आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानवी नराचं थैमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शतकानुशतकं स्त्रीदेहावर बलात्कार होत आले आहेत. पण मानवी नराचं हे थैमान नवभांडवली, चंगळवादी बाजारव्यवस्था आणि धर्मांधता व सत्ता या घातक मिश्रणात अधिकाधिक हिंस्त्र होत आहे. मानवतेची शिकवण देणाऱ्या धर्मापासून नैतिक मूल्यांपर्यंत साऱ्या  गोष्टी या बाजारव्यवस्थेत गलितगात्र होऊन उभ्या असताना पुरुषमाणसाचं विवस्त्र होणं अधिक वेगाने होतंय...


आता नेमकं काय लिहावं...? आणि अजून किती वेळा हे लिहावं लागेल...? बलात्काराच्या प्रत्येक घटनेनंतर हे प्रश्न मनात येतात. बलात्काराच्या प्रत्येक घटनेनंतर त्यातली वाढत जाणारी विकृती पाहून मन थिजतं. कधी खैरलांजीची दलित महिला , कधी दिल्लीची निर्भया, कधी कठुआची  अल्पवयीन पोर.  नावं बदलतात पण कृती आणि त्यातील हिंसा तीच राहते. बलात्कार करणारा कधी सत्तरीचा म्हातारा असतो, कधी तरुण असतो तर कधी अल्पवयीन मुलगा असतो. वासनांना धरबंद उरला नाही की वयाचा संदर्भ फिजूल बनतो.

 
कठुआच्या घटनेत पीडितेच्या कोवळ्या देहाची झालेली विटंबना या पुरुषप्रधान समाजात, धर्म-जात-वर्ग-राजकीय सत्ता यांचं पाठबळ लाभलेल्या पितृसत्तेत, बाई असणं म्हणजे नेमकं काय ते सांगते. एक मादी, एक भक्ष्य, हालहाल करुन संपवावं असं एक सावज. आज शतकानुशतकं स्त्रीदेहावर बलात्कार होत आले आहेत. पण मानवी नराचं हे थैमान नवभांडवली, चंगळवादी बाजारव्यवस्था आणि धर्मांधता व सत्ता या घातक मिश्रणात अधिकाधिक हिंस्त्र होत आहे. मानवतेची शिकवण देणाऱ्या धर्मापासून नैतिक मूल्यांपर्यंत साऱ्या गोष्टी या बाजारव्यवस्थेत गलितगात्र होऊन उभ्या असताना पुरुषमाणसाचं विवस्त्र होणं अधिक वेगाने होतंय. त्याच्यातला नर त्यालाही न जुमानता अधिक वेगाने उसळ्या मारतोय. शतकानुशतकांचा प्रवास करुन आलेला मानवी नर एकविसाव्या शतकात अधिकच हिंस्त्र बनला आहे.


भारताच्या संदर्भात विचार करायचा तर, १९७० च्या दशकात मथुरा या आदिवासी मुलीवर पोलीस स्थानकात पोलिसांनीच केलेल्या अत्याचारानंतर भारतात बलात्कार हा मुद्दा सार्वजनिक पातळीवर चर्चेसाठी आला. स्त्री संघटनांनी केलेल्या निदर्शनांच्या रुपाने राजकीय आणि सामाजिक अवकाशात एक चर्चा विषय बनला. बलात्काराचा कायदा, त्यातील त्रुटी, पोलिसांचा तपास, त्यातील त्रुटी याकडे स्त्रीवादी चळवळीने लक्ष वेधलं. बलात्काराचा परंपरागत अर्थ पुरुषाने स्त्रीदेहावर केलेली बळजबरी, स्त्रीच्या मनाविरुद्ध लादलेला संभोग एवढाच मर्यादित होता. बलात्काराचा हा मर्यादित अर्थ नाकारत स्त्री चळवळीने या गुन्ह्याचं वास्तव स्पष्ट केलं. बलात्कार ही केवळ बळजबरी नाही तर ती स्त्री देहाविरोधातली हिंसा आहे, तो लैंगिक अत्याचार आहे. एवढंच नाही तर बलात्कार हे पुरुषाच्या हातातलं एक शस्त्र आहे, हेही स्त्री चळवळीने सांगितलं. दोन जातींच्या, दोन धर्मांच्या, दोन देशांच्या संघर्षात स्त्रीचा देह हा कायम रणभूमी बनत आला आहे. स्त्रीदेहावर बलात्कार करुन तिच्या समाजातल्या पुरुषांना नामोहरम करणं, त्यांच्यात दहशत निर्माण करणं हे कायम होत आलेलं आहे. आजवरची सारी युद्ध, दंगली याला साक्ष आहेत. 


