आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटलेपणाचे व्‍याकुळविश्‍व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातीशी शतकांचे नाते असूनही कायमच उपरेपणाचा शिक्का आणि स्वत:ची सांस्कृतिक ओळख पुसून प्रवाहात सामील होण्याचा आक्रमक आग्रह या संघर्षातून जीवन नामदूंग यांची कविता जन्माला आलेली आहे. नव्हे, त्यांचं समग्र साहित्यच संघर्षाचा आवाका कवेत घेणारे आहे...


वन नामदूंग हे गेल्या चार दशकांतील नेपाळी साहित्यातील एक आघाडीचे नाव. त्यांनी जागरण, दुर्स आवाझ व तेवा अशा महत्त्वाच्या नियतकालिकांचे संपादन केले. ‘जीवन नामदूंग का कविता हरू' हा त्यांचा प्रकाशित झालेला पहिला काव्यसंग्रह. त्यांनी लिहिलेल्या समालोचना व पर्यवेक्षण या समीक्षाग्रंथाचे नेपाळी साहित्यात समीक्षेसाठी मोठे योगदान मानले जाते. कविता, कथा, समीक्षा व प्रवास वर्णनांसारख्या त्यांच्या विपुल साहित्यातून वाचकाला समकालीन नेपाळी समाज व संस्कृतीचे नेमके चित्रण आढळून येते. 


जीवन नामदूंग लिहितात, त्या नेपाळी साहित्यामध्ये सुरुवातीपासूनच वास्तववादी साहित्याचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. ग्रामीण भागातील शोषणाचे वर्णन करणारी लीळ बहादूर छेत्री यांची ‘बसाई' ही कादंबरी असो, की असित राई यांची ‘नये क्षितिज कि खोज' असो, असित राई यांनी या कादंबरीत कामासाठी भारतभर स्थलांतरित होणाऱ्या वा मूळ मातीपासून दुरावलेल्या नेपाळी समूहाच्या वेदना शब्दबद्ध केल्या आहेत. त्याचबरोबर इंद्रबहादूर राय यांची सत्तरच्या दशकात प्रकाशित झालेली ‘आज रमिता छ' अर्थात ‘आज तिथे आनंदोत्सव आहे' अशा आशयाची कादंबरी यावर्षीच मंजुश्री थापा यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केली. सत्तरच्या दशकात इंद्रबहाद्दूर राय यांनी रेखाटलेला दार्जिलिंग आजही वाचकाच्या मनाची पकड घेतो आहे. त्यामुळेच जेरी पिंटो ‘आज रमिता छ'ला नेपाळी साहित्यातील सर्वोत्तम कादंबरी ठरवतात. अलीकडे याच मातीतून लिहिणाऱ्या प्रज्वल पराजुली याचा ‘गुरखा डॉटर' हा मूळ इंग्रजीतून प्रकाशित झालेला कथासंग्रह नेपाळी समाज आणि जगभरातील त्याच्याविषयीच्या उलटसुलट मनोधारणांची उकल करण्यास पुरेसा आहे.


आपल्या समकाळाकडे अतिशय संवेदशीलतेने पाहणाऱ्या जीवन नामदूंग यांचे साहित्य हे प्रखर वास्तववादी आहे. यासाठी आपण त्यांच्या काही कविता विचारात घेऊ शकतो. त्यांची अलीकडे प्रकाशित झालेली ‘कॉलरा' ही कविता वर्तमानातील भारताचे चित्र उभे करण्यास पुरेशी आहे. या कवितेत ऐन पावसाळी हंगामात पसरलेल्या कॉलऱ्याचे वर्णन आले आहे. कवी सांगतो की, जर हा रोग प्रदूषित पाण्यामुळे पसरला असता तर आपणाला निश्चितच नियंत्रित करता आला असता. परंतु हे सारे प्रदूषित विचारांमुळे घडते आहे, याची जाणीव कवी करून देतो. ते सारे प्रचंड संसर्गजन्य असून, हे लागण झालेले लोक याचा वेगाने प्रचारप्रसार करताहेत. आजच्या ‘पोस्ट ट्रुथ’च्या काळात ही कॉलराची लागण झालेले प्रदूषित लोक समाजमाध्यमांवरील ट्रोल बनून अनेकांची माथी बिघडवताना दिसतात तेव्हा ही निव्वळ कवी कल्पना न राहता आपले समाजवास्तव बनले आहे याची जाणीव होत राहते.


