आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्द खोडून तयार झालेली राजकीय कविता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘इरेझर पोयट्री’... सोप्या भाषेत हा कवितेचा एक प्रकार आहे, जो गेल्या वर्षात अमेरिकेतील साहित्यिकांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय विरोधासाठी वापरला गेला.या कवितेला ‘ब्लॅकआऊट’ किंवा ‘रिडक्शन’ पोएट्री असंही म्हणतात. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असलेला शब्द लिहिल्यानंतर कवितेचा जन्म होतो. पण हे प्रकरण जरा उलटं आहे, शब्द खोडल्यानंतर तयारी होणारी ही कविता आहे.
 
राजकीय, सांस्कृतिक दमनाच्या काळात कलेचे आणि साहित्याचे नवनवे प्रकार जन्माला येतात, अस्तित्वात असलेले उत्क्रांत होतात. अशा दमनाच्या काळात मानव, त्यांचे समूह व्यक्त होण्यासाठी नवनव्या कलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकदा का त्या समूहाला ती कला, तो साहित्य प्रकार सापडला की, तो विरोधाचा आवाज मांडण्याला नवीन अवकाश निर्माण करून देतो, तो सर्वव्यापी होते. या प्रक्रियेतून त्या कला-साहित्यालाही एक नवीन राजकीय व सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त होतं. रॅप, हिप-हॉप ही त्याची उदाहरणं म्हणून पाहता येतील. वंशविरोधी लढ्यात अाफ्रिकन कलावंतांनी केलेला या कलांचा वापर फारच परिणामकारक ठरला. कलेचा या अनुषंगाने विचार विचार करत असताना एक प्रश्न सातत्यानं विचारला जातो, कला ही राजकीय असते का? तर हो कला ही राजकीय असतेच. फक्त तो कलाप्रकार राजकीय ठरण्यासाठी काही घडामोडी घडाव्या लागतात आणि ती कला लोकांच्या अभिव्यक्तीचं महत्त्वाचं माध्यमं बनावी लागते. 
 
‘इरेझर पोयट्री’ हे त्याचं आजच्या काळातलं उदाहरण. फक्त ते आहे अमेरिकतलं. सोप्या भाषेत हा कवितेचा एक प्रकार आहे, जो गेल्या वर्षात अमेरिकेतील साहित्यिकांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय विरोधासाठी वापरला गेला. अशा कवितांनी मागच्या एक वर्षात अमेरिकेचा साहित्यिक अवकाश व्यापला आणि प्रचंड लोकप्रियताही मिळविली. तसा हा कविता प्रकार काही नवीन नाही. पूर्वीही अशा प्रकारच्या कविता लिहिल्या गेल्या. पण आता तिला राजकीय अधिष्ठान प्राप्त झालंय. ही कविता आज तिथल्या लोकांचा विरोधाचा आवाज आणि माध्यम बनली आहे.  
 
या कवितेला ‘ब्लॅकआऊट’ किंवा ‘रिडक्शन’ पोएट्री असंही म्हणतात. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असलेला शब्द लिहिल्यानंतर कवितेचा जन्म होतो. पण हे प्रकरण जरा उलटं आहे, शब्द खोडल्यानंतर तयारी होणारी ही कविता आहे. 
 
म्हणजे आधीच लिहिलेला ठराविक आशय वा मजकूर  घ्यायचा. मग तो हाताने लिहिलेला असेल किंवा छापील स्वरूपातील असेल. त्या मजकूरातील अनावश्यक शब्द खोडत जायचं आणि आपल्याला आवश्यक तेवढेच शब्द शिल्लक ठेवून कविता रचायची. ज्यातून मुळ मजकूराच्या विचारांशी असहमती दर्शविणारं मत व्यक्त होत असेल.  
 
