आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवशिवणाऱ्या बोटांसाठी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी कठुआ आणि उन्नावमधल्या बलात्कारपीडितेचा धर्म शोधला गेला, मग ज्यानं त्यानं आपली भूमिका ठरवली आणि मीडिया-सोशल मीडियावर सुरू झाला सामाजिक विधिनिषेधशून्यतेचा नागडा वाघडा तमाशा, कांगावेखोर हिंदुत्ववादी आणि हितसंबंधींचा हेतू सफल करणारा... 


कठुआ आणि उन्नावच्या बलात्कारांनी आपल्यापैकी अनेकांच्या आत दडलेल्या उद्रेकीपणाचं भीषण दर्शन घडवलंय. उन्नाव नावापुरतंच, खरं तर मला कठुआच म्हणायचंय. खरं तर या दोन्ही घटनांबद्दल एक सामायिक आवाज निषेधाचाच आहे. मग, याच निषेधाचा, आक्रोशाचा दबाव बलात्काराचे खटले वेगानं निकाली काढण्यासाठी, पुरूषांच्या आणि व्यवस्थेच्या (कारण तीही पुरुषांचीच बनलेली असते.) बधीर झालेल्या संवेदनांना खडबडून जागं करण्यासाठी आणि मतभेद मान्य करूनही बलात्कारासारखं निर्घृण कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठी वापरता येऊ शकला असता. 


मात्र, आधी कठुआ आणि उन्नावमधल्या बलात्कार पीडितेचा धर्म शोधला गेला, मग ज्यानं त्यानं आपली भूमिका ठरवली. आणि सुरू झाला सामाजिक विधिनिषेधशून्यतेचा नागडा वाघडा तमाशा. हा तमाशा काही प्रमाणात पारंपरिक माध्यमांमध्ये आणि बऱ्याच अंशी सोशल मीडियावर खेळला गेला. एक गट होता/आहे, सदर मुलगी ज्या बकरवाल मुस्लिम समाजातून आहे, त्या समाजाला जम्मू भागात लोकसंख्या वाढवून काश्मिर खोऱ्यानंतर आता जम्मू हा हिंदू बहुल भागही अंकित करायचाय, असं मानणाऱ्यांचा. याच्याच जोडीला भाजपप्रेमी, नरेंद्र मोदीप्रेमी (होय, भाजपप्रेमी आणि त्यातही मोदीप्रेमी वेगळे असतात.) असे गट होतेच. एक मोठा गट असाही होता, जो असा काही बलात्कार झालाच नाही, याची कपोलकल्पित कथा मिळेल तिथून वाचत होता. इतरांना फॉरवर्ड करत होता. याच गोतावळ्यातला आणखी एक गट म्हणजे ‘झाला तो बलात्कार वाईटच, पण काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत होते तेव्हा कुठे गेले होते हे आजचे लोक? त्या ढमुक ढमुक ठिकाणी हिंदू मुलीवर बलात्कार झाले तेव्हा का नाही बोललात?’ असं विचारणारी मंडळी. एक छोटा मात्र जास्त धोकादायक गट असाही दिसला की, ज्यानं यानंतर देशात जिथं कुठं मुस्लिम व्यक्तीनं  किंवा फार गवगवा न झालेल्या घटना अशा हिंदू स्त्रीवर, मुलींवर बलात्कार केलेत, त्याच्या खऱ्या-खोट्या बातम्या पाठवायला सुरूवात केली. ज्यातील एक तर महाराष्ट्रातलीच घटना होती. हे कमी म्हणून की काय काही मान्यवर माध्यमांनीही कठुआ प्रकरणाचं गांभीर्य घालवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या बातमीनं लोकांचं ‘जागरण’ करण्याऐवजी चक्क हा बलात्कार झालाच नाही, अशी बातमी एका हिंदी वृत्तपत्रानं दिली. नंतर आपल्या वेबसाइटवरून काढूनही टाकली. भाजपच्या अनेक नेते, कार्यकर्ते मंडळींनी निर्लज्जपणाची हद्द गाठली. काश्मिरातील सरकारमधले काही भाजप मंत्री असोत किंवा अन्य नेते त्यांनाही, यात आरोपीचा ‘हिंदू धर्म’ दिसला.  स्मृती इराणी, सुषमा स्वराज, मीनाक्षी लेखी आदी भाजपच्या बोलक्या महिलांनी तर या घटनेचा विटाळच मानला. सर्वात दु:खद म्हणजे इतर वेळी छोट्या-मोठ्या घटनांवरही ट्विट भाष्ट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीं कठुआ-उन्नावनंतर बराच काळ गप्प होते. लंडनच्या ‘शो’मध्ये मोदी बलात्कारांबद्दल बोलले मात्र अगदी उरकल्यासारखं...


दुसरा गट आधीच्या तुलनेत अधिक शहाणा (समंजसपणा मात्र काहींपुरताच!) आणि अधिक प्रभावीपणे मांडणी करणारा, असा समूह. त्याचं एक चांगलं होतं, की ते कठुआ आणि उन्नावच नव्हे तर एकूणच बलात्कार, पुरूषी मानसिकता आणि अशी मानसिकता वर्षानुवर्ष घडवत जाणारा आपला समाज आणि त्याची संस्कृती यावर टिप्पणी करत होता. मात्र, यातील अनेक मंडळी आणि दुर्दैवानं अनेक मान्यवर मंडळी हा रोष, राग आक्रमकपणे व्यक्त करण्याच्या नादात पहिल्या गटातल्या मूर्खांच्या रांगेत जाऊन बसली.


याची सुरुवात झाली, ती म्हणजे कठुआ बलात्कार पीडित मुलगी, बलात्कारी आणि बलात्कार करण्याचं ठिकाण यांचा त्यांनी आपापल्या पूर्वग्रहानुसार वापर केला. हे करताना सगळ्यात आधी त्यांनी बळी दिला, तो पीडितेच्या ओळखीचा आणि बलात्कार झाला, त्या मंदिर नावाच्या धार्मिक बाबीचा. बलात्काराचा बळी ठरलेली अल्पवयीन असल्यास, तिची ओळख उघड करायची नसते, या कायदेशीर नियमाला धाब्यावर बसवून या मंडळींनी तिच्या नावाचे हॅशटॅग, सोशल मीडियावरच्या पोस्टी तयार केल्या. तीचे फोटो बिनधास्तपणे फडफडवले (इथे एक सांगावं लागेल, की मीसुद्धा काही संघटनांनी मुंबईत आयोजित केलेल्या निषेध सभेचं आमंत्रण माझ्या फेसबुकवर टाकलंय, ज्यात तीचा फोटो होता. मात्र, निषेध सभेचं माध्यम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाईलाजानं त्यांचं पोस्टर शेअर केलं. अन्यथा, या लेखातही मी मुलीचं नाव लिहित नाहीये) आणि याहून वाईट गोष्ट म्हणजे,त्यांनी बलात्काराचं स्थळ जे की मंदिर होतं, त्याचा उघड उल्लेख आणि त्यातील देवतेचा (कोणत्या देवाची मूर्ती होती, हे माहीत नसताना राम, शंकर, देवी असं काहीही फिरत होतं) बलात्काराशी संबंध जोडला जात होता. हे धोकादायक ठरलंय. हीच घटना जर मशिद किंवा चर्चमध्ये घडली असती, तर घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन ठिकाणाचं वर्णन अप्रस्तुत ठरलं असतं. मी स्वत:ला पुरोगामी म्हणवत असेन, तर हा मुद्दा कटाक्षाने पाळला गेलाच पाहिजे. मात्र, पुरोगामी चळवळीतल्या भल्या भल्या कलाकार, लेखिक-लेखिका, विचारवंतांनी अंगात हिव भरल्यागत तिथला देव, त्या चिमुरडीवर बलात्कार होत असताना काय करत होता? वगैरे तारे तोडले. मी पुन्हा म्हणेन, की आधीच्या गटातल्या मूर्ख, अतिरेक्यांकडून मुळातच अपेक्षा नसल्यानं त्यांच्यावर टीका तरी काय करणार? मात्र, देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या असंख्य समविचारी सद्बुद्ध मंडळींनी असे उल्लेख करून आग अधिकच पेटवली. यामुळे बलात्काराकडे बलात्कार म्हणून बघणारा आणि हिंदुत्ववाद्यांकडे न झुकलेला एक मोठा हिंदू वर्ग अचानक धार्मिक अस्मितेसाठी आक्रमक होऊन मी वर पहिल्या गटाच्या कळपात अलगद पडला. 


