आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरावेचक लोककलावंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरूबाई वाघमारे... एकीकडे पुण्याच्या रस्त्यारस्त्यांवरचा कचरा वेचतात आणि दुसरीकडे वस्त्यावस्त्यांपासून ते अगदी परदेशात जाऊन लोकगीतं सादर करतात. प्रचंड ताकदीच्या लोककलावंत आणि शाहीर. शाळेची पायरीही न चढलेल्या सरूबाईंनी घेतलेला समाजप्रबोधनाचा वसा उलगडून दाखवणारा हा रिपोर्ताज...


सचिन बगाडे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. एक दिवस ते मला पुणे महानगरपालिकेच्या जवळ भेटले. गडबडीत होते. त्यांना विचारलं, "कॉम्रेड, काय गडबड?'
त्यांनी सांगितले, "मुक्ता साळवे यांच्या नावाने साहित्य संमेलन घेतोय. संमेलनाच्या अध्यक्षांना भेटायला निघालोय.’
"कोण आहेत अध्यक्ष”
"सरूबाई वाघमारे’
नाव नवीनच होत. पुन्हा मी म्हणालो, "कोण?'
त्यावर सचिनराव म्हणाले, "त्यांचं नाव तुम्हाला माहिती नसेल बहुतेक. पण त्या लोककलावंत आणि शाहीर आहेत. दीडशेच्या वर चळवळीतील गाणी लिहिली आहेत.’ ते ऐकल्यावर मी त्यांना म्हणालो, "खरं तर मी हे नाव आजच ऐकतोय.‘
मग मी त्यांच्यासोबत साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या सरूबाईंना भेटायला निघालो. 


पुण्यातील कसबा पेठेकडून कुंभारवाड्याकडून महापालिकेच्या दिशेनं जो रस्ता येतो. त्याच कोपऱ्यावर एक झोपडपट्टी आहे, तिथं आलो. सचिन बगाडे यांच्या पाठोपाठ चाललो. एका घराच्या पुढे थांबलो. एक बाई भांडी घासत बसल्या होत्या. बगाडे म्हणाले "या आहेत आमच्या अध्यक्षा.' मग त्या आम्हाला पाहून उठल्या. साहित्य संमेलनं, त्यांचे अध्यक्ष, त्यावर होणाऱ्या वादग्रस्त चर्चा... या सगळ्या पार्श्वभूमीवर सरूबाई वाघमारे यांच्या रुपाने एक साधा अध्यक्ष आमच्यासमोर होता. श्रमिक वसाहतीत राहणारा, 
साहित्यिक असलेल्या या सरूबाईला पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान मिळणार होता.


आम्ही आत गेल्यावर सरूबाई त्यांच्या साहित्यनिर्मितीबद्दल बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, "मी लहान असताना आजीसोबत भजनाला जात होते. मला त्याची आवड निर्माण झाली. माझे अनेक अभंग पाठ झाले. नंतर माझ लग्न झाल्यावर माझं भजनाला जाणं कमी झालं. पण कुठं गाणं, संगीत ऐकलं की जीव हुरहूर व्हायचा. काम थांबवून गाणं ऐकावं असं वाटायचं. मी आणि माझा नवरा कागद, काच, पत्रा गोळा करायचो. रस्त्यावर फिरताना कोठेही संगीत ऐकलं की बरं वाटायचं. एक दिवस अशीच बसले असताना मला एक ओळ सुचली आणि त्याच वेळी ‘साजन' चित्रपटातील एक गाणं कानावर पडलं. मग त्याच चालीवर गाण्यांच एक कडवं तयार केलं. गुणगुणत पाठ केलं. दुसऱ्या दिवशी सगळंच गाणं तयार झालं. मग ते गाणं जपून कस ठेवायचं, हा प्रश्न पडला. कारण मला वाचायला, लिहायला येत नव्हतं. मग मालकांना (नवऱ्याला)सांगितलं. नवऱ्यालाही कौतुक वाटलं. त्यांनी गाणं लिहून घेतलं. मग मी अधूनमधून सिनेमाच्या चालीवर गाणी रचू लागले. माझा नवरा ती गाणी लिहून ठेवू लागला. मी झोपडीपट्टीतील लोकांचं जगणं, तिथले प्रश्न, दारूबंदी, पुढाऱ्यांकडून लोकांची होणारी फसवणूक, पुरोगामी चळवळ या विषयांवर गाणी रचू  लागले.याच दरम्यान आमच्या कागद काच पत्रा संघटनेचा एक मोर्चा होता १९९५ मध्ये. या मोर्चात मी पहिल्यांदा लोकांच्या समोर जाऊन गाणं म्हटले. माझ्या सोबत असलेल्या कागद,पत्रा गोळा करणाऱ्या बायकांना खूप आश्चर्य वाटले. त्या माझं कौतुक करायला लागल्या.नंतर मला गाणी रचायला हुरूप आला. आणि मी गाणी रचू लागले. म्हणू लागले.'


