आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही हवेसे 'समाजस्वास्थ्य'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाच्या लेखी अस्पृश्य असलेल्या लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर नि महत्त्वाच्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे सातत्याने परखड विचार मांडण्यासाठी ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाला रधों यांनी सलग हत्यार बनवले.


रघुनाथ धोंडो कर्वे (जन्म : १४ जानेवारी १८८२ – मृत्यू : १४ ऑक्टोबर १९५३) हे मुळात गणित विषयाचे प्राध्यापक. त्यांच्या जडणघडणीवर प्रामुख्याने समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा प्रभाव होता. वडील धोंडो केशव कर्वे यांच्या प्रगल्भ सुधारणावादी विचारांची त्यांना प्रेरणा मिळाली होती. ज्या काळात इंग्लंड आणि अमेरिकेत प्रगत सामाजिक विचारांचे वारे वाहण्यास प्रारंभ झाले होते, त्याच घडीला, म्हणजे सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी, महाराष्ट्रात रधों संततिनियमन, लैंगिक शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण असे गंभीर महत्त्वाचे विषय निर्भीडपणे समाजस्वास्थ्य मासिकातून मांडत होते. यावरूनच रधोंंची दूरदृष्टी अधोरेखित होते. रधोंनी केवळ संततिनियमन हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून १५ जुलै १९२७ रोजी समाजस्वास्थ्य हे मासिक सुरू केले. त्यांना तथाकथित सनातनी आणि थोतांड धर्माधिकाऱ्यांकडून तीव्र रोष पत्करावा लागला. पुराणमतवादी समाजाने रधोंना वेडे आणि भ्रमिष्ट ठरवले.


अज्ञानी समाजाचे शोषण करणाऱ्या समाजगटाला रधों यांचे ठोस, निर्भीड, बुद्धिप्रामाण्यवादी विचार त्रासदायक वाटू लागले. स्वार्थी मानसिकता असणाऱ्या अशा सनातनी वर्गाची अज्ञानी समाजावर प्रभावी पकड होती, ती रधोंच्या परखड विचारांनी ढिली होईल, अशी भीती समकालीन ढोंगी धर्माधिकाऱ्यांना वाटत होती. तरीही रधों यांचा एकाकी लढा सामाजिक प्रवाहाविरुद्ध बेधडकपणे सुरू होता. तेव्हा रधों यांचे सुधारणावादी विचार ऐकून घेण्याची, वाचून अभ्यासण्याची किंवा पाहून व्यक्त होण्याची मानसिकता ना शोषण करणाऱ्या मूठभर सनातन्यांकडे होती, ना त्यांना बळी जाणाऱ्या अज्ञानी समाजाकडे! तशी मानसिकता असणारा समाज तेव्हा प्रगल्भ नव्हता. तो आज घडीला आहे, असेही म्हणण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे पुरातन काळापासून आजपर्यंत किंबहुना भविष्यातही समाजातील असे चलाख स्वार्थी सनातनी गटांचे केवळ मानवी स्वरूप बदलत जातात, त्याचप्रमाणे नवनव्या रधोंसारख्या विचारांचा जन्म त्या-त्या काळात वेगवेगळ्या स्वरूपाने होत असतो. जो आजच्या काळात अजित दळवी यांनी लिहिलेल्या समाजस्वास्थ्य या नाटकाच्या रूपाने झाला आहे. समाजस्वास्थ्य नाटकाच्या निमित्ताने सन १९३०च्या काळातील रधोंच्या विचारांचे पुनरुज्जीवन झाले आहे. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी तितक्याच ताकदीने रंगमंचावर आणले आहे. जसे प्रेक्षकांना नाटक खिळवून ठेवते तसे हे नाटकाचे पुस्तक वाचकांना विचार करायला भाग पाडते, हे नि:संशय!


सबंध भारतात महात्मा गांधींचा प्रभाव असण्याच्या काळातही रधोंनी गांधींच्या ब्रह्मचर्य कल्पनेला बेधडकपणे वेडेपणा म्हटले. स्वामी विवेकानंद यांच्या अाध्यात्मिक संकल्पनेला आपण किंमत देत नाही, असे रधोंनी समाजाला ठणकावून सांगितले. रवींद्रनाथ टागोर अथवा अरविंद घोष यांच्यासारख्या समाजमान्य प्रतिभावंतांवर त्यांनी सडकून टीका करण्याचे धारिष्ट्य दाखवले. बहुधा खटल्याच्या अनुषंगाने टागोर, गांधी आणि विवेकानंद यांच्यावर केलेल्या टीकेचे मुद्दे येत नसल्यामुळे दिग्दर्शक अतुल पेठे यांनी रंगमंचावरील नाटकात ती टाळली असावी.


