आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोकळी जीवघेणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तसा तर कुणाच्याही मृत्यूने जीव कळवळत असतोच. पण सार्वजनिक क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहणाऱ्या माणसांच्या जाण्यानं या सगळ्यांसह आणखीही अनेकांचा जीव तडफडत राहतो. आपण बोलून तर जातो की त्यांचं काम जिवंत राहावं हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. पण तसं करणं म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची हमी देणं असतं आणि तशी हमी आपण देऊ शकू का याबाबतची साशंकता, आपल्या मनाला कुरतडून टाकत असते... 


जगण्याच्या प्रयोजनाची नेमकी लय ज्यांना गवसली होती, अशी तीन माणसं गेल्या पंधरा दिवसांत आपल्यातून आकस्मिक निघून गेली. त्यातले दोघे म्हणायला वार्धक्यावस्थेतले, वयाची ऐंशी-नव्वदी गाठलेले, पण मनाने नेहमीच तरोताजा असलेले आणि तिसरीने, तर वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर नुकतंच पाऊल टाकलेलं. शिवाय, ही तिन्ही माणसं सार्वजनिक क्षेत्रात आपापली अमीट छाप सोडणारी होती. महत्त्वाचे म्हणजे, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय रणधुमाळीला भिडत सतत त्याच्याशी दोन हात करणारी होती. बाहेरून नव्हे, अंतरावर राहून नव्हे, तर थेट आत ऐन मध्यभागी घुसून आतूनच अवघ्या प्रभुत्वशाली घटितांना टाचणी लावणारी होती. टाचणी कसली? खरं तर सुरुंगच! हे सुरुंगही किती वेगवेगळे... कमालीच्या ज्वालाग्राही रसायनांनी संपृक्त असलेले. बुद्धिवादात निहित असलेल्या तार्किक युक्तिवादाच्या संकल्पना, उदारमतवादी मूल्ये आणि लोकशाहीच्या आधुनिक ढाच्यावर मनस्वी प्रेम करणारी ही माणसं. सर्व प्रकारच्या पारंपरिक श्रद्धांना ओलांडून जाणारी पाखंडी वितंडा त्यांच्यात नेहमीच उसळ्या घेणारी.


मला कायमच अशा पाखंडी वितंडेचं भिन्न-भिन्न अर्थाने आकर्षण आणि महत्त्व वाटत आलं आहे. प्रत्येक समाजात सनातनी प्रारूपाला मुळातूनच प्रश्नांकित करणारी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला आली पाहिजेत. त्यांचा मृत्यूही मग केवळ एका व्यक्तीचा, एका देहाचा मृत्यू राहत नाही. मला ज्या तीन माणसांबद्दल बोलायचं आहे, ती माणसं सॉक्रेटिससारखी विषाचा प्याला प्राशन करायला भाग पाडली गेलेली नव्हती. देव नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, हे प्रतिपादन ठासून केल्यामुळे आणि अथेन्सच्या न्यायव्यवस्थेवर टीका केल्याने तत्कालीन ग्रीकांनी सॉक्रेटिसला ज्या निर्ममपणे लक्ष्य केलं, तसं काहीही रजनी तिलक, भाई वैद्य आणि डॉ. गंगाधर पानतावणे यांच्याबाबत घडलं नाही आणि तरीही मी या त्रिकुटाला सॉक्रेटिसाचेच चेले मानेन, कारण हे तिघंही प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी होते. 


या तिघांचं राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण मला तंतोतंत मान्य होतं असं खचितच नाही. यातल्या प्रत्येकाबाबत माझी भूमिका वेळप्रसंगी वितंडा करण्याची राहिलेली आहे. विशेषतः डॉ. पानतावणेसरांबरोबर केलेला वितंडा हा सर्वाधिक अलीकडचा आणि दखलपात्र ठरला. गेल्या वर्षी लातूर येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना, मी त्यांच्या वैचारिक सांस्कृतिक भूमिकेची चिकित्सा करण्याचा गंभीर प्रयत्न केला होता. पानतावणेसरांनी अत्यंत काळजीपूर्वक माझं म्हणणं ऐकून तर घेतलंच, पण घाईघाईने त्यावर कसलीही टिप्पणी वा शेरेबाजी करून ते खोडून टाकण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही, हे मला अधिक महत्त्वाचं वाटलं. संमेलनानंतर प्रसिद्ध झालेल्या ‘अस्मितादर्श’च्या अंकात त्यांनी एका शब्दाचाही बदल न करता माझं पूर्ण भाषण जसंच्या तसं छापलं. एका प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी माणसाची भूमिकाच त्यांनी आपल्या या कृतीतून सिद्ध केलेली होती.   


