Home | Magazine | Rasik | Abhijeet deshpande write on watching actions

कोऱ्या नजरेचा चकवा

प्रा. अभिजित देशपांडे | Update - Jun 03, 2018, 01:00 AM IST

आपण खरोखरीच कोऱ्या नजरेने हे जग पाहू शकतो का? तर मुळीच नाही. पाहण्याच्या क्रियेत अनेकानेक सामाजिक-सांस्कृतिक-व्यक्तिगत ग

 • Abhijeet deshpande write on watching actions

  आपण खरोखरीच कोऱ्या नजरेने हे जग पाहू शकतो का? तर मुळीच नाही. पाहण्याच्या क्रियेत अनेकानेक सामाजिक-सांस्कृतिक-व्यक्तिगत गोष्टी मिसळलेल्या असतात. पाहण्याच्या क्रियेत आपण कोरे असत नाही. असू शकत नाही...

  असे म्हटले जाते की, The Innocent Eye is Blind, The Virgin Mind is Empty. आणि ते खरेही आहे. अज्ञानी लोकांबद्दल संत ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात - मोराच्या अंगी आसोसे । पिसे आहाती डोळसे ।। परी एकली दिठी नसे । तैसे ते गा ।। मोराच्या सुंदर पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात, पण दृष्टी नसते, तसेच अज्ञ जनांबाबत म्हणता येईल. डोळे असणे म्हणजे, दृष्टी असणे नव्हे. दृष्टीचा संबंध आपण ज्ञानाशी जोडतो. दूरदृष्टी, दिव्यदृष्टी, या शब्दांतून देखील हेच सूचित होते.


  प्रख्यात ग्रीक विचारवंत अॅरिस्टॉटल म्हणाला होता, Of all the senses, trust only the sense of SIGHT. वाचलेल्या वा ऐकलेल्या गोष्टींपेक्षा साक्षात डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर आपला अधिक विश्वास असतो. डोळ्यांवर आपण किती विसंबून असतो, याचा हा पुरावाच मानता येईल. चित्रपट या कलेचे भाष्यकार रूडॉल्फ अर्नेहिम तर म्हणतात की, Vision is the primary Medium of Thought. म्हणूनच दिसण्या-पाहण्याचे हे व्याकरण समजून घेतले पाहिजे.


  दिसणे आणि पाहणे ही वास्तविक एकच क्रिया सूचित करणारी, पण भिन्न अर्थच्छटांची क्रियापदे आहेत. दिसणं ही एक निरपेक्ष, नैसर्गिक-जैविक क्रिया आहे. तर पाहणं ही सापेक्ष, सांस्कृतिक क्रिया आहे. दिसणं या शब्दातून आपोआप दृश्यमान होणं सुचित होतं, तर पाहणं या क्रियेत कर्त्याचं सक्रीय असणं अपेक्षित आहे. दिसण्याच्या या क्रियेत मेंदू हा अवयव येत असल्याने आणि या क्रियेत त्याचा मोठाच हस्तक्षेप असल्याने दिसणं, ही गोष्ट वस्तुनिष्ठ राहत नाही, ती सापेक्ष बनते. त्यालाच आपण ‘पाहणं’ असं म्हणतो.


  अकबर - बिरबलाची एक गोष्ट सांगितली जाते. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, आपल्या राज्यात आंधळे किती? बिरबलाने उत्तर दिले, सगळेच. अकबराला राग आला, म्हणजे मीही आंधळा की काय? बिरबल म्हणाला, वेळ आल्यावर सिद्ध करून दाखवीन, महाराज. आणि तशी वेळ लवकरच आली. एकदा फेरफटका मारत शहेनशहा अकबर बिरबलाच्या घराशी आला. दुपारच्या थंडगार हवेत बिरबल घराबाहेर झाडाखाली खाटेवर पहुडला होता. अकबराच्या अशा अचानक येण्याने बिरबलाची झोपमोडच झाली. खाटेवर टेकत अकबराने विचारले, काय बिरबला, काय चाललंय? तत्क्षणी बिरबल म्हणाला, महाराज, बघा, डोळे असूनही तुम्ही आंधळेच नाही का? अकबर पुरता खजील झाला. यातला औपचारिक प्रश्नाचा नि सांस्कृतिक सवयीचा भाग अलाहिदा, पण समोर दिसणारी-दिसू शकणारी, प्रत्येकच गोष्ट आपण पाहतो असे नाही.


  पाहण्यात एक प्रकारची जाणीवपूर्वकता असते. अवधान असते. निरीक्षण असते. विशिष्टता असते. उद्देश असतो. (आणि म्हणून) निवड असते. म्हणजेच पर्यायाने (दिसण्यातल्या) काही घटकांना वगळणे असते. दिसण्यातली स्वाभाविकता इथे नसते.जैविक घटकांबरोबरच तुमची मनःस्थिती, परिस्थिती, हेतू... या आणि अशा काही घटकांवर तुमचे पाहणे अवलंबून असते.


  The more you KNOW, the more you can SEE.
  जेवढे तुमचे ज्ञान अधिक, तेवढे तुमचे पाहणे अधिक व्यापक.
  + ही खूण एखाद्या अशिक्षित खेडूतासाठी निरर्थक असेल, पण तुमच्या माझ्यासाठी ते बेरजेचे चिन्ह आहे. ते पांढऱ्यावर लाल रंगात असेल, तर ती वैद्यकीय खूण ठरेल-रेड क्रॉस. खालची रेषा अधिक लांबुडकी असेल, तर तो ख्रिश्चन धर्मियांचा होली क्रॉस ठरेल. कदाचित येशू ख्रिस्ताला सूळावर चढवण्याची प्रतिमा व कथाही तुमच्या डोळ्यासमोर येईल. जेवढे तुमचे ज्ञान अधिक, तेवढे तुमचे पाहणे अधिक व्यापक. पण एवढेच नाही. प्रत्येक ठिकाणी संदर्भानुसार अर्थ बदलला आहे. हा अर्थ आधीच कुणीतरी निश्चित केलेला आहे. तो मी लावलेला अर्थ नाही. एकतर हे विविