आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खानोलकरांचा 'संजीवक' बाजीराव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य, नाट्य, सिनेमा आणि त्यातली पात्रं इतरांच्या खुरटलेल्या, हरवत चाललेल्या, शून्यात गेलेल्या जगण्यात  संजीवक होऊन जीव फुंकतात? खानोलकरांनी नाटकातून जिवंत केलेला बाजीराव शंभर टक्के फुंकतो. इतकंच नव्हे, कला-संस्कृतीचा साचलेला प्रवाहसुद्धा मोकळा करतो...

 

चिं.त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू. कमालीचा मनस्वी आणि वृत्ती-प्रवृत्तीने  कलंदर असा हा प्रतिभावंत. ८ मार्च १९३० हा खानोलकरांचा जन्मदिवस. जेमतेम ४६ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या खानोलकरांनी कवी, नाटककार, कथा-कादंबरीकार, ललित-निबंधकार म्हणून मराठी साहित्यसृष्टीवर स्वत:च्या नकळत अमीट मुद्रा उमटवली. त्यांच्या गंधभारल्या कवितांनी आणि वासना-विकारांचा माग काढणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्यांनी वयाच्या एकेका टप्प्यांवर  मला मोहवून टाकले होते. त्यातल्या त्यांच्या कविता तर अजूनही अचानक, उसळी मारून ताबा घेतात, कोणी अवती-भवती नसताना एकटेपणात साथसंगत करतात. निःशब्द करणाऱ्या कित्येक प्रसंगात, जणू माझ्याच अनुभवांना शब्दरुप देतात. पण गेली तीस-एकतीस वर्षं ज्या त्यांच्या साहित्यकृतीनं माझा अथक पाठलाग केला आहे, ती म्हणजे त्यांचं पहिलं नाटक - ‘एक शून्य बाजीराव’. एखाद्या निद्रिस्त ज्वालामुखीसारखं ते - विशेषतः त्यातला ‘बाजीराव’ मनात कधी जागा होईल काही सांगता येत नाही. अगदी दुसरं काही वाचतानाही हा ‘बाजीराव’ अचानक त्या पात्रांमध्ये येऊ उभा ठाकत असे. कमल देसाईंची ‘काळा सूर्य’  ही लघुकादंबरी वाचली, तेव्हाही हा अचानक येऊन उभा राहिला आणि विचारू लागला.’


‘अरे, ती ‘काळा सूर्य’ची नायिका तुला माझ्यासारखी नाही वाटत ?’ मी काही विचार करतोय बघितल्यानंतर गायब झाला. पुन्हा प्रगटला अन् म्हणाला, ‘बघ, त्या नायिकेच्या आत्याचा सासरा रामण्णा, आमच्या आप्पारावसारखा आहे की नाही.’ मी त्याच्या निरीक्षणानं चमकलो! कारण रामण्णाला ‘काळा सूर्य’ची नायिका लहानपणी पुस्तकातला दुष्ट राक्षस समजते आणि आप्पारावाला ‘बाजीराव’ देवमासा म्हणतो. दोघेही सत्ताधीश-आपल्या अवती-भवतीच्यांवर सत्ता गाजविणारे. त्यांना गुलामासारखे वागवणारे. नंतर एकदम माझ्या लक्षात आलं, की बाजीराव आणि ‘काळा सूर्य’ची नायिका दोघेही बंडखोर आहेत. या 


सत्ताधीशांशी तर ते झुंज घेतातच, पण ईश्वराशीही थेट संवाद साधू शकतात. अशा वेळी त्यांची बंडखोरी परतत्त्वात्मक(मेटॅफिजिकल) होते. नोबेल  पारितोषिक विजेत्या तत्वज्ञ-कादंबरीकार अल्बेर काम्यूनं तर सांगूनच ठेवलं आहे- ‘(बंडखोर) ईश्वर नाकारत नाही. ईश्वराशी फक्त समानतेच्या नात्याने बोलतो.’