पानतावणे सर असोत, भाई असोत वा रजनी असो, वितंडा हा प्रगतीला अडसर असतो, असं यातलं कुणीही मानत नव्हतं. उलट त्यातूनच परिवर्तनाच्या पुढच्या दिशा अधिक मोकळ्या होत जातात असा त्यांचा ठाम विश्वास होता. 


भाई आणीबाणीनंतरच्या वर्षात राज्यातील पुलोद सरकारमध्ये गृहमंत्री होते. त्या काळातील त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अनेक घटना-प्रसंग त्यांच्या जाण्याने पुन्हा एकवार प्रसारमाध्यमांतून समोर आले, चर्चिले गेले. ‘सुपरकॉप’ अशी सार्थ ओळख असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी अशा काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यातली एक आठवण विलक्षण आहे. एकदा रिबेरो पुणे शहरात कारमधून जात असताना, त्यांनी भाईंना रस्त्यावरून सायकलवर जाताना पाहिलं. राज्याचा माजी गृहमंत्री इतक्या साधेपणाने आपले जीवन व्यतीत करतो, हे पाहून पुन्हा एकदा भाईंना तिथल्या तिथे सॅल्यूट करण्याची भावना आपल्या मनात निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आणीबाणीच्या काळात भाई पुण्याचे महापौर होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पदाचा विचार न करता, आणीबाणीच्या विरोधात शनिवारवाड्याच्या मैदानात जंगी राजकीय सभा आयोजित केली. त्यानंतर त्यांना सरकारने कारावासात टाकलं. स्वातंत्र्य चळवळीत आपल्या राजकीय जीवनाचा ओनामा करणारे भाई तब्बल साठ वर्षे सार्वजनिक जीवनाचा अंगभूत भाग बनून राहिले होते. 


दिल्लीला राहणारी रजनी ही खरं तर माझ्या आईची मैत्रीण. ती जेव्हा माझ्या घरी पहिल्यांदा आली, तेव्हा तिच्यातून उडणाऱ्या ठिणग्यांमुळे मी तिच्याकडे आकृष्ट झाले होते. सावळ्या रंगाची, काहीशा स्थूलपणाकडे झुकणारी देहयष्टी असणारी, मेकअपचा जराही लवलेश चेहऱ्यावर नसणारी आणि पूर्णपणे अनलंकृत अशी रजनी बोलायला लागली की, तिच्याकडे दुर्लक्ष करणं भल्याभल्यांना अवघड जायचं, हे मी पाहिलं होतं. याचं कारण तिच्या बोलण्याला तिच्या कृतीशील संघटनात्मक - संस्थात्मक जीवनाचा दांडगा आधार होता. महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थिनींबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाविरोधात तिने आंदोलन उभं केलं होतं. लवकरच तिने आपलं संघटन डाव्या विचारांच्या प्रगतिशील विद्यार्थी संघटनेमध्ये विलीन केलं. पुढच्या काळात जेव्हा तिला डाव्या संघटनांच्या विचार व्यवहारातील त्रुटींची ओळख झाली, तेव्हा तिने स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. यानंतरच्या काळात रजनीने दलित चळवळीत काम सुरू केलं. पण तिथेही तिला पुरुषसत्ताक विषमतेच्या विरोधातला सूर अभावानेच ऐकू आला. इथून पुढे तिच्या स्वतःच्या कामाच्या दिशा स्पष्ट होऊ लागल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी, अंगणवाडी सेविकांसाठी संघटना बांधणीचं काम, ‘आव्हान’ या दलित नाट्य गटाची उभारणी, तरुणांसाठी अभ्यास वर्ग अशा अनेक गोष्टींत ती मनापासून बुडाली. मथुरा बलात्कार प्रकरणात रजनीने कळीची भूमिका बजावत, एक मोठं आंदोलन उभं केलं. त्यानंतरच्या काळात दलित स्त्रियांचा राष्ट्रीय महासंघ, नॅकडोर, दलित लेखक संघ अशा अनेक संस्था तिने उभ्या केल्या, हिरिरीनं चालवल्या. या बरोबरीने कथा, कविता, आत्मकथन यांद्वारे तिची सर्जनशील लेखिका म्हणून कारकीर्दही आकार घेऊ लागली होती. 


