आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्‍ह चाइल्‍ड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पितृसत्ता केवळ विवाहित मातृत्वाचंच गुणगान गाते, त्याला पवित्र मानते. मातृत्वाचं स्वतंत्र अस्तित्व नाकारत त्याला पितृत्त्वाशी जोडते. यामुळेच एकविसाव्या शतकातही पुरुषाची अधिकृत पत्नी नसलेल्या स्त्रीचं मातृत्व लांछनास्पद मानलं जातं. यातूनच पित्याचं अधिकृत नाव नसलेल्या संततीचे प्रश्न तीव्र बनले आहेत. आज शाळेच्या दाखल्यावर आईचं नाव लावणं मान्य झालं असलं, तरी यातून या मुलांची अनौरस ही ओळखच अधिक ठळक होत आहे...


कुमारी मातेसह अर्भकाचा मृत्यू... उच्च न्यायालयाने बलात्कारित विद्यार्थिनीस दिली गर्भपाताची मुभा... अनाथ मुलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची अनाथ मुलांची मागणी...गेल्या महिन्याभरात प्रसिद्ध झालेल्या या काही बातम्या अनौरस, अनाथ संततीविषयी तसंच पुरुषसत्ताक मातृत्वाविषयी काही सांगतात आणि योनिशुचिता या स्त्रीशरीरविषयक मूल्याची सामाजिक व्याप्तीही स्पष्ट करतात.


खरं तर स्त्री-पुरुषांच्या संयोगातून जन्माला आलेलं प्रत्येक मूल, हे औरसच असायला हवं. मानवी जन्म हा निखळ, नितळच असायला हवा. मानवी संस्कृतीच्या पहिल्या टप्प्यात मातृप्रधान समाजरचनेत सगळी मुलं आईच्याच नावाने-कुळाने ओळखली जात असल्याने कोणी औरस किंवा अनौरस नसे. पण मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे वाटचाल करताना, मातृदेवतांच्या जागी पुरुषदेवांची प्रस्थापना होताना मानवी समाजात जे बदल झाले, त्यातला हा एक प्रमुख बदल आहे. स्त्रीला पुरुषाच्या अधीन आणून, त्यासाठी योनिशुचितेचं मूल्य रुजवून, मातृत्वाला विवाहसंस्थेसोबत जोडूनच पुरुषप्रधान समाजरचना समाजात रुजली. पितृसत्तेत मातृत्व निखळ राहिलं नाही. त्याची विवाहित मातृत्व आणि विवाहबाह्य मातृत्व अशी काटेकोर विभागणी करण्यात आली. पितृसत्तेत जन्माला आलेल्या अपत्याचा दर्जा मातेच्या वैवाहिक दर्जावरून ठरतो. पितृसत्तेने विवाहसंस्थेच्या माध्यमातून स्त्रीच्या गर्भाशयावर, मातृत्वावर एका पुरुषाची मालकी प्रस्थापित केली. त्यामुळे स्त्रियांमध्ये पत्नी, रखेल, कुमारी माता, बलात्कारिता असे भेद पाडण्यात आले. विवाहित पत्नीच्याच मुलांना अधिकृत मुलांचा परिणामी वारसाहक्काचा अधिकार मिळाला. इतर संतती ही अनौरस मानली गेली. त्यांना पित्याचे-कुळाचे नाव, वारसाहक्क हे अधिकार नाकारले गेले. जगभरातील भाषांमध्ये या अशा संततीसाठी बास्टर्ड, कडू, लेकावळा असे वेगवेगळे शब्द आहेत. सध्याच्या पोस्ट मॉडर्न जगण्यात या अशा संततीला ‘लव्ह चाइल्ड’ म्हटलं जातं. परिभाषा वेगळी असली तरी त्यातला आशय तोच आहे. अनधिकृत संतती.