मला यावरून एक किस्सा आठवतो. जमात-ए-इस्लामीच्या एका व्हॉट्स अपग्रुपवर मी आहे. तिथं अल्लाचा परमदयाळूपणा आणि तो एकमेव त्राता कसाय, यावर चर्चा चालली होती. मी त्यांना प्रश्न केला की, खुद्द पैगंबरांची भूमी असलेल्या आणि आज बहुसंख्य मुस्लिम असलेल्या प्रदेशात मग हा भीषण हिंसाचार का सुरूय? इराण-सिरियात लहान मुस्लिम मुलांना कोणते रोजे बुडवल्यानं किंवा नमाज अदा न केल्यानं मृत्यू कबूल करावा लागतोय? अर्थात अशा प्रश्नांना अर्थ नसतो आणि मुळात ते कुठे आणि कधी विचारायचे, हे कळावं लागतं.  हे कमी म्हणून की काय एक ऑनलाइन कॅम्पेन सुरू करण्यात आलं. अनेक बॉलिवूड तारका, अभिनेते-अभिनेत्रींनी काही सामाजिक मान्यवरांनी ‘मी आहे हिन्दुस्तान, मला हिंदू असण्याची लाज वाटते’ किंवा ‘मी आहे हिंन्दुस्तान, मला हिंन्दुस्तानी असण्याची लाज वाटते’ वगैरे कार्डबोर्ड घेतलेले फोटो ऑनलान टाकणं सुरू केलं. माझी स्थिती अवघड होती. नेमक्या याच काळात कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय क्रीडापटूंनी त्यातही महिलांनी सुवर्णपदकांची लयलूट केली होती. या ‘कॉमनवेल्थ’मधल्या अनेकांच्या कष्टसाध्य यशोगाथा वाचताना मन भरून येत होतं. हा माझा भारत आहे! काश्मिरातल्या चिमुरडीवरच्या अत्याचारासाठी धर्म-जात-प्रांत न मानता रस्त्यावर येणारा हा माझा भारत आहे! मग, मी या देशाची, देशवासियांची आणि त्यांच्यातील बहुसंख्याकांच्या धर्माची लाज का बाळगावी? मात्र, सोशल मीडिया, ऑनलाइन मतपत्रांमधील मोठ्या वर्गानं उद्रेकाला अशा कांगाव्यात बदलून हिंदुत्ववादी आणि हितसंबंधिंचा हेतू आपोआप सफल करून दिला. 


यामुळे कठुआ आणि उन्नावच्या, निर्भया किंवा महाराष्ट्रातील दलित मुली-स्त्रियांवरील अत्याचारांविरूद्ध आवाज बुलंद होवो न होवो, पण आमच्या संतापानं भरून जावोत लाखो फेसबुक पोस्टी, ट्विटरांची अक्षरं आणि आभासी जगाची प्रकाशित पानं... आणि म्हणूनच, विधीनिषेधशून्य आमच्या द्वेषासाठी, करूणा-न्यायभाव-विवेक नसलेल्या आमच्या हितसंबंधी अभिव्यक्तीसाठी, रेप असो की आयपीएल... आमच्या उत्सवी गोंगाटासाठी... शब्दांचे रतीब घालण्याकरता आमच्या शिवशिवणाऱ्या बोटांसाठी एक बलात्कार अजून हवा...


- प्रसन्न जोशी
prasann.joshi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...