आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभासी दुनियेचे सत्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी करत असताना फक्त काॅल करणे व काॅल घेणे इतकाच माेबाइलचा वापर करत होते. परंतु निवृत्तीनंतर एकेदिवशी व्हाॅट्सअॅपची गरज पडली. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे! खूप दिवस शिकायचे शिकायचे म्हणत होते, परंतु जमतच नव्हते. मुलगा पुण्यात साॅफ्टवेअर अभियंता आहे, तो घरी आला की जेवणखावण, गप्पाटप्पा, यांतच दोन दिवस कसे निघून जायचे समजतच नसे. मग पतिदेवांना एक दिवस म्हणाले, ‘मला शिकवाच आता.’


‘अगं, काय कामं सोडून मागे लागलीस?’
‘नाही, शिकवाच.’
परंतु, त्यांचा काही मूड नव्हता तेव्हा, त्यांनी रागारागातच शिकवले. त्यामुळे मीही त्या वेळेस समजून घेतले तरी खरे समजलेच नाही. एकदोनदा प्रयत्न केला आणि मग जमायला लागले. हे तर फार सोपे आहे, असे लक्षात आले. इंग्रजी, मराठी मेसेजही टाइप करायला शिकले. एखादी गोष्ट शिकल्यानंतर व्यक्ती ती गोष्ट पुन्हापुन्हा करून पाहते. ‘तुला मी शिकवत नव्हतो तेच बरं होतं, या आभासी दुनियेत रमू नको, वास्तवात राहा,’ असं हे म्हणू लागले. ते विज्ञानाचे विद्यार्थी, त्यामुळे व्यावहारिक. मी साहित्याची विद्यार्थिनी, त्यामुळे भावनिक.


व्हाॅट्सअॅपवर अनेक संदेश येऊ लागले. सुप्रभात ते शुभरात्री. काही सामाजिक आशयाचे, आध्यात्मिक, साहित्यिक, विनोदी, चांगली गाणी, चित्रफिती, वगैरे. ते वाचून माझ्या ज्ञानात आणि आनंदात भर पडत होती. काही काही संदेशांना मी उत्तरही देत होते. ‘अगं, तुझ्याइतका कोणी त्यावर विचार करत नाही, ते फक्त पुढे ढकलत असतात,’ हे म्हणाले. हा एक मूक संवादच. त्यावरून व्यक्ती खरेच कशी आहे, तिचे मन कसे आहे, ते समजतच नाही. मला असे वाटते की, सगळ्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही. काही लोक दूर गावी असतात, म्हणून त्यांच्याशी हा मूक संवाद. परंंतु, प्रत्यक्ष समोरासमोर आल्यानंतर जो संवाद होतो, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ती व्यक्ती आपल्याला जास्त उमगते. खरा मित्र कोण, शत्रू कोण, का वरवर गोड बोलून मतलब साधणारे कोण, हे प्रत्यक्ष भेटीत अधिक चांगले कळते. व्हाॅट्सअॅपमुळे माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे, प्रत्यक्षात तो कृती किती करत असेल, याविषयी शंकाच आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध व्हाॅट्सअॅपवर करणं सोपं आहे. 


जेवढे तुम्ही समाजात मिसळाल तेवढा तुमचा अनुभव जास्त, तेवढा दृष्टिकोनही व्यापक होतो. काम करण्यास प्रेरणा मिळते. 


या वयात आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे. चालणे, फिरणे, घरातील आवश्यक कामे करणे, वाचन, या सर्व गोष्टी करत राहायला हव्यात. ‘सिर सलामत तो पगडी पचास. व्हाॅट्सअॅप वापर, पण मर्यादेत,’ असे यांचे म्हणणे. मुलगाही म्हणतोय, ‘आई, दिवसातील फक्त अर्धा तास वेळ दे. शेवटी हे आभासी जग आहे, त्याच्या मर्यादेचे भान ठेवलेच पाहिजे.’


- रत्नमाला दुधे, नाशिक

बातम्या आणखी आहेत...