पितृसत्ता केवळ विवाहित मातृत्वाचंच गुणगान गाते, त्याला पवित्र मानते. मातृत्वाचं स्वतंत्र अस्तित्व नाकारत त्याला पितृत्त्वाशी जोडते. यामुळेच आज एकविसाव्या शतकातही एका पुरुषाची अधिकृत पत्नी नसलेल्या स्त्रीचं मातृत्व लांछ्नास्पद मानलं जातं. यातून अविवाहित तरुणी, वेश्या, विधवा, घटस्फोटिता अशा स्त्रियांचं मातृत्व अनधिकृत, धर्मबाह्य, कलंकित मानलं जातं. समाजात या स्त्रियांच्या संततीला कायम बहिष्कृताचं अपमानास्पद जगणं जगावं लागतं. पित्याचं अधिकृत नाव नसलेल्या या संततीचे प्रश्न आज तीव्र बनले आहेत. आज सरकारी आदेशाने शाळेच्या दाखल्यावर आईचं नाव लावणं मान्य झालं असलं, तरी यातून या मुलांची अनौरस ही ओळखच अधिक ठळक होते.  या अशा अनौरस संततीमधूनच अनाथ संतती जन्माला येते. ज्यांचे आईवडील जिवंत नाहीत, ती मुलं म्हणजे अनाथ मुलं, असा या शब्दाचा वाच्यार्थ आहे. पण प्रत्यक्षात अनाथाश्रमांमध्ये अशी वाच्यार्थाने अनाथ असलेली मुलं फार थोडी असतात. कारण आईवडील हयात नसले, तरी कुटुंबातले इतर नातेवाईक, आजीआजोबा अशा मुलांना सांभाळतात. आत्यंतिक दारिद्र्य असलेल्या कुटुंबातच अशा मुलांना नातेवाइकांकडून अनाथाश्रमात पाठवले जाते. मग आजचे सगळे अनाथाश्रम कोणत्या संततीने भरले आहेत? समाजासाठी हे उघड गुपित आहे. पुरुषाने फसवलेल्या, बळजोरी केलेल्या अविवाहित, विधवा, परित्यक्ता तरुणी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर अशा विवाहबाह्य संबंधांतून जन्माला आलेलं मूल अनाथाश्रमात सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.


भारतीय समाजात आजही एखादी तरुणी विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेलं मूल घेऊन सन्मानाने जगू शकत नाही, आपल्या मुलाला-मुलीला अधिकृत जगणं देऊ शकत नाही. यातूनच अनाथाश्रमांची संख्या वाढते. अनेकदा यातूनच भ्रूणहत्याही घडते.


समाजात जेव्हा आजच्या काळासारखी अनाथाश्रमांची सोय नव्हती, तेव्हा भ्रूणहत्या हा स्वाभाविक प्रकार होता. ब्राह्मणी पितृसत्तेत उच्चजातीय स्त्रियांच्या लैंगिकतेवर अधिक कठोर बंधनं होती. त्यामुळे उच्चकुलीन मानल्या जाणाऱ्या कुटुंबातील स्त्रिया आणि तरुणींसमोर विवाहबाह्य संबंधातून, बलात्कारातून जन्माला आलेल्या अपत्याला मारून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. तत्कालीन समाजातील उच्चवर्णीयांमध्ये बालविधवांची संख्या मोठी असे. गरोदर राहिल्यावर जीव देणे किंवा जन्माला आलेले अपत्य मारून टाकणे, एवढेच त्या करू शकत. एकोणिसाव्या शतकात अशा फसलेल्या बालविधवांसाठी आणि त्यांच्या अपत्यांसाठी महात्मा फुलेंनी आपल्याच घरात बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं होतं. बालविधवांनी आपल्या अपत्यांची हत्या करू नये किंवा आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवू नये, म्हणून या क्रांतिदर्शी समाजसुधारकाने त्या काळात हे असं बालहत्या प्रतिबंधकगृह काढण्याचं धाडस दाखवलं होतं. जोतिबा आणि सावित्रीबाईंनी अशा ४० बालविधवांची आपल्या घरात बाळंतपणं केली. यातल्याच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला, यशवंतला दत्तक घेतलं. 