२०१६ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्यांच्या विचारांशी आणि धोरणांची ओळख अमेरिकेतील साहित्यिकांना होतीच. निवडून आल्यानंतर स्थलांतरविरोधी निर्णय घ्यायला त्यांनी सुरूवात केली. तिथल्या संवेदनशील लेखक-कवींसाठी हा धक्काच होता. ट्रम्प यांनी शपथविधीनंतर पहिला निर्णय घेतला तो इराण, इराक, सिरिया, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याचा. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी अमेरिकेतील साहित्यिकांनी ‘इरेझर’ पोएट्रीचा आधार घेतला. आणि त्यातून ही कविता तिथल्या राजकीय विरोधासाठी मोठ्या प्रमाणात वापरायला सुरू झाली.  
 
ही कविता राजकीय वापरासाठी २००० पासून अमेरिकेत जॉर्ज बुश यांच्या धोरणांना विरोध करण्यापासून वापरली जात होती पण तिला हवी तेवढी लोकप्रियता मिळाली नाही. तिचा परिणामही तेवढा जाणवला नव्हता. १९६५ मध्ये डोरीस क्रॉक या चित्रकाराने १९१३च्या वेबस्टर डिक्सनरीमध्ये पेंटिगच्या ब्रशचा वापर करून काही शब्द खोडून कॅलिडोस्कोपीक काम तयार केलं. साहित्य आणि कलेच्या अभ्यासकांनी त्या कामाला कवितेचा एक प्रकार म्हणून नंतर जगापुढं आणलं. तर हा थोडक्यात या कवितेचा जन्माचा तिच्या राजकीय वापराचा इतिहास...   
 
‘द रम्पस’ या संकेतस्थळावरून अलीसन थूमेल हिची सहा कवितांची मालिका ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर एक महिन्यात प्रकाशित झाली. त्याबद्दल तिनं ‘द रम्पस’ या संकेतस्थळावर लिहिलं आहे. “ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर मला आणि इतर अनेक साहित्यिकांना आमच्या आणि या देशाच्या भविष्याबद्दल भीती वाटली आणि आम्हाला माहिती असलेल्या एकमेव माध्यमातून याला विरोध करायचं आम्ही ठरवलं, ते माध्यम म्हणजे लिहिण्याचं. पण त्या वेळी मी शब्दविरहित झाले होते. साहित्यिक म्हणून मी काहीच लिहू शकत नव्हते. पण सोशल मीडियावरून मला या कवितेच्या प्रकाराबद्दल माहिती झाली आणि मला माझी व्यक्त होण्याची भाषा सापडली कोणताही शब्द न लिहिता व्यक्त होण्याची साहित्यिक भाषा.” 
 
अलिसननं जे निर्माण केलं ते ऐतिहासिक होतं. ज्या शिकागो विद्यापीठात अलिसन शिकली त्याच विद्यापीठात शिकलेली ज्युलिया हांन ही आता डोनाल्ड ट्रम्प यांची विशेष सहायक म्हणून काम करते. ज्युलिया हांन ही एक्स्ट्रीम उजव्या विचारांच्या  स्थलांतरविरोधी मानसिकता तयार करणाऱ्या ‘ब्रेइटबार्ट’ या माध्यमसंस्थेत काम करत होती. तिथं तिनं स्थलांतरविरोधाची धोरण ठरवण्यात महत्त्वाची ठरलेली लेखांची मालिका लिहिली होती.  
 
 
अलिसननं हांनच्या त्याच लेखांच्या मजकुरावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर टिका करणाऱ्या ‘ऑन लॉ पास्ड’ ‘टू लेबर’ ‘ट्रोजन’ ‘स्मिअर सेशन्स’ ‘फाऊंडिंग’ ‘स्पिकर’ या इरेझर कवितांची मालिकाच लिहिली. 
त्यातील स्पीकर कविता इतरांच्या तुलनेत छोटी आहे. ती अशी... 
 
