आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वप्‍नवत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्कराेगावर मात करण्यासाठी संशोधनात रमलेल्या एका तरुणीची ही गोष्ट. आधार देणारे आईवडील, मेहनत करण्याची तयारी आणि एक विशिष्ट स्वप्न या शिदोरीवर तिने अमेरिकेत तिच्या क्षेत्रात नाव कमावलं आहे.


‘मला डाॅक्टर, वैज्ञानिक व्हायचंय, उच्च शिक्षण घ्यायचंय, खूप काही वेगळं करायचंय.’ हे माझं स्वप्न पूर्ण झालंय. अमेरिकेतल्या माझ्या बारा वर्षाच्या सिंहावलोकनात हे अधोरेखित झालं.


लहाणपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा मी ध्यास घेतला. मन लावून अभ्यास केला. पुण्यातून एमबीबीएस केलं. पुढील शिक्षणाकरता भारतात धडपड करत असतानाच इंग्लंड  वा अमेरिकेतील शिक्षणाच्या पूर्वपरीक्षा उदा. प्लॅब, जीआरई, टोफेल दिल्या. अर्ज पाठवले. एक दिवस पप्पांचा मला फोन आला. मी तेव्हा पुण्याच्या रूबी हॅास्पिटलमध्ये कार्यरत होते. ‘शली, तुला बफेलो-सनी युनिव्हर्सिटीत MPH (Master in Public Health) करता ॲडमिशन मिळालीय’. 


पप्पांचे ते शब्द अवर्णनीय अत्यानंदाचे होते.
मुलींना इतकं दूर का पाठवता? कशाला इतका खर्च करता? झेपेल का तुम्हाला हा खर्च? कर्जबाजारी व्हाल तुम्ही, वगैरे  काही सुचवणाऱ्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करून आईपप्पांनी मला अमेरिकेस पाठवण्याची तयारी सुरू केली. ते दिवस अक्षरश: स्वर्गीय होते. २००६मध्ये मी मुंबईला माझ्या कुटुंबियांसोबत विमानतळावर आले. आता येथून पुढे माझा एकटीचा प्रवास सुरू होणार होता. मनात संमिश्र भावना होत्या. माझे जिवलग इथे व फक्त स्वप्नं आणि आठवणींची सोबत आता माझ्याबरोबर असणार!


विमान झेपावले तसे स्वप्न सुखावले. पहिलाच विमानप्रवास, चक्क मुंबई ते न्यू याॅर्क, १६ तासांचा. सगळंच अकल्पनीय व अजूनही विश्वास न बसणारं वाटत होतं. पण आता स्वप्नांनाही पंख लाभले होते. पुढे बफेलोला जायचं होतं. तर आमचं विमान रद्द झालं, कारण हवामान खराब होतं. आता जेव्हा हवामान चांगलं होईल तेव्हा आम्हाला पुढे पाठवणार, तोवर आमची हाॅटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. दोन दिवस न्यू याॅर्कच्या त्या हॅाटेलात होते. पण घरी फोन वा मेल करणं काही तांत्रिक अडचणींनी शक्य नव्हतं. तिसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू झाली आणि मी बफेलोला पोहचले, मात्र माझ्या बॅगा आल्या नव्हत्या. याचाच अर्थ माझ्यासोबत फक्त स्वप्नंच नाही तर अडचणीही आल्या होत्या. या स्वप्नांच्या जगात मी अडचणींना पार करून माझे ध्येय गाठणारच ही मनाशी खूणगाठ बांधून मी माझं उच्च शिक्षण सुरू केलं.


अतिशय भव्य सुंदर निसर्गरम्य परिसरातल्या सनी युनिव्हर्सिटीत माझ्या स्वप्नांची वाटचाल सुरू झाली. आम्ही चार मुलींनी मिळून जवळच एक घर घेतलं होतं. तिथे परदेशात आम्हीच एकमेकींच्या स्वकीय होताे. आता इथे येणारे सारे विद्यार्थी हेच कुटुंबीय व स्नेही. इथे फक्त कुटुंबीयच बदलले असं नाही तर परिसर, वातावरण, क्षुधाशांतीच्या सवयी, पद्धती, राहणीमान, वस्त्रप्रावरणं, सगळंच वेगळं होतं. त्याच्याशी मैत्री केली तरच इथे टिकाव लागणार होता. मग त्या सवयी, शिस्त, पद्धती आत्मसात केल्या. तिथल्या फूड कोर्टमध्ये पाच तास, आठवड्यातनं तीन दिवस, काम करून पुढच्या सत्राची फी व माझ्या दैनंदिन खर्चाचा प्रश्न सुटला. कमालीची थंडी, अव्याहत होणारी बर्फवृष्टी, हे नेत्रसुखद होतं. बर्फात रुतलेला एक पाय काढून पुढे टाकत नाही तर दुसरा रुतून बसायचा, तरीही आम्ही आनंदाने बर्फात खेळलो. फोटो काढले. खूप छान वाटलं. मात्र दूध, किराणा आणायला बाहेर जायची वेळ आली तेव्हा घर आठवलंं. एकाकी वाटू लागलं. कधी कधी एकटेपण असह्य व्हायचं. परत जावं घरी असाही विचार मनात यायचा पण मग स्वप्न पुढे दिसायचं. खंबीर मनाने एकटेपणावर मात करून MPH पूर्ण केलं. त्यापूर्वीच मी पीएचडीकरता राॅसवेल पार्क कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये प्रयत्न सुरू केला होता. त्यात मी यशस्वी झाले. Prevention of ovarian cancer, breast cancer and blood cancer म्हणजेच अंडाशय, स्तन, आणि रक्ताचा कर्करोग कसा टाळता येईल यावर तेथे प्रचंड मेहनत घेऊन मी चार वर्षांत डाॅक्टरेट मिळवली. या पदवीदान समारंभास माझे आई, पप्पा, भाऊ समीर व बहीण प्रियांका चौघंही आले होते. आमच्या आयुष्यातला स्वप्नपूर्तीचा व आनंदाचा हा क्षण होता. यानंतर लगेच माॅफिट कॅन्सर सेंटर, फ्लाेरिडा येथे रिसर्च सायंटिस्ट पदावर मी रुजू झाले. अतिथंड अशा परिसरातून मी अतिउष्ण अशा प्रदेशात आले होते. येथील माझं घर म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती देणारं, स्वकष्टावर कमावलेलं एक अकल्पित होतं. आता नवीकोरी टोयोटा गाडी माझ्या स्वप्नांच्या मदतीला आली होती. यशाच्या या शिखराकडे झेपावताना अनेक चकवे, अडथळे येतात, त्या त्या वेळी माझा भाऊ समीर मला दिसतो. त्याच्या खडतर विकलांग अवस्थेकडे दुर्लक्ष करून नेहमी हसतमुख असणारा व दुर्दम्य आशावाद ठेवणारा समू जर इतका आनंदी राहू शकतो तर मग आम्हाला इतकं सर्व मिळतंय तरीही आम्ही इतके हतबल का होतो, हा विचार मनात पुन्हा चैतन्य निर्माण करतो. म्हणूनच रोज सकाळी व झोपण्यापूर्वी समीरशी बोलणं, हीच माझ्या स्वप्नपूर्तीची ताकद आहे, प्रेरणा आहे.


