आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा सेक्युलर कथनाची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलगू साहित्यामध्ये ज्या प्रकारे दलित साहित्य किंवा स्त्रीवादी साहित्याचे स्वागत झाले, त्या तुलनेत मुस्लिम साहित्याचे स्वागत झाले नाही. अपवाद, युसूफबाबा ऊर्फ स्कायबाबा यांचा. त्यांच्या साहित्याने खऱ्या अर्थाने सेक्युलर समाजनिर्मितीचा आवाज बुलंद केला... 

 

स्कायबाबा या थोड्याशा विचित्र वाटणाऱ्या टोपणनावाने लिहिणारे युसूफ बाबा हे समकालीन तेलगू साहित्यातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. पेशाने पत्रकार असलेले स्कायबाबा हे कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये कवितेच्या माध्यमातून तेलगू साहित्याकडे वळले. या काळात त्यांनी  लिहिलेल्या कवितांचा परिवेश हा आपणाला मुस्लिम समाजाभोवतीचा आढळून येतो. एकीकडे प्रचंड गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि जन्मत:च चिकटवले जाणारे उपरेपण यातून त्यांच्या आजूबाजूचा मुस्लिम समाज अस्वस्थ असलेला पहायला मिळतो. या समूहाच्या विविधांगी भावभावना शब्दबद्ध करण्यात त्यांची कविता यशस्वी ठरली आहे. या कवितेच्या मुळाशी असलेला प्रागतिक विचारांचा स्वर तेलगू कवितेमध्ये महत्त्वाचा मानला गेला आहे. आजमितीस त्यांचे तीन कवितासंग्रह, चार कथासंग्रह आणि एक कादंबरी असे विपुल साहित्य प्रसिद्ध झालेले आहे. 


तेलगू भाषिक समूहावर साहित्यिकांचा  विशेष, असा प्रभाव नेहमीच राहिलेला आहे. त्यांच्या कथनाला सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर नेहमीच महत्त्व राहिलेले आहे. विशेष म्हणजे, राजकारणात येण्यापूर्वी पी. व्ही. नरसिंह राव हे तेलगू साहित्यातील एक दखलपात्र नाव होते. त्यांनी ज्ञानपीठकार विश्वनाथ सत्यनारायण्णा यांचे ‘वेई पडगालू’चे ‘सहस्र फणी’ या नावाने संस्कृतमध्ये भाषांतर केलेले आहे. त्यासोबतच आजच्या समकालीन तेलगू साहित्यविश्वामध्ये  मणकेना, जयप्रभा, कलेकुरी प्रसाद, अन्वर, जी. वेंकटकृष्णा विमला व मर्सी मार्गारेट ही महत्त्वाची नावे आहेत. ‘निली मेघालु' सारख्या कवितेतून पुरुषी मनोवृत्तीला जाब विचारणारी कवयित्री माहेजबीन असेल किंवा दलित स्त्री म्हणून जगत असताना जातीय आणि लैंगिक भेदभावाला सामोरे जाणारे अनुभव मांडणारी चलपल्ली स्वरूपा राणी असेल. ‘मी जन्माला आलो तेव्हापासूनच ठरवलो गेलो, गद्दार' अशा आशयाची आक्रमक मांडणी करणारे खादर मोहिउद्दीन असतील. अशा कैक समकालीन  साहित्यिकांनी आपल्या बहुपदरी अनुभव विश्वाच्या जोरावर तेलगू साहित्य समृद्ध केलेले आहे.  


स्कायबाबा यांचा ‘अधुरे'  हा कथासंग्रह मूळ तेलगू भाषेतून प्रकाशित झाल्यानंतर त्या संग्रहातील ‘फक्त शाकाहारी' या कथेने तेलगू साहित्यविश्व अक्षरश: हादरवून सोडले. कालांतराने ‘फक्त शाकाहरी :तेलगू मुस्लिमांच्या कहाण्या’ या नावाने तो इंग्रजीमधूनही ‘ओरिएंट ब्लॅकस्वान’ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला. ‘अधुरे’ हा त्यांचा कथासंग्रह आणि मुस्लिम समूहाला सामोरे जावे लागणाऱ्या अनुभविश्वाची मांडणी आपणाला आपल्याकडील बाबूराव बागुल यांच्या ‘जेव्हा मी जात चोरली' याची निश्चितच आठवण करून देतो.


