आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वकाही शांततेसाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

काश्मीर आणि मणिपूरची तुलना करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही, पण काश्मीरच्या तुलनेत मणिपूर हे राज्य लष्कर, पोलीस आणि फुटीरवादी टोळ्यांकडून होणाऱ्या अनन्वित अत्याचारामुळे अधिक दुर्दैवी आहे, याची मात्र कुणी दखल घेत नाही. नेमक्या याच अदखलपात्र मणिपूरच्या वेदना नाओरेम बिघासागरसारखे कवी धाडसाने मांडताहेत...  


भारतीय पौराणिक कथांमध्ये मणिपूरचा उल्लेख हा ‘रत्नभूमी' असा केलेला आहे. ‘चित्रगंधा' ही रवींद्रनाथ टागोरांची सुप्रसिद्ध अशी नृत्यनाटिका आहे. अर्जुनाचा चित्रगंधाशी होणाऱ्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर टागोरांनी रेखाटलेला अप्रतिम असा मणिपूर आपणाला या नृत्यनाटिकेत दिसून येतो. पण अलीकडच्या काळात मात्र हा प्रदेश हिंसेच्या खाईत लोटला गेला आहे. सशस्त्र फुटीरवादी बंडखोर आणि भारतीय सेनेत वेळोवेळी उद््भवणाऱ्या संघर्षातून हा भाग दहशतीत जगत अाहे. त्यासोबतच मिताई, नागा आणि कुकी या जमातीअंतर्गत वर्णवर्चस्वाच्या संघर्षातून हा भूभाग शांततेसाठी पूर्णतः पारखा झालेला दिसून येतो आहे. मात्र, एकेकाळी रत्नांची भूमी असलेल्या या प्रदेशाचे अस्सल वास्तविक चित्रण आपल्या साहित्यातून करणाऱ्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांमध्ये ‘नाओरेम बिद्यासागर सिंग’ यांचे नाव आपणाला प्रामुख्याने घ्यावे लागेल. 


मणिपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाओरेम बिद्यासागर हे सीलचरच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दरम्यान, त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झालाही होता. त्यानंतर काही वर्षांतच मणिपुरी साहित्याची चिकित्सा करणारा त्यांचा निबंधसंग्रह प्रकाशित झाला. अकादमिक समीक्षेसोबतच त्यांनी मानवी मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले, हे निबंध मणिपुरी साहित्यात महत्त्वाचे मानले जातात. ‘गाव आणि निर्वासित' अर्थात ‘खुंग-गांग आमसुंग रेफ्युजी' हा त्यांचा निर्वासितांच्या जगण्याला शब्दबद्ध करणारा काव्यसंग्रह पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झाला आहे. या संग्रहाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले, पण त्याचसोबत त्यांनी हिंसाप्रवण भागातील निर्वासितांच्या जगण्यातील वेदना ज्या पद्धतीने शब्दबद्ध केल्या, ते वाचकांना हादरवून सोडणार होते. आपले जग पाठीवर घेऊन जगणारी माणसं आणि त्यांची सुखदुःखं साहित्याच्या मुख्य प्रवाहात प्रखरतेने मांडणारा कवी म्हणून नाओरेम बिद्यासागर यांना ओळखले जाऊ लागले आहे. ‘रेफ्युजी गीता’ या कवितेचा आपणाला या दृष्टीने विचार करता येईल. 


या कवितेत कवीने एका निर्वासिताचे आयुष्य वाचकांसमोर उभे केले आहे. एकेदिवशी रस्त्याने जात असताना कवीला ‘भगवद््गीता' वाचणारा निर्वासित दिसतो. पण कवी सांगतो, की त्याच्या गीतेत पाप-पुण्य किंवा आत्मा-परमात्मा असे काहीच नसून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या फुटकळ गोष्टी आहेत. त्याच्याकडे एक ‘जॉब कार्ड’ (‘मनरेगा’ योजनेंतर्गत जी कार्डं दिली जातात, त्याला ‘जॉब कार्ड’ म्हणून ओळखलं जाते.) आहे. कधी तरी रोजगार मिळेल, या आशेवर जीवापाड जपलेले. इंदिरा आवास योजनेत बांधल्या गेलेल्या घराच्या नोंदी आहेत. एक मतदान कार्ड आणि घराची मालकी सांगणारी काही कागदपत्रे आहेत. विशेष म्हणजे, या गीतेच्या मुखपृष्ठावर कधीकाळी पोटापाण्याच्या सोयीसाठी त्याने दूरवर सोडून आलेली नदी वाहताना दिसतेय. बाजूला अर्धवट जळालेला कुटुंबीयांचा फोटोग्राफ आहे की, जो मुन्शी प्रेमचंदांच्या ‘गोदान'मधून बाहेर डोकावतोय. अशी अनेक सामग्री सोबत घेऊन भाकरीच्या शिकारीसाठी बाहेर पडलेल्या निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे कवी आजूबाजूला पाहतो आहे. थोडक्यात, काय तर गेल्या काही दशकांत रक्तरंजित मणिपूरमधल्या लोकांचे दुःख कवी श्रेष्ठ कादंबरीकार लेखक प्रेमचंदांच्या ‘गोदान’शी जोडतोय. कष्टकऱ्यांशी जोडतोय आणि कोणताच कष्टकरी अद्यापही सुखी नाही, हे प्रखरतेने लक्षात आणून देतोय.


