आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशीम गाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज एकादशी. दोन तीनच टेबल लागलेले. चतुर्थी, एकादशीला धंदा जरा मंदा असतो. चार नंबरच्या टेबलवर पाच- सहा कस्टमर बसले होते. सुमन आणि मी हॉलच्या बाजूला बसलो होतो. तिनं ‘रात्री खोलीवर केव्हा पोहचला?’ या पलीकडं मला तोवर काहीच विचारलं नव्हतं. ती मूग गिळून बसली होती. मग पुढाकार घेऊन मीच तिला म्हणालो, ‘आज तोंडाला कसं काय कुलुप लावलं? तरीही तिच्या तोंडातून शब्द फुटला नाही. मग मी जोरात तिला एक चिमटा काढला. लगेच भानावर आली. म्हणाली, ‘रेश्माची काळजी सतावते आहे.’ ‘तिनं काय केलं आता? आणि आज दिसत नाही ती?’ मी प्रश्न विचारुनसुद्धा सुमननं उत्तर दिलं नाही. ती परत काही तरी हरवल्यासारखी बसून राहिली. थोड्या वेळानं माझ्याकडं पाहत सांगू लागली, ‘रात्री तू फ्लॅटवरुन चालता झाला. त्यानंतर रेश्माला पहाटेपर्यंत झोप आली नाही. सारखा तुझा विचार करत होती. तीही झोपली नाही आणि मलाही झोपू दिलं नाही. तुझ्याबद्दलच बोलत हाती.’


सुमननं असं सांगितल्यावर मला मात्र नवल वाटलं. असं काय झालं असावं, की तिच्या मनातल्या विचाराचा मी विषय व्हावा? माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी सुमनला म्हणालो, ‘मी रात्री पाणी प्यायलो नाही म्हणून तिला माझा राग आला का?’ ‘नाही रे! हे तर तिच्या ध्यानीमनीसुद्धा नाही.’ सुमन टेबलकडं पाहत माझ्याशी बोलत होती. सुमननं माझ्या डोक्यात एक नागीन सोडली होती. 


मी रेश्माचाच विचार करत होतो. आज ती ड्युटीवर का आली नाही? यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. तिचं काही दुखत खुपत असेल?, ती डॉक्टरांकडे गेली असेल का? फ्लॅटवर ती एकटी काय करत असेल? आजारी असेल तर तिच्याजवळ कोणीतरी थांबायला हवे. मी सुमनला म्हणालो, ‘ड्युटी संपल्यावर मी तिला भेटायला येऊ का?’ असं म्हणताच ती सणकन बोलली, ‘ती तुझ्याजवळून दूर जाण्याचा प्रयत्न करते आहे, तरी तिला जमत नाहीये आणि तू परत तिच्याजवळ जा. म्हणजे तिला आणखी त्रास व्हायला पाहिजे, नाही का? सुमन असं बोलल्यावर मला काहीच बोलता आलं नाही. मात्र, रेश्मा न आल्यानं मला तिची जास्तच फिकीर वाटत होती. मी तिच्याजवळ तर जात नाही ना? आम्हां दोघात कोणतं नातं तर तयार होत नाही ना? माझ्या मनाला प्रश्न दंश करत होते. 


शटर खाली ओढायची वेळ झाली. माझं जेवण झालं. घरी निघावं म्हटलं, तरी पाय निघत नव्हता. ड्रायव्हर शेठसंगं बाहेर गेलेला होता. त्याची वाट पाहत बारबाला खोळंबल्या होत्या. किचनमधून सुमन रेश्मासाठी जेवण पार्सल घेत होती. रेश्माला राइस आवडतो. म्हणून सुमननं दोन बाऊल राइस कॅरीबॅगेत टाकला. मी तिची वाट पाहत जिन्याजवळ उभा होतो. सुमन अजूनही किचनमधून आली नव्हती. शेवटी जिना उतरु लागलो, तोच ती पळत आली. ‘ कल ड्राय डे है। किधर जानेवाला है तू?’ कही नहीं। घरपर ही हूँ।’ ‘मॉर्निंग को ग्यारह बजे फ्लॅटपर आयेगा?’ ‘देखता हूँ।’ ‘देखना नहीं। फिक्स बता। आयेगा की, नही आयेगा?’ ‘ठीक है। पहुँच जाऊंँगा’ असे म्हणून मी जिना उतरु लागलो...