एक सुशिक्षित नवविवाहित जोडीला हैदराबादसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात भाड्याचे घर शोधताना आलेले अनुभव, हे या कथेचे मध्यवर्ती सूत्र आहे. अनेकदा पूर्ण व्यवहार ठरला असतानाही फक्त ते मुस्लिम आहेत, हे समजल्यावर त्यांना घर नाकारण्यात येते. या ठिकाणी ते शिक्षित असणे गैरलागू होते किंवा ते मुस्लिम असूनही इतकं सुंदर तेलगू बोलताच कसे, असा प्रश्न एक खोली मालक विचारतो. म्हणजे, ज्यांच्या कैक पिढ्या इथल्या माती-माणसांसोबत वाढल्या, ते तेलगू बोलणार नाही तर हिब्रू बोलणार का? असा प्रश्न नायकाच्या मनात उभा राहतो. अलीकडे आपल्याकडच्या अनेक शहरी भागात ‘नो मुस्लिम' अशा प्रकारचा अलिखित नियम कैक सोसायट्यांमध्ये आढळून येताना दिसतो. दिवसभर वणवण करून घर मिळाल्यानंतर नायकाला त्याच्या आजूबाजूच्या समाजातील ढोंगीपणा अधिकच त्रासदायक वाटतो. मुस्लिम समाजातील ताणपेच आणि समकालीन समाजवास्तव जाणून घायचे असेल तर ‘अधुरे’ हा कथासंग्रह वाचायलाच हवा.


तेलगू साहित्यामध्ये ज्या पद्धतीने दलित साहित्य किंवा स्त्रीवादी साहित्याचे स्वागत झाले त्या पद्धतीने मुस्लिम साहित्याचे स्वागत झाले नाही, असे स्कायबाबा सांगतात. कारण, दलित किंवा स्त्रीवादी साहित्य हे हिंदू साहित्याचाच भाग आहे, असे तर मुस्लिम साहित्य मात्र परके मानले गेले. याच पार्शवभूमीवर त्यांनी तेलगू साहित्यातील एकोणचाळीस कवींच्या कविता ‘जलजला' या नावाने प्रकाशित केल्या. ‘जलजला’ हा फक्त तेलगूमधील नव्हे, तर भारतातीलच मुस्लिम कवींच्या एकत्रित कवितेचा पहिला प्रयोग होता. त्यानंतर काही वर्षातच त्यांनी ‘अझा' या नावाने आणखी काही मुस्लिम कवींच्या कविता संपादित केल्या. सुरुवातीला या प्रयोगाकडे साहित्यवर्तुळ शंकाखोर पद्धतीने पाहत होते. पण यातूनच तेलगू साहित्यातील मुस्लिमवादी साहित्याचा पाया घातला गेला. या काळात त्यांना दोन्हीकडच्या धार्मिक मूलतत्त्ववाद्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या कवितेतून जेव्हा बुरखा,परदा किंवा मुस्लिम धर्मातील काही रूढीपरंपरांवर भाष्य गेले ते मुस्लिम कट्टरवाद्यांना पटले नव्हते. यासाठी त्यांना अनेकदा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. गुजरातच्या गोध्रा प्रकरणानंतर त्यांनी त्याकाळच्या संपूर्ण आंध्र प्रदेशातून  मुस्लिम कथाकारांच्या कथा ‘वतन' या नावाने संपादित केल्या. त्या काळात संपूर्ण भारतभर हिंसेचे धर्मद्वेष्टे असे दंगलयुक्त गुजरात मॉडेल प्रसारित केले जात असताना बंधूभाव जपणाऱ्या आणि सांगणाऱ्या या मुस्लिम कथाकारांच्या कथा तेलगू साहित्यात मोलाची भर घालत होत्या.


स्कायबाबा हे इस्लाम आणि मुस्लिम या शब्दात फरक करतात. ते सांगतात  की, दलित या शब्दांप्रमाणेच ‘मुस्लिम’ हा शब्द वर्षानुवर्षे नाकारलेल्या, बाहेरचे ठरवले गेलेल्या समूहासाठीचा शब्दप्रयोग म्हणून मी माझ्या साहित्यात वापरतो. म्हणूनच त्यांचे  मुस्लिमवादी साहित्य हे धर्माचे परिप्रेक्ष्य ओलांडून मानव्याकडे जाणारे आहे. स्कायबाबा हे मुस्लिम, मादिगा, दलित किंवा आदिवासी समूहांची निर्मिती ही एकाच शाखेतून झालेली आहे, असे मानतात. या शोषित समूहाचे वरवरचे विभाजन हा इथल्या राजकारणाचा भाग होता, याची जाणीव ते करून देतात. यासाठी त्यांच्या ‘जागणे कि रातें' या काव्यसंग्रहातील ‘मुस्लिम वादलू' या कवितेचा विचार करायला हवा. ते सांगतात :


धर्मांतर ही खरंतर बंडखोरीच होती...  

