आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण रक्षणासाठी ऊर्जा संवर्धन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांचे मर्यादित साठे, त्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम आणि त्यामुळेे ऊर्जा संवर्धनाच्या उपायांचं महत्त्व याचा आढावा आपण या लेखमालिकेच्या पहिल्या भागात घेतला. या लेखात जाणून घेऊया अपारंपरिक ऊर्जास्रोतांबद्दल. 

 

आ पण वर्षानुवर्षे जे ऊर्जा स्रोत किंवा इंधन वापरत आलोय त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम पर्यावरणातील प्रत्येक घटकावर होतो. आपली आतापर्यंतची जीवनशैली मुख्यत्वे अपारंपरिक ऊर्जेवर आधारलेली आहे. यामुळे आपलं राहणीमान उंचावून जीवन सुखकर झालं, परंतु या ऊर्जानिर्मिती व वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे किती तरी जिवांच्या प्रजाती धोक्यात आल्या. तापमान वाढू लागलं. अनियमित पर्जन्यमान, बदलतं ऋतुमान या गोष्टी आपण अनुभवतो आहोत. तसेच ही ऊर्जा मर्यादित असल्यामुळे ऊर्जेची वाढती मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ घालणं कठीण झालं आहे. याला अटकाव घालण्यासाठी पर्यायी ऊर्जेचा वापर ही काळाची गरज बनली आहे. ही पर्यायी ऊर्जा म्हणजे अपारंपरिक ऊर्जा. यालाच अक्षय ऊर्जा (न संपणारी/ पुनर्निर्मित होणारी ऊर्जा) असेही म्हणतात.  


पूर्वीचा निसर्गपूजक मनुष्य पृथ्वी, आप (जल), अग्नी, वायू आणि आकाश या पंचहाभूतांची पूजा करत असे. आज आपणही नव्या प्रकारे अपारंपरिक ऊर्जेच्या रूपात याकडे वळू लागलो आहोत. या ऊर्जा स्त्रोतांचे दोन मुख्य फायदे आहेत. एक म्हणजे बहुतांश भागात ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि दुसरा आणि महत्त्वाचा फायदा हा की, ही ऊर्जा प्रदूषणविरहित असून यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही. 

निसर्गात सहज आढळणारे मुख्य अपारंपरिक ऊर्जा स्रोत पुढीलप्रमाणे :-


भू-औष्णिक ऊर्जा
भूगर्भातील किंवा काही ठिकाणी भूपृष्ठावर असलेल्या उष्णतेचा वापर करून वीजनिर्मिती करता येते. अशा ठिकाणी कूपनलिका खोदून औष्णिक ऊर्जा वापरली जाते. या प्रकारच्या ईर्जेला भूऔष्णिक ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा मात्र काही ठरावीक ठिकाणीच उपलब्ध असते.


जल ऊर्जा
नद्यांच्या उगमांच्या ठिकाणी धरणे बांधली जातात. ते पाणी खाली सोडले की, गतिज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत रूपांतर होते. ही ऊर्जा वापरून वीजनिर्मिती करता येते. तसेच सतत वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची गतिज ऊर्जा वापरून वीजनिर्मिती करता येते. यालाच हायड्रोइलेक्ट्रिसिटी असेही म्हणतात.


समुद्र ऊर्जा
चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती-ओहोटीचे चक्र अविरत सुरू असते. या भरतीओहोटीच्या ऊर्जेचा वापर करून ऊर्जानिर्मिती करता येते. तसेच सतत येणाऱ्या समुद्राच्या लाटांची गतिज ऊर्जा वापरून वीजनिर्मिती करता येते. याशिवाय महासागरांच्या पृष्ठभागावर पडणारी सूर्यापासून शोषली जाणारी ऊर्जा वापरून वीजनिर्मिती करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.


पवन ऊर्जा
वाऱ्याच्या गतीचा वापर करून जी ऊर्जानिर्मिती होते त्याला पवन ऊर्जा म्हणतात. जिथे वारा जास्त वाहतो अशा ठिकाणी पवनचक्क्यांच्या साहाय्याने गतिज ऊर्जा वीजनिर्मितीसाठी वापरली जाते. हा स्रोत मात्र अनियमित आहे.


सौर ऊर्जा
सूर्य हा पृथ्वीवर मिळणाऱ्या ऊर्जेचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा स्रोत आहे. सूर्यापासून उष्णता व प्रकाश या स्वरूपात येणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात. सूर्यापासून पृथ्वीवर जेवढी सौर ऊर्जा पोहोचते ती आपल्या एकंदर गरजेपेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे. म्हणून सौर ऊर्जेकडे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचा ऊर्जा स्रोत म्हणून पाहिलं जातं.


भारताच्या भौगोलिक स्थितीमुळे वर्षभर आपल्याला मुबलक प्रमाणात सौर ऊर्जा मिळते. या वर्षी जानेवारीमध्ये भारताने २० गिगावॅट इतकी सौरस्थापित क्षमता गाठली. गेल्या चार वर्षांत भारताची सौर ऊर्जानिर्मितीची क्षमता ८ पटींनी वाढली आहे. ग्रामीण भागात कितीतरी सौरचुली वितरित करण्यात आल्या. सोलर पॅनलच्या आयात दरात घट, तसेच विविध सबसिडीज आणि योजना यामुळे ग्रामीण भागातसुद्धा सौर ऊर्जेच्या वापराला चालना मिळतेय. सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, सोलर स्टील, सौर घट असा सौरऊर्जेचा प्रत्यक्ष वापर वैयक्तिक पातळीवर आपण करू शकतो. तसेच सोलर पॅनलद्वारे विजनिर्मितीसुद्धा आता सहज शक्य होऊ लागली आहे. जिथे वीज पोहोचू शकली नाही अशा भागात सौरऊर्जा आज वरदान ठरतेय. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जिथे सौर ऊर्जा वापरून विद्युतनिर्मिती होते तिथेच ती वापरून वहनात वाया जाणारी ऊर्जा वाचवता येऊ शकते. तसेच ग्राहक ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतो. नेट मीटर पॉलिसीमार्फत अतिरिक्त निर्माण झालेली ऊर्जा आपण महावितरणला पाठवून भार काही प्रमाणात हलका करू शकतो. अपारंपरिक ऊर्जा हा उत्तम पर्याय आपल्याकडे असला तरी तिच्या विकासात अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. पारंपरिक ऊर्जेची जागा पूर्णपणे अपारंपरिक ऊर्जा सद्य:परिस्थितीत तरी घेऊ शकत नाही. त्या एकमेकांना पूरक आहेत. अपारंपरिक ऊर्जावापरालासुद्धा मर्यादा आहेत. हे ऊर्जा साठे अक्षय असले तरी ऊर्जेची प्रचंड वाढती मागणी सध्या पुरवू शकत नाहीत. तसेच या स्रोतांवर पूर्णपणे निसर्गाचे नियंत्रण आहे. परंतु अपारंपरिक व पारंपरिक ऊर्जा या दोन्हींचा योग्य व्यवस्थापनाद्वारे समन्वय साधून आत्ताची गरज निश्चित भागवली जाऊ शकते.

 


rucha.abhyankar15@gmail.com

बातम्या आणखी आहेत...