आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीही फजिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात अन्वीच्या शाळेतून ‘अन्वीची वार्षिक पालक-शिक्षक मीटिंग एक नोव्हेंबरला ८:१० ते ८:३० च्या दरम्यान असेल’ अशी नोटीस आलेली. तेव्हापासून सकाळी किती वाजता निघायचे, कसे जायचे, लवकर जायचे तर अन्वीला कितीला उठवायचे याची आखणी केली होती. अन्वीला रात्री झोपतानाच सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्वतः लवकर उठलो, अन्वीला उठवले.

 

पटापट आवरून बरोब्बर आठ वाजून आठ मिनिटांनी शाळेत पोचलो. चक्क दोन मिनिटे लवकर! मग काय, आपण ठरवलं तर कायबी करू शकतो, समजलात काय मला? (घरातल्या विशिष्ट व्यक्तीला उद्देशून उपरोक्त वाक्य आहे, हे कळलंच असेल.) शाळेच्या दरवाजातच मला अडवून ‘पाल्याला इथेच सोडा’ असे सुचवल्यावर मी मान ताठ करून ‘मला मीटिंगला बोलावलंय म्हणून आलोय.’ मी निग्रहाने सांगितले.  चपराश्याने तिने गोंधळून जरासा विचार करत ‘कोणी पण उठून कधीबी येतंय आजकाल’ असा काहीसा चेहरा करत ‘नक्की?’ असा उलट जाब विचारला.


मी हातातला नोटीसचा कागद तिच्या नाकासमोर नाचवला, तसे मला आत सोडण्यावाचून पर्याय नसल्याने, अनिच्छेने का होईना सोबतच्या अन्वीकडे पाहात आत सोडले. अन्वी मला तिच्या वर्गामध्ये घेऊन गेली. प्रवीणराजे पधारले आहेत तरीही काय ही गुस्ताखी...


चक्क ते मास्तर राजांची सन्मानपूर्वक दखल न घेता फक्त तिरपा कटाक्ष टाकून समोरच्या कागदात डोके खुपसून जाग्यावरच बसून राहिले. एक मिनिट लवकर आलो आहोत त्यामुळे असावे अशी मनाची समजृत घालून मी तसाच दहा सेकंद बाजूला उभे राहिलो. न राहवून अकराव्या सेकंदाला विचारलेच - मी अजून थोडा वेळ वाट पाहून सुरू करायचे आपण? 
घड्याळात पाहात मास्तरांनी पूर्ण चेहरा व्यापेल असे प्रश्नचिन्ह काढून हातानेच ‘काय?’ विचारले.
याला काय पद्धत म्हणायची? आमंत्रण पाठवून राजांना बोलावून घ्यायचे आणि ‘कशाला आलात?’ विचारायचे?
अ प मा न! असो, लेकरासाठी काय काय सहन करावं लागतं. राजे, अपमान गिळा, शांत व्हा! 
हातातली चिठ्ठी मास्तरांच्या टेबलावर अदबीने ठेवली. मास्तरांनी चष्म्याच्या काड्या सरळ करून, चष्मा नाकावर एका विशिष्ट ठिकाणी स्थिरावत, नाकासमोर दीड फुटावर चिठ्ठी धरली. तिथूनच हात लांबवत माझ्याकडे जवळपास चिठ्ठी फेकतच फक्त मास्तरच काढू शकेल अशा आवाजात फक्त एकच वाक्य बोलले,
‘It’s at PM, not AM!’
अन्वीने ते पाहावे-ऐकावे असे मला बिलकुल वाटत नव्हते. खाली मान घालून पाठी वळलो तर अन्वी कपाळावर हात मारून खास तिच्या आवाजात एकच वाक्य बोलली,
‘बाबा काय तू?’
नवऱ्याला त्याची फजिती ऐकून बायको खास तिच्या आवाजात एकच वाक्य बोलली, ‘वाटलेलंच मला!’

 

- प्रवीण क्षीरसागर, न्यूयाॅर्क
 postboxpravin@gmail.com

बातम्या आणखी आहेत...