आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणांची भाषा इन्‍टाग्राम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट हे दोन मीडिया हायस्कूल, कॉलेज आणि एकंदर तरुणाईला विशेष प्रिय आहे असे वारंवार आढळते. तरुणाईची भाषा इन्स्टाग्राम आहे. आज याच तरुणाईच्या भाषेविषयी...


फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट याबरोबर मार्केटिंग आणि व्यक्तिगत वापराकरता इन्स्टाग्रामला प्राधान्यक्रम देणारे अनेक आहेत. नव्या माहितीचे लोकांच्या मनात कुतूहल असते. त्यामुळे विविध सोशल मीडियावर लोकांचा वावर असतो. विविध ब्रँडसुद्धा सगळे सोशल मीडिया वापरतात. तरीही ठरावीक वयोगटासाठी एखादा मीडिया जास्त लोकप्रिय असतो असे दिसते. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट हे दोन मीडिया हायस्कूल, कॉलेज आणि एकंदर तरुणाईला विशेष प्रिय आहे असे वारंवार आढळते. तरुणाईची भाषा इन्स्टाग्राम आहे. 


इन्स्टाग्रामवर काय करता येते? 
फोटो, व्हिडिअो आणि स्टोरी पोस्ट करण्याकरता हे माध्यम वापरता येते. इन्स्टाग्रामवर एकाहून अधिक अकाउंट्स काढता येतात. हे अकाउंट्स इन्स्टाग्राम हँडल म्हणूनही ओळखले जातात. मोबाइल फोनवर तुम्ही हे अकाउंट स्विच करू शकता आणि सर्व अकाउंट्स वापरू शकता.


फोटो पोस्ट करणे : इन्स्टाग्रामची सुरुवात २०१० मध्ये प्रामुख्याने मोबाइल फोटो पोस्ट करण्याची साइट म्हणून झाली. सुरू झाल्यापासून तीन महिन्यांत १० लाख सदस्य तयार झाले. अनेकदा जास्त सदस्यांना ही साइट वापरता यावी आणि ती क्रॅश होऊ नये याकरता विशेष खबरदारी घ्यावी लागत असे. कोणत्याही सोशल मीडियाला असा सदस्यांचा पाठिंबा सुरुवातीपासून मिळाला नव्हता. या सदस्यांना आकर्षित करण्याकरता पैसे गुंतवावे लागले होते हे वैशिष्ट्य आहे. जस्टिन बिबर जेव्हा इन्स्टाग्रामवर आला आणि पोस्ट करू लागला तेव्हा हजारो मुली त्याचे फोटो लाइक करत, ही इन्स्टाग्रामवर नोंद घेण्यासारखी घटना होती. 


फेसबुक व इतर माध्यमात असतात तेच फोटो काहीजण इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात. काही लोक मात्र इन्स्टाग्रामवर इतर माध्यमांमधल्या अकाउंटपेक्षा वेगळी थीम राहील अशी दक्षता घेतात. लेखक म्हणून फेसबुकवर तुम्ही पुस्तकाचा कव्हर फोटो पोस्ट केला असेल तर ते कव्हर तयार करण्यामागची प्रक्रिया इन्स्टाग्रामवर शेअर करता येते. त्यामुळे पुस्तकाच्या कव्हरचे काम कसे करतात, काय प्रक्रिया असते हे लोकांना जाणून घेता येते. 


व्हिडिअो पोस्ट करणे 
इन्स्टाग्रामवर आता व्हिडिअोसुद्धा पोस्ट करता येतात. फोटोंना जसा प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद व्हिडिअोंनाही मिळतो. इतर माध्यमे आणि इन्स्टाग्रामवर व्हिडिअो पोस्ट करताना वेळेचे बंधन पाळावे लागते. इन्स्टाग्रामवर अगदी छोटे व्हिडिअो पोस्ट करणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त एक मिनिट ही वेळमर्यादा इन्स्टाग्राम व्हिडिअोला असते.


