्यात माेठा पुरस्कार अाहे. निसर्ग साेडला तर बाकी सगळं भंकस वाटतं असं ते जेव्हा उद्विग्नतेनं म्हणतात, तेव्हा अापणही विचार करायला लागताे. 


तर माझ्या कार्यक्रमांच्या दरम्यानच एक गाेष्ट घडली. दादा पुन्हा सांगू लागतात. मी कामाला लागलाे, बीए झालाे अाणि लग्न झालं हे सगळं एकाच वर्षी झालं. महिंद्रा कंपनीत नाेकरी करताना शरीर मशीनवर काम करायचं, पण मन निसर्गात हिंडायचं. ३०-३५ वर्ष नाेकरी केली. मुलगा माेठा झाला अाणि दिली नाेकरी साेडून. कशासाठी फक्त निसर्गात हिंडण्यासाठी, छान-छान कविता करण्यासाठी अाणि त्या अापल्याच ‘स्टाईल’मधी लाेकांना एेकविण्यासाठी! पण त्याआधी थाेडे कष्ट पडले. नाेकरी टिकवायची हाेती. ती जगण्याची गरज हाेती. घराकडं लक्ष द्यायचं हाेतं. तीन मुली, एक मुलगा हाेेता. कारव्हीच्या काड्यांचं एक झाेपडं बनवलं, त्याच्यातच राहिलाे. थाेडं स्थिर-स्थावर हाेईपर्यंत, कंपनीतील कामाशिवाय काहीच करता येत नव्हतं. काम करायचाे पण विचार मात्र कविता, शब्द, भाषा, निसर्ग यांच्यात रमलेलं हाेतं. हळुहळू स्थिरावलो अाणि दिलं काम साेडून अाता करताे कविता. 


दादा ‘करताे कविता’ असा शब्द वापरतात. अापण मात्र ‘लिहिताे, कविता’ असे म्हणताे. यावर मुद्दामच, मग दादा तुम्ही कविता लिहित नाही का असं विचारल्यावर ते म्हणतात की, गरजच पडत नाही. सगळी चाेपडी मनात तयार असते, ना. सगळ्या कविता ताेंडपाठ असतात. पेन घ्या, चष्मा घ्या, कागद घ्या, हे सांगितलंच काेणी? एखाद्या कार्यक्रमानंतर काेणीतरी येतं की, तुमची कविता लिहून द्या म्हटल्यावर मी थरथरत्या हातानं ती लिहून द्यावी लागते. त्याला फार वेळ लागताे पण. पाठ असली की, ती अशी अापाेअाप अाेठावर येते. मग तेव्हा टीकाही हाेते की, काय कवी अाहे एवढी सुंदर कविता पण, साधी लिहूनही ठेवत नाही. पण, अापण कधी टीकेची वा समीक्षेची पर्वा केलीच नाही. काेणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. अापण अापल्या काळजात साठवलेलं असतं, ते व्यक्त करायचं. बस. एवढं ठरवलं. 


समीक्षेकडे थाेडं दुर्लक्ष केलं म्हणूनच माझी एक कविता तिसरीच्या पुस्तकात पाच वर्षांपासून अाहे. तर दुसरी एक कविता नववीच्या पुस्तकात अाहेत. दाेन्ही बाेलीभाषेतील निसर्ग कविता अाहे. फ्रान्सिस दिब्रीटाे, रा. रं. बाेराडे यांनी माझे कार्यक्रम पाहिले हाेते. त्यांना वाटलं की, या कविता मुलांनी शिकल्या पाहिजे म्हणून त्या पुस्तकात अाल्या. अापण काही वेगळे प्रयत्न केले नाही. मुळात मी कवितेसाठी वेगळे प्रयत्न करत नाहीच. खडपटी, वशीले सांगितले काेणी. तिसरीच्या पुस्तकात जी कविता अाहे, त्याच्या पुढचा भाग म्हणून थाेडी प्रगल्भता आलेली कविता अापल्याला नववीच्या पुस्तकात दिसते. एवढचं नाही तर माझ्यावर, माझ्या कवितांवर पाेरं पीएचडी करतात. पुणे विद्यापीठातून ‘वळीव एक अाकलन’, ‘तुकाराम धांडेंच्या कविता अाहेत की, अात्मकथन?’ या विषयांवर मुलांनी अभ्यास केले अाहेत. हेच माझ्या कवितांसाठी पुरस्कार अाहेत. माझ्या कवितांसाठीच नाही, तर त्यातील बाेलीभाषेसाठी, शब्दांसाठी हाच दागिना नाही का? अाणि एका व्यक्तीनं मला खूप माेठं केलं. ते म्हणजे, रामदास फुटाणे. त्यांनी माझी कविता अाेळखली अाणि जवळपास सगळ्याच कार्यक्रमांना मला ते साेबत घेऊन जाऊ लागले. त्यांच्याबराेबर मी जेव्हा जायला लागलाे, तेव्हा त्यांनी माझी सर्वप्रथम अाेळख करून दिली की, अाता मी तुम्हाला भेटवणार अाहे एका अाेरिजनल माणसाला. असा हा ‘अाेरिजनल माणूस’ त्यानी सर्वत्र फिरवला अाणि त्याची भाषा, भावना, शब्द, प्रश्न, अडचणी सगळं सगळं व्यक्त करायला जागा दिली. 


एवढं सगळं बाेलून झाल्यावर एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटला ताे मी विचारला, अाणि त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं... दादा मला सांगा की, कवितेनं तुम्हाला काय दिलं? दादा म्हणतात, कवितेनं माझा उद्धार केला. अहल्या िशळा हाेती ही पुराणकथा अापल्याला माहिती अाहे. नंतर तिचा उद्धार झाला. तसंच जन्माला येऊन प्रत्येकाचा उद्धार व्हावा तेच माझं झालं कविता केली अाणि प्रश्न मांडले, काही साेडिवण्याचा प्रयत्न केला. माझाच नाही तर अवघ्या अादिवसी, ठाकर बांधवांचा उद्धारच झाला. अादिवासींच्या मूळ पराचा उद्धार झाला. मी सांगताे की भविष्यात जेव्हाही अादिवसींचा प्रश्न पुढे येईल, त्यांच्या साहित्यावर बाेललं जाईल तेव्हा माझ्या या रानकवितांचा नक्कीच उल्लेख हाेईल. त्यांच्या नैसर्गिकपणाचा ताे दस्तावेज असेल, याचा मला ठाम विश्वास अाहे असं ते गर्वाने सांगतात, तेव्हा पुन्हा वेगळ्या वेशातला तुकारामच भेटल्याची अनुभूती आपल्याला होते. 


कवितेमुळे गावात पाणी
तुकाराम धांडेंची ‘साहेब’ ही कविता अत्यंत लाेकप्रिय अाहे. याबद्दल ते सांगतात की, ‘साहेब’ ही कविता मी, गेल्यावर्षी मराठीदिनाच्या एका कार्यक्रमात सादर केली हाेती. माेठं हाेतं सगळं. माेठ हाॅटेल, स्विमिंग करायचं पानी-बीनी. तिथंच ताे कार्यक्रम हाेता. तिथं उद्धव ठाकरे, अादेश बांदेकर, शिवतारे वगैरे मंडळी हाेती. मी ‘साहेब’ ही कविता त्याच जाेशात सादर केली. माझ्यापासून उद्धवजी जरा लांब बसलेले हाेते. कविता संपल्या-संपल्या त्यांनी माझी विचारपूस केली. लगेच अापल्या लाेकांना सांगून अामच्या गावात पाणी यावं, या कामासाठी लगबग सुरू झाली. अादेश बांदेकरांचा फाेन अाला. पुन्हा काम सुरू झालं. बास मला काहीच नकाे हाेतं. माझ्या गावातल्या बाया, पाेरंसाेरं,  म्हातारी, काेतारी यांची वणवण थांबवायची हाेती. अाता ती लवकरच थांबेल. ते फक्त एका कवितेमुळे! याचाचा अानंद अाहे. अशी अापली, अापल्या भाषेतील कविता अापला उद्धार करत असते, ती अशी... 


साहेब
साहेब 
अाव,  इठ कह्याचा देस धरम अन् जातपात 
इठ मरणासी अाट्यापाट्या खेळत 
पाणी गवसीत फिरणं 
अन् पाण्यासावाचून मरणं 
हीच इठली रितभात 
हाऽऽऽ डाेंगर 
त्येच्या पाठीमागय डाेंगर 
त्याेच्या ह्या अंगाय डाेंगर 
इठून तिठून डाेंगरच डाेंगर 
अन् त्यांच्या सावलीत इावलेल्या 
ह्या उघड्या बाेडक्या खाेल खाेल दऱ्या 
हे खाचखळगे, हे उंचवटे 
अन् हे सगळं दगड गाेटे 
हाच अामचा देस 
काेरडा खडखडीत 
इठला पावसाळा अाम्हाला 
अापटून धाेपटून काढताे 
अन् अाठ महिनं खडकावं वाळात घालताे 
लई तरास व्हताे साहेब 
अंगाची लाही लाही व्हते 
घशाला काेरड पडते 
जीव असा घाबर गुबरा व्हताे 
तव्हा इथला एखादा माणूस उंबराच्या झाडाच्या मुळीला 
अस्सा सिपला मारताे 
अन् खाली वाटी धरताे 
घटकाभरानं ते उंबराचं झाड 
वाटीभरून पाणी देतं 
अन् तेच अामचं देव व्हऊन जातं साहेब 
कारण इठ पानी देई 
ताे देव व्हईल अशी रित हाये 
अजून एक गाेट सांगतू साहेब 
ह्या इठ, डाेंगराच्या त्या अंगा 
सर्वतीरीथ म्हणून एक गाव हाये 
तीठ मरणाच्या दारात घुटमळराऱ्या 
अन् पाण्यासाठी तडफडणाऱ्या जटायूसाठक्ष 
परभू रामचंद्रानं भुईत बाण मारुन 
पाण्याच्या चिळकांड्या उडवल्या 
जटायूला लय बर वाटलं 
अन् राम म्हंजे लई माेठा माणूस 
म्हंजे देव माणूच 
हे अाम्हालाही पटलं 
जाऊंद्या साहेब ती लई जुनी गाेट झाली 
पण, अाता... या कलियुगामंदी... तुम्ही 
त्या तिकडच्या धरणातून 
लिफ्टाना पाणी उचलून 
पईपातून,  नळ ातून कह्यानाच का व्हईना 
या डाेंगराच्या मध्यापर्यंत अाणून साेडलं 
अन् एखाद्या कपारीतून भका भका बहेर साेडलं 
ते तुम्ही रामपेक्षाय माेठ व्हऊन जाल 
राहता राहीली मतांची बात 
त हा लक्ष्मीचा चारा हाता घेऊन सांगतू साहेब 
असं जर झालं ना! 
न इठली उघडी नागडी पाेरंसाेरं 
यड्या धह्या बायाबापड्या 
डाेईवर हात ठिऊन अाभाळ न्याहाळणारी 
म्हतारी काेतारी माणसं 
इतकंच नहीं तर या डाेंगराच्या अंगाखांद्यावर खेळणारी 
मुकी जनावरं अन् रानपाखरं 
या सगळेंची लाख लाख मतं 
तुम्हालाच मिळतील साहेब तुम्हालाच मिळतील... 


भूक
भूक मोडून-तोडून दिली रानात टाकून 
तव्हा तिला आलं कोंब सा-या कंदमुळातून 
उन्हातान्हात फिरता भूक झाली काळी निळी 
तव्हा रानात पिकल्या जशा करवंदी जांभळी 
असं अनवाणी पाय काटकुटं मुकं घेती 
तव्हा रानमाळावर त्यांची रानफुलं व्हती 
सारं रान धुंडाळता रात पडली पडली 
तव्हा अख्ख्या उजेडाची आभाळात फुलं झाली 
चांदव्या रं मह्या राजा तुव्हा चांदीचाच तोडा 
पहे कसा उजळला उभ्या डोंगराचा कडा 
लई मायाळू खडक देई मायेचा निवारा 
वर कासवाची पाठ पुढं अमृताचा झरा 
कोण खातो त्या भुकेला पोट भरलं भरलं 
मह्या डोंगरराजानं मला पोटाशी धरलं. 

- तुकाराम धांडे, 
इगतपुरी, नाशिक 
मोबाइल : ९८९००७४८९६ 

 

- पीयूष नाशिककर 
piyushnashikkar@gmail.com 
लेखकाचा संपर्क : ७७७००५९००९ 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...