मणिपुरी हा सांस्कृतिकरीत्या संपन्न समाज आहे. अभ्यासकांना ‘जगोई' या मणिपुरी नृत्यप्रकारासोबतच, बाराव्या शतकापासून विकसित होत गेलेल्या मणिपुरी नाट्यपरंपरेचे या दृष्टीने काही दाखले देता येतील. विविध सण-उत्सवांच्या आधाराने ही परंपरा अधिक बळकट होत गेली आहे. नाट्यप्रकारासोबतच ‘वारी-लिबा' या खास मणिपूरमध्ये आढळून येणाऱ्या कथन प्रकाराचा प्रामुख्याने आपणाला विचार करता येईल. एखाद्या राजाच्या दरबारात किंवा उत्सवांमध्ये सामान्य लोकांच्या समोर कथाकार आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत त्या काळी जे कथन ऐकवीत, असे त्याला वारी-लिबा म्हणले जाते. म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी समृद्ध असलेल्या बराक व्हॅलीच्या काठावरील या आदिम संस्कृतीचा साहित्यिक आढावा घेत असताना आपणाला लिखित साहित्यासोबतच अशा अनेक मौखिक परंपरेचाही विचार करावा लागतो, ज्याने मणिपुरी समाजमन समृद्ध केले आहे. नाओरेम यांच्या कवितेत आढळून येणारे विविध लोककथेतील प्रतिमा आणि संदर्भ वाचकाला थेट हजारो वर्षांच्या या मातीतील मौखिक कथनाकडे निश्चितपणे घेऊन जाणारे आहे. या दृष्टीने नाओरेम यांचे साहित्य अनन्यसाधारण दर्जाचे ठरते.


नाओरेम यांच्यासोबतच मणिपूरी भाषेतील काही समकालीन साहित्यिकांसाठी सामान्य माणूस आणि त्याचे अस्थिर जगणे हा आस्थेचा विषय राहिलेला आहे. यासाठी आपण त्यांच्या काही समकालीन साहित्यिकांचा विचार करायला हवा. किशलय भट्टाचार्य हे मणिपूरच्या  इलेक्ट्रॉनिक माध्यमातील एक आघाडीचे नाव. त्यांचे ‘चे इन पओना बझार’ हे इंग्रजी पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. त्यातून मणिपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील तानपेच प्रकर्षाने पुढे आलेले आहेत.  मणिपूरचा सामान्य माणूस हा नेहमीच युद्धप्रवण अशा भवतालात जगत आलेला आहे. त्यामुळेच नव्वदच्या दशकानंतरचे उत्तर-पूर्व भारतातील साहित्य हे या हिंसेच्या मुळाशी जाऊ पाहणारे आहे. ते साहित्य या संघर्षप्रवण काळाची चिकित्सा करू पाहते आहे. बराक व्हॅलीच्या दुर्दशेसाठी जाब विचारू पाहते आहे. ‘सुसाईड नोट' या कवितेत प्रियोब्रता सांगतात की, ऐन दंगलीच्या गदारोळातच कवीला कविता लिहावी लागणार आहे.  तीही आपल्या जीवाची जोखीम पत्करून. त्यांच्या एका कवितेत ते लिहितात  - ‘मी हे सारे लिहित राहतो तिच्यासाठी/जिला स्वतःच्याच लहानग्याच्या डोळ्यासमोर/जावे लागले सामूहिक बलात्काराला सामोरे/वा स्वतःच्याच नवऱ्याच्या समोरच केला गेला  तिचा विनयभंग'. या ओळींमधील प्रखरता जाणून घेण्यासाठी आपणाला मणिपूरमध्ये काही वर्षांपूर्वी लष्कराच्या अत्याचाराविरोधात महिलांनी काढलेला नग्न मोर्चा हे उदाहरण पुरेसे आहे.