आता मला ‘काळा सूर्य’ची नायिका आणि ‘बाजीराव’ अगदी मित्र-मैत्रिणीसारखे वाटू लागले. पुढच्या वेळी मी ‘बाजीराव’ स्वतःहून येईल, अशी वाट बघितली नाही. मी आपणहूनच त्याला येण्याची विनंती केली. त्यांच्या दोघांमधले आणखी एक साधर्म्य मला गवसले आणि ते बाजीरावाला सांगण्यासाठी माझा आत्मा आतूर झाला. बाजीराव आला, मी कसेबसे शब्द उच्चारत त्याला म्हणालो, ‘अरे, तुम्ही दोघांनीही माणसासाठी-मानव्यासाठी हौतात्म्य पत्करलं होतं...’ बाजीराव माझ्याकडे पाहत, गूढ हसत, अंतर्धान पावला. मात्र अजूनपर्यंत मला ‘बाजीराव’ आणि ‘काळा सूर्य’ची नायिका  यांची भेट घालून देता आलेली नाही; पण तोपर्यंत एक गंभीर-गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो, दोघांचीही विनोदबुद्धी विलक्षण-सारखी आहे. अगदी विनोदाच्या साऱ्या चौकटी खिळखिळ्या करून टाकणारी, तुम्ही घेत असलेला श्वास रोखून धरणारी, ऊर फुटेस्तोवर हसवणारी.


‘एक शून्य बाजीराव’चा पहिला प्रयोग २८ मे १९६६ला मुंबईत झाला होता आणि याच वर्षी २८ जुलैला ‘मौज प्रकाशना’नं ही संहिता पुस्तकरूपात प्रकाशित केली. या संहितेनं दिग्दर्शक-नट-अन्य नाटककार-रंगकर्मी अशा अनेकांना चक्रावून टाकलं होतं. काही तरी खूप मौलिक, पण आवाक्यात न येणारं-अनेक पातळ्यांवर आव्हान देणारं-अन्वयार्थाच्या वाटेवर-सृजनाच्या टप्यावर दमवणारं असं खूप काही त्यात होतं.


नाटकातला हा अनोखा ‘बाजीराव’ साकारण्यासाठी माधव वाटवे यांनी घेतलेल्या कष्टांची नोंद करून खुद्द नाटककार खानोलकर म्हणतात, ‘माझ्या कल्पनेतला बाजीराव माधव वाटव्यांनी रंगभूमीवर नाना कळांनी आणि प्रत्येक छटेनिशी साकार केला.’ खानोलकरांनी हे नाटक ‘रंगायन’च्या मंडळींसमोर पहिल्यांदा वाचलं. तेव्हाचा परिणाम- प्रभाव माधव वाटवे यांनी नोंदवून ठेवला आहे. ‘...वाचन सुरू झाले आणि आरामात बसलेली मंडळी हळूहळू सरळ व्हायला लागली. एका आगळ्या चैतन्याने भारावून जाऊ लागली... नाटकाचा हिरो असा असू शकेल, असे स्वप्नातही जाणवले नव्हते. गलथान, गबाळा, उलट्या खोपडीचा, तऱ्हेवाईक पोशाखातला पण आभाळाएवढ्या हृदयाचा’ असे बाजीरावाचे वर्णन केल्यावर  माधव वाटवे पुढे खानोलकरांबद्दल लिहितात. ‘नाकावर घसरलेल्या चष्म्यावरून नाटकाच्या प्रतिक्रिया आजमावत, भिजल्या मेंढरागत ओशाळून बसलेला एक सामान्य दिसणारा जीव. माझा विश्वासच बसेना... एका  कविहृदयाने रंगभूमी-माध्यमात गरूडझेप मारून मराठी रंगभूमीची काव्यात्म नाटकाची तहान भागवली होती.’