ज्या ज्या वेळेला धर्मांधता वाढते, दोन समाजांमध्ये युद्धसद्दश परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळेला बाईंच शरीर वेठीला धरलं जातं. जम्मू काश्मीरमधल्या कथुआ गावात तेच झालं. निवृत्त महसूल अधिकारी असलेल्या सांजीरामला मुस्लिम गुज्जर-बकरवाल समाजाला धडा शिकवायचा होता. त्यासाठी बलात्काराचा अधिक सोपा मार्ग निवडण्यात आला. सत्ता आपलीच आहे या उन्मादात सांजीरामने आपलं इप्सित साध्य करण्यासाठी  प्रत्यक्ष मंदिरात आठ दिवस नंगा नाच केला. एका विशिष्ट धर्माची आहे म्हणून निरागस कोवळ्या देहाविरोधात बलात्काराचं शस्त्र उगारण्यात आलं. मात्र  धर्म, वंश, जात यांच्या अस्मितेने आणि सत्तेच्या पाठबळाने बेभान झालेली टोळकी, नरांच्या झुंडी बलात्काराचं हे शस्त्र अखेरीस आपल्या जातधर्माच्या बाईवरही उगारतात. कधी तिला शिस्त लावण्यासाठी तर कधी स्वतःची वासना शमविण्यासाठी. उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये याचंच प्रतिबिंब पाहायला मिळतं. तिथे एका अठरा वर्षांच्या मुलीवर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने बलात्कार केल्याचा आरोप आहे. तिने त्याविरोधात आवाज उठवताच तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली आणि त्यांनाच अटक करण्यात आली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. पोलीस कोठडीत तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. सत्ता जेव्हा पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांचं स्वातंत्र्य नाकारते त्यावेळी आणीबाणीसद्दश परिस्थिती निर्माण होते आणि या आणीबाणीत सामान्य माणसाचा पोलीस कोठडीत अगदी सहजतेने मृत्यू होतो. इथे कोणता पक्ष सत्तेवर आहे, हा मुद्दा गैरलागू ठरतो. 


या दोन्ही घटना उजेडात आल्यावर संपूर्ण देशाला हादरा बसला. आज वेगवेगळ्या माध्यमांमधून हा हादरा, ही हतबलता व्यक्त होत आहे. ही हतबलता व्यक्त होत असतानाच १६ एप्रिलला सुरतमध्ये दहा वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची बातमी आली आहे. पण असा अचानक मानसिक धक्का का बसावा समस्त देशातल्या सुजाण नागरिकांना? हे असं होणारंच आहे आता हे त्यांच्या सुजाण मनाला, मेंदूला जाणवलं कसं नाही? श्वापदं मोकाट सुटली आहेत, हे यांनी ओळखलं कसं नाही? एका पाठोपाठ एक करत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांना मारण्यात आलं.  या गोळ्या केवळ चार मेंदूंवर झाडण्यात आल्या नव्हत्या. तर त्या या देशातल्या लोकशाहीच्या गाभ्यावर झाडण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधुनिक मूल्यांवर झाडण्यात आल्या होत्या. चळवळीतली आणि कला-साहित्य क्षेत्रातली मंडळी वगळता इतर क्षेत्रातली स्वतःला सुजाण म्हणवणारी उच्चशिक्षित मंडळी तेव्हा बहुतांशाने गप्प होती. माझ्या वडिलांना पाकिस्तानने मारलं नाही, युद्धाने मारलं, असं एक विवेकी, युद्धविरोधी विधान करणाऱ्या मुलीला समाजमाध्यमांमधून जाहीरपणे बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या. विद्यापीठातल्या तरुणाईवर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले. झुंडीच्या झुंडी मोकाट सुटल्या आहेत, याचंच हे लक्षण होतं. 


कोणत्याही प्रदेशात अविवेकी झुंडी घडवण्याचं रसायन एकच असतं. बेरोजगार, हाताला काम नसलेल्या तरुणांची फौज, त्यांना आश्रय द्यायला, पोसायला राजकीय नेते आणि कधी धर्मांध तर कधी अस्मितावादी विचारांची पेरणी या गोष्टी एकत्र आल्या, की अविवेकी विचारांच्या झुंडी तयार होतात. याच झुंडीतले लोक नाक्या नाक्यावर राजकीय नेत्याचे कार्यकर्ते बनून उभे राहतात आणि यथावकाश स्वतःही नेता बनतात. आमदार बनतात, मंत्री बनतात आणि बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करतात. अर्थात बलात्कार केलेल्या कार्यकर्त्यांची पाठराखण करण्यामध्ये इतर पक्षीय नेतेही मागे नसतात. खरं तर आज सगळ्याच राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवरील आपल्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या चारित्र्याची नेमकी यत्ता काय आहे हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. वस्त्या-वस्त्यांमधल्या गुंडगिरीला, छेडछाडीला, विनयभंगांना राजकीय कार्यकर्ता नामक स्थानिक व्यवस्थेचं पाठबळ आहे, हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे. भारतीय बेटीच्या असुरक्षिततेची दखल आता संयुक्त राष्ट्र संघानेही घेतली आहे. आज मुलींवर, तरुणींवर केवळ बलात्कार होत नाहीत तर बलात्कारानंतर अतिशय निर्ममतेने त्यांच्या शरीराची विटंबना केली जात आहे. समाजातला, देशातला विवेकवादी विचार जेव्हा क्षीण होतो, संपतो, संपवला जातो, तेव्हाच अशी निर्ममता जन्माला येते. या अशा निर्ममतेच्या वातावरणात बेटीचा बचाव होणं तरी कसं शक्य आहे? त्यासाठी विचार केवळ मनामध्ये नाही, तर जाहीरपणे करण्याची तातडीची आवश्यकता आहे. 

 

sandhyanarepawar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...