आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहजीबी भाषेचा गंगाजमनी जश्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उर्दू है जिसका नाम, हमी जानते है दाग, सारे जहां में धूम हमारे जबां की है’ या शेराची प्रचिती देणारा सर्वांसाठी खुला आणि विनाशुल्क असलेला जश्ने रेख्ता या भाषा महोत्सवाचं हे चौथं वर्ष होतं. दिल्लीत झालेला जश्ने रेख्ता अक्षरश: जगभरातल्या उर्दूप्रेमींनी ओसंडून वाहत होता. त्याचा हा आँखों देखा हाल... 


‘मुस्लिम असूनही मराठी किती छान बोलतेस!’ असं तथाकथित कौतुक माझ्या अनेक मुस्लिम मित्रमैत्रिणींना व्हावं लागलंय. तुम्ही मुस्लिम, म्हणजे तुमची मातृभाषा उर्दू. मराठी फारफारतर तोडकंमोडकं येत असावं असं यांच्याबाबतचं गृहीतक. हे असं धार्मिक निकषांवर भाषिक ओळख जोखणं दुखावून जायचं त्यांना, मलाही. मग याचा व्यत्यास काय, की मराठीची मिरास मिरवायची ती फक्त गैरमुस्लिमांनी. आणि उर्दू म्हणजे ‘मुसलमानी भाषा’ या दोन्ही सनातनी समाजांना छेद देणाऱ्या गोष्टी म्हणजे, महाराष्ट्रात होणारं ‘मुस्लिम मराठी साहित्य संमेलन’ आणि दिल्लीत होणारा ‘जश्ने रेख्ता’. 


‘उर्दू है जिसका नाम, हमी जानते है दाग, सारे जहां में धूम हमारे जबां की है’ असं ज्यांनी बेलाशक जाहीर केलं ते होते जनाब दाग देहलवी. सर्वांसाठी खुला आणि विनाशुल्क असलेला जश्ने रेख्ता हा याच शेराची प्रचीती देणारा भाषा महोत्सव. हे या उत्सवाचं चौथं वर्ष होतं. यंदा आठ ते दहा डिसेंबर या कालावधीत दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेला जश्ने रेख्ता अक्षरश: जगभरातल्या उर्दूप्रेमींनी ओसंडून वाहत होता. बरेच मराठी तरुणही तिथे भेटले. नजरेत भरली ती तरुणांची संख्या. खुल्या मंचावर कविता सादर करण्यापासून ते हरेक कार्यक्रमाला भरभरून दाद देणाऱ्या गर्दीचं तरुण वय सुखावणारं आणि उर्दूच्या सुरक्षित भविष्याबद्दल आश्वस्त करणारं होतं. गंभीर परिसंवाद, मुलाखती, मुशायरा, बैतबाजी, कव्वाली आणि सुफी संगीताची मैफल अशा हरेक प्रकारांतून उर्दूची नजाकत आणि बेमिसाल सौंदर्य तीन दिवस ओसंडत राहिलं. पंच्याहत्तरहून अधिक विशेष निमंत्रित असल्याने एकाच वेळी चार मंचांवर वेगवेगळे कार्यक्रम सुरू होते. ते मंच म्हणजे, ‘महफिल-खाना’, ‘बज्मे खयाल’, ‘दयारे इजहार’ आणि कुंज-ए-सुखन’. तीन दिवसात जवळपास लाखभर लोकांनी उत्सवाला भेट दिली. 


पहिल्या दिवशी सायंकाळी या उत्सवाचं उद््घाटन केलं ते प्रख्यात गायक पं. जसराज आणि अभिनेत्री वहिदा रहमान यांनी. सोबतच या उत्सवाचे आयोजक असलेले आयआयटीएन उद्योजक संजीव सराफ होते. मूळ नागपूरचे असलेल्या सराफ यांनी आपल्या मनोगतातून जश्ने रेख्ताचा उगम आणि प्रवास मांडला. ते म्हणाले, ‘मला अगदी ना कळत्या वयापासूनच उर्दू शायरी-अफसाने यांनी मोह घातला. माझ्या मना-मेंदूचा कब्जाच घेतला! पुढं वयाबरोबर हे वेड वाढतच गेलं. ११ जानेवारी २०१३ ला जश्ने रेख्ताचं संकेतस्थळ सुरू झालं. तिला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हमें महसूस हुआ के लफ्ज महज शक्ल नही आवाज भी है. बलकी बनने से पहले आवाज है. इस आवाज में रस होता है और रोशनी भी, खुशबू होती है और जायका भी. उर्दू सिर्फ एक जबान नही, एक पुरी तहजीब है. जिने का एक अंदाज है. उर्दू के चाहनेवाले उस अंदाज को पुरी तरह जी सके इसीलिये हमने रेख्ता फाउंडेशनके माध्यमसे जश्ने रेख्ता का आगाज किया.’ 