खानोलकरांच्या ‘एक शून्य बाजीराव’ या नाटकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील संहिता आणि उपसंहितेतील घटकांच्या आंतरक्रियेतून उमलणारा प्रतीकात्मक अर्थ.
बाजीरावाचे व्यक्तिमत्त्व खानोलकर कसे रेखाटतात ते पाहा -
‘बाजीराव येतो. साधारण ठेंगणा माणूस. डोक्यावर हॅट. एका हाती वेडीवाकडी काठी.दुसऱ्या हाती व्हायोलिन केस. अंगावर बेंगरूळ सूट, काळा. डोक्याला गंध वगैरे थाटात दारावर उभा’ बाजीरावाच्या व्यक्तिरेखेत नाटककार या रंगसूचनेद्वारे माणसाच्या सगळ्या जगण्यातला अंतर्विरोध(हॅट-गंध-वेडीवाकडी काठी-व्हायोलिन-सूट), त्याचे रूढीला चिकटून राहणे(काठी), जीवनातले बंदिस्त सूर(व्हायोलिन) गोठवून टाकतो. पुढे बाजीराव अत्यंत गंभीर होऊन हातातल्या व्हायोलिन केसकडे पाहत म्हणतो - ‘ही स्वरांची शवपेटी कुठे ठेवू?’ सूर बंदिस्त झाले आहेत, हे पूर्वीच रंगसूचनेतून कळले होते. आता त्याचं हरवलेपणसुद्धा कळतं. मग ही व्हायोलिनची पेटी सर्वच ‘हरवलेल्या’ जीवन-प्रयोजनांची, आठवणींची, स्वप्नांची वाहक होते. वेड्यावाकड्या काठीतून तिचे जुनाटपण-त्यातील रूढीप्रधानता, ‘पारंपरिक’पण, जीर्णत्व, सारेच उलगडत जाते. पुढे आत्म्याला फोन करण्याचा अभिनय... पेटी खाली ठेवतो...बसतो, उकिडवा. काठी आधाराशिवाय उभी करण्याचा प्रयत्न करतो, अशा रंगसूचना येतात.


बाजीरावाच्या वस्तू (रंगमंच सामग्री) आणि त्याचं व्यक्तिमत्त्व यात अद्वैत आहे-आत्मिक नाते आहे. नेपथ्य आणि रंगमंचसामग्री जणू त्याच्या व्यक्तिमत्वाचा विस्तार करतात. बाजीरावाचे हे बोलणे सुरू असतानाच त्याच्यावर निळा मंद प्रकाश (ईश्वराची वस्ती असलेल्या अवकाशाचा रंग?) उतरतो. आता बाजीरावाचे सारे बोलणे विश्वरहस्याच्या, निर्मितीच्या, जगण्याच्या प्रहसनाच्या पातळीवर येते, कारण निळ्या रंगात न्हाऊन निघालेला बाजीराव स्वतःशी बोलताना ईश्वराशीही बोलत असतो.


या दृश्यातील संवादांमध्ये (डायलॉग्ज) नाट्यकृतीचा भाष्यात्मक-गुण प्रत्ययाला येतो, तर रंगसूचना संभाव्य अर्थाचे दार उघडते. पुन्हा रंगसूचना येते - काठीबरोबर बाजीराव प्रचंड झगडा करतो... बाजीराव कोसळतो... प्रकाश ओसरतो. बाजीरावाच्या या कोसळण्यातून त्याच्या अंताचे सूचन होते आणि त्यानंतरच्या साऱ्या घटनांवर एका शोकात्म खेळाचे आणि अटळ विधीचे सावट पडते.


‘एक शून्य बाजीराव’ या नाटकात नाटक - आणि नाटकातील नाटक(गर्भनाटक) आहे  आणि त्यांच्या आंतर-क्रियेतूनही मोठा जीवन-आशय साकारतो. तो ‘श्याम-मनोहर’(ट्रॅजिक-ब्लॅक-कॉमिक) असा आहे. नाटकाच्या शेवटी बाजीरावाचा मृत्यु होतो, या दृश्याबद्दल, माधव वाटवे सांगतात, ‘बाजीराव मरणाचे नाटक करतोय, अशा समजुतीने खदाखदा हसणारे ‘नाटकातल्या नाटका’चे प्रेक्षक बघून ‘रंगायन’चे प्रेक्षक अवाक् व्हायचे आणि ट्रॅजिक आणि कॉमिक यांच्या चिमटीत सापडलेल्या आयुष्याच्या अनुभूतीने अवाक् होऊन घरी जायचे.’


