आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिचकिचाहट कैसी?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण अडचणीत असताना इतरांकडून मदत घेणं अनेकाना पसंत नसतं. मला कुणाच्या मदतीची काहीच गरज नाही, असा निरर्थक आणि टोकाचा अभिमान त्यामागे असतो. मात्र, अडचणींची गंभीर समस्या बनून त्याचे दुष्परिणाम भोगण्यापेक्षा योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत घेणं कधीही चांगलंच.


जुई विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. नाकासमोर चालणारी सुरेख, मृदू स्वभावाची जुई गेल्या काही दिवसांपासून मात्र गप्पगप्प होती. तिचं बोलणं अगदी कमी झालं होतं. पुस्तकं समोर असायची मात्र नजर शून्यात. जरा आवाज झाला की, दचकायची. कधी डोळे सुजलेले असायचे. वाटायचं की, ती चोरून रडत असावी. शेवटी कल्याणीनं एकदा अचानक तिची वही चाळली तेव्हा तिला कळलं की, जुईला दोन महिन्यांपासून एक मुलगा खूप त्रास देत होता. तिचा पाठलाग करायचा. तिचा रस्ता अडवायचा. त्याने कुठून तरी जुईचा फोन नंबरही मिळवला होता. तो तिला फोन करून धमकवायचा. भेटायला आली नाहीस तर तुझी बदनामी करीन, असं म्हणायचा. तिने वहीत आपलं मन मांडलं होतं. त्रास इतका वाढला आहे की, मरून जावंसं वाटतं, असं तिनं लिहीलं होतं. कल्याणी तिला म्हणाली, अगं जुई, तू अशी कोमेजून गेलीस तर कसं गं? तुला मदतीची गरज आहे. तू बोलली का नाहीस इतकं होऊनही?


वेदांतनं शाळेपासून थेट महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत आपल्या कविता, ललित लेख यामुळे साऱ्यांच्या मनात प्रेमाचं, अभिमानाचं स्थान निर्माण केलं होतं. इंजिनिअरिंगच्या शिक्षणात मात्र त्याचं मन अजिबात लागत नव्हतं. सारस्वतांच्या मैफिलीत तो रमायचा. त्याला स्वत:चं एक मासिक काढावं असं वाटायचं. प्रकाशन संस्था काढण्याचं स्वप्न होतं. परीक्षेत तो जेमतेम पास होत होता. त्याचं नुसतं पास होणं आईवडिलांना निराश करत होतं. चिंतेत टाकत होतं. आपल्या करिअरबद्दल वेदांत सिरियस नाही याचा त्यांना विलक्षण राग येत होता. मन मारून अभ्यास करणारा वेदांत पुरता विस्कटत चालला होता. पण काय करावं, कुणाची मदत घ्यावी हे त्याला कळेना. विचारांच्या अन मनातल्या इच्छांच्या आवर्तनातून कसं बाहेर पडावं? आपल्या मनातलं आईवडिलांना हे कसं सांगावं हे त्याला कळत नव्हतं. आपल्या मुलाची आवड त्यांना का कळली नाही? कुणाला विचारावं? कवितेतसुद्धा येतंय हे प्रश्नचिन्ह. अभियांत्रिकीमधला कोरडेपणा नाही मनाला भावत. शब्दांशी झालेली मैत्री कशी नाकारावी? असं कोंडमारा होणारं जगणं जगण्यापेक्षा श्वास संपवावेत, असे निकराचे बोल कवितांच्या ओळीत येऊ लागले.


मुलं शाळेतून महाविद्यालयात आली तरी मनाचं कोवळेपण पुरतं संपत नाही. समजूतदारपणाची मिसरुडं फुटली तरी स्वप्नांचं हळवेपण असतंच. मनाविरुद्ध घडणारी गोष्ट सहन करणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. यातून मार्ग काढता यावा यासाठी ‘जेव्हा गरज असेल तेव्हा मदत घ्यायला हवी’ हे जीवनकौशल्य माहिती करून घ्यायला हवे.  समजून घ्यायला हवे. त्याचा उपयोग होतो हे जाणून घ्यायला हवे. जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा मदतीचा शोध घेणं, ती मिळवणं, ही एक प्रक्रिया आहे. आपण सगळेच कधी ना कधी समस्येमध्ये सापडतो. दर वेळेसच अडचण सोडवणं, त्यावर उत्तर शोधणं आपल्याला शक्य होत नाही. अशा प्रसंगांमधून एकट्यानं जाताना मनावर खूप ताण येतो. अशा वेळी कुटुंब, मित्र, किंवा इतरांकडून मदत घेतली तर त्यामुळे निश्चितच फायदा होतो. 


