आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदृश्‍य वेदनांचा माग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी वेदनेची ठसठस मराठी कथाविश्वात या ना त्या रूपांत उमटत होतीच. मनाचा तळ ढवळून काढण्याची ताकदही या कथेमध्ये होती, परंतु वर्ग आणि वर्गभेदातून उद््भवणाऱ्या मानसिक-भावनिक संघर्षाचं भान तिच्या ठायी तसं अभावानेच होतं. प्रस्तुत कथासंग्रहाद्वारे कथाकार जयंत पवार ही उणीव भरून काढताना वंचितांच्या वाट्याला येणाऱ्या वेदनेच्या अदृश्य छटांचेही समर्थपणे दर्शन घडवतात....

 

थाकार हा कधी काळच्या वंचितांचा वंशज आहे. कथाकाराने डोळ्यांना दिसणाऱ्या आणि कानांना ऐकू येणाऱ्या वास्तवापलीकडे पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझा स्वत:चा तसा प्रयत्न असतो. जसं घडलं तसं सांगणं, म्हणजे, कथा हे सोपं समीकरण रूढ झाल्याने कथा नि:सत्व झाली.’ कथा या वाङ््मय प्रकाराच्या संदर्भातलं हे विचार प्रवर्तक असं चिंतन. कथाकार जयंत पवार यांनी ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केलेलं.  याच मनोगताचा सारांश पवार यांच्या ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या प्रस्तुत कथासंग्रहाला सुरुवातीला जोडला आहे. त्यातून त्यांची ठाम भूमिका  आणि स्वतंत्र लेखनशैलीचे महत्त्व वाचकांपर्यंत पोहोचले आहे.


त्यांच्या ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या प्रस्तुत कथासंग्रहात पाच दीर्घ कथांचा समावेश आहे. अर्थातच आपल्या कथालेखनाच्या भूमिकेशी प्रामाणिक राहूनच त्यांनी हे कथालेखन केले आहे. ‘आपण वंचितांचे प्रतिनिधी आहोत’ हे ते क्षणभरही विसरले नसल्याचे या कथा वाचताना प्रत्ययाला येते. कथेला कल्पकतेची, अद््भुताची तर कधी सौम्य विनोदाची, उपहासाची जोड ते देतात. वंचितांच्या जीवनातील अभावग्रस्तता, अगतिकता, व्यथा, वेदना आणि कारुण्य कथाभर ओसंडून वाहताना जाणवते. अद््भुततेतून, कल्पनारम्यतेतून साकारत जाणाऱ्या त्यांच्या कथेला काळीज कापत जाणाऱ्या कारुण्याची अशी काही किनार असते की, कथा वाचून झाल्यावर वाचक सुन्न होतो, अंतर्मुख होतो. कथा ज्या परिसरात घडते, तो परिसर ते, चित्रकाराने कुंचल्याने चित्र रंगवावे, तसा शब्दातून जिवंत करताना. त्यांच्या कथेतील पात्रं सजीव साकार होऊन आपल्या आसपास वावरत असल्याचा भास होतो. कथालेखनाची त्यांची शैली एवढी प्रभावी आहे की, कथांतर्गत विविध स्थळांवर ते सहज लीलया संचार करतात आणि वाचकालासुद्धा बोट धरून फिरवून आणतात. ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ संग्रहातील कथा वाचताना वाचक कथा केवळ वाचत नाही तर, कथाभरच्या कल्पनारम्य अद््भुत वातावरणात विस्मयचकित होऊन कथा अनुभवत व पाहत राहतो. जयंत पवारांची कथा नागर असली तरी वंचितांचं बोट कधी सोडत नाही.


‘बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य...’ ही या संग्रहातली पहिलीच कथा. या कथेचा निवेदक मधून मधून वाचकाशी कथांतर्गत संवाद साधतो. हा संवाद कथेत वेगळ्या टाइपात नोंदवलेला आहे. कथेतील या संवादातील, ‘नुसत्या वास्तवाने हृदयं उचंबळत नाहीत, जर ती उचंबळत असतील, तर समजावं की त्या वास्तवात अद््भुताचा अंश आहे, नवी मिथकं निर्माण करणं लेखक म्हणून माझं काम आहे, मिथकं अलौकिक माणसाचीच होतात, वास्तवाशी फारकत म्हणजे सत्याशी फारकत नव्हे, किंबहुना वास्तवाला मुरड घालूनच सत्यापर्यंत पोहोचता येईल असे माझे मत आहे, काळाच्या मोठ्या टापूवर परिणाम करत काही मूल्य रुजवायची असतील तर कथाकार म्हणून मला मिथकंच रचली पाहिजेत,’ अशी काही विधानं कथा लेखकाची कथा लेखनामागची भूमिका अधिक स्पष्ट करतात. वाचकाला एका अद््भुतांची अनुभूती देतात.


