आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षणाचा हा कोणता प्रकार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या पुरुषाने स्त्रीचं रक्षण करणं समाजाला मान्य आहे. रक्षण करणाऱ्या पुरुषाचा तो पुरुषार्थ समजला जातो. मात्र, स्त्रीने स्वत:चं रक्षण स्वत:च करणं अजूनही सर्वमान्य नाही. का? अजूनही पुरुषांना स्त्रियांच्या रक्षणकर्त्यांच्याच भूमिकेत पाहायला का आवडतं आपल्याला?

 

गेल्या रविवारी एका छोट्याशा बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं! जेमतेम दोनशे शब्दांची लहानशी बातमी. कोल्हापुरात एका नवऱ्याने आपल्या बायकोची छेड काढणाऱ्या माणसाचा भररस्त्यात पोटात चाकू खुपसून खून केला होता. दिवसभरात अनेक वेळा ही बातमी फेसबुक, ट्विटर आणि व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून माझ्यासमोर येत राहिली. मी जेव्हा त्या ऑनलाइन बातमीच्या लिंकवर क्लिक करून बघितलं तेव्हा तब्बल तीन हजार आठशे माणसांनी त्या बातमीवर ‘लाइक’ची मोहोर उठवली होती आणि पन्नासपेक्षा जास्त प्रतिक्रिया त्या बातमीवर लिहिल्या गेल्या होत्या. मी कुतूहलाने बातमीवरच्या प्रतिक्रिया वाचायला लागले आणि बातमीपेक्षा त्या प्रतिक्रियांनीच मला धक्का बसला! 


अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंतच्या जवळपास सर्वच प्रतिक्रियांमधून ‘शाब्बास रे भावा!’, ‘याला म्हणतात मर्द मराठा’, ‘वेल डन! स्वत:च्या बायकोचे रक्षण केलेस,’ अशा शब्दांमध्ये त्या खून करणाऱ्या माणसाचे भरभरून कौतुक केलेले होते. ‘हम उंगलियाँ नही काटते, गला काटते है!’ हा ‘बाहुबली’ सिनेमाचा डायलॉगसुद्धा चारपाच प्रतिक्रियांमध्ये लिहिलेला होता. या माणसाने बायकोची छेड काढणाऱ्याचा खून केल्यामुळे अशी छेडछाड करणाऱ्यांना धाक बसेल, असेही अनेकांनी म्हटले होते. तीन-चार प्रतिक्रियांमध्ये तर त्या खुनी माणसावर गुन्हा नोंदवण्याऐवजी त्याचा सत्कार केला पाहिजे, असेही सुचवले होते. कोणी म्हणत होते की, त्याला कोल्हापूरभूषण पुरस्कार द्या, तर कोणी म्हणत होते की भारतभूषण पुरस्कार द्या! आपल्या पत्नीचे रक्षण करण्याचे कर्तव्य बजावलेले आहे म्हणून त्या माणसाच्या गुन्ह्याला बहुसंख्य प्रतिक्रियांमधून जोरदार पाठिंबा मिळालेला दिसत होता. मी हा लेख लिहायला घेतला तोपर्यंत ६२ प्रतिक्रिया आलेल्या दिसल्या. प्रतिक्रिया लिहिणाऱ्यांची जी नावे दिसत होती त्यावरून त्या बहुसंख्य प्रतिक्रिया  पुरुषांच्या आहेत आणि फक्त दोनच महिलांच्या प्रतिक्रिया आहेत असे दिसत होते. त्यापैकी एका महिलेने हत्येचे उघड कौतुक केले होते आणि दुसऱ्या महिलेने छेडछाडीला मामुली गुन्हा समजू नये, असे म्हणत, खून करण्यामागे त्या माणसाची काही तरी मजबुरी असावी, असे सुचवले आहे! विशेष म्हणजे या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये फक्त एकाच पुरुषाने पोलिसांची आणि कायद्याची मदत घ्यायला हवी होती, असे म्हटलेले आहे. त्याच्या या प्रतिक्रियेला खोडून काढत त्याला एका पुरुषाने उत्तर दिले आहे की, ‘साहेब तुमच्याआमच्यासारखे लोक तक्रार करतात, घावडेसारखे वीर कुणाकडे पाहून रडण्यासाठी जन्माला येत नाहीत!’ कायद्याच्या मार्गाने गेले तर न्याय मिळायची शाश्वती नसते, असाच बहुतेक प्रतिक्रियांचा सूर होता. पोलीस आणि कायदा निरुपयोगी आहेत; म्हणून सामान्य नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागतो, असे समर्थन केलेले दिसत होते.


बायकोची छेडछाड करणाऱ्या माणसाचा भररस्त्यात खून करणाऱ्या पुरुषाला इतक्या मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालेलं पाहून मला फारच आश्चर्य वाटलं! कारण जेव्हा एखादी बाई स्वत:ला असा त्रास देणाऱ्या माणसाला प्रतिकार करते, तेव्हा तिला मात्र अगदी उलट प्रतिसाद मिळतो.