आणि आता पानतावणेसर. मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या हातून लिहिली गेलेली ‘कोकिळा’ ही पहिलीवहिली कविता ‘अस्मितादर्श’मध्ये छापून आली. ‘प्रज्ञा पवार’ या नावाने छापून आलेल्या त्या कवितेने कवयित्री म्हणून मला घडवण्यात कळीची भूमिका बजावली. 


मराठी साहित्यात साठ-सत्तरच्या आगेमागे फुले-आंबेडकरवादी विचारविश्वातून प्रेरणा घेऊन ‘दलित साहित्य’ नावाची अतिशय महत्त्वाची साहित्य चळवळ निर्माण झाली. हे निव्वळ वाङ््मयीन स्थित्यंतर नसून भारतातला सर्वात मोठा तलस्पर्शी असा वैचारिक झंझावात होता. या वैचारिक ऊर्जेला साक्षात करण्याची, सर्जनशील राखण्याची, आणि प्रवाही ठेवण्याची सर्वार्थाने अवघड, कष्टप्रद असलेली ध्येयनिष्ठ वाटचाल पानतावणे सरांच्या ‘अस्मितादर्श’ने १९६८पासून गेली पन्नास वर्षे अव्याहतपणे पार पाडली आहे. 


‘अस्मितादर्श’ची महत्त्वाची फलश्रुती ग्रंथव्यवहाराच्या, प्रकाशनाच्या, प्रसिद्धीच्या संदर्भात त्या काळात प्रस्थापित साहित्य व्यवहारातून निर्माण झालेली कोंडी फोडण्यात आहे. बहुजन समाजातून, भटक्या विमुक्त जमातींमधून, ख्रिस्ती-मराठी, ’मुस्लिम-मराठी, आदिवासी यांसारख्या अल्पसंख्य समूहातून, श्रमजीवी, सर्वहारा, कामगारवर्गातून, सर्वात पायतळी असणार्‍या आणि शोषणाचा दुहेरी-तिहेरी काच सोसणाऱ्या दलित स्त्रियांमधून लिहिते झालेल्यांना, त्या काळात ‘अस्मितादर्श’ने चेहरा दिला. विशिष्ट भूमिकेशी घट्ट अनुबंध राखून सातत्याने दीर्घकाळ हे काम करत राहणं खचितच सोपं नाही.


तसा तर कुणाच्याही मृत्यूने जीव कळवळत असतोच. बऱ्याचदा असा जीव कळवळणारी माणसं जाणाऱ्या माणसाच्या रक्ताच्या नात्यातली नि गोत्यातली असतात. शेजारपाजारी असतात. मित्र असतात. एकत्र राहणारी, सहकारी म्हणून एकमेकांसोबत कामं करणारी, प्रसंगी एकमेकांशी तंटेबखेडे करणारीही असतात. पण सार्वजनिक क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहणाऱ्या माणसांच्या जाण्यानं या सगळ्यांसह आणखीही अनेकांचा जीव तडफडत राहतो. व्याकुळ व्याकुळ होतो. एक उदासवाणी, पोटात खड्डा पाडणारी पोकळी वाहून नेतात, ही मागे राहणारी माणसं. जातीपातीच्या पलीकडची, कसल्याही प्रकारचा घरोबा नसलेली माणसं. आणि त्याचं खरं कारण म्हणजे जे सार्वजनिक विश्व ही माणसं निर्माण करू पाहत होती, ते विश्व पोरकं होण्याची भीती. उत्तराधिकारी म्हणून यथार्थ चेहरे न मिळण्याची आशंका. आपण बोलून तर जातो, की त्यांचं काम जिवंत राहावं, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. पण तसं करणं म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याची हमी देणं असतं आणि तशी हमी आपण देऊ शकू का याबाबतची साशंकता, आपल्या मनाला कुरतडून टाकत असते. म्हणून मग आदरांजलीपर भाषणांमध्ये बऱ्याचदा उल्लेखली जाणारी पोकळी, ही खरं तर त्या माणसांच्या जाण्याने नव्हे, तर आपल्या स्वतःच्या बद्धतेमधून निर्माण होत असते, आणि म्हणूनच ती जीवघेणी ठरते!


- प्रज्ञा दया पवार
pradnyadpawar@yahoo.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...