आज संपूर्ण जगभरच माणूस हिंसेच्या गडद छायेखाली जगतो आहे. अनेकदा इतिहासाच्या अघोरी उत्खननातून उसळलेले हिंसेचे आगडोंब आपण पाहिले आहेत. कवी सांगतो की - ‘सावध असा / आपल्या हातात चॉकलेट म्हणून / इतिहास / सोपवतो आहे. बंदुकीच्या गोळ्या' आणि हे सारे आपण माणूस म्हणून जबाबदारीने नाकारायला हवे. शेवटी कोणत्याही कारणाने झालेली हिंसा निषिद्ध मानत माणसाकडे निखळ माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी नामदूंग यांच्या साहित्यात आढळून येते.


जीवन नामदूंग समजून घेत असताना आपणाला नेपाळी समाजासोबतच विकसित झालेल्या भू-सांस्कृतिक घडामोडीही समजून घ्याव्या लागतील. एकीकडे आपणाला देशाच्या बहुविविधतेचा अभिमान असतो, पण त्याच्याआड मात्र आपण प्रचंड अज्ञान आनंदाने बाळगून असतो. आणि त्याचा साधा लवलेशही आपल्या वागण्याबोलण्यात कधी दिसत नाही. म्हणजे, सिक्कीम हे भारतातील महत्त्वाचे राज्य. तिथे राहणाऱ्या समूहाला काही शतकाचा सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास आहे. त्यांच्या शौर्याच्या कहाण्या जगभर ऐकवल्या जातात. आणि तरीही हे लोक बाहेरून आलेले आपण कसे ठरवतो? उदाहरणार्थ दार्जिलिंग मधील बहुतांश समूहाची मातृभाषा ही नेपाळी आहे. सोबतच आसामसह भारतभर काही कोटीच्या घरात नेपाळी बोलणारे लोक आहेत. असे असताना आपण त्यांना ‘भारतीय नेपाळी' म्हणतो, म्हणजे काय? दुर्दैवाने नेपाळी साहित्य वगळता भारतीय साहित्यामध्ये आढळून येणारे सारे थापा, भुतिया किंवा गुरुंग हे नेपाळ या देशातूनच स्थलांतरित झालेलेच, कसे असतात? पर्यायाने वर्षानुवर्षे आपण आनंदाने बाळगलेले हे अज्ञान त्यांच्यात असुरक्षितेची भावना निर्माण करण्यास निश्चितच पुरेसे आहे. भारतीय घटनेने नेपाळीला ‘राजभाषा' अशी मान्यता दिलेली असताना नेपाळी आदिकवी भानुभक्त आचार्य यांच्यापासून कोणत्याही साहित्यिकाची खुद्द भारतातच भारतीय नेपाळी लेखक अशी ओळख करून, देणे निश्चितच योग्य नाही.


अलीकडे जगभरात ‘भाषिक' अंगाने विविध समूह संवेदनशील झालेले पाहायला मिळतात. भारतासारख्या बहुभाषिक देशात भाषा ही नेहमीच समूहसंस्कृती प्रवाहित करण्याचे काम करत असते. तीला फक्त अभिव्यक्तीचे माध्यम असे मर्यादित स्वरूप आपणाला देता येत नाही. अशा वेळी बहुसंख्येच्या जोरावर किंवा दीर्घ ऐतिहासिक परंपरा किंवा आर्थिक वा राजकीय वर्चस्वाच्या जोरावर काही भाषांचे दमन आपल्याकडे आपसूक सुरु असते. पण ते फक्त भाषेपुरते मर्यादित न राहता समूहसंस्कृतीशी जोडलेले असते, हे समजून घ्यायला हवे. भाषेच्या नावावर तो निव्वळ राजकीय व्यवहार असतो. दार्जिलिंगच्या भागात नेपाळीचे बंगाली भाषकांकडून होणारे दमन याच अर्थाने पाहायला हवे. यासाठी आपण यासाठी पूर्वीचा मराठी- कोकणी, बंगाली - आसामी किंवा बंगाली - उडिया वादाचा विचार करू शकतो. म्हणूनच भारतातील इतर फुटीरवादी गटांकडे पाहणाऱ्या नजरेतून आपण ‘गुरखालँड'च्या मागणीकडे पाहू शकत नाही. या चळवळींचा उदय प्रामुख्याने वांशिक आणि सांस्कृतिक ओळख जतन करण्याच्या भावनेतून झालेला आहे. त्यासाठी त्यांना भाषा हा महत्त्वाचा घटक वाटतो आहे. 