नाट्यकलेवरचे भाष्य म्हणूनही ‘एक शून्य बाजीराव’ वाचता येते आणि ही बहुतेक भाष्ये बाजीरावानेच उच्चारली आहे. उदा.
बाजीराव - स्वतःला विसरण्यासाठी खुंट्यांवरचे कपडे घालून आणि स्वतःला खुंट्यांवर टांगून ती माणसं तिकिटबिकिट काढून येतात. नाटक पहायला! किंवा वाचिक अभिनयाबद्दलचे भाष्य वाटावे, असे हे बाजीरावाचे उद््गार-शोकनाट्यातला शब्दन् शब्द खड्यासारखा प्रेक्षकांना लागून त्यांच्या डोळ्यातून पाणी निघालेच पाहिजे.


नाटकाबद्दल प्रेक्षक आणि नाटककार यांचं योगदान काय, या दृष्टीने हे रोकडं सत्य सांगितल्यासारखं विधान पाहा. - ‘कुणी पैसे देतं, कुणी जन्म देतं’ अगदी समीक्षक-नाटककार हा  पैलूही या नाटकात आलेला दिसतो. ‘पाइप तोंडात बाळगणारा कुठलाही टीकाकार त्याला धुराबरोबर ऊंच उडवून देईल.’


‘एक शून्य बाजीराव’चा प्रयोग हिंदीमध्ये ‘अभियान’ या संस्थेतर्फे सादर करण्यात आला होता आणि बाजीरावाची भूमिका केली होती, हिंदी रंगभूमी आणि चित्रपट-क्षेत्रातले विख्यात नट टी.पी.जैन यांनी. त्यांनीही नोंदवून ठेवलंय - ‘बाजीरावाच्या या भूमिकेने दिलेल्या आव्हानाला नट म्हणून माझ्या आयुष्यात विशेष अर्थ आहे. या भूमिकेमधून मला स्वतःचा शोध लागला, मला माझ्या मर्यादा समजल्या. माझ्या उणिवांबद्दलही जाणीव झाली. माझ्यामधील नट साचेबंद होऊ लागला होता, तेव्हा बाजीराव एखाद्या संजीवक शक्तीसारखा माझ्यासमोर आला.’


बाजीरावाची ही संजीवक शक्ती तुमच्या-माझ्यासारख्या आस्वादकांसाठी  आहेच. कला-संस्कृतीचा साचलेला प्रवाह मोकळे करणारीही आहे. पाश्चिमात्त्य नाटकाकडे झुकलेला तोल अशा अस्सल भारतीय नाटकाकडे, वळवणारी समतोल-शक्ती या उत्तुंग नाट्यकृतीमध्ये आहे आणि पूर्व-पश्चिमाला गवसणी घालणारी सार्वत्रिक आवाहकताही त्यात आहे. बाजीरावाचे आकाशाला भिडणारे गहिरेपण टी.पी.जैन यांनी सांगून ठेवले आहे. ते म्हणतात, “बाजीराव हा मला एक शोकात्म विदूषक वाटत नाही, तो खरा नट आहे.प्रत्यक्ष सृष्टीनिर्मात्याशी बरोबरीने बोलण्याचे धारिष्ट ज्याच्यापाशी आहे,असा कलानिर्माता!”
‘काळा सूर्य’ची नायिकाही अशीच आहे, पण ती यापुढेही जाते,कारण ती प्रतिसृष्टी निर्माण करण्याची मनीषा बाळगते. दोघांमध्येही सर्जकता आणि हौतात्म्य हे साम्य आहे...
पण मला आता एकाचवेळी स्त्री-पुरूषाच्या सुरात काही शब्द ऐकू येत आहेत-
कोणी दिव्याशिवाय होतो स्वतःच दीप
कोणी दिव्यावरी अन् टाकून झेप घेतो. 
बहुतेक बाजीराव आणि ‘काळा सूर्य’ची नायिका म्हणताहेत, एकत्र आरती प्रभूंच्या या ओळी!
   
   
   
- संजय आर्वीकर,
arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...