शाळेची पायरीही न चढलेल्या सरूबाई त्यांच्या गाण्याच्या निर्मितीची कुळकथा सांगत होत्या. सांगत सांगत त्या गाणीही म्हणून दाखवत होत्या. सरूबाईच्या गाण्याचे विषय सामाजिक आहेत. त्या याच विषयावर गाणी लिहितात. आजवरच्या आयुष्यात त्यानी अनेक गाणी लिहिलेली असली तरी दारूबंदी, हुंडाबंदीवर लिहिलेली गाणी लोकांना आवडतात. ती गाणी लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. हुंडाबंदीवर लिहिलेले गाणे "आंटीने वाजवली घंटी'या चित्रपटाच्या चालीवर आहे. हे गाणे आज सरूबाई जातील त्या कार्यक्रमात लोकांना ठेका धरायला लावतात. शहरातील पुढाऱ्यांच्यावर रचलेलं ‘आम्ही तुम्हाला निवडून दिलं, सांगा तुम्ही ओ काय काय केलं?' हे त्यांचं गाणंही अनेकंच्या मुखी बसलेलं आहे. अगदी शालेय  संमेलनातही हे गाणं गाजलेलं आहे. आता तर सरूबाईनी हे गाणं लिहिलेलं आहे हे सांगावं लागतं. सरूबाई म्हणाल्या,"एकदा मी कचरा गोळा करत असताना शाळेजवळून निघाले होते. कानावर "आम्ही तुम्हाला निवडून दिलं’सारखं काही तरी ऐकायला मिळालं. मग त्या आवाजाच्या दिशेनं गेलो तर पोर -पोरी मिळून ते गाणं म्हणीत होती. मला इतका आनंद झाला काय सांगू? बघत उभी राहिले. थोड्या वेळाने तिथले शिक्षक आले. त्यांनी सरूबाईला  विचारलं,"कोण हवंय?’
त्यावर सरूबाईंनी, ही पोर जे गाणं म्हणत्याती ते माझं आहे, असं सांगितलं. सुरुवातीला त्यांना पटत नव्हतं. पण त्यांच्यासोबत असलेल्या बाईंनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलं जिथं सराव करत होती तिथं सरूबाईंना नेलं. मग त्यानी आपल्या खड्या आवाजात मुलांना ते गाणं म्हणून दाखवलं. ते गाणं एवढं रंगलं की मुलांनी त्या गाण्यावर ताल धरलाच, पण शिक्षकांनीही ठेका धरला.हा अनुभव सांगताना सरूबाई हरखून जातात.