बरोब्बर अकरा वाजता मी फ्लॅटवर गेलो. सुमन कपड्यांना इस्त्री करत होती. बाजूलाच चादरीवर रेश्मानं अंगं टाकलं होतं.  मला पाहताच सुमन म्हणाली, ‘आईये बरखुरदार। मला वाटलं, तू येणार नाही.’ सुमन बोलते आहे म्हणून रेश्मा उठून बसली, आणि पळत येऊन लटक्या रागानं तिला मारु लागली. दोघीही मोठमोठ्यानं हसू  लागल्या. त्यांच्या तो हसण्याचा आवाज दारा-खिडक्यांमधून बाहेर सांडत होता. रेश्माचं म्हणणं होतं की, ‘ये आनेवाला था तो, तुने मुझे बताया क्यू नहीं?’  मी खाली बसलो तोच रेश्मानं बसायला चादर टाकली. सुमननं रेश्माच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले. ती पुढे सांगू लागली, ‘रेश्मा ही बांग्लादेशातल्या एका छोट्या गावातली आहे. तिला नृत्याची-गायनाची पहिल्यापासून आवड होती. तिचे शिक्षक नेहमी म्हणायचे की, ‘तू गायनाचा क्लास लाव. पण रेश्माच्या घरची परिस्थिती जेमतेम होती.  गल्लीतल्या ओळखीच्या अय्युबनं नृत्य क्लासची हमी घेतली. त्याच्या अमिषाला रेश्मा बळी पडली. एक दिवस दोघेही मुंबईत आले. तेव्हापासून तिला कधीच आपल्या देशी जाता आलं नाही. अनेकदा तिचे प्रयत्न फसले. शेवटी रेश्मा थकली. डोळ्यांतून वाहणारं पाणी सुकलं. जे समोर आलं, ते इच्छा नसताना सगळं स्वीकारलं. ती कधीच कुणाजवळ मोकळी बोलली नाही. सतत मनातल्या मनात जळत राहिली.  तू भेटल्यापासून तिला आपलं कुणीतरी सापडलंय, असं वाटतंय. तू नेहमी आमचा स्त्री म्हणून विचार करतो, ही गोष्ट तिला खूप भावली. कस्टमर, मालक फक्त तोंडापुरतं बोलतात. काम काढून घेतात. नंतर टिश्यू पेपरसारखं यूज करुन फेकून देतात. तुझं नोकरी करुन शिकणं, बोलणं तिनं आपल्या काळजावर कोरलंय. तुझ्यात ती गुंतत चाललीय. पण तिची जबरदस्ती नाहीये. ती आपली पायरी सांभाळून आहे.’ सुमननं रेश्माचा अख्खा पाढा वाचला...


रेश्माबद्दल माझ्या मनात सहानुभूती निर्माण झाली होती. पण ही बांगलादेशीय बारबाला आहे. हा विचार माझ्यावर कुरघोडी करत होता. कधी कधी वाटायचं मुलगी म्हणूनचे सगळे गुण रेश्मात होते. फक्त ती लेडीज बारमध्ये नोकरी करते. इच्छा नसतानाही तिला कस्टमरशी लगट करावी लागते. कस्टमर तिच्या अंगाला हात लावतात. यामुळे सारखा जीव जळत होता. सुमनला काय सांगावं? नाही बोलावं, तर मीदेखील परंपरेचा पाइक ठरणार होतो. रेश्मा माझ्या उत्तराची वाट पाहत होती. तेवढ्यात मी पटकन तिचा हात धरला. हे बघून सुमन आत निघून गेली. आता 
रेश्माचा हात माझ्या हातात होता. हातावर तिच्या डोळ्यातलं थेंब थेंब पाणी गळत होतं...


दुपारचा समय हॉटेलमधून निघायचं नाव घेत नव्हता. तो भिंतींना जणू काही पक्का चिकटला होता. अशा वेळी फारसे कस्टमर नसायचे. त्या दिवशी मी कॉलेजमधून सरळ हॉटेलमध्ये गेलो. मला पाहताच रेश्माची कळी खुलली. तेवढ्यात तीन-चार कस्टमर जिना चढून वर आले. हेल्परने टेबलवर ग्लास, पाणी ठेवलं. कांता टेबलवर गेली. तिला पाहताच त्या कस्टमरच्या डोळ्यात तिडीक उठली. ती त्यांच्याशी लाडानं बोलू लागली. हातात हात घेण्यासाठी तिनं दोन वेळेस हात पुढे केला. मात्र कोणतंच कस्टमर तिच्याशी बोललं नाही. हस्तांदोलनासाठी हातही पुढे केला नाही. ती बोलण्याची वाट बघू लागली. तेव्हा त्यातलं एक कस्टमर म्हणालं, ‘रेश्माला पाठव टेबलवर.’ हे ऐकून कांताला खूप गुस्सा आला. ती पाय आपटत रेश्माकडं आली. ‘तुझे बुलाया उसने।’ असे सांगून  स्टाफ रुमकडं निघून गेली. 


कांता स्टाफ रुममधून उठलीच नाही. टीना, ऐश्वर्या, बबली किंवा कोणत्याही वेटरनं तिच्याकडं लक्ष दिलं नाही. घडलेलं हे सारं केव्हा रेश्माला सांगतो, असं मला झालं होतं. रेश्मा शेवटच्या टेबलवर कस्टमरशी हसत होती, बोलत होती. पेग बनवताना शेजारी बसली होती. ते पाहिल्यावर माझा आतल्या आत भडका उडाला. पण, तिचं कस्टमरशी असं बोलणं मला सारखं जाळत का होतं? थोडा वेळ मी वाट बघितली. ती आली नाही. मला ते सहन झालं नाही. ताडताड जिना उतरुन मी रस्त्याला लागलो. रेश्मा आणि कांता नजरेपुढे आल्या. एकीच्या चेहऱ्यावर उद्याचा दिवस  कसा उगवेल,याची भ्रांत होती, तर रेश्मा माझ्याकडे बघून वाहत्या पाण्यासारखी खळखळून हसत होती.  मात्र, दोघींच्याही विचारानं चक्रव्यूहात अडकलेला मी रस्ता कापत होतो. बेभान होऊन.

 

rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४

बातम्या आणखी आहेत...