आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इट्स नेव्हर टू लेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सृजनात्मक कामाची आवड, शिस्त आणि नियोजनाच्या आधारे रेणुकानं छंदाचं व्यवसायात रूपांतर केलं. तिने तयार केलेल्या केकची चव, त्या केकची सजावट, आणि सजावटीमधला सफाईदारपणा यामुळे तिचा व्यवसाय आता बाळसं धरतोय. आर्थिक स्वातंत्र्य स्त्रियांच्या बाबतीत खूप महत्त्वाचं असतं, आणि ते मिळवण्यासाठी कधीही वेळ निघून गेलेली नसते असं तिला वाटतं.


रे णुका मूळ धुळ्याची. बीएस्सी होम सायन्स शिकलेली. फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमाही तिने पुण्यात पूर्ण केला. त्यानंतर ती लग्न होऊन २००५मध्ये औरंगाबादला आली. सहासात वर्षांनंतर २०१२मध्ये इंजीनिअर असलेल्या नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्तानं जर्मनीला गेली. तिथली भाषा आणि पद्धती शिकली. त्यामुळे अवघड वाटणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या. नवरा नोकरीवर गेल्यानंतर चार वर्षांच्या मुलीला सांभाळून उरलेल्या वेळाचं करायचं काय, असा प्रश्न तिला पडला आणि आकाराला आला, ‘केक आर्ट फॉर यू.’ नवऱ्यानं केक डेकोरेशन करणाऱ्या एका क्लासबद्दल माहिती दिली . होम सायन्स विषयात रस असणाऱ्या रेणुकाला ही कल्पना आवडली. पण क्लास पूर्णपणे जर्मन भाषेतून असल्यामुळे ती थोडी साशंक होती. शिवाय त्या वेळी रेणूकाचा धाकटा मुलगा फक्त एक वर्षाचा होता.


रेणुकानं केक डेकोरेशनचा क्लास पूर्ण केल्यानंतर मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधे, कुटुंबातले सदस्य, मित्रमैत्रिणींचा वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, यांसाठी रेणुकालाच केक बनवायची ऑर्डर हक्कानं दिली जाऊ लागली. केकची चव आणि डेकोरेशन पाहून एक दिवस रेणुकाच्या मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, छंदाला व्यवसायाचं स्वरूप देण्याचा. मैत्रिणीच्या या सल्ल्यानं हुरूप वाढलेल्या रेणुकानं, ‘इंडियन्स इन म्युनिच’ या फेसबुक पेजवर स्वत:च्या केकचे फोटो टाकायला सुरुवात केली. विशेष म्हणजे पेज तयार केल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ऑर्डर मिळू लागल्या. तो ओघ आजही कायम आहे. अर्थात त्यासाठी ती मेहनतही घेते. केकसंदर्भातलं तिचं ज्ञान आणि कौशल्य ती वेळोवेळी अपडेट करते. नवनव्या ट्रेंडची माहिती मिळवते. ग्राहकांच्या आवडीनुसार, मागणीनुसार केक आणि त्यावरचं डेकोरेशन ती करून देते. त्यामुळे तिच्या केकना खूप मागणी असते. प्रसंगानुरूप सजावट हे रेणुकाचं वैशिष्ट्यं आहे. म्युनिचच्या ऑलिंपिक टॉवरवर रेणुकाच्या एका क्लाएंटला तिच्या मित्रानं मागणी घातली होती. त्या क्लाएंटला ती आठवण सेलिब्रेट करण्यासाठी त्या प्रसंगावर आधारित त्या ठिकाणाचा केक बनवून हवा होता. तिने तसा तो दिला. ‘ ते पाहून त्या जोडप्याला झालेला आनंद ही माझ्या या करिअरमधली सगळ्या गोड आठवण आहे,’ ती सांगते. भारताबाहेर काम करताना एक गोष्ट आपल्या खूप उपयोगाची ठरते आणि अडचणीचीही. तुमच्या कामात शिस्त नसेल तर परदेश तुम्हाला अडचण वाटेल. आणि शिस्त पाळणारे तुम्ही असाल तर तुमची प्रगती कुणी रोखू शकत नाही. मुलगी आणि कुटुंब सांभाळून हा व्यवसाय करणं सुरुवातीला अवघड गेलं. मात्र शिस्त, नियोजन, नीटनेटकेपणाची सवय यामुळे भरभराटही झाली. ‘छंदाला व्यवसायाचं रूप दिल्यानं मला हे करण्याचा कधीच कंटाळा येत नसल्याचं ती म्हणते. भारतीय आणि जर्मन स्त्रिया यात कुठला फरक जाणवतो याबद्दलही रेणुकाकडून जाणून घेतलं. ती म्हणते, जर्मन स्त्रिया स्वतंत्र वृत्तीच्या असतात. स्वत:ला वेळ देतात. ताणतणावापासून मुक्त राहण्याचा प्रयत्न करतात. आरोग्यासाठी विशेष वेळ राखून ठेवतात. भारतातल्या गृहिणी असलेल्या माझ्या मैत्रिणींना मला हेच सांगावेसे वाटते की,आर्थिक स्वातंत्र्य खूप वेगळं - आनंददायी असतं. आणि ते मिळवण्यासाठी कधीही वेळ निघून गेलेली नसते. स्वत:ला महत्त्व द्या, तरच इतरांसाठी काही छान करू शकाल. स्वत:च्या दिवसाचं नेटकं नियोजन करा,’ असं रेणुका आवर्जून सांगते.


- वंदना धनेश्वर, औरंगाबाद
vandana.d@dbcorp.in

 

पुढील स्‍लाइडवर पाहा आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...