आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे अप्रकाशित टिपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे साक्षेपी अभ्यासक प्रा. गो. मा. पवार यांच्या संग्रहातून नुकतेच महर्षींचे एक अप्रकाशित टिपण प्राप्त झाले आहे. १२ ऑगस्ट १९३६ रोजी पुणे येथील ‘ऐक्य संवर्धन मंडळा’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त सभेचे अध्यक्ष म्हणून शिंदे यांनी त्यांच्या भाषणापूर्वी काही मुद्द्यांचे टिपण काढले होते. २ जानेवारी हा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा स्मृतिदिन. त्या औचित्यनिमित्ताने महर्षी शिंदे यांच्या टिपणाचा हा सारांश... 


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना आपण ओळखतो ते कर्ते समाजसुधारक, विचारवंत आणि ब्राह्मधर्म प्रसारक म्हणून. ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळ’ ही संस्था स्थापून त्यांनी भारतभर अस्पृश्यता चळवळीचे व समाज जागृतीचे काम केले. शेती प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न ते राष्ट्रीय चळवळीत धडाडीने सहभाग घेतला व त्यासंबंधी मूलभूत स्वरूपाची मांडणी केली. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासावर त्यांच्या समाजकार्याचा आणि दृष्टीचा खोलवर ठसा उमटलेला आहे. शिंदे यांनी त्यांच्या अखंड समाजकार्यव्याप्त काळात मौलिक असे लेखन केले. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा समाजशात्रीय ग्रंथ, ‘आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र तसेच रोजनिशी व प्रवासवर्णनपर लेखनातून त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमनाचा आणि समाजचिंतनाचा भरघोस असा आविष्कार झाला आहे. आपल्या आयुष्याच्या उत्तरकाळात ब्राह्मसमाज, कौटुंबिक उपासना व पुणे येथील शिवाजी शाळेत उदारमतवादी विचारांवर ते व्याख्याने, कीर्तने व प्रवचने देत. 


या ठिकाणी महर्षी शिंदे यांचे एक अप्रकाशित टिपण प्रसिद्ध करीत आहोत. १९३० नंतरचा शिंदे यांच्या उत्तरायुष्याचा काळ हा दगदगीचा गेला. मधुमेहाच्या आजाराने ते त्रस्त होते. सार्वजनिक कार्यातून काहीसे अलिप्त झाले होते. मात्र या काळात पुण्यातील समाजकार्यात ते सहभागी होत असत. १२ ऑगस्ट १९३६ रोजी पुणे येथील ‘ऐक्य संवर्धन मंडळा’च्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त म्युन्सिपाल्टी सभागृहात संध्याकाळी सहा वाजता एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्ष म्हणून शिंदे यांनी केलेल्या भाषणाचा सारांश या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत. या भाषणासाठी त्यांनी मुद्द्यांचे एक टिपण लिहिले होते. या संक्षिप्त टिपणाधारे त्यांनी त्या वेळी विस्तृत भाषण दिलेले असावे. या भाषणात त्यांनी पुणे शहराच्या त्यावेळच्या स्थितीबद्दलचे व नागरी समाजाबद्दलचे मिश्कील स्वरूपाचे भाष्य मांडले आहे. तसेच परंपरा आणि आधुनिकतेतील अंतविर्रोधाचे पेच त्यांनी नमुद केले आहेत. पुणे शहराच्या नागरिक दृष्टीबद्दल व संस्थात्मक कामाच्या उभारणीबद्दलचा विचार भाषणात आहे. पुणे शहराची वाढ भविष्यात कोणत्या दिशांनी होणार आहे त्याची सूचनाच या भाषणात आहे. तसेच पुणे शहराचे समाजशास्त्रीय वर्णनही या टिपणात आहे. शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वातील मिश्किलपणाचा भावही त्यामध्ये आहे. पुण्याच्या नागरी समाजाच्या स्वभावरंगाची झलकच या भाषणात पाहायला मिळते. महर्षी शिंदे भाषेचा नेमका आणि अर्थवाही वापर करत. शिंदे यांच्या विचारातील भविष्यदर्शीपणाचा प्रत्यय प्रस्तुत टिपणातून येतो. या टिपणास शीर्षक नव्हते.ते नव्याने सोयीसाठी योजिले आहे. प्रस्तुत टिपण महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे साक्षेपी अभ्यासक प्रा. गो. मा. पवार यांच्या संग्रहातून प्राप्त झाले आहे.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पुणे पेन्शनर लोकांचे गाव... 


- डॉ. रणधीर शिंदे 
randhirshinde76@gmail.com

बातम्या आणखी आहेत...