आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका ते कासेगाव: एक बंडखोर प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तरच्या दशकात उंचपुरी, निळे डोळे, सोनेरी केसाची मजबूत बांध्याची एक अमेरिकन तरुणी भारतात नव्हे तर महाराष्ट्रात येऊन इथल्या डाव्या विचारसरणीवर लेखन, संशोधन करते. या विचारांशी जोडली जाऊन कार्यरत होते आणि इथेच रमते. अशा डॉ. गेल ऑम्वेट यांच्याविषयी


अमेरिकेत १९६५ ते १९७० या काळामध्ये काळा आणि गोरा वर्णभेद, वंशवादविरोधी चळवळ आणि लोकशाही हक्कांच्या चळवळ यांसारख्या सामाजिक चळवळीनी तरुणांमध्ये खूप जोर धरला होता. साहजिकच या सामाजिक चळवळीमध्ये अनेक विद्यार्थ्यांसारखीच गेल ऑम्वेट ही तरुणीदेखील सहभागी झाली होती. एकीकडे या चळवळी सुरू असतानाच, दुसरीकडे विद्यार्थ्यांमध्ये एका वेगळ्याच चळवळीने जोर धरला. प्रस्थापित सरकारने तरुणांना फौजेमध्ये भरती करून घेण्याची सक्ती करणाऱ्या कायद्याविरुद्ध ही चळवळ उभी राहिली होती. तरुण विद्यार्थ्यांचा मुख्य प्रश्न होता, की व्हिएतनामने नेमकं असं काय केलं आहे की, आम्हा तरुणांना सैन्यात दाखल व्हावं लागत आहे. व्हिएतनाम हा गरीब देश आहे, तरी आपण त्यांच्याशी युद्ध का करत आहोत? तोपर्यंत सैद्धांतिक जगात थर्ड वर्ल्ड कंट्रीची संकल्पना रुजू लागली होती. तरुणांना समजू लागले की, या तिसऱ्या जगाचाच व्हिएतनाम हा एक भाग आहे. मग हे जे तिसरे जग आहे ते गरीब का आहेत? हे नेमके तिसरे जग काय आहे, हे आम्हाला समजून घेण्यासाठी तेथील सर्व विद्यापीठांमध्ये ‘थर्ड वर्ल्ड डिपार्टमेंट’ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अनेक विद्यापीठांमध्ये असे विभाग सुरू झाले, जे आजही कार्यरत आहेत. या विभागामध्ये शिकत असताना, संशोधनासाठी विषय निवडत असताना तुमच्या विषयामध्ये तिसऱ्या जगातील परिस्थितीचा संबंध असणे बंधनकारक होते. या सगळ्यातूनच गेल यांच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाला खतपाणी मिळाले. 


हायस्कूलचे शिक्षण संपले की, अनेक अमेरिकी विद्यार्थी पैसे जमा करून, पाठीवरती आवश्यक सामानाचे गाठोडे घेऊन विविध देश फिरायला बाहेर पडतात. गेलही कॉलेज ग्रॅज्युएशननंतर १९६८मध्ये नागपूरमधील शहापूर येथे आल्या होत्या. इथे आल्यानंतर त्यांनी इंग्रजी शिकवायचं आणि मिळणाऱ्या पैशातून देश फिरून बघायचा असं त्यांनी ठरवलं. फुले, आंबेडकर, मार्क्सच्या विचाराने प्रेरित झालेल्या वैचारिक बैठक असलेल्या गटाच्या संपर्कात त्या आल्या. पुढे आपल्या देशात परत गेल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना संशोधनासाठी ‘ब्राम्हणेत्तर चळवळ’ हा विषय निवडला. पुढे या विषयात त्यांनी पीएचडीही केली. महत्त्वाचं म्हणजे या विषयामुळे पुढे महाराष्ट्रातील सत्यशोधक समाज, लाल निशाण पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांसारख्या अनेक डाव्या विचारसरणीच्या चळवळींशी त्या जोडल्या गेल्या त्या कायमच्याच. प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या युक्रांद, मागोवा, दलित पँथर या समपातळीवर कार्यरत असणारे युवकांचे तीन गट कार्यरत होते. या विविध गटांच्या कामाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. या चळवळीच्या माध्यमातून कार्यरत असताना अनेक खेड्यांमध्ये संशोधनासाठी त्या फिरत होत्या. संशोधनाचे काम करत असतानाच कराडमधील कासेगाव हे सत्यशोधक चळवळीचे प्रमुख केंद्र होते. संशोधनाचा भाग म्हणून क्रांती वीरांगना इंदुताई पाटणकर यांची मुलाखत घेण्यासाठी त्या गेल्या, तिथेच श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्याशी मैत्री झाली, जिचे पुढे सहजीवनात रूपांतर झाले. भारत पाटणकरांच्या आधीही त्या इंदुताई पाटणकरांच्या खूप जवळ होत्या.


