आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिराबायचा गट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरच्या गरिबीचं भांडवल करून जगण्यापेक्षा कष्ट करून ताठ मानेनं जगणं तिनं स्वीकारलं. गावातील परिस्थितीनं गरीब, जमीन नसलेल्या, व्यसनी नवरे असलेल्या पिचलेल्या बायकांना एकत्रित करून मजूर कामगार बायकांचा एक गट तिनं सुरू केला. स्त्रीत्वाचा, स्त्रीवादाचा, स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा खरा मापदंड आपल्या कामातून 

घालून देणाऱ्या हिराबायबद्दल...

 

‘च ला गं पोरींनो... चला लवकर, गाडी उभी राहिलीय. सारिके हो, गाडी आलीय. आंब्याच्या बागंत काम हाय. हाजरी बी लय हाय,’ अशी कामाची माहिती देत हिराबाई गावातल्या अनेक आळ्यांना यडा घालता फिरायची. दररोज सकाळी नऊ-साडेनऊच्या दरम्यान हिराबायची ही हाळी ठरलेली. गावातल्या प्रत्येक आळीतनं कामावर येणाऱ्या बायकांना गोळा करून मजूर म्हणून शेजारच्या गावात, तर कधी तालुक्यापर्यंत शेतात मजुरी करायला घेवून जाणारी हिराबाय.


गावात चैत्राच्या महिन्यात गुढीपाडवा झाला की, काही दिवसांतच सकाळी सकाळी आळीमधून हिराबायची हाळी घुमायची. गावातल्या काम करणाऱ्या बायकांना गोळा करून आंब्याच्या बागेत हिराबाय कामाला न्यायची. दुष्काळी पट्ट्यातल्या फलटण (जि. सातारा) तालुक्यातील वाखरी या तिच्या गावाला कुठलं आलेत हापूस, पायरी आंबं. गावात आंबं कधी विकायला आलं तर ते साधं बारक्या कोयांचं असायचं. आंब्याच्या सिझनामधी कधीतरी घरी आंब खायला मिळायचं. मात्र या आंब्याच्या बागेत कामाला गेलं तर चांगल्या प्रतीचा एकदा दुसरा आंबा खायला मिळायचा. हिराबायबरोबर कामाला गेलेल्या पोरींनी एखाददुसरा आंबा खालच तर हिराबाय त्यांना मोकळ्या मनानं एखाददुसरी शिवी देत म्हणायची, ‘ए बया लपवून खा, नाय तर मालकानं बघितलं तर तुझ्याबरोबर माझी पन बिनपाण्यानं हाजामत करंल.’ असं म्हणून ती हसायची.


बुटकी, रंगाने काळी, तिडतिड्या बांध्याच्या हिराबायचा आवाज मोठा खणखणीत. झपझपाप पावल टाकत चालायची. गावगाड्यात पूर्वीपासूनच ज्या समाजाची कधी गणतीच केली जात नाही अशा रामोशी समाजातील ही हिराबाय. तशी अडाणी बाई. सासरची गरिबी असली तरी गरिबीचं भांडवल करून जगण्यापेक्षा कष्ट करून ताठ मानेनं जगणं तिनं स्वीकारलं. अन त्यातूनच गावातील परिस्थितीनं गरीब, जमीन नसलेल्या, व्यसनी नवरे असलेल्या पिचलेल्या बायकांना एकत्रित करून तिनं मजूर कामगार बायकांचा एक गट सुरू करून खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षमीकरणाची सुरुवात केली.
औपचारिक शिक्षणाची शाळा ती शिकली नसली, तरी अनेकींना संसाराच्या आर्थिक वर्षाच्या इयत्ता तिनं पास व्हायला मदत केली. हिराबायचा गट २००० साली सुरू झाला. अन आजही तो चालूच आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे वर्षातील तिन्ही ऋतू इतरांच्या शेतात राबवून, ताठ मानेनं जगायला तिनं अनेकींना शिकवलं.


बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतात काम करत असताना ‘अवं दादा, भाऊ, कामात कुठं कुचराई हाय का? मग मजुरीत काय कमी नाय.’ म्हणून हक्कानं मजुरी वाढवून घेणार. पांढरपेशा समजात पूर्वीही आणि आताही केवळ खोट्या प्रतिष्ठेच्या नावावर, मानमर्तबाच्या नावावर घरातील गडीमंडळी बायकांना कामाला पाठवायची नाहीत अन स्वत:ही काम करायची नाहीत. मात्र घरात दररोज चुलीपुढं काम करणाऱ्या बाईला स्वयंपाक कशाचा करायचा हा प्रश्न सतावयाचा. एक ना दोन. अशा अनेक बायकांना काही तरी काम करू वाटायचं. पण काय काम करायचं, कुठं काम करायचं, असा प्रश्र नेहमी त्यांना पडायचा. या सगळ्यांच्या मदतीला हिराबाय उभी राहिली. या बायांना एकत्र करून दररोज गावाशेजारील इतर गावांमध्ये बागायतदारांच्या शेतात कामाला घेऊन जायला सुरुवात केली. पुढे हळूहळू या मजूर बायकांचा गट हा ‘हिराबायचा गट’ म्हणून ओळखला जाऊ लागला. कामाचा उरक आणि मान मोडून काम करण्याच्या पद्धतीमुळं सुगीच्या काळात कुणाच्या शेतात काम करणार यावरून बागायतदार शेतकरी एकमेकावर हमरीतुमरीला यायचे. यावर पण हिराबाय उपाय काढायची. अन समजुतीच्या स्वरात म्हणायची, ‘अवं दादा, तुमी दोघंबी थांबा. मी आज अर्ध्या बायका तुमच्यात लावते कामाला अन अर्ध्या ह्यांच्यात. आज संपणारं काम एक दिवस वाढलं एवढंच ना, असू द्या. घ्या आता समजून सगळ्यांनीच. सुगीचं दिवस संगच येत्यात सगळ्यांचच,’ असं समजुतीनं म्हणायची. तिचं नाव जरी हिराबाय असलं तरी गावातील बायकांची ‘हिरामावशी’ कधी झाली ते तिलाही कळलं नाही. 


गावाला सतत पडणाऱ्या दुष्काळात या हिराबायनं अनेकींची घरच्या चुली पेटवण्यास मदत केली. या हिराबायच्या गटात केवळ बायकाच कामाला जायच्या नाहीत, तर शाळेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेक मुली शनिवार-रविवारच्या सुट्टीत कामाला जायच्या. काम करून मिळणाऱ्या पैशातून अनेक मुलींनी आपल्या कॉलेजच्या फी भरल्या, शाळेसाठी लागणारी पुस्तकं, स्वत:साठी कपडे, चपला घेतल्या आहेत. गटात बायांच्या बरोबर येणाऱ्या या पोरींनादेखील हिरामावशी संपूर्ण हाजरी द्यायला लावयाची. एकादा शेतकारी लयच काचकूच करायला लागला तर त्याला ती म्हणायची, ‘अवं भाऊ, पोरगी असली म्हणून काय झालं, बायच्या पातबरोबर पात वढतीय, उलट एक काकाण जास्तच पण कमी नाय. मग तिला काय म्हणून अर्धी हाजरी देताय?’ हिरामावशीच्या या ठसकेबाज वाक्यावर शेतकरी मात्र अनेकदा निरुत्तर होत असत. कामाला येणाऱ्या प्रत्येकीसंग हासून खेळून राहणं, बाया-बायांच्यात भांडणं लागलीच तर दोघींना पण शिव्या हासडून भांडणं मिटवायची काम ती अजूनही करते.


हिराबायच्या घरची गरिबीच. नवरा स्वभावाला आणि कामाला पण शांत माणूस. काम केलं केलं, नाय केलं नाय केलं, असंच असायचा. मात्र हिराबायनं स्वत: पुढाकार घेऊन कामाला सुरुवात केली. तिला असलेल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न करून मुलाला घरजावई करून घेतलं. स्वत:च्या संसाराबरोबर लेकीचा संसार उभा केला. हिराबायला असलेल्या तीन नातवंडांमधील मोठ्या नातीचं लग्न तिनं लावून दिलं अन या तिच्या नातीला झालेलं पहिलं अपत्य विशेष मूल निघालं, तवा त्याला त्या मुलीबरोबर न पाठवता तिनं स्वत:च्या जवळ ठेवून घेतलं. याबद्दल हिराबाय म्हणते, ‘अगं, हे पोर जरी भोळसांड असलं तरी ती माणूस हाय. पण मी जर हिला माझ्या नातीसंग लावली असती तर कदाचित तिची हेळसांड झाली असती. काय सांगावं नातीच्या नांदण्यांचं चांदणं झालं असतं म्हणून माझ्याजवळच ठिवली बघ.’ पुढं ती म्हणते, ‘नाय तर मला तरी कोण हाय, ही सगळी आपल्या संसारात रमली मला आपली हिची सोबत बरी.’


हिराबायच्या गटात अनेकजणी आल्या. त्यांनी आपले संसार सावरले. काही काळानंतर बंद झाल्या. शाळा न शिकलेल्या अनेक पोरी ज्या गटात काम करायच्या त्यांची लग्नं झाली. मात्र हिराबायचा गट अजूनही चालूच आहे. स्त्रीत्वाचा, स्त्रीवादाचा, स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा खरा मापदंड हिराबायनं आपल्या कामातून घालून दिला आहे. 


prajaktadhekale1@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...