Speaker (Silent) 
[Speaker muted]
just…… 
Speaker:
attack    
[Speaker praising] [Speaker quiet] [Speaker mention] 
Tragedy 
Condolences      Victims 
[Speaker heard] : threat! 
Speaker did not respond. 
 
 
 नीना पोलारी हिनं ‘फॉर्म एन ४००’ ही कविता याच दरम्यान तयार केली. ‘एन ४०० फॉर्म’ हा अमेरिकेचा रहिवाशी होण्यासाठी भरून द्याचा फॉर्म. सरकारच्या स्थलांतरविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी तिनं याच फॉर्मचा वापर करून कविता लिहिली.   
 
 
 पोलारी हिनं फॉर्मवरचा जवळपास सर्व मजकूर काळा केला आणि फक्त दहा शब्द ठेवले. ते शब्द होते 
“Have you / been / in / total / terror?”  
कविता तिच्या वाचकांना हा प्रश्न विचारते आणि खाली पर्याय दिलेत  
“Check yes or no” 
सोलमाझ शरीफ यांची ‘लूक’ ही इरेझर कवितांची मालिकाही गंभीर राजकीय भाष्य करणारी आहे. सोलमाझ शरीफ यांनी तर तिथं निर्माण करण्यात येणाऱ्या सेन्सॉरशिपचा विरोध करण्यासाठी ग्वाट्यानामोच्या तुरूंगात कैदी असलेल्या सलीम अहमद अमदानला त्याच्या बायकोनी लिहिलेल्या पत्रांचा वापर केला आहे. 
 
 
या सगळ्यात जागतिक पातळीवर जिची कविता गाजली ती म्हणजे कोलियर नोग्यूस. कोलिअरनं लिहिलेल्या इरेझर कवितांनी अनेक पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला. तिनं जगाचा नकाशा घेतला, त्यावरचे शब्द खोडत गेली आणि शिल्लक ठेवलं ते फक्त  
The/Ground/I/Stand/On/Is/Not/My/Ground 
म्हणजे काय तर, ह्या पृथ्वीचं इथल्या जमिनीचं प्रतिक म्हणून वापरला जाणारा नकाशा खोडत तिनं सांगितलं, की ज्या जमिनीवर मी उभी आहे ती जमीन माझी नाहीच. याच नावानं प्रकाशित झालेल्या तिच्या इरेझर कवितांच्या पुस्तकात तिनं पॅसिफिक युद्धातील ऐतिहासिक पुराव्यांचा वापर केला आहे आणि त्यातील मजकुरातून कविता लिहिली आहे. या सर्व कविता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्या ट्विटरवर उपलब्ध आहेत. समजायला थोडा वेळ लागतो पण वेळ काढून वाचलात तर त्यात किती प्रचंड ताकद आहे हे समजू शकतं.  
 
 
दमनाच्या काळात कलाकार – साहित्यिक त्यांच्या व्यक्त होण्याचे नवनवे मार्ग शोधत असतात. हे मार्ग स्वीकारण्याची किंमतही त्यांना चुकवावी लागते. पण त्यातून निर्माण झालेला विरोध हा बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त गतीनं सरकारी अहंकारांची हुकूमशाही वृत्तीचे बुरूज उद्ध्वस्त करू शकतो. धोरण बदलवण्यास भाग पाडू शकतो. दमनाच्या काळात कला कधीच मनोरंजनाचं साधन असू शकत नाही आणि अर्थात कला ही शेवटी राजकीयच असते. इरझेर पोएट्रीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या उदयानं राजकीय अधिष्ठान प्राप्त झाल आहेच, पण अमेरिकेतील साहित्यिकांनी त्यांची आजच्या काळात विरोध व्यक्त करण्याचं साहित्यदेखील शोधून काढलं आहे.  
 
- अभिषेक भोसले ( लेखक औरंगाबाद येथील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पत्रकारिता विषयाचे सहायक प्राध्यापक आहेत.
लेखकाचा संपर्क : 9421375083  )  
bhosaleabhi90@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...