आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गती आणि गुरुत्वाकर्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानाची भीती अनेक विद्यार्थ्यांना वाटत असते. हे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग नाही, ते आपल्याला कळणारच नाही, अशा विचारांतून आलेली ही भावना असते. नेमकं हेच लक्षात घेऊन वैज्ञानिक संकल्पना कशा शिकवायच्या, याची ही युक्ती...


मुळातच ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण हे माझे आवडते विषय आणि ते शिकवायचं म्हणलं की, जाम हुरूप येतो मला. एकतर यात अनेक रोजच्या जीवनातल्या गोष्टी सांगता येतात आणि त्यांचा संदर्भही पटकन लागतो विद्यार्थ्यांना. आणि वर्ग हसताखेळता राहतो. 
बारावीला ग्रॅव्हिटेशन हा दुसऱ्याच क्रमांकाचा पाठ आहे आणि त्यात escape velocity, critical velocity, projection of satellite असे अनेक मजेदार घटक आहेत. या संज्ञा एकदा कळल्या की, अख्खा पाठ शिकायला एक वेगळी मजा येते. आणि मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी सांगितल्या संदर्भासाठी तर क्लास संपूच नये वाटतं.
सोलापूर आणि तिथे संक्रांतीच्या सुमारास होणारी गड्डा यात्रा हे जुनं समीकरण. यात्रा हा सर्वांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. हाच अभ्यासायचा.
"गड्ड्यात मौत का कुआ कुणी नाही बघितलाय सांगा.’
एकही हात वर नसतो. कारण कोणत्याही यात्रेचं प्रमुख आकर्षणच ते असतं मुळी.
"कुणीच नाही? सगळ्यांनी बघितलाय?’
"हो.’
"मग मला सांगा तो मोटारसायकलवाला हात वगैरे सोडून, कसरती करत कसा काय फिरत असतो? खाली पडायला हवा ना तो तर?’
".......’
मुलांना खरंच आठवत नसतं किंवा कळत असून सांगता येत नाही.
"बरं मग त्यांनी गाडीचा वेग थोडा वाढवला तर काय होईल आणि कमी केला तर काय होईल?’
"कमी केल्यावर पडतील खाली आणि जास्ती केल्यावर विहिरीच्या बाहेर होतील.’
"हेच तर आपलं सॅटेलाइटचं (उपग्रहांचं) फिरणं आहे ना. ठरावीक अशी गती त्या उपग्रहाला देणं जेणेकरून तो त्या ग्रहाच्या ठरावीक कक्षेत फिरत राहील. ती ठरावीक गती म्हणजे critical velocity आणि त्या उपग्रहाला जर त्या ग्रहाची कक्षा सोडून जायचं असेल तर तेवढीच गती देणं जेणेकरून तो ती कक्षा सोडून अंतराळात जाईल, ती ठरावीक गती म्हणजेच escape velocity.’
"म्हणजे तो मौत का कुआवाला असंच करतो ना?"
"अर्थात... तो त्या कक्षांमध्येच फिरत राहतो. वेगवेगळ्या कक्षांसाठी वेगवेगळी गती ठेवतो. पण चुकून जरी त्याच्याकडून तो प्रोजेक्शन अँगल आणि गती चुकली तर एक तर तो विहिरीबाहेर येईल किंवा विहिरीतच जोरात आपटेल. आपण जे काही उपग्रह सोडतो ते critical velocityने फिरत राहतात पण एखादं यान आपल्याला कक्षेबाहेर पाठवायचं तर escape velocity द्यावी लागते.’
"मंगलयान, चंद्रयानसारखं ना?’
मुलं पण पेपर वाचून अवांतर पण गरजेचं ज्ञान मिळवत असतातच.

- प्रियांका पाटील, सोलापूर
pppatilpriyanka@gmail.com

बातम्या आणखी आहेत...