आजही या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आज बालहत्या प्रतिबंधकगृहाचंच रूपांतर अनाथाश्रमांमध्ये झालं आहे. खरं तर अनाथाश्रमांमधली बहुसंख्य मुलं प्रत्यक्षात अनाथ नाहीत. केवळ त्यांचा जन्म अधिकृत विवाहबंधनातून होणाऱ्या शरीरसंबंधातून झालेला नसल्याने त्यांच्या माथी समाजाने, पितृसत्ताक व्यवस्थेने अनाथपण लादलेलं आहे. विवाहपूर्व संबंधातून एखादी तरुणी गरोदर राहताच, आधी गुप्तपणे असुरक्षित गर्भपाताचे प्रयत्न केले जातात. जर पालकांना कळेपर्यंत गर्भपाताची वेळ टळून गेली असेल तर गुपचूपपणे बाळंतपण पार पाडलं जातं. यातून कुमारी मातेचा अर्भकासह मृत्यू अशी बातमी येते. पण हा मृत्यू का झाला, याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. का आजही जन्माला आलेलं अपत्य आपल्या आईच्या नावाने सन्मानाने जगू शकत नाही?  कारण आजही आई सासर-माहेरच्या आडनावांमध्ये विभागलेली आहे. तिला स्वतःचं आडनावंही नाही आणि हक्काचा वंशही नाही. पुरुषसत्तेने स्त्रीला वंशावळीतूनच हद्दपार केलं आहे आणि लग्नाच्या नावाने तिच्यावर आपल्या पितृकुळातून तसंच पितृगृहातून विस्थापन लादलं आहे. तिचं मातृत्व विवाहाशी बांधलं आहे. मातृत्वाभोवती योनिशुचितेचा कडेकोट पहारा उभा केला आहे. 


भारतासारख्या मनुवादी पितृसत्तेत पुरुषसत्ताक मातृत्व केवळ अपत्याला जन्म देण्यासाठी नसतं, तर घराण्याला वारस देण्यासाठी असतं. बहुतेक सर्व धर्मशास्त्रांनी स्त्रीजन्म हीन मानला आहे. यातून मग मुलगा हवा हा आग्रह बळावतो आणि आधुनिक विज्ञान अवतरल्यावर त्याच्या मदतीने लिंगनिवड करुन स्त्रीगर्भांचा संहार केला जातो. देशातल्या अनेक राज्यांमध्ये आज लिंगदराचं प्रमाण भयावह पद्धतीने घसरत आहे. खरंतर पितृसत्ताक मातृत्वच अल्पवयीन मुलींना बालविवाहाच्या वाटेवर ढकलतं. वयात आलेल्या मुलींचं कौमार्य जपण्याची अवघड कामगिरी आईवडिलांना पार पाडायची असते. एकीकडे कौमार्य जपण्याची परंपरागत अट, तर दुसरीकडे बाजारकेंद्री चंगळवादातून वाढलेला लैंगिक अत्याचार या दोन्हींच्या कात्रीत ग्रामीण भागात १५-१६ वर्षीच मुलींची लग्न  उरकली जातात. आज ‘लेक लाडकी अभियान' सारखं आंदोलन घसरता लिंगदर आणि बालविवाह या दोन्हींमध्ये स्वतःला पुरोगामी म्हणणारा महाराष्ट्र आघाडीवर आहे, ही वस्तुस्थिती सामोरी आणत आहे.


एकीकडे लिंगनिवड करून होणारी स्त्रीगर्भांची हत्या, मुलींचे बालविवाह तर दुसरीकडे अनाथाश्रमांची वाढती संख्या, तिथे घुसमटणारी, आयुष्यभर आपल्या अस्तित्त्वाचा, अनाथपणाचा अर्थ शोधणारी संतती या सगळ्यामागे पुरुषसत्ताक मातृत्त्वाची फरफट आहे.


ही फरपट थांबवायची असेल, मानवी संततीतील अधिकृत-अनधिकृत हे भेद मिटवायचे असतील तर पुरुषनिरपेक्ष मातृत्वाचा सन्मान करायला हवा, मातृत्वाची पितृसत्तेच्या चौकटीतून मुक्तता करायला हवी.


- संध्या नरे-पवार
sandhyanarepawar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...