आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश करूया सुटीची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सकाळी पेपर वाचत होते. ‘सँडविच स्कूल’च्या संकल्पनेविषयी बातमी होती. उन्हाळी सुटी कमी करून पुढच्या शैक्षणिक वर्षातला अभ्यासक्रम शाळा सुरू करत आहेत, आणि जी काही एक-दीड महिना सुटी मुलांना मिळते त्यातली पालक मुलांची रवानगी वेगवेगळ्या लर्निंग कॅम्प्समध्ये करत आहेत. हे चित्र पाहून मन उदास होतं. माझ्याकडे आठवी इयत्तेतला एक मुलगा समुपदेशनासाठी आला होता. तो सुटीत गिटार, गाणं, आणि नृत्य अशा तिन्ही क्लासना जावा, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. 

 

शिवाय रोजचा अक्षर सुधारण्याचा वर्ग होताच. तो मुलगा म्हणाला, ‘उन को मुझे देने के लिए टाइम कहाँ है, इस लिए इतने सारे क्लासेस लगाना चाहते है!’ म्हणजे सुटी सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेसारखंच गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स.


मुळात सुटी कशासाठी असते?

शाळेत असतानाचा नियमित दिनक्रम, वेगवेगळ्या वर्गांना जाण्याची गडबड, परीक्षांचा, स्पर्धांचा ताण विसरण्यासाठी. मग जसे पालक शाळा सुरू असतानाच्या दिनक्रमाविषयी विचार करतात, त्यासाठी तयारी करतात, असाच सुटीविषयी, त्यात मुलं काय करणार आहेत, त्यातून त्यांना नवीन काय मिळणार आहे, कशाची मजा येणार आहे, हाही विचार करायला हवा.

 

सुटीत मुलांनी एकत्र खूप खेळायला हवं. पत्ते, कॅरम, उनो असे बैठे खेळही, आणि क्रिकेट, लपाछपी, बॅडमिंटन, सायकलिंग असे मैदानी खेळही. एकमेकांचं समजून घेऊन, कधीकधी वादावादी करून, एकमेकांमधले गुण समजून घेऊन, सर्वांना घट्ट धरून पुढे जायचं आहे. सामाजिक गुणवत्ता आणि भावनिक गुणवत्ता वाढवण्याची सुटी ही एक छान संधी आहे. पालकांनी मुलांसोबत बसून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी राेज एखादा अक्षरांचा, आकड्यांचा, शब्दांचा खेळ खेळण्यासाठी, चित्रं रंगवण्यासाठी, गोष्टी/बालनाट्यं वाचून दाखवण्यासाठ, त्यांच्यासोबत भसाड्या आवाजात गाण्यासाठी, घरातल्या वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांची मदत घेऊन त्यांना धन्यवाद असं म्हणण्यासाठी... थोडक्यात सुटीची पूर्ण मजा घेण्यासाठी सुट्टी असते.  पालकांनो, फक्त आपण किती पैसा खर्च करतो हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही आणि तुमच्या मुलांनी मिळून सुटीची, सुटीच कशाला कोणत्याही गोष्टीची, किती मजा घेतलीत ते महत्त्वाचं. चला तर मग, सुटीवर.

 

बातम्या आणखी आहेत...