किसम प्रियोकुमार यांच्या ‘अहिंग अमा ' या कथेतून नागा आणि कुकी या समुदायातील वर्णवर्चस्वाचा संघर्ष आणि त्यातून दावणीला बांधलेला सामान्य माणूस ठामपणे दिसून येतो. या त्यांच्या समकालीन साहित्यिकांसोबतच नाओरेम सांगतात की, आजूबाजूची हिंसा आणि सामान्य माणसांचे मृत्यू रोज वर्तमानपत्रांच्या पानांसोबत माझ्या घरापर्यंत पोहोचत असतात. मी उद्विग्न होतो. पण कविता लिहिण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्याकडे उरत नाही. ते सांगतात, ‘घराचे दरवाजे बंद करून/ मी उलटू शकत नाही फक्त पानांवर पाने. एकंदरीतच नाओरेम यांची कविता बराक व्हॅलीतील सद्यःपरिस्थी मांडत असतानाच संवेदनशील मनाची होणारी उलाघाल आणि व मानवी मर्यादेतून येणारे नैराश्य वाचकांसमोर आक्रमकरित्या व्यक्त करते. गेल्या दोन दशकांत मणिपूरचा इतिहास हा इरोम शर्मिला या महिला सत्याग्रहीशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. अगदी वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी उपोषणाला बसलेल्या इरोम शर्मिलाचे उपोषण तब्बल सोळा वर्षे सुरू होते. तिचा हा संघर्ष फक्त शांतता मागत होता. ‘आयर्न लेडी'  म्हणून ओळखली जाणारी इरोम शर्मिला स्वत: कवयित्रीदेखील आहे. उत्तर पूर्व भारतात शांतता नांदावी म्हणून स्वतःचे आयुष्य पणाला लावणारी ही कवयित्री तिच्या 'शांततेचा सुगंध'  कवितेत सांगते की -

 
माझ्या मृत्यूनंतर... 
ही त्वचा सुकून जाणारच आहे, कधी ना कधी 
तुम्ही मला निश्चिंत गाडा मातीमध्ये 
आणि  विरघळून  जाऊ द्या, मला या खनिज -मातीमध्ये 
येणाऱ्या पिढ्यांच्या फायद्यासाठी...
मी पसरवित राहील सर्वदूर शांततेचा सुगंध...


दुर्दैवाने आजही ही भूमी दहशतीच्या अमलाखाली जगताना आढळते आहे. काहींना आपला प्रदेश सोडावा लागला आहे, तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या अतोनात विनाशाची, अन्यायाची नोंद कोणत्याच पुस्तकात नाही याची कवीला पुरेपूर जाणीव आहे. म्हणून नाओरेम त्यांच्या बराक व्हॅली या कवितेत सांगतो की - जे कधीच परतून आले नाहीत, पुन्हा माघारी/त्यांच्या पाऊलखुणा/ नेहमीच राहिल्यात रेखांकित /माझ्या काळजावर.  


अशा अनेक वर्तमानाच्या वेदना नाओरेम यांच्यासहित त्यांचे  समकालीन साहित्यिक मित्र मणिपुरी साहित्यात वागवताना दिसत आहेत.
नाओरेम यांच्या कवितेत आपणाला जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागणाऱ्या कष्टकऱ्यांचं, निर्वासितांचं  प्रदीर्घ कथन वाचायला मिळते आहे. या सामान्य नागरिकांच्या संघर्षासोबतच त्यांची धारणा, मान्यता आणि आदिम परंपरा कवी सामान्य वाचकांपर्यत पोहचवितो आहे. निर्वासित म्हणून जगत असताना मागे राहिलेल्या गाव-मातीविषयीच्या,  जाणिवा त्यांच्या समग्र साहित्यातून स्पष्ट जाणवत आहेत. युद्धभूमीच्या या हिंस्र वातावरणात नाओरेम यांची कविता ठामपणे शांततेसाठी जप करत आहे.


- सुशीलकुमार शिंदे
shinde.sushilkumar10@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३८

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...