सरूबाई गाणी रचत होत्या. पण त्या खऱ्या अर्थाने लोकांसमोर आल्या बारामतीत. तिथं सुनंदा राजेंद्र पवार यांनी एक कार्यक्रम घेतला होता. त्यासाठी सरूबाई गेलेल्या. तिथं त्यांनी काही गाणी सादर केली. ती गाणी ऐकून सुनंदा पवार म्हणाल्या "या तर प्रतिबहिणाबाई आहेत. "या कार्यक्रमानंतर त्यांना अनेक ठिकाणी बोलावणं यायला लागलं. लोककलेच्या कार्यक्रमाला त्या जाऊ लागल्या.


सरूबाई या लोककवी -शाहीर आहेतच पण त्यांच्या दैनंदिन जगण्याची लढाई समजून घेतली पाहिजे. त्या सकाळी लवकर उठल्या की नवऱ्यासोबत कचरा गोळा करायला जातात. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारी ही लोककलाकार आहे. त्यांनी कचऱ्यावरही लिहिले आहे. त्यात त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितलं आहे.सरूबाईच्या कामामुळे आणि आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे अमीरखान यांच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात त्यांचा सत्कार झाला आहे. परदेशातसुद्धा त्यांनी गाणी गायलं आहे. आतापर्यंत सरूबाईंनी अमेरिका, जर्मनी, थायलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील अशा ठिकाणी जाऊन त्यांची कला सादर केली आहे. अर्थात त्यांच्या गाण्याचा आशय तिथल्या दुभाषाने लोकांना समजावून सांगितला.पण विमानाने एवढ्या दूर जाऊन गाणं म्हणण्याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. कचऱ्याच्या व्यवस्थापनावर होणाऱ्या कार्यशाळेसाठी त्या आठ दहा देशांत मांडणी करण्यासाठी गेल्या आहेत. लोकांचं प्रबोधन करणारी गाणी रचणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. पण त्यासोबत कागद काच पत्रा पंचायत या संघटनेच्या त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्या म्हणतात,"संघटनेतील लोकांच्यामुळे मला आत्मविश्वास निर्माण झाला आहे.त्यांच्यामुळं माझ्या आयुष्याला दिशा मिळाली.’


सरूबाई आणि त्यांची लोकगीत याची चर्चा झोपडपट्टीतील लोकांमध्ये आहे. कोठेही कार्यक्रमात गेले की त्यांचं नाव पुकारलं जातं. सत्कार होतो. पण राज्यभर वेगवेगळी साहित्य संमेलन होतात त्यासाठी या सरूबाईला आजवर साधी निमंत्रण पत्रिकाही आलेली नाही. शाळेची पायरीही न चढता गाणी रचणाऱ्या या श्रमिक लोककवीचं कौतुक करावं, त्यांचा सन्मान करावा, असं प्रस्थापित साहित्य व्यवहार सांभाळणाऱ्या मंडळींना कधीच वाटलं नाही. गाणं रचणारी सरूबाई श्रमिक वसाहतीत फेमस आहेत, पण जिथं साहित्यांचे सोहळे होतात तिथपर्यंत त्यांचा हा लोकगीतांचा आवाज गेलेला नाही. याच सरूबाईच्या आजवरच्या साहित्याची कदर व्हावी म्हणून सचिन बगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांची निवड केली आणि एका श्रमसंस्कृतीतील लोककलावंताला सलाम केला.


बगाडे यांनी साहित्य संमेलनाची पत्रिका सरूबाईना दिली,"सचिन मला गाणं म्हणायला येतं.पण तू म्हणतोस भाषण करायला लागलं. मला जमलं का?’
"सरूबाई, तुम्हाला जस जमलं तसं बोला.’
"हो हो. मला जे वाटलं ते बोलेन.’
"चाललं...’


आम्ही त्यांचं घर सोडलं. थोडे पुढं गेल्यावर माग फिरून बघितलं तर सरूबाई आम्ही गेल्यावर त्यांची भांडी घासायची तशीच राहिली होती, त्या भांड्याजवळ बसून भांडी घासू लागल्या.


- संपत मोरे
sampatmore21@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

बातम्या आणखी आहेत...