इंदुताईंविषयी गेल सांगतात की, ‘आमच्या दोघींमध्ये काही गोष्टीचे खूप साम्य होते. आम्ही दोघी बंडखोर, सतत उत्साहाने भरलेल्या, चळवळीसाठी समर्पण केलेल्या, स्त्री म्हणून स्वत:ची स्वायत्तता जपणाऱ्या स्त्रिया होतो. आणि हाच आमच्या दोघींचा सगळ्यात मोठा यूएसपी होता.’
भारतात काम करण्याच्या अनुभवाविषयी त्या सांगतात की, ‘कॅलिफोर्निया विद्यापीठातून मी एमए आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. मेक्सिकोच्या सीमेजवळ असणाऱ्या राज्यातल्या एका विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना तेथील परिस्थितीही काहीशी भारतासारखीच होती. शालेय जीवनापासून चळवळीमध्ये कार्यरत असल्यामुळे मक्सिकोमधील मागासलेल्या लोकांच्या आरोग्य, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध तिथेही लढत होते. गरिबी तर आधीच पाहिली होती. त्यामुळे मला भारतात काम करणे फारशे अवघड वाटले नाही.’


‘माझ्या शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार लोकशाही पक्षाचे काम माझे आजोबा करत. वडील निष्णात वकील होते, ते स्वतंत्रपणे काम करत. इतर वकिलांच्या तुलनेत खूप कमी पैसे मिळत होते. कायम शोषितपीडित लोकांसाठी काम करत राहिल्यामुळे घरातही खर्चावर अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे साहजिकच परिस्थितीची जाण मला होती. भारतात आले तेव्हा  परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मला याचा फायदा झाला.’
आणीबाणीच्या काळात १९७५मध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून महिलांना उभं करण्यासाठी गेल यांनी अमेरिकेतील सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या, स्त्रीमुक्तीसाठी लढणाऱ्या विचारवंत स्त्रियांची ओळख, त्यांचा अनुभवांची ओळख ‘मागोवा’ मासिकामधून करून दिली. 


या बैठका, आंदोलने, लिखाण, लेक्चर्स यामधनं कुटुंबाला कसा वेळ देता, या प्रश्नावर त्या म्हणतात, ‘मी करत असलेलं काम माझ्या अंतरिक प्रेरणेतून करत आलेय. माझी मुलगी प्राची आता अमेरिकेत स्थिरावलीय, वर्षातून एकदा ती भारतात येते तेव्हा मी आणि भारत तिच्यासाेबत फिरतो आणि छान वेळ घालवतो. लिखाण, बैठका, विविध विषयावर चर्चांच्या वेळी तर मी आणि भारत बरोबरच असतो. खरं सांगायचं तर तरुणपणापेक्षा म्हातरपणी आम्ही खूप वेळ एकमेकांच्याबरोबर असतो. डॉ. भारत पाटणकरांविषयी त्या म्हणतात, त्यांच्यासारखा क्रांतिकारी विचारवंत ‘मुद्दा आहे जग बदलण्याचा’ हा ध्यास घेऊन काम करतो, याचा मला खूप अभिमान वाटतो. त्यांच्या या कामात जोडीदार होऊन साथ देण्याचे काम मी करत आहे. 


आम्ही करत असलेल्या कामामुळे कधी थकवा येत नाही. उलट आजूबाजूला बोलणारी माणसं नसतील तर आम्ही कोलमडून पडू. माणसांशिवाय आमच्या आयुष्याला शून्य किंमत आहे.


- प्राजक्ता ढेकळे, पुणे
prajaktadhekale1@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...