आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात लोकशाही पण घरात?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या देशातल्या महिलांची राजकीय समज निर्माणच होऊ दिली  गेलेली नाही, त्या देशात महिलांनी मतदान करावं हा हट्ट का?

 

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन वाजतगाजत पार पडलाय! भरपूर शुभेच्छांची देवाणघेवाण, सत्कार समारंभ यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत ८ मार्च हा दिवस अगदी सामान्य माणसांपर्यंत पोचलेला आहे. हा प्रचार- प्रसार करण्यात टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रांसारख्या माध्यमांनीदेखील गेल्या काही वर्षांपासून मोठाच हातभार लावलेला आहे. अनेक टीव्ही वाहिन्या या दिवसासाठी विशेष कार्यक्रम तयार करतात, त्याआधी महिलांचे सत्कार घडवून आणतात. काही मोठाले मॉल्स महिलांना विशेष सूट जाहीर करतात आणि त्या निमित्ताने आपलेही नाव जाहिरातीतून झळकवतात. त्या दिवसांत घड्याळे, बिस्किटं, कपडे, पर्सेस अशी अनेक उत्पादने किंवा अगदी कर्ज आणि आयुर्विम्यासारख्या सेवासुद्धा महिलांनाच केंद्रस्थानी ठेवून आपापल्या जाहिराती बनवतात. आपल्याला एरव्ही वर्षभर जशा जाहिराती पाहाव्या लागतात त्यापेक्षा या जाहिराती खूपच वेगळ्या असतात. त्यात महिलांच्या कष्टांची, कर्तृत्वाची आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचे गुणगान केलेले असते.  ‘स्त्री म्हणजे अमुक, ती म्हणजे तमुक, तिच्याशिवाय दुनिया व्यर्थ आहे’ असे हे महिलांच्या कौतुकाचे ओघळ वाहायला लागले की, महिला दिन जवळ आला असं अपोआप लक्षात यायला लागतं! पण एकदा महिला दिवसाचं कौतुक संपलं की त्या जाहिरातीदेखील दिसेनाशा होतात!


पण यातली एक जाहिरात मात्र आणखी काही महिने नाहीशी होईल असं वाटत नाहीये. कारण ही आहे, महिलांना मतदार बनायचं आवाहन करणारी जाहिरात! जागतिक महिला दिनाचा मुहूर्त साधून निवडणूक आयोगाने सगळ्या महिलांना मतदार म्हणून नावनोंदणी करायचं आणि लोकशाहीतला स्वत:चा महत्त्वाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईमध्ये तर प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर या जाहिरातीचे चारचार फलक लावलेले आहेत. वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्यांवरून वारंवार ही जाहिरात दाखवली जाते आहे! कारण या जाहिरातीत टीव्हीवरच्या निरनिराळ्या मालिकांमध्ये दिसणाऱ्याच अनेक महिला कलाकार सामील झालेल्या आहेत. रोज सकाळ-संध्याकाळ महाराष्ट्रातल्या घराघरात पोचून त्यांचं मनोरंजन करणाऱ्या सासवा, सुना, जुळ्या बहिणी, माम्य-ामावशा या जाहिरातीतून त्यांच्या प्रेक्षकांना सांगताहेत – तुम्ही मतदार व्हायला पाहिजे, आपला हक्क बजावायला पाहिजे, कारण लोकशाहीने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे. 


