आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सर आणि आयुर्वेद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या काळात रासायनिक खतांचा अन्नधान्याच्या उत्पादनातील अतिवापर, तंबाखूचे सेवन, मद्यपान, धूम्रपान इत्यादी अनेक कारणे मानवी शरीरात कॅन्सरची निर्मिती करतात असे सिद्ध झाले आहे. अतिप्रमाणात मांसाहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खाण्यासाठी मांस शिजवताना त्याला अतिप्रमाणात उष्णता दिली तरी ते कॅन्सरसाठी एक मोठे कारण ठरते, असेही पाश्चात्त्य देशातील तज्ज्ञ सांगतात. मांसाहार हा पचायला एकूणच जड असतो. 

 

कॅन्सर म्हटले की आपल्याला एक भयंकर चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आधुनिक जगामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार विहारा मुळे निर्माण होणारा हा रोग सम्राट म्हणजे आधुनिक काळाची मानव प्राण्याला मिळालेली एक विचित्र देणगी म्हणून समजले जात असले तरी प्राचीन भारतीय आयुर्वेद शास्त्रात या रोगाशी आणि त्याच्या लक्षणांशी साम्य असनाऱ्या लक्षण समूहाचे वर्णन आढळते. अर्बुद या नावाने साधारणपणे या व्याधीचे वर्णन प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये केलेले आहे, हे वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल आणि गंमत म्हणजे शरीरातील मांस धातुशी निगडीत असणाऱ्या या व्याधीची तीव्रता वाढल्यावर त्याची चिकित्सा शस्त्रकर्म, क्षारकर्म आणि अग्नीकर्म  यांनी करावी असे स्पष्ट मार्गदर्शन  आयुर्वेदाने केले आहे. जे आजच्या आधुनिक विज्ञानाच्या चीकीत्सेशी मिळते जुळते आहे. मांस धातू दुषित करणाऱ्या कारणांचेही वर्णन आयुर्वेद शास्त्र  करते त्यामध्ये दही, मासे, या सारखे स्त्राव वाढवणारे आणि मार्ग अवरुद्ध करणारे असे पदार्थ खाणे तसेच पचायला अत्यंत जड असा आहार घेणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अर्बुदामध्ये शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होते. त्यामुळे या व्याधीत शरीरातील शुक्रधातुचीही दुष्टी कारणीभूत ठरते हे लक्षात घेतले पाहिजे. अतिप्रमाणात गोड चवीचे पदार्थ खाणे  हे देखील अर्बुद या व्याधीचे एक कारण आयुर्वेदाने सांगितले आहे.

 
आयुर्वेदाने अर्बुद म्हणजे पर्यायाने मांस दुष्टीच्या कारणांमध्ये त्याचा केलेला उल्लेख हा आजही संदर्भहीन किंवा अशास्त्रीय ठरत नाहीत. कॅन्सर पासून आपण स्वतःला वाचवायचे असेल तर वर सांगितलेली प्राचीन आणि अर्वाचीन कारणे टाळायला हवीत.


आजमितीला तोंडाच्या , जिभेच्या ,घश्याच्या ,अन्ननलीकेच्या  कॅन्सरचे प्रमाण फार मोठे आहे.त्याचप्रमाणे यकृत ,मोठे आतडे ,आमाशय ,पित्ताशय ,स्वादुपिंड ,हाडे , रक्त इत्यादीच्या कॅन्सरचेही  हजारो रुग्ण आज आढळतात. त्यांचे संख्याशास्त्रहि उपलब्ध आहे.परंतु खरा प्रश्न आहे तो या दुर्धर व्याधीच्या चिकित्सेचा.आज आपल्या देशात आधुनिक चिकीत्सेबरोबर आयुर्वेद या भारतीय वैद्यक शास्त्राची चिकित्साही यासाठी उपलब्ध आहे. कॅन्सरची चिकित्सा हि सामान्य रुग्णाच्या आवाक्या बाहेरची आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. यासाठी अक्षरशः काही रुग्णांना किमान तीन ते पाच लाख रुपये मोजावे लागतात.केमोथेरपी , रेडीएशन यांचा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये होणारा उपयोग नाकारता येत नाही.परंतु त्यामध्ये या चिकित्सेचे शरीरावर होणारे दुष्परिणाम बर्याचवेळा तीव्र स्वरूपाचे असतात.त्यामध्ये डोक्यावरचे केस गळणे , खूप अशक्तपणा येणे , शरीराचा दाह होणे  ,तीव्र जुलाब होणे किंवा मलावरोध होणे ,आम्लपित्त वाढणे ,लघवीची आग होणे, तोंड येणे ,त्वचेवर लाल चट्टे उमटणे व त्वचेची आग होणे. इत्यादी अनेक दुष्परिणामांना रुग्णांना सामोरे जावे लागते.हे दुष्परिणाम होऊ नयेत तसेच झाल्यास त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले काही सुलभ उपचार योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करून घेतल्यास कॅन्सरच्या रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकतो.यामध्ये काही आयुर्वेदीय औषधांबरोबरच दुर्वांचा रस , काळ्या मनुका ,उंबर या फळापासून तयार केलेले औषध तुळशीचे बी , गुलकंद ,मुरावळा  ,गायीचे शुध्द तुप, गायीचे दुध इत्यादी नैसर्गिक गोष्टींचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने करता येतो.


काहीवेळा कॅन्सरची गाठ शस्त्रक्रिया किंवा अन्य चिकित्सा घेतल्यावर निघून जाते पण पुन्हा उद्भवण्याचा धोकाही असतो.शरीराची प्रतिकार शक्ती आणि एकूण स्वास्थ्य चांगले असेल तर कॅन्सर पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी असतो.असा पुनरुद्भव होऊ नये म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली रसायन चिकित्सा अत्यंत महत्वाची ठरते. च्यवनप्राश  , अगस्तीप्राश ,अश्विनीप्राष ,आमलकी रसायन इत्यादी अनेक रसायन औषधे आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये पुन्हा होणारा कॅन्सर टाळण्यासाठी उपयोगी पडू शकतात. याचबरोबर योग तसेच भारतीय संगीत या पूरक पधतींचाही उपयोग मुख्य आयुर्वेदीय चीकीत्सेबरोबर होऊ शकतो. तेव्हा जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने आधुनिक वैद्यकाने भारतीय शास्त्रांशी समन्वय साधून कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केल्यास ती या क्षेत्रातील मोठी क्रांती ठरेल असा विश्वास वाटतो. 


- वैद्य विजय कुलकर्णी
ayurvijay7@gmail.com