‘सर निघाले सप्तपाताळाकडे...’ ही एका वयोवृद्ध प्राध्यापकाची कथा. लेखक प्राध्यापकासोबत वाचकाला पोस्टाच्या अंधाऱ्या गोदामात, वितरित न होता पडून राहिलेल्या कुबट पत्रांच्या गराड्यात घेऊन जातात. मग, ‘पत्र म्हणजे संवाद आणि संवाद म्हणजे माणूस जिवंत असल्याची खूण’ असं सूचक विधान करून, पडून राहिलेल्या पत्रांतील मजकुरातून वंचितांच्या कुबट, अंधाऱ्या आयुष्याचं दर्शन घडवतात. वंचितांच्या आयुष्याच्या जीवघेण्या दर्शनाने वाचक सुन्न होतो. ‘हालीच्या पोरीना कायपन सहन करायचे नसते. मग बाईच्या जन्माला येऊन काय उपेग मावली’ अशा शब्दांत लेखक स्त्रियांच्या सोशिक, शोषित जीवनाचं भेदक विदारक सत्य उजागर करतात. वंचितांच्या जीवनातील एकूणच अभावग्रस्तता, अगतिकता, व्यथा आणि वेदना, ‘We are sailing in the same boat and remember one thing. no one dies virgin, life xxx many ways...’ अशा शब्दांतून तीरासारखी काळजात रुतून बसते. ‘आपलेपणा नसतो तिथे शोषण क्रूर होतं.’ ‘माणसं नाही आयुष्यभर पडून राहतं? कुत्रं विचारत नाही. ‘जन्म म्हणजे नवं सृजन, असंच काही नाही. एका जन्माबरोबर एक मृत्यूही जन्म घेतो.’ सगळ्या आयुष्याच्या तळाशी बालपणाचा अर्क असतो, अनेक ज्येष्ठांना घरी एकटे राहण्याचे भय वाटते. ‘एकट्या माणसाला शहर खाऊन टाकतं.’ कथेतील अशी काही विधानं वर्तमान जगण्यातील वास्तवाआड दडलेलं अमानुष सत्य अधोरेखित करून वाचकाला अस्वस्थ करतात.


‘वरन भातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’! ही मुख्यत: बय व डिग्या यांच्या आयुष्याची परवड कथन करणारी कथा. तरीही अनुषंगाने या कथेत अनेकानेक पात्रं येतात. बय व डिग्या यांच्या आयुष्याची फरपट तर ही कथा प्रवाहीपणे कथन करतेच, पण सोबतच नागरी जीवनातील वंचितांच्या शोकांतिकेलाही सहज हात घालते. लेखक कथातंर्गत पात्रांच्या आयुष्याशी संवेदनशील आत्मीयतेने एकरूप झाले असल्याने या शोकांतिकेतील कारुण्य वाचकाच्या मनाला हेलावून टाकते. दीर्घ असली तरी कल्पनारम्यता, अद््भुतता यांच्या आधारे आकारत जाणारी ही कथा वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवते.


‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य...’ ही रहस्यकथाकार असलेल्या अलौकिक जीवन जगणाऱ्या काकांची गोष्ट. कथांतर्गत रहस्य कथा आणि या रहस्यकथांच्या अंगाने काकांचं अलौकिक आयुष्य रहस्यमयरीत्या उलगडत जाणारी ही कथा उत्कंठावर्धक जमून आली आहे.


‘तुझी सेवा करू काय जाणे...’ ही या संग्रहातील शेवटची कथा. गिरणी कामगारांच्या आयुष्यातील कारुण्यपूर्ण जीवघेणं वास्तव, ही कथा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कधी सौम्य विनोदातून, कधी उपहासातून, कधी पुराणातील अगम्य, अद््भुत, काल्पनिक कथा, दंतकथा यांचा आधार घेऊन वाचकांपर्यंत पोहोचवते. कथेतील पर्यावरणीय पट खरे तर खूप मोठा विस्तृत. कधी चाळीतील दहा बाय दहाची अंधारी खोली, तर कधी गणेशोत्सवाचा झगमगाटी भव्य मंडप. कधी गिरणीचा परिसर तर कधी समुद्र किनारा. पण हे स‌र्व पर्यावरण लेखकाने चित्रमयरीत्या आपल्या शब्दातून सजीव साकारले आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्याआधारे कालक्रमण करणाऱ्या गिरणी कामगारांचं केविलवाणं आयुष्य, त्या आयुष्यातील करुण कारुण्य लेखकाने टोकदारपणे टिपलं आहे. कथेतून आलेलं गिरणी कामगाराचं जगणं, त्या जगण्यातील कारुण्य मध्यमवर्गीय संवेदनशील वाचकाला शरमेने मान खाली घालायला भाग पाडतं.


गिरणी मालकापासून तर गिरणी कामगारापर्यंत आणि बिल्डरांपासून तर विस्थापित झोपडवासीयांपर्यंत अवघं नागर जीवन, ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या संग्रहातील कथा आपल्या कवेत घेताना दिसतात. दीर्घ पल्ल्याच्या असल्या तरी आणि कथांतर्गत पात्रांची संख्या खूप मोठी असली तरी, कथेला कल्पनारम्यता, अद््भुतता यांची बेमालूम जोड दिल्याने कथेतील वंचितांच्या आयुष्यातील जीवघेणं वास्तव व त्या वास्तवाआड दडलेलं कारुण्य खिळवून ठेवतं. आपल्या कथाविषयक भूमिकेशी ठाम राहून जयंत पवार आपल्या कथेतून वास्तवाआड दडलेलं अगोचर विदारक सत्य वाचकाला गोचर करून दाखवतात. त्यामुळेच वास्तव आणखीनच प्रखरपणे काळजाला भिडत राहतं.


- रवींद्र पांढरे
लेखकाचा संपर्क : ९४०३०१९६१७

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...