जेव्हा आपण ताणतणावात असतो, गोंधळलेल्या मनोवस्थेत असतो तेव्हा दुसऱ्याची मदत घेणं कठीण वाटतं खरं. कधी कधी तर आपल्याला मदत हवी आहे हे आपल्याला उमगतसुद्धा नाही. कारण आपल्याला वाटतं की, आलेली अडचण आपोआप दूर होईल. मदत मागायला संकोच किंवा भीती वाटते. कोणी मला मदत करायला तयार होईल का? कुणी मला समजून घेणार नाही. मी मदत मागायला कुठे जाऊ, असे प्रश्न मनात येतात. खरं तर अशी मदत देऊ करणारे व्यावसायिक असतात. पण आपल्याला ही मदत खचिर्क असेल, खूप वेळ खाणारी असेल असं वाटत राहातं. हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. अडचणीच्या काळात दुसऱ्याची मदत घेऊन मार्ग शोधणं महत्त्वाचं असतं. कारण आपल्या अडचणीकडे आपण एकाच दृष्टिकोनातून पाहत असतो. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं तर उत्तरं सापडतात आणि फायदाही होतो.


आपल्याला अशी मदत कुटुंबाकडून आणि मित्रमैत्रिणींकडून मिळू शकते. कारण ते तुम्हाला ओळखतात. तुमची मन:स्थिती, परिस्थिती समजून घेतात. ते तुम्हाला वास्तववादी आणि भावनिकदृष्ट्या मदत करतात. जिथून तुम्हाला मदतीचा आधार मिळू शकेल अशा व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचवतात. शारीरिक मानसिक समस्या, ताणतणाव यातून बाहेर पडायला डॉक्टर मदत करतात. शिवाय सपोर्ट ग्रुप्स तुम्हाला उपयोगी पडतील अशा गोष्टी सांगतात. हेल्पलाइनद्वारेही तुमच्या समस्येवर मदत मिळते. नात्यातील संबंधांमधील प्रश्नांवर मार्ग दाखवणारी पुस्तकंही मदत करतात. मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, आर्थिक सल्लागार, कायदेशीर सल्लागार, समुपदेशक, अशी वेगवेगळी माणसं तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात खूप चांगली मदत करतात.


अडचण आल्यावर झुरत न बसता, स्वत:ला कोंडून न घेता, मनात भीती किंवा अपराधाची भावना न बाळगता, नकारात्मक विचारांना बळी पडून स्वत:चं आयुष्य संपवण्याचा आततायीपणा करू नये. अशा प्रसंगामध्ये मदत मागण्याची लाज वाटून घेऊ नये. मदत घेण्यात काहीच चूक नाही. मदत घेतली तर आपल्या शरीर आणि मन या दोन्हींच्या स्वास्थ्यात निश्तिच सुधारणा होते. 


आपल्या मनातील भावना दुसऱ्यांना सांगितल्यानं ताण कमी झाल्याचं जाणवतं. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उत्तरं शोधणं जमायला लागतं. नवा दृष्टिकोन तयार होतो. अडचणीत असताना आपण एकटं राहाणं पसंत करतो. स्वत:ला कोंडून घेतो. मात्र, अशा स्थितीत मित्रांची वा कुटुंबाची मदत घेतली तर एकमेकांमधील नातेसंबंध दृढ होतात. आपली अडचण गंभीर होऊन त्याचे दुष्परिणाम भोगण्यापेक्षा योग्य अशा व्यक्तीची मदत घेणं केव्हाही चांगलं असतं. एक लक्षात ठेवायचं की, जसं आपण समोरच्याकडून मदत घेतो तसंच त्यालाही वेळप्रसंगी आपण मदत करायला तयार हवं. 


आज केवळ शिक्षणाच्या क्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रात जसं की, मित्रमैत्रिणींमध्ये स्वत:चं अस्तित्व टिकवताना, आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि प्रभावी दिसण्याकरता, आपली आर्थिक स्थिती दर्शवताना, करिअर निवडताना, गर्लफ्रेंड असण्यासाठी आणि रिलेशनशिप टिकवण्यासाठी भावनांचं, पैशाचं व्यवस्थापन करताना विद्यार्थ्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. ज्यातून त्यांच्यात निराशा, एकलकोंडेपणा, आत्महत्येचे विचार येतात. अशा वेळी गरज असेल तेव्हा मदत घेणं हे जीवनकौशल्य उपयोगी ठरतं. जखम भरून यायला वेळ लागतो, पण मदत मागणं हे धाडसाचं पहिलं पाऊल असतं. म्हणूनच जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा ते नक्कीच उचला.


- डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...