आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठंडे ठंडे पानी से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्यात जेवढे आंब्याला महत्त्व आहे तेवढेच किंवा त्याहूनही जास्त थंडगार पाण्याला आहे. पाण्याच्या या आकर्षणातून हिंदी सिनेमाही सुटलेला नाही. अनेक वेळा कथेची गरज असो किंवा नसो, पाऊस आणणे कठीण असेल तर बाथटब किंवा अगदी कृत्रिम शॉवरच्या पाण्यातच नायिकेला चिंब चिंब भिजवणारी अनेक गाणी चित्रित झाली. 

 

पा यातल्या चपला बाजूला उडवून ती बाथरूममध्ये जाते. उबदार पाण्याचा झोत अंगावर घेताना तिला वाटते,  नुसता मळ नाही, आपण अंतर्बाह्य स्वच्छ होतोय. एका निर्मळ सुखाच्या धुंदीत चिंब होताना अचानक पडदा सरकवला जातो. दिसते एका बाईचीच आकृती. अस्पष्ट. चमकत असतात भक्ष्याचा वेध घेणारे दोन हिंस्त्र डोळे आणि अंधारात लखलखणारा तीक्ष्ण धारेचा सुरा. सर्वकाही सुरळीत होणार या कल्पनेत असलेला प्रेक्षक दचकतो आणि अघटित घडते. सपकन खाली आलेला तो सुरा आणि थिएटरमध्ये ऐकू आलेल्या किंचाळ्या. वाहत्या पाण्याच्या पार्श्वसंगीतावर घेतलेला फक्त तीन मिनिटे आणि तेरा सेकंदांचा हा शॉट. सुरुवातीला काही तरी चावट पाहायला मिळेल या कल्पनेत असलेला प्रेक्षक, सत्याच्या त्या अभद्र दर्शनाने स्तिमित होतो. दोन परस्परविरोधी भावना, दोन्हीकडे उत्तेजना पण अशी टोकाची.


‘सायको’ हा सिनेमा पाहून माझ्या मुलीने शॉवर घ्यायचा सोडला आहे असे एक पत्र हिचकॉकला एका संतापलेल्या  प्रेक्षकाने पाठवले होते. मुंबईत राहणारा नक्कीच नसणार तो. सुऱ्याच्या, जखमांच्या, मरणाच्या भीतीवरही पुरून उरेल एवढी आर्द्रता आहे आज वातावरणात. तरी अजून पाण्याचा दुष्काळ नाही. त्यामुळे शॉवर वापरणे अजून तरी सोडले नाही. पावसात भिजायला अजून बराच वेळ आहे. उन्हाळ्यात जेवढे आंब्याला महत्त्व आहे न तेवढेच किंवा त्याहूनही जास्त थंडगार पाण्याला आहे. पाण्याचे हे आकर्षण हिंदी सिनेमातील नायिकेलाही आहे. कथेची गरज असो किंवा नसो, पाऊस आणणे कठीण असेल तर बाथटब किंवा शॉवरच्या पाण्यावरच ही हौस भागवावी लागते.


बाथटबमध्ये चित्रित झालेले एक गीत पडोसन या सिनेमात सायरा बानूवर चित्रित आहे. इथेसुद्धा प्रेम नाहीच. त्याचा अहसाससुद्धा नाही पण तारुण्याचा उन्माद सायराच्या हालचालीत आहे. नुकती वयात आलेली मुलगी, सुंदर, हुशार आणि सुखवस्तू. त्यामुळे असलेला अंगभूत आत्मविश्वास आणि डौलसुद्धा तिच्यात दिसतोच.


डर लागे क्या होगा, 
पीछे कोई चोर लगा होगा
छोटी उमरीया सफर बडा 
मैं हो गई थक के चूर
भई बत्तूर, भई बत्तूर 
अब जाएंगे कितनी दूर
मनात कोणीच नाही अजून पण कोणीतरी येणार ह्याची खात्री आहे तिला. टब मधून बाहेर येणारा नाजूक पाय, त्याला पांघरून घेणारा तो साबणाचा फेस आणि त्यातून हळूच बाहेर येणारे ते गोड रूप. मुंबईत किंवा शहरात राहणाऱ्या कोणालाही बाथटब ठेवण्याएवढे बाथरूम मिळणे कठीण आहे याची जाणीव आहे. आणि ते असेलही तरी पाण्याची टंचाई आहेच. एक एक थेंब जपायच्या जमान्यात बादली आणि तांब्याचाच उपयोग श्रेयस्कर नाही का! आमच्या लहानपणी पाणी फक्त रात्री एक तास यायचे. त्यात टाकी, बादल्या, पिंप भरून ठेवायचे. सक्काळी आंघोळी आटपून घे म्हणून आजीची सतत भुणभुण चालू असायची. 


ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये
गाना आये या ना आये गाना चाहिये
संजीव कुमार आपल्या मुलाबरोबर जशी गात आंघोळ करतो अशी सांगीतिक आंघोळ फक्त रविवारी करायला मिळायची. बाबा मुलाला आंघोळ घालत आहेत. मुलाचा आणि वडिलांचा संवाद होतो तो पाण्याच्या आणि गाण्याच्या साथीने.
बेटा बजाओ ताली, गाते हैं हम क़व्वाली
बजने दो एक तारा, छोड़ो ज़रा फव्वारा
ये बाल्टी उठाओ, ढोलक इससे बनाओ
हा आहे सुट्टीचा दिवस. आईने बाहेर जायचा कार्यक्रम ठरवला आहे आणि यांच्या साग्रसंगीत आंघोळीने त्याला उशीर होतो आहे म्हणून तिची तक्रार आहे. हे एका कुटुंबाचे गाणे आहे आणि अजूनही खूप लोकप्रिय आहे. गाण्याच्या भेंड्यात “ठ”वरून जी मोजकी गाणी आहेत त्यात हे आहेच. धबधबा, पाऊस, स्विमिंग पूल यातील पाण्यात उतरून हर हर गंगे म्हणणारी बरीच गाणी सिनेमात आहेत पण घराच्या चार भिंतीत रोमान्स करणे आपल्याला बहुतेक जमत नसावे. त्यासाठी तरी लवकर पाऊस पडो ही पर्जन्य देवाला प्रार्थना करणे फक्त हातात आहे.

 


nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...