माझ्या लोकांनी लावला  खांद्याला खांदा  
व गेले चर्च आणि मशिदीमध्ये,
यातूनच उफाळत राहिला तुझा अहंकार 
आणि मग तू विभागलेस, मारलेस व दाखवला तुझा खराखुरा रंग 
जसे तू विभागले होते एकेकाळी  वाली आणि सुग्रीवाला 
अगदी तसेच वेगळे केलेस मुस्लिम व दलितांना 
वर्णांचा वापर करीत भिडवत राहिलास आदिवासी व मुस्लिमांना 
हाच तर तुझ्या जुनाट शतकांचा पूर्वापार इतिहास आहे.


स्कायबाबा यांच्या साहित्यात आपणाला धार्मिक आणि सांस्कृतिक शोषणासोबतच ग्रामीण भागातील शेतकरी जीवनाच्या हालअपेष्टासुद्धा  प्रामुख्याने पाहायला मिळतात. एकीकडे विजयवाडा आणि रायलसीमा भागात खोऱ्याने शेतकरी आत्महत्या होत असताना त्यांची कविता ही या शोषणव्यवस्थेवर आसूड उगारताना दिसते. तेलंगणाच्या निर्मितीसाठी  स्कायबाबा यांचे व तेलगू साहित्यिकांचे अभूतपूर्व असे योगदान राहिलेले आहे. यामध्ये ‘रचयीतला वेदिका' सारख्या साहित्यिक संस्था आघाडीवर होत्या. त्याचसोबत गदर आणि गोरती प्रसण्णा यांच्या लोकगीताने सारा तेलगू समाज ढवळून काढलेला होता. तेव्हाच ‘जागो जगाओ', ‘जखमी आवाज'  किंवा ‘क्विट तेलंगणा' या संपादित कविता संग्रहाच्या माध्यमातून तेलंगणासाठीचे जनमत बनवण्याचे काम स्कायबाबा  करत होते. यासाठी त्यांना अजूनही आंध्र प्रदेशातील तेलगू भाषकांच्या रोषाला सामोरे  जावे लागत आहे. गेल्या वर्षी त्यांच्या  ‘मोखामी' या नावाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील वीस कवींच्या संपादित पुस्तकाचे प्रकाशन विजयवाडा मध्ये थांबण्यात आले. त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. एकीकडे दोन्ही राज्यांतील राजकारणी किंवा सिनेस्टार यांना समाज आनंदाने स्वीकारत असताना साहित्यिकांना मात्र तो  खुल्या मनाने स्वीकारायला तयार नाही, हे व्यथित करणारं आहे असे ते सांगतात.


स्कायबाबा यांनी कविता आणि कथेच्या संपादनासोबतच वेळोवेळी विविध नियतकालिकेही चालवली आहेत. दलित बहुजन राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून त्यांनी २००४ च्या सुमारास ‘दलित व्हॉइस' हे नित्यकालिक सुरू केले. त्यासोबतच मुलकी, चमन आणि सिंगिडी ही नियतकालिकेही त्यांनी चालवली. सोबतच मुस्लिम लेखकांसाठी ते ‘हरियाली' या नावाने साहित्यिक अभ्यास मंडळ चालवतात. विविध विषयांवर संपादने करत असताना त्यांच्या लक्षात आले की, दलित किंवा मुस्लिम साहित्यासाठी मुख्य प्रवाहातील प्रकाशक संस्थांना अनास्था आहे. त्यातूनच त्यांनी ‘नसल किताब घर' या प्रकाशन संस्थेची निर्मिती केली. एकंदरीत विपुल अशा लेखनासोबतच त्यांनी चालवली नियतकालिके आणि संस्थांच्या माध्यमातून एक मोठा लिहिता वर्ग साहित्यप्रवाहामध्ये सामील होतो आहे.


स्कायबाबा यांच्या कवितेने तेलगू मुस्लिम समाजाला एक प्रकारचे आत्मभान दिले. वरवर रिपोर्ताज वाटणाऱ्या त्यांच्या कथांनी समाजाची दांभिकता तीव्रपणे अधोरेखित केली. त्यांच्या साहित्यातील आंतरिक आवाज हा सेक्युलर समाजनिर्मितीसाठी प्रकर्षाने आकाराला येताना दिसतो आहे. एकंदरीत त्यांच्या आयुष्याची कहाणी ही या देशातील सेक्युलरवादी कथनाला अधिक ठळक करणारी आहे. गेल्या दोन दशकातील त्यांच्या साहित्यिक योगदानातून निर्माण झालेल्या ‘तेलगू मुस्लिमवादी' साहित्याच्या जवळ पोहोचू शकेल, असे कोणतेही साहित्यिक योगदान आजमितीस तरी आपणाला इतर कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेत आढळून येताना दिसत नाही. हे त्यांचे, त्यांच्या प्रतिभेचे मोठेपण आहे.


- सुशीलकुमार शिंदे
shinde.sushilkumar10@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

बातम्या आणखी आहेत...