आपल्या देशात ८०% बायकांना रस्ते, दुकाने, ऑफिस, रेल्वे, अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. एकतर अशा त्रासाला ‘छेडछाड’ असं हलकंफुलकं नाव देऊन आपण त्याचं गांभीर्यच कमी करतो! ‘आपण अशा त्रासाकडे दुर्लक्ष करावं,’ असंच मुलींना लहानपणापासून शिकवलं जातं. याच प्रवृत्तीमुळे आपल्या देशात शाळेच्या रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीमुळे असंख्य मुलींना शाळा सोडावी लागते. सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, असं आपल्याला मुळात वाटतच नाही. ‘बाईची जागा चुलीसमोर’ हेच आपल्याला मनातून इतकं पटलेलं असतं की, सार्वजनिक ठिकाणी बाईला त्रास दिल्याबद्दल पुरुषाला जाब विचारणे आपल्या संस्कृतीत बसतच नाही. सार्वजनिक ठिकाणी एखादा माणूस जेव्हा एखाद्या बाईकडे टक लावून पाहत राहतो, तिच्याकडे बघून गाणी म्हणतो, तिला जबरदस्तीने स्पर्श करतो किंवा धक्का मारतो, तेव्हा तिनेच मान खाली घालावी असे सुचवले जाते. हल्लीच एका बलात्काराच्या संदर्भात किरण खेर यांनीदेखील ‘मुलींनी जपून राहिले पाहिजे’ अशाच आशयाचे वक्तव्य केलेले होते! जर क्वचित एखाद्या मुलीला पुरुषांनी असे वागण्यात काही गैर आहे असे वाटले आणि तिने त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर तिला मात्र वेगवेगळ्या प्रकारे गप्प केले जाते! 


दोनच वर्षांपूर्वीची गोष्ट. पंजाबातल्या तरणतारणमध्ये रस्त्यावर एका मुलीला काही ट्रक ड्रायव्हर्सनी त्रास दिला म्हणून ती जवळच उभ्या असलेल्या पोलिसांकडे तक्रार करायला गेली तेव्हा पोलिसांनी तिलाच बदडून काढले. तिला लाठी आणि लाथांनी मारत असल्याचा व्हिडीओ रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने घेतला होता. त्यानंतर ते प्रकरण बातम्यांमध्ये दिसायला लागले आणि त्या पोलिसांची ‘चौकशी’ सुरू झाली. त्या चौकशीतून काय निष्पन्न होईल आणि त्या मुलीला न्याय मिळेल का, माहीत नाही!


‘रोहतक सिस्टर्स’ आठवतात ना? काही वर्षांपूर्वी हरियाणामध्ये दोन मुलींनी बसमध्ये दोन मुलांना मारल्याची घटना देशभर गाजली होती. त्या घटनेबद्दलचे व्हिडिओ अजूनही यूट्यूबवर पाहायला मिळतात. चालत्या बसमध्ये दोन मुली पट्ट्याने पुरुषांना बडवत असताना बाकीचे प्रवासी शांतपणाने बसलेले त्यात दिसतात. अनेक वृत्तवाहिन्यांनी त्या घटनेची बातमी केली, त्या मुलींच्या मुलाखती घेतल्या, त्यांना बहादुरीसाठी बक्षिसे जाहीर झाली. मात्र, नंतर गावातील खाप पंचायतीचे लोक पुढे आले, त्या मुली खोटारड्या असल्याची साक्ष देणाऱ्यांच्या मुलाखती दिसू लागल्या आणि हळूहळू ते प्रकरण वेगळ्याच दिशेने जायला लागले. तीन वर्षांनी या खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले! त्रास देणाऱ्या पुरुषांना प्रतिकार करणाऱ्या महिलांचे अशा प्रकारचे आणखीही काही व्हिडिओ इंटरनेटवर दिसतात. असे व्हिडिओ बरेच लोकप्रियसुद्धा असावेत असे दिसते! पण अशा व्हिडिओवरती असलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर पुरुषांना माफी मागायला लावणाऱ्या बायकांना मनमुराद शिव्या हासडलेल्या दिसतात. बहुतेक वेळा अशा प्रकारे वागणाऱ्या मुलींना खोटे ठरवलेले असते. ‘हिला कोण त्रास देणार? ही इतकी फालतू दिसतेय की, हिच्याकडे कोणी पाहाणारच नाही!’ इथपासून  तिला वेश्या ठरवण्यापर्यंतच्या अनेक अतिशय असभ्य प्रतिक्रिया दिसतात. थोडक्यात, स्त्रियांनी स्वत:वरच्या अन्यायाचा प्रतिकार करणे समाजपुरुषाला मान्य नाही! त्रास देणाऱ्या पुरुषाला प्रतिकार करणाऱ्या बाईला शिव्या घालायच्या आणि त्याचा खून करणाऱ्या पुरुषाचे मात्र कौतुक करायचे, ही आपल्या समाजाची प्रवृत्ती फारच भयानक आहे! स्त्रिया जणू काही पुरुषांची मालमत्ता आहेत, असं आपल्याला वाटतं हेच अशा प्रतिक्रियांमधून दिसून येतं. आणखी किती वर्षं आपण पुरुषावर रक्षणकर्त्याची भूमिका लादत राहणार?


- वंदना खरे, मुंबई
vandanakhare2014@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...