लेखक अजित दळवी यांनी सन १९२७ ते १९५३ अशी सत्तावीस वर्षे र. धों. कर्वे यांनी समाजस्वास्थ्य मासिक ज्या मोठ्या निष्ठेने आणि कमालीच्या निग्रहाने चालवले, तो काळ वाचकांसमोर आक्रस्ताळेपणा न आणता नैसर्गिकपणे उभा केला. समाजस्वास्थ्य मासिकाच्या माध्यमातून रधोंनी लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. ‘समाजस्वास्थ्य’चे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रसिद्ध होत. रधों मासिकाचे बंडल बांधून त्यावर पत्ते लिहिण्यापासून पोस्टात टाकण्याचे कार्य निष्ठेने स्वत: करत.  रधोंनी समाजस्वास्थ्य मासिकामध्ये केवळ संततिनियमनाचीच नव्हे, तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप आणि निर्भय चर्चा व्हावी, असा आग्रह धरला. त्यामुळे रधोंना त्या काळच्या समाजातील जुनाट समजुतींना कवटाळणाऱ्या डॉक्टरांसह कर्मठ, सनातनी, स्वार्थी, धर्माभिमानी समाजगटाच्या कोर्टातील खटल्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. समाजस्वास्थ्य अंकातील निर्भीड लेखन ‘शहाणे करावे सकळ जन’ तत्त्वाप्रमाणे असल्यामुळे समाजातील स्वार्थी घटकांना ते परवडणारे नव्हते. म्हणून रधोंना ‘समाजमाध्यम’मधील लेखन ‘अश्लील’ ठरवून कायद्याच्या कात्रीत पकडण्यासाठी त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. या खटल्यांतील कोर्टरूममधील संवाद म्हणजेच समाजस्वास्थ्य हे नाटकाचे पुस्तक. खटल्यामुळे रधोंच्या लेखन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसा घाला घालण्याचा प्रयत्न झाला, त्यावर रधोंनी कशी बुद्धिप्रामाण्यवादाने आपली संयमी बाजू मांडली याचे दर्शन समाजस्वास्थ्य पुस्तकात घडते. विरोधकांची तमा न बाळगता आर्थिक अडचणींचा सामना करत रधोंनी आलेली अस्थिरताही पचवली.  मात्र, आपल्या जीवननिष्ठेबाबत कधीच तडजोड केली नाही. रधोंनी आपल्याला पटलेले विचार समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर जिद्दीने केल्याचा प्रत्यय समाजस्वास्थ्य हे दोन अंकी पुस्तक वाचताना येतो.


रधोंनी अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फक्त तसा आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे, हे संयमाने नि तितक्याच ताकदीने न्यायालयास पटवून दिले.


समाजाच्या लेखी अस्पृश्य असलेल्या लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर नि महत्त्वाच्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे सातत्याने परखड विचार मांडण्यासाठी ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाला रधों यांनी सलग हत्यार बनवले. समाजातून प्रचंड विरोध होत असतानाही रधोंच्या प्रामाणिक सचोटीचा हेतू कधीच डळमळीत झाला नाही. अशा दृढनिश्चयी समाजसुधारकाला आपली सरकारी खात्यातील नोकरीही  सोडण्याची वेळ आली.


रधोंनी हिंदू देवदेवतांच्या लीलांना व्यभिचार मानले. व्यभिचार या कल्पनेचेच उघडपणे समर्थन करत सनातनी धर्मवाद्यांना अंगावर घेणाऱ्या रधोंनी झुंडशाही महाप्रवाहाच्या विरोधात जिद्दीने तोंड दिले. नाटकाच्या शेवटी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी सांस्कृतिक लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी समाजातील वैचारिक जळमटे दूर होण्याचा हेतू व्यक्त करणारा अप्रतिम लेख लिहिला आहे, ज्यात पाऊणशे वर्षांपूर्वीचे रधोंचे विचार आजच्या समाजस्वास्थ्यासाठीही कसे अमृत आहे, त्याचा प्रत्यय येतो. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी आपली भूमिका लेखाच्या स्वरूपात मांडलेली आहे.

 

- यशवंत पोपळे, सोलापूर
yashwant.pople@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...