कधीकाळी दार्जिलिंग हे भूतान, नेपाळ व तिबेट या तीन देशांतील सिक्कीमच्या अधिपत्याखालील ‘बफर स्टेट' होते. पण स्वातंत्र्यानंतर बंगालचा भाग बनल्यानंतर मात्र अनेक पातळ्यांवर त्यांना भाषिक दमनाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे राजकीय दबावातून एकाच भाषेची झालेली दोन राज्य अर्थात तेलंगणा आणि हैदराबाद आपल्यासमोर असतानाच दार्जिलिंगच्या नेपाळी बहुभाषिकांचा प्रश्न, मात्र आपण सोडवू शकलेलो नाही. त्यासाठी राजकीय अनिच्छा सर्व स्तरांवर पाहायला मिळत आहे. त्यातूनच ‘गुरखालँड'साठीची सांस्कृतिक आणि साहित्यिक जागृतीची महत्वाची बाजू नेपाळी साहित्यिक जोरकसपणे सांभाळताना दिसत आहेत. यासाठी नेपाळीचे महत्त्वाचे साहित्यिक उदय थुलुंग सांगतात की, भारतात सर्वत्र दिसणारा गुरखा हा नेपाळी स्थलांतरित किंवा घुसखोरी करून आलेला नसून तो या मातीचा अविभाज्य भाग आहे. एकंदरीतच भाषिक आणि सांस्कृतिक स्तरावर गुरखालँडची मागणी समजून घ्यायची असेल, तर आपण उदय थुलुंग यांना आवर्जून वाचायलाच हवे.


कोणताही साहित्यिक सूत्ररूपाने आपल्या नजरेतील विश्व वाचकासमोर उलगडत असतो. याचपद्धतीने वर्तमानाच्या कैक व्याकुळखुणा जीवन नामदूंग यांच्या साहित्यातून आकाराला आलेल्या वाचकांना जाणवत राहतात. त्यांनी जसा भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या सामान्य माणसांची चित्रे रेखाटली आहेत अगदी तसेच रोजीरोटीसाठी घरदार सोडून परप्रांतात गस्त घालणारा गुरखासुद्धा शब्दबद्ध केला आहे. सीमेवर लढणारा ‘गुरखा रेजिमेंटच्या' ‘आणण कशफी'सारखा लढवय्या सैनिक त्यांनी नायक बनवला, अगदी तसेच चहाच्या मळ्यावर राबणारे एखाद्या तेनझिंगचे कुटुंबीय आणि त्यांची कष्टकामे त्यांनी साहित्यातून नोंदविली आहे. नामदूंग यांची कविता समकालाला भिडतानाच समष्टीचा मोठा आवाका शब्दांकित करीत आहे.  मागे अखिल भारतीय नेपाळी परिषदेचे काही पदाधिकारी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना भेटायला गेले असता खुद्द पंतप्रधानांनी नेपाळी भाषेचा उल्लेख परकीय भाषा म्हणून केला होता. अशा अनेक अपमानांना नेपाळी भाषकांना वेळोवेळी सामोरे जावे लागले आहे. मनप्रसाद सुब्बा नावाचा कवी लिहितो की - मी हिमालयाइतकाच प्राचीन/तरीही माझ्याच देशात/ मी असतो उपेक्षित.  मृत्युगर्भातून नव्याने जन्मण्याची वेळ आली आहे पुन्हा... थोडक्यात, या समूहाच्या कैक वर्षांच्या परंपरा सहजपणे मोडीत काढल्या जात आहेत. त्यांच्या संस्कृतीला विशिष्ट स्तरीकरणातून दुय्यमत्व लादले जात आहे. त्यातून येणारे तुटलेपण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. एकाच वेळी हळूहळू पुसल्या जात असलेल्या अस्मिता आणि सोबत बाहेरून चिटकवल्या गेलेल्या बेगडी ओळखी अशा  पेचात भारतीय नेपाळी समाज अडकला आहे.  परकेपणाचे असे अनेक अनुभव पचवत नामदूंग यांच्या साहित्यातील माणसं मात्र नेटाने इथल्या मातीशी आपले नाते सांगत आहेत. ‘तिथे आत्महत्येसाठीही नाही वेळ’ या कवितेत नामदुंग नेमकेपणाने सांगतात की - काळाच्या पाठीवर उमटलेल्या समग्र जखमा / केल्या जातील संग्रहित / माझ्या कवितेच्या ओळीतून... 
एकूणच, जीवन नामदूंग यांचे साहित्य भारतभर पसरलेल्या समग्र नेपाळी समूहाची व्याकुळचिन्हे रेखाटण्यात यशस्वी ठरले आहे.


- सुशीलकुमार शिंदे
shinde.sushilkumar10@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...