स्टोरी पोस्ट करणे : इन्स्टाग्रामवर २४ तासात आपोआप नाहीसे होतील असे व्हिडिअो आणि फोटो पोस्ट करायचे असतील तर ते स्टोरी म्हणून पोस्ट करावे लागतात. इन्स्टाग्रामवर प्रत्येक सदस्याची एक स्टोरी फक्त २४ तास उपलब्ध असते. २४ तास झाल्यावर त्याच्या प्रोफाइलवर/ हँडलवर ती स्टोरी दिसत नाही. पण प्रोफाइलवर पोस्ट केलेले फोटो व व्हिडिअो मात्र कायम दिसतात. स्नॅपचॅट या टीनेजर्समध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या माध्यमाने २४ तासांनंतर नाहीशा होणाऱ्या पोस्टचा पर्याय वापरला आहे. तोच पर्याय इन्स्टाग्रामने आपल्या सदस्यांना उपलब्ध करून दिला आहे. एरवी नीट आयोजन केलेल्या पोस्ट/ फीडमध्ये कोणताही व्यत्यय न येता, त्यांच्या गाभ्याला धक्का न लावता सदस्य इतर गोष्टी शेअर करण्याकरता स्टोरीचा पर्याय पसंत करतात. 


सोशल माध्यमांतील अकाउंट्सची जोडणी करणे 
सदस्याचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंट्स एकमेकांना जोडण्याची सोय या माध्यमांनी दिली आहे. एका माध्यमात केलेली पोस्ट दुसरीकडे पोस्ट करायची असेल तर ते शक्य आहे. फेसबुकसारख्या इतर सोशल मीडियातही मराठी पोस्ट करता येतात, माहिती मराठीत देता येते हे ध्यानात घ्यावे. मराठी पत्रकार, लेखक, कवी, कलाकार वा ५००० हून अधिक जण मित्रयादीत असलेल्यांनी ही जोडणी/ अकाउंट्स केले नसतील तर करावे. तुम्ही व्यावसायिक/ ब्रँड म्हणून या माध्यमांचा उपयोग करत असलात सर्व माध्यमांचे सदस्यत्व घ्यावे अशी विनंती. प्रत्येक माध्यमाचा वापर केला नाही तरी चालेल. तुम्ही फेसबुक नियमित वापरत असलात तरी इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट आणि ट्विटरचे सदस्यत्वसुद्धा घ्यावे. तिथे सदस्यत्व घेतले की तुमच्या मित्रयादीतील किमान चार मित्रांना तिथे जोडून घ्या. अशी माध्यमे एकमेकांना जोडली तर तो वापरही फार वेळ न देता करणे शक्य आहे. भविष्यात आपले अकाउंट नाही म्हणून कुणी दुसऱ्याने वेगळ्या माध्यमाचा तुमच्या नावाखाली गैरवापर करण्याची शक्यता ध्यानात असू द्या. सायबर सेलकडे काही कारणाने जावे लागले तर तुमचे सर्व माध्यमातले सदस्यत्व आणि त्याचे लॉगिन्स तुमच्या कामी येतील हे ध्यानात घ्यावे.


इन्स्टाग्राम सोशल मीडिया मॅनेजमेंट : मोबाइल फोनवरून एकाहून जास्त इन्स्टाग्राम अकाउंट्स वापरता येतात. sproutsocial सारखे मॅनेजमेंट टूल वापरले तर इन्स्टाग्राम पोस्टचे नियोजन करता येते. सातत्याने पोस्ट करणे, पोस्ट करताना ब्रँडशी सुसंगत पोस्ट करणे या गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. 


आवर्जून बघावे असे काही इन्स्टाग्राम अकाउंट्स 
नॅशनल जिअोग्राफिक
नाइके लॅब
मंचीमुंबई
फोटोवाली
सिद्धार्थजोशी
खन्नाचंदन
ही अकाउंटसवरून फोटो कसे पोस्ट करायचे, थीम कसे कायम ठेवायचे, नावीन्य कसे राखायचे अशा अनेक गोष्टी शिकता येतील.


- सोनाली जोशी, ह्यूस्टन, अमेरिका
sonali.manasi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...