ही जाहिरात म्हणजे विरोधाभासाचा एक उत्तम नमुना आहे! ज्या टीव्ही मालिकांमधून महिलांवरचे कौटुंबिक अत्याचार रोज दाखवले जातात, जिथे सज्ञान मुलामुलींचा स्वत:चा जोडीदार निवडण्याचा हक्कसुद्धा डावलला जातो त्यातच काम करणाऱ्या कलाकारांनी स्त्रियांच्या हक्काबद्दल बोलावे याहून मोठा विनोद काय असणार? सगळ्याच वाहिन्यांवरच्या बहुसंख्य मालिकांमध्ये स्त्रियांना साचेबंद भूमिकांमध्ये अडकवून ठेवलेलं असतं. सध्या सुरू असलेल्या मालिकांमधल्या अनेक नायिकांचे मनाविरुद्ध लग्न झालेले आहे. अनेक नायिका घराबाहेर हाकलून काढलं जाण्याच्या दहशतीखाली असतात किंवा कुठल्या न कुठल्या निमित्ताने त्यांना घरात त्रास दिला जातो. त्यांना स्वत:ची मतं आग्रहपूर्वक मांडता येत नाहीत, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते. याचेच दुसरे टोक म्हणजे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्त्रिया मालिकेतल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर अन्याय करीत असतात, सत्तेचा गैरवापर करीत असतात. स्वत:चे विचार नीटपणे मांडता न येणे, स्वत:वर अन्याय होऊ देणे, हे जणू काही सद्गुण आहेत आणि ठामपणा, स्वत:ला महत्त्व देणे हे जणू काही दुर्गुण आहेत, अशा प्रकारे मालिकांमध्ये चित्रण केलेले असते. वास्तव जीवनातसुद्धा स्त्रियांकडून समाजाच्या तशाच अपेक्षा असतात. वास्तवातल्या सामाजिक अन्यायाला आव्हान देण्याचे काम लोकप्रिय माध्यमांद्वारे कधीच केले जात नाही. कारण वास्तव जीवनातली परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली तरच माध्यमात गुंतवलेल्या कोट्यवधी रुपयांतून फायदा कमावता येणार असतो. त्यामुळे समाजाकडून स्त्रीपुरुषांनी जसे वागण्याची ठोकळेबाज अपेक्षा असते, तिलाच खतपाणी घालणारे चित्रण माध्यमातून केले जाते. मालिका किंवा चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचे त्यातल्या आशयावर काहीच नियंत्रण नसते. दिले गेलेले संवाद स्वत:चे कौशल्य वापरून सादर करणे एवढेच त्यांना करायचे असते. आपापल्या कौशल्यामुळे त्या त्या भूमिकेच्या नावानेच त्या कलाकार प्रसिद्ध होतात. उदाहरणच द्यायचे झाले तर सध्या सुकन्या कुलकर्णी हे अतिशय गुणी अभिनेत्री ‘माई’ ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे – तिने केलेल्या आजेसासूच्या भूमिकेमुळे!


या आजेसासूबाई घाडगे कुटुंबातली एक खमकी महिला आहे. त्यांची एक प्रकारची एकाधिकारशाही घाडग्यांच्या घरात चालते. आपल्या नातवाने जीवनाची साथीदार म्हणून निवडलेली मुलगी या माईंना पसंत पडली नाही म्हणून नातवाच्या मनाविरुद्ध स्वत:चाच हेका चालवून त्यांनी आपल्या पसंतीच्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिलेले आहे. त्यांच्या इच्छेविरुद्ध बोलण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. भर लग्नात त्यांच्या नातसुनेने तिला हे लग्न नको असल्याचे स्पष्टपणे सांगूनदेखील तिच्या इच्छेला माईने मान दिलेला नाही. लग्नानंतरही सुनेला वेगवेगळ्या कारणांनी शिक्षा दिल्या जातात. थोड्याफार फरकाने अशी कुटुंबे आणि अशीच माणसे अनेक मालिकांमध्ये आपल्याला दिसतात. अशा या कुटुंबातल्या अशा बायकांच्या भूमिका निभावणाऱ्या कलाकारच सामान्य स्त्रीच्या मतदानाच्या हक्काबद्दल आपल्याला उपदेश करत आहेत!


जसा मालिकांमधल्या कुटुंबात बायकांना आपले मत व्यक्त करण्याचा आणि स्वत:च्या मतानुसार स्वत:च्या आयुष्यातले निर्णय घेण्याचा अधिकार नसतो, तसाच प्रत्यक्षातदेखील असंख्य बायकांना स्वत:च्या मर्जीने स्वत:चे आयुष्य जगायचा अधिकार नाकारलेला असतो! त्यांनी शिकायचे की नाही, नोकरी करायची की नाही, घरातून बाहेर पडायचे की नाही, कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या वेळी बाहेर जायचे, मुलगा होऊ द्यायचा की मुलगी; हे काहीही त्या स्वतंत्रपणे ठरवू शकत नाहीत. त्यांच्याही घरात लोकशाही नाही, पण देशाच्या लोकशाहीत मात्र त्यांनी स्वत:चा हक्क बजावला पाहिजे, असे त्यांना सांगितले जाते आहे. भारतामध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार नेहमीच कमी प्रमाणात मतदान करतात. महिलांमध्ये असलेली शिक्षणाची कमतरता याला कारणीभूत आहे, असे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. आपल्या देशात ३५ टक्के महिलांना साधी अक्षरओळखसुद्धा झालेली नसते. महिलांनी घराबाहेर पडण्यावर अतोनात बंधने असतात, त्यांना बाहेरचे जग समजून घेण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे त्यांची राजकीय समज फारशी वाढू शकत नाही. अशा परिस्थितीत नवरा सांगेल त्याच उमेदवाराला मत देण्याकडे अनेक बायकांचा कल असतो. ही परिस्थिती बदलल्याखेरीज नुसतंच ‘बायकांनी मतदान केले पाहिजे’ असे म्हणणे हा खोटारडेपणाच नाही का? घरात लोकशाही नसेल तर देशात तरी लोकशाही कुठून येणार?


- वंदना खरे, मुंबई
vandanakhare2014@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...