फ्लोरिडा येथील चार वर्षांत त्वचा व रक्ताच्या कर्करोगावर संशोधन केले. अनेक नवीन प्रकल्प, योजना, व संशोधनातील देवाणघेवाणीसाठी  इटली, पोर्तुगल, दक्षिण आफ्रिका, आदि देशांत मी मॅाफिटमधील सायंटिस्ट प्रतिनिधी म्हणून गेले होते.


माझे नवीन संशोधनातले १९ पेपर आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. हे यश घेऊन स्वप्नच आता माझ्या कवेत आले आहे. आता स्वप्नाला माझी सोबत हवी असते. सध्या मी फिलाडेल्फिया येथे जाॅन्सन ॲण्ड जाॅन्सनमध्ये ब्लड कॅन्सर असोशिएट मेडिकल डायरेक्टर आहे. येथे मी ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी नवीन औषधावर संशोधन करतेय. माझ्या कामाचा भाग म्हणून मी अनेक संशोधन प्रकल्प सांभाळते. 


अमेरिकेतल्या विविध राज्यांमधल्या डाॅक्टरांच्या संपर्कात असते. अनेक परिसंवादांत सहभागी होते जिथे मला अतिशय बुद्धिमान व प्रतिभावान व्यक्ती भेटत असतात. ब्लड कॅन्सरवर औषध शोधण्याचे प्रयत्न अमेरिकेपुरते मर्यादित नसून यामुळे जगभरातल्या रुग्णांना संजीवनी मिळेल, असा आमचा विश्वास आहे.


हे यश सहजसाध्य नव्हते. कारण कुठल्याही स्वप्नांची इमारत ही त्यागाच्या पायावर, कष्ट आणि जिद्दीच्या आधारानेच उभी राहते. माझ्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे असलेले माझे आईपप्पा हे खरे या यशाचे शिल्पकार आहेत. समीर हा अखंड प्रेरणास्रोत आहे तर पियु माझी लहाण बहीण माझा विश्वास आहे. ती माझ्याचसारखं स्वप्न मनात घेऊन आज न्युयार्कला यशोशिखरावर उभी आहे. या सगळ्यांमुळे अशक्य ते शक्य करता आलं. स्वप्नांना मूर्त रूप आले. मग दु:खकष्टांचे क्षण त्यात दिसेनासे झाले.


माझा जन्म औरंगाबादचा असला तरी शैक्षणिक सुरुवात परळी येथे झाली. तेथून औरंगाबाद, व्हाया पुणे करत अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास म्हणजे एका स्वप्नाचा प्रवास आहे. अमेरिकेत शिकण्याचे काही फायदे मला महत्त्वाचे वाटतात. इथे तुमच्यातल्या प्रतिभेचं मोल आहे, तुमचा रंग, भाषा, वंश कोणताही असो. आणि, इथे कामाला प्रतिष्ठा आहे, ते कोणतेही असो. इथे शिकताना मला नवनवीन संशोधन पाहता आलं आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अमाप सुविधांचा फायदा मिळाला.


आज मी पाच खंडांचा प्रवास केला आहे. अजून खूप काही करायचंय, मिळवायचंय. कारण स्वप्नं कधी संपत नाहीत आणि संपूही नयेत. नाहीतर जगण्यात काही आनंदच राहणार नाही ना!


पुन्हा नवं स्वप्न पुढच्या प्रवासाकरता मनात रुंजी घालतं, त्या स्वप्नात मी आता नव्याने रंग भरते.


-  शलाका हंप्रस, फिलाडेल्फिया, अमेरिका
shalaka.hampras@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...