आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाँग मार्च घेऊन आलेल्या किसान सभेच्या अनेक मागण्या या आधीच्या मोर्च्यांनीही मांडल्या होत्याच. मग, त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याइतका डाव्यांचा द्वेष करणारे भाजपवाले, या डाव्या मंडळींबाबत इतके सकारात्मक का राहिले? भाजपनं या प्रकारे एका दगडात दोन पक्षी तर नाही मारले?
झे एक मित्र आहेत. संजय दाभाडे त्यांचं नाव. ते डाव्या चळवळींशी संबंधित आहेत. काही प्रमाणात ऐतिहासिक असा जो शेतकरी मोर्चा नाशिक ते मुंबई असा पार पडला, त्याबद्दल त्यांनी एक मेसेज पाठवला. त्याचं मुख्य सार असं की, या भारत देशात वादळ निर्माण करण्याची ताकद फक्त दोघांतच आहे. ‘निळ्या’मध्ये आणि ‘लाल’मध्ये. निळं आणि लाल वादळ एकत्र आल्यास ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही मातीत गेल्याशिवाय राहणार नाही.
कॉम्रेड अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखालील किसान सभेच्या या आंदोलन-मोर्चा किंवा त्यांच्या भाषेत ‘लाँग मार्च’नंतर या मोर्चाबद्दल, हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाबद्दल अशाच स्वरूपाच्या अतिरंजित प्रतिक्रियांचा पाऊस पाहायला मिळाला. विचारप्रणाली कोणतीही असो पण भावूकपणा हा आपणा सर्व दक्षिण आशियाई लोकांचा स्वभाव विशेष आहे. पण दरवेळी कुणाला दुखवायला नको म्हणून अशा भावनोत्कट गोष्टीबद्दल बोलणंही टाळलं जातं. दाभाडे यांच्या मेसेजवर मी त्यांना म्हणालो की, डावे-पुरोगामी लाल झेंड्याखाली आणि दलित-आंबेडकरी निळ्या झेंड्याखाली असे दोघे एकत्र येतीलही,पण प्रतीक म्हणून पाहायचं तर मग भगव्या झेंड्याखालील बहुसंख्य हिंदूंच्या वादळानं कुणाच्या शिडात शिरायचं? बहुसंख्या हिंदूंचा प्रतिनिधी होण्यास डाव्यांनी कधीच तयारी न दाखवल्यानं हिंदूंचं भगवेकरण करणं आरएसएस भाजपला सोपं गेलं आणि जातंय. उरला मुद्दा ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा. त्यातील ब्राह्मणांच्या ब्राह्मणशाहीला विरोध करता येईलही, पण इतरेजनांच्या बहुसंख्याक आणि अधिक प्रभावी ब्राह्मणशाहीचं डावे काय वाकडं करू शकणार आहेत?
भांडवलशाहीला विरोध याचं डाव्यांना आजही इतकं अप्रूप कसं वाटतं याचंच मला आश्चर्य वाटतं. भांडवलशाहीला विरोध म्हणजे, घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधापर्यंत हे तर्कट जातं (डाव्यांचा त्या अर्थानं सद्य लोकशाहीबद्दल आणि घटनेबद्दल तसा आक्षेप आहेही.) मिलिंद कांबळेंसारखे दलित उद्योगपती तर ‘कॅपिटालिझम लाओ, मनु भगाओ’ अशी घोषणा देतात, मध्यंतरी लेफ्ट-लिबरलादी मंडळींचे हीरो झालेल्या माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी तर ‘भांडवलशहांपासून भांडवलशाही वाचवा’, अशा सूर आळवला. सार्वजनिक क्षेत्रं अव्यवहार्यतेमुळे आकुंचित होत असताना, शेतीच्याच काय, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीकडे मानव समाज जात असताना डावे अजूनही त्याच त्याच बोथीला का चोखतायत? लेखाच्या सुरुवातीलाच हे घडाभर तेल वाटत असलं, तरी डाव्यांच्या मोर्चा, आंदोलनं वगैरेपेक्षा एकूणच विचारव्यूहाबद्दल या माझ्या शंका आहेत, ज्या अंतिमत: देशप्रश्नांच्या सोडवणुकीच्या सर्वपक्षींयांच्या धोरणांबद्दलच्याही आहेत. ज्यात शेती, शेतकरी प्रश्नही आलेच.
आता या मोर्चाबद्दल. हा मोर्चा, त्यात सामील झालेले नाशिक, नंदुरबार आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील अल्पभूधारक, वनजमीनधारी हजारो शेतकरी, मोर्चाचं नेतृत्व करणारे कॉ. ढवळे आणि मोर्चाच्या मागण्या, उद्दिष्टं यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. त्यांना माझं समर्थनही आहे. हा मोर्चा नरडीला कोरड आणि आतड्याला पीळ बसलेल्यांचा होता. या मोर्च्याच्या मागेपुढे मला कुठे चकाचक टोयोटा, इनोव्हा, स्कॉर्पिओ, क्रूझर गाड्या दिसल्या नाहीत. गोल गरगरीत चेहऱ्यांचा अन् हातात सेल्फी स्टिकसह स्मार्ट फोन मिरवणाऱ्यांचा तर हा मोर्चा नक्कीच नव्हता, शासन-प्रशासन, राजकारण-समाजकारणावर मांड ठोकून, मिश्यांना पीळ देऊन मुजरा करायला सांगणाऱ्यांचाही हा मोर्चा नव्हता, आधी श्रेष्ठ जातीचा माज मिरवित शूद्राचं शोषण करून वर आपल्याच शूद्रत्वाचे ऐतिहासिक दाखले दाखवत आरक्षणाची मागणी नव्हे, तर दरडावणी करणाऱ्यांचा हा मोर्चा नव्हता. हा खऱ्याच खऱ्या पीडित कुणब्यांचा मोर्चा होता. हा मोर्चा नाशिक ते मुंबई असा निघाला असला, तरी त्याची सावली त्रिपुरापर्यंत जाऊन भिडते, उजव्या मंडळींना, शहरी लोकांनाही कवेत घेते.
या मोर्चाची वेळ मोठी सूचक आहे खरी. त्रिपुरात डाव्यांचा पाडाव होऊन भाजपचं सरकार आलंय, लेनिनचा पुतळा पाडला गेलाय आणि कम्युनिस्ट पार्टीचे मृत्युलेख लिहिले जाताहेत, त्याच सुमारास दुसऱ्या एका भाजपशासित राज्यात म्हणजे महाराष्ट्रात विळा-हातोडा मुद्रांकित लाल बावटे हजारोंच्या संख्येनं उभे राहताहेत, राजधानी मुंबईवर ही मंडळी पायपीट करून येतात आणि सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला लावतात. बरं हे सगळं कोण करतं? तर फारशी माहीत नसलेली किसान सभा आणि त्यांचे नेते कॉ. ढवळे. हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे, गेल्या वर्ष -दोन वर्षांपासून विरोधी पक्षांचे असे काही मोर्चे निघाले आहेत. अगदी आत्ता आत्ताचा म्हणायचा, तर राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर झालेली ‘हल्लाबोल यात्रा’. या वयातही खुद्द शरद पवार या मोर्चाचं नेतृत्व करत होते. त्याची नुकतीच सांगता झाली. सांगायचा मुद्दा हा की, लाँग मार्च घेऊन आलेल्या किसान सभेच्या अनेक मागण्या या आधीच्या मोर्च्यांनीही मांडल्या होत्याच. मग, त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याइतका डाव्यांचा द्वेष करणारे भाजपवाले, या डाव्या मंडळींबाबत इतके सकारात्मक का राहिले? मुंबईत पोहोचून विधिमंडळाला घेराव घालून आणि तरीही सरकार बधलं नाही, तर मुंबईचे मुख्य मार्ग रोखण्याचं प्लॅनिंग मोर्चेकऱ्यांनी केलं होतं. मग, हे सगळं न होता मुंबईतल्या पहिल्याच दिवशी मोर्चाच्या बहुतांश मागण्या मान्य होतात? नुसत्या ऊसदराच्या प्रश्नावरही प. महाराष्ट्र पेटतो, शासनही काही काळ ते चालू देतं, मग या वेळी असं काही का झालं नाही? भाजपनं याप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारले. एक, काँग्रेस व त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वापर न करू देणं आणि दुसरं म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादीसमोरच्या ग्रामीण-शेतकरी-बहुजन राजकीय अवकाशात एक पर्याय उभा होऊ देणं. ‘२०१९ची राज्यातली निवडणूक भाजप काठावर पास होण्याची आशा आहे’, इतकं केविलवाणं विधान भाजप प्रवक्त्यानं प्रस्तुत लेखकापाशी केलं होतं, या पार्श्वभूमीवर पर्यायी राजकीय केंद्र उभारून असंतोष डिफ्यूज होऊ देणं, हा मुद्दा असू शकतो.
मोर्चात सहभागी शेतकऱ्यांबद्दल पूर्ण आदर बाळगूनही असं मानायला जागा आहे की, आयोजक आणि शासन यांच्यात ‘टर्म्स ऑफ अंडरस्टँडिंग’ आधीच ठरल्या असाव्यात. पण, मी या सर्व राजकारणाचं डाव्यांसाठी स्वागत करतो!
राज्यातल्या असंतोषाचा नेता होण्याची अशीच संधी भीमा-कोरेगाव प्रकरणानं प्रकाश आंबेडकरांना दिली होती. मात्र, ते नंतर गायब झाले ते झालेच! या ‘लाल वादळाला’ ‘निळ्या वादळा’ची जोड देऊन वेगळं राजकारण आकारास ते आणू शकले असते. पण, त्यांचा अवसानघातकी स्वभाव आड आला. ही चूक कॉ. ढवळेंनी आणि त्यांच्या मा.क.प.ने करू नये. बऱ्याच काळानं डाव्यांचा एक लोकप्रिय चेहरा म्हणून कॉ. अशोक ढवळे पुढे येऊ शकतात. यात मला नव्या राजकारणाचा अवकाश दिसतो. कॉ. ढवळेंचं विशेष कौतुक यासाठी की, त्यांनी मोर्चा दरम्यान कर्मठ कम्युनिस्टी भूमिका न ठेवता ते लवचिक राहिले. ठाण्यात शिवसेनेनं मोर्चाला मदत देऊ केली. ती त्यांनी घेतली. मुंबईत आझाद मैदानावर आलेल्या सर्वच राजकारण्यांना स्थान दिले. कॉ. ढवळेंना योग्य साथ मिळाल्यास ढवळे महाराष्ट्रात डाव्यांचं राजकारण पुन्हा मोठं करू शकतात.
हे झालं या ‘लाँग मार्च’चं कवित्व. शेतकऱ्यांच्या प्रश्नांनंतर आता भाजप आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या टीकेवरून काँग्रेसला संधी न देण्यासाठी कंबर कसतोय. दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे पडघम मला आत्ताच ऐकू येऊ लागलेत...
- प्रसन्न जोशी
prasann.joshi@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.