लेखक सअादत हसन मंटो यांच्या वादळी लिखाण आणि जगण्यावर बनलेला ‘मंटो’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यासंदर्भाने दुसऱ्या दिवशी ‘मंटो से रूबरू’ होण्यासाठी आले होते दिग्दर्शक नंदिता दास आणि सिनेमात मंटो बनलेला अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी. मंटो आणि त्याच्या कथा कायमच जवळच्या वाटत आल्याचं सांगत नंदिता म्हणाल्या, ‘लेखक म्हणून मंटोनं त्याच्या कथांमध्ये समाजाचं विद्रूप वास्तव मांडलं. आजच्या काळाकडे पाहताना वाटतं की, आजतरी समाज फारसा कुठं बदललाय? तेच प्रश्न नव्या रुपात समोर उभे आहेत. वाटलं, मंटोचा हात धरून त्यांचा सामना करता येईल. म्हणून हा सिनेमा केला. त्यासाठी बरेच दिवस लाहोरला मंटोच्या घरी त्यांच्या मुलीसोबत जाऊन राहिले. फिल्म वही अच्छी होती है जो दिल और दिमाग को एकसाथ झिंझोड के रख दे. पर देखते वक्त इन्सान को पताही न चले के वो दिल से सोंच रहा है या दिमाग से... मेरी कोशिश ऐसीही फिल्म बनाने की रही.’ नवाज म्हणाला, ‘मंटोला साकारताना त्याचा ‘लूक’ सहज मिळाला. पण त्या काळात काय प्रकारचा विचार तो वागवत असेल हे समजून घेणं कमालीचं आव्हानात्मक होतं. अभिनयातून त्याला साकारताना मी एवढा मंटोमय झालो, की मला खरं बोलायची लत लागली. आता मागे घेतलेल्या आत्मचरित्रात मी इतकं खरं बोलून बसलो, की ते वाचून लोकांनी मला फैलावर घेतलं. माझ्यातला मंटो आता लवकरात लवकर बाहेर काढायचाय मला!’ 


‘मुस्लिम सामाजिक चित्रपट आणि उर्दू’ या सत्रात प्रगल्भ अभिनेत्री वहिदा रहमान, शबाना आझमी, जाणते दिग्दर्शक मुजफ्फर अली यांना इरा भास्कर यांनी बोलतं केलं. ‘चौदहवी का चांद’सिनेमाच्या आठवणी जगावताना वहिदाजींनी सेन्सॉर बोर्डाच्या सनातनी वागण्याचे किस्से सांगितले. मुजफ्फरजींनी ‘उमराव जान’ सिनेमाचा काळ उभा केला. सिनेमांमध्ये उर्दूचा वापर करणं मी सत्यजित रे यांच्याकडून शिकलो अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘सत्यजित रे त्यांच्या सिनेमांमध्ये बंगाली भाषा आणि संस्कृती ज्या पद्धतीने पेश करायचे ते पाहून मला वाटलं, हे असं आपण हिंदी सिनेमामध्ये उर्दूबाबत केलं पाहिजे. उर्दू अदब, उर्दू शायरी खुबीदारपणे समाजासमोर आणावी अशी तीव्र इच्छा झाली. मी अलिगढलाही राहिलो. त्या दिवसांनी खूप शिकवलं. खोल वेदना जागवणारी शायरी तिथं भेटली. या शहरानं दिलेला ऐवज घेऊनच मी ‘गमन’, ‘अंजुमन’सारख्या सिनेमात व्यक्त झालो. ‘उमराव जान’ ही तर जणू पटकथेतून अवतरलेली गझलच! शायर शहरयार दीड वर्ष माझ्या सोबत राहिले. ’ 


शबानाजी बोलल्या, ‘माझा जन्म हैद्राबादचा. लखनऊ, आझमगढलाही राहिले. तिथं उर्दू तहजीब शिकले उर्दूतला अंदाजे बयां केवळ लाजवाब आहे. ‘खिलना कली ने कम कम सिखा, तेरी आखों की नीम ख्वाबीसे’ यात जे सौंदर्य आहे, ते कसं कुठल्या भाषेत अनुवादित करणार? आणि भाषेचा संबंध धर्माशी नसतो. ती तर संस्कृतीचा भाग असते. फाळणीनंतर आपण सगळ्यांनी उर्दूवर खूप अन्याय केला. आणि गंमत काय, की जोवर तुम्हाला ती ऐकताना कळत राहते, तुम्ही तिला ‘हिंदुस्तानी’ म्हणता. पण जशी ती समजत नाही, तुमच्यासाठी लगेच उर्दू बनते. ये तो नाइन्साफी है!’ या संवादाच्या अखेरीस मुजफ्फर अलींनी एक महत्त्वाचं आवाहन केलं, ‘डोंट बी कंझ्युमर्स ऑफ उर्दू, बी क्रिएटर्स इन उर्दू!’

