आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक ठिणगी पुरेशी आहे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसपासचं वातावरण नुसतंच राजकीय नव्ह,े तर जहरी राजकीय बनलं आहे. या वातावरणाचा ताबा ठिकठिकाणच्या झुंडींकडे गेला आहे. कडव्या राष्ट्रवादाचा जयजयकार करणाऱ्या या झुंडींचं वर्तन दहशत निर्माण करणारं असलं तरीही यातून जनता निडर होत जाणार आहे... 


धाय मोकलून रडले मी 
अख्खं घर रडलं गदगदून
वस्तूंनाही फुटला पाझर 
हुंदके आवरेनात
म्हणून भिंतीत तोंड खुपसलं 
अ-वस्तूंनी


माझ्या ‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ कवितेतल्या या ओळी. परवापासून मला पुन्हा पुन्हा आठवत आहेत. कल्याणला एका वैयक्तिक कामासाठी गेले असताना काम लांबलं म्हणून मुक्काम करावा लागला. सकाळचं कॉलेज गाठण्यासाठी सात - सव्वा सातच्या सुमारास ठाण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये चढले. जिना उतरता उतरताच, जो डबा समोर आला त्यात घाईघाईने शिरले. पारसिक बोगद्याच्या जरा अलीकडे नेहमीप्रमाणे ट्रेन मुंब्र्यातून जाऊ लागली, तसा अचानकच डब्यामधल्या लोकांनी ‘श्री राम जय राम जय जय राम’चा जोरजोरात घोष सुरु केला. मग ‘वंदे मातरम’चा राउंड झाला. त्यानंतर लगेचच ‘जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल, वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह’ म्हणून झालं. तोवर ट्रेन पारसिक बोगदा निम्म्याहून अधिक पार करून पुढे आली होती. घोषणा थांबल्या. पण आता माझ्या मनात मात्र ‘जय भीम’, ‘अल्लाहू अकबर’, ‘हिंदू-मुस्लिम सिख-इसाई, हम सब बहन भाई’ आणि ‘जय भारत’ अशा घोषणा आलटून पालटून उमटू लागल्या. उमटल्या तशा पटापट विरूनही जाऊ लागल्या. यातली एक जरी घोषणा मी दिली, तर या अंधारातच आपल्याला गाडीतून बाहेर फेकून दिलं जाईल, या विचाराने मी जागच्या जागी थिजून गेले. ओठ घट्ट मिटून घेत तशीच उभी राहिले. तेव्हा एका अनामिक भीतीने माझ्या मनाचा कब्जा घेतला होता.


बोगद्यातून बाहेर पडल्यावर त्या मॉबकडे मी थोडं नीट लक्ष देऊन पाहिलं. सुशिक्षित आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय तरुण व मध्यमवयीन पुरुषांचा तो मॉब होता. मुख्यत्वे मराठी आणि गुजराती भाषिक. त्यांच्यात एकही शीख व्यक्ती  नव्हती. एकाच्या बोटाला सात-आठ वर्षांची एक लहानशी मुलगी. भोवतालचे सगळे तिची काळजी घेणारे. घोषणा संपल्यानंतर आधीसारखेच हास्यविनोद सुरू झाले. मॉब नॉर्मल झाला, पण मला का कुणास ठाऊक त्या मुलीत कठुआची बलात्कारपीडित कोवळी पोर दिसू लागली. सोबतच्या मुलीचं संरक्षक कवच बनलेली ही सगळी माणसं, जर ती मुलगी काश्मिरी मुस्लिम असती आणि लोकलमध्ये चुकून एकटीच शिरली असती, तर कशी वागली असती? नुसत्या कल्पनेनेच माझ्या जीवाचा थरकाप उडाला. घसा कोरडा पडू लागला. हातापायांना दरदरून घाम फुटला. लोकल ट्रेन ठाणे स्टेशनला लागताच मी त्वरेने बाहेर पडले. सरकत्या जिन्याने (एलिव्हेटर) वर सरकू लागले. त्या मॉबमधले दोघे तिघे काही पायऱ्या सोडून माझ्या पुढेच होते. बहुधा रोजगाराच्या ठिकाणी निघाले असावेत. आपण भारतातल्या एलिव्हेटर वरून वर सरकत नसून सिरीया, अफगाणिस्तानच्या एलिव्हेटरवरून सरकत असल्याचा भास मला होऊ लागला. खरोखर हा देश आपला राहिला आहे का, असा प्रश्न तीव्रपणे टोचू लागला. रिक्षातनं घरी पोहोचेपर्यंतचं अंतर कसं आणि कधी संपलं हेही मला कळलं नाही. घरात शिरताच, माझे डोळे घळाघळा वाहू लागले. हमसून हमसून रडत राहिले मी कितीतरी वेळ...


केवळ सहा वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाने तब्बल २८ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली म्हणून कोर्टातच हमसून हमसून रडणाऱ्या गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी आज आनंदाश्रू ढाळत आहेत. गुजरातमधील २००२च्या मुस्लिमविरोधी जनसंहारात नरोडा पाटिया (९७ हत्या) व नरोडा गाम (११ हत्या) या दोन नृशंस हत्याकांडाच्या ‘मुख्य सूत्रधार’ ठरलेल्या माया कोडनानी यांना गुजरात उच्च न्यायालयाने आता थेट ‘निर्दोष’ घोषित केलं आहे. राजकारणात त्यांचं तातडीने पुनर्वसन करण्याचं सुतोवाच भाजपने लगोलग करून टाकलं आहे. अजमेर-दर्गा बॉम्बस्फोटप्रकरणी गेल्या वर्षी आणि हैदराबादच्या मक्का मशीद बॉम्बस्फोट घडवण्याप्रकरणी या वर्षी स्वामी असीमानंद यांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त ठरवलं आणि भाजपने त्यांच्यावर पश्चिम बंगालमधल्या प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. तर मालेगाव बॉम्बस्फोट घडवणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नऊ वर्षांनंतर जामीन मंजूर केला, तेव्हा साध्वींचे मेहुणे भगवान झा यांनी या मुक्ततेचा आम्ही कुटुंबीय देशभरात उत्सव साजरा करू असं उच्चरवात घोषित केलं आहे. एकूणात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना रडवणाऱ्या कायदेशीर प्रक्रियांचं बालंट काढून घेऊन या गुन्हेगारांना २०१९च्या निवडणुकीच्या प्रचारात सुहास्यवदनाने तसंच राणा भीमदेवी थाटात उतरवणं हे कार्य सत्ताधारी पक्ष न्यायालय यंत्रणेला हाताशी धरून पद्धतशीरपणे करत आहे.  याच धोरणाची दुसरी बाजू म्हणजे आपल्या विरोधकांना हसण्यापासून परावृत्त करणं, इतकंच नव्हे. तर त्यांना अत्यंत तकलादू कारणं देत ताब्यात घेणं, तुरुंगात डांबणं, त्यांचा अनन्वित छळ करणं आणि अखेरीस त्यांना जेरीस आणणं अशी आहे. रेणुका चौधरी यांचं हास्य-प्रकरण आपल्या सर्वांच्या स्मरणात आहेच...


स्थळ : भारतीय संसद. काळ : एकविसावं शतक. प्रसंग : गेल्या चार वर्षातल्या आपल्या अभूतपूर्व, अजोड कार्याविषयी सातत्याने पंतप्रधान देत असलेल्या अनेक भाषणांपैकी एक भाषण सुरू आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी याही भाषणात एक नवी पुडी सोडली. ‘आधार’ची मूळ संकल्पना लालकृष्ण अडवाणी यांनी मांडली होती असं ते म्हणाले. खरं तर सगळं आपल्यापासून व आपल्यामुळेच सुरू झालं आहे असं मानणाऱ्या या पंतप्रधानांनी हे विधान करणं म्हणजे, आश्चर्यच! पण तरी त्यांनी ते केलं. याचं कारण गुजरातच्या निवडणुकीत अशाच आणखी एका संकल्पनेने -  जीएसटीने त्यांना अक्षरशः घाम फोडला होता. इतका की गांधीनगरच्या निवडणूक सभेत बोलताना त्यांनी आपल्या प्रिय ‘व्यापारी भाईयो'ना उद्देशून म्हटलं होतं, ‘मी एकटा जीएसटीला जबाबदार नाही. त्यासाठी मी तीस पक्षांशी आधीच बोललो होतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, काँग्रेसही जीएसटी आणण्यात आमच्याइतकंच जबाबदार आहे!’ आता गुजरातची सर्वात अवघड अशी निवडणूक जिंकून झाली आहे. त्यामुळे प्रचारसभेत काँग्रेसला दिलेलं श्रेय स्वतःकडे परत घेणं हे ओघानं आलंच. या श्रेयवापसीची पहिली पायरी म्हणून अडवाणींच्या गळ्यात हा ‘आधार हार’ घालून झाला. पण नेमकं या वेळी एक नाट्य घडलं. मोदींची ही पुडी ऐकून रेणुका चौधरी यांना हसू आवरेना. त्या जोरजोरात हसू लागल्या. सभापती व्यंकय्या नायडू यांनी रेणुका चौधरी यांना त्वरीत समज दिली. त्या थांबल्या. खरं तर हा मुद्दा तिथंच संपायला हवा होता. पण हर घडी भारतीय राजकारणाचा धार्मिक सोप ऑपेरा करू पाहणाऱ्या पंतप्रधानांनी ही संधी सोडली नाही. त्यांनी ताबडतोब स्मितहास्य करत सभापतींना उद्देशून म्हटलं, ‘हसू द्या, हसू द्या त्यांना. टीव्हीवरील "रामायण' मालिका संपल्यापासून असं हसणं मी आजवर ऐकलेलं नव्हतं.' "रामायणा'तल्या नेमक्या कुठल्या पात्राच्या हास्याची त्यांना आठवण झाली, याचा उल्लेख काही त्यांनी केला नाही. पण ते स्पष्ट करण्यासाठी त्यांचे बगलबच्चे लगेचच कामाला लागले. काही जणांना चौधरींच्या हसण्यामुळे रावणाच्या हास्याची आठवण झाली. काहींना त्राटिकेची झाली. तर एका केंद्रीय मंत्र्यांनी रा. रा. रामानंद सागरकृत "रामायणा'तल्या शूर्पणखेच्या हसण्याच्या प्रसंगाचं व त्याच्या शेजारीच रेणुका चौधरींच्या हास्याचं चित्र ट्वीट करून टाकलं. स्त्रीच्या मोकळ्याढाकळ्या हसण्याची भीती वाटणाऱ्या कोणत्याही काळातल्या सत्ताधीशांना अखेर स्त्रीच रडवत असते, हा जगभरचा अनुभव आहे.  

 

उत्तर प्रदेशमधील भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ‘रावण’ हे दलितांच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांच्या या ‘गुन्ह्या’साठी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गेले अनेक महिने तुरुंगात डांबून ठेवलं गेलं आहे. मे २०१९पर्यंत ते बाहेर येण्याची सुतराम शक्यता नाही. ही सुटी घटना नाही. संपूर्ण उत्तर भारतात गुन्हेगारी निर्मूलनाच्या नावाखाली खोट्या चकमकीत अल्पसंख्यांक व दलित तरुणांचे मृत्यू घडवून आणले जात आहेत. व्यापम घोटाळ्यात मृत्यूंची साखळी निर्माण करणारे, सोहराबुद्दीन प्रकरणात मंत्र्यापासून न्यायमूर्ती, साक्षीदारांपर्यंतच्या सर्व अडचणीच्या व्यक्तींना होत्याचे नव्हते करणारे, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विवेकवादी चळवळीच्या पाईकांना नाहीसं करणाऱ्या संस्थांना पुरेपूर संरक्षण देणारे सत्ताधारी आज तरी प्रचंड जोमात आहेत. ‘अ’वर्गीय भांडवलाच्या बळावर आपण काहीही करू शकतो,अशी सत्ताधाऱ्यांची भावना आहे. पण हसू आणि आसू यामध्ये अगदी नजीकचं नातं असतं हे त्यांनी कदापि विसरू नये. भाजपची हिंदुत्त्वाची नवी प्रयोगशाळा असणाऱ्या उत्तर प्रदेशात खुद्द मुख्यमंत्री योगी आणि उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या स्वतःच्या मतदारसंघांमध्ये मतदारांनी त्यांना धूळ चारलेली आहे. जितकी जास्त दहशत तुम्ही पसरवू पाहाल तेवढी जनता अधिक निडर होत असते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. निरंकुश सत्तेने अंध झालेल्यांना हे दिसणार नाही, पण आजच्या वेदनेतूनच उद्याची ठिणगी निर्माण होत असते यावर एक कवयित्री म्हणून माझा नितांत विश्वास आहे.


- प्रज्ञा दया पवार
pradnyadpawar@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...