 
मंटोनंतरच्या सत्रात ख्यातनाम निवेदक आणि अभिनेते अन्नू कपूर यांनी आपल्या जिंदादिल शैली आणि शब्दसुरांनी सगळा माहोल खुशनुमा केला. बाजूच्या मंचावर खास पुण्याहून निमंत्रित ‘टीम सुखन’च्या मराठी कलावंतांनाही रेख्तारसिकांनी दिलखुलास दाद दिली. सुखन ही उर्दू नज्म-शायरी, गायकी आणि अफसाने यांची वेधक पेशकश. जावेद अख्तर यांना ‘कुछ इश्क किया कुछ काम किया’ या मुलाखतीत शबाना आझमी यांच्यासोबतच्या सहजीवनापासून ते आजच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवरही धारदार भाष्य केलं. अतिका अहमद फारुकी यांनी त्यांना बोलतं केलं. ‘हम दोनोंकी दोस्ती इतनी गहरी और मजबूत है के शादीभी उसका कुछ नही बिगाड सकी’ त्यांच्या ‘नया हुक्मनामा’ या नज्मनं ‘मुकर्रर’ची दाद मिळवली. इम्तियाज अली यांनी भगवद्गीतेच्या उर्दू अनुवादातले काही निवडक श्लोक वाचत त्यावर सुरेख भाष्य केलं. स्वत:च्या जगण्यातले प्रसंग समांतरपणे समोर ठेवत त्यांनी गीतेतल्या तत्वज्ञानाची त्यासोबत गुंफण घातली. 

 
तिन्ही दिवस वाजणारं रेख्ताचं आशयघन थीम सॉँग ‘सर चढ के बोलता है उर्दू जबां का जादू, हिंदोस्तां का जादू...’ सगळ्यांच्याच ओठावर खेळत राहिलं. राजकमल, वाणी, साहित्य अकादमीसह अनेक मोठ्या प्रकाशनांचे बुक स्टॉल्स गर्दी खेचत होते. मैदानात एक चित्रकार जश्ने रेख्ताचा जिवंत माहोल आपल्या कॅनव्हासवर चितारत होता. त्याच्याभोवती गराडा घालून लोक मंत्रमुग्ध होऊन त्याला पाहत होते. मैदानात ठिकठीकाणी अहमद फराज, फिराक गोरखपुरी, फैज अहमद फैज अशा शायरांच्या पेंटीग्ज त्यांच्या शायरीसह लावलेल्या होत्या. उर्दू कॅलिग्राफीच्या विभागासामोराची गर्दी हटतच नव्हती. ‘ऐवान-ए-जायका’ मध्ये असलेल्या फूड स्टॉल्सवरचा अफगाणी, रामपुरी, मुगलाई, अवधी असा हरतऱ्हेचा खाना उत्सवाचा जायका वाढवत गेला. एके दिवशी मला या उत्सवात एक पाकिस्तानी मैत्रीण मिळाली. निदा तिचं नाव. ती म्हणाली, ‘फाळणीनंतर फक्त माणसंच दुरावली नाहीत एकमेकांपासून. एक मोठी भाषिक श्रीमंतीही आपण गमावली. जन्मापासून परस्परांविषयी गैरसमज, द्वेष घेऊनच मोठे होतो आपण दोन्हीकडचे लोक. उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा असली तरी तिकडं तिची अवस्था फार काही आदर्श नाही. इथं मात्र उर्दूच्या या मेळ्याला मिळणारा भरभरून प्रतिसाद मला खूप आश्वस्त करतो.’ 


उत्सवात कुणीतरी बोललं, की ‘उर्दू हिंदुस्तान की मेहमान नही है, हिंदुस्तान उर्दू का मकान है.’ उर्दूच्या या घरात राहणं तुमच्या-माझ्यासारख्या हिंदुस्तानी लोकांनाही दिवसेंदिवस अधिक माणूस बनवत जाईल यात शंका नाही. गंगा-जमनी तहजीबीची अमिरी उजळणारा ‘जश्ने रेख्ता’चा मानवी मंच असाच आबाद रहावा, अजून काय?  


उर्दूची ‘प्रॅक्टिकल’ सेवा!
rekhta.org हा पूर्णत: नि:शुल्क असलेला उर्दूचा खजिना. सात हजारांहून अधिक दृकश्राव्य स्वरूपातील मैफली-परिसंवाद, दीड हजार शायरांचे कलाम, ३४ हजार इ-बुक्स असं सगळं या संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे. उर्दू शायरी इथं उर्दूशिवाय खास देवनागरी आणि रोमन लिपीतही शायरांचे दिवाण वाचायला मिळतात. वाचताना एखादा शब्द अडला तर त्यावर क्लिक केल्यानंतर लगेचच त्याचा अर्थ तिथं कळण्याची सोय आहे. रेख्तानं तयार केलेला ऑनलाइन उर्दू लर्निंग कोर्स आहे. तब्बल १३ हजार लोक या कोर्सच्या मदतीनं आजवर उर्दू शिकलेत. शिवाय नव्या ताकदीच्या शायरांची पुस्तकंही रेख्ता पब्लिकेशन प्रकाशित करत आहे. 


- शर्मिष्ठा मीना शशांक भोसले, लेखिकेचा संपर्क - ८३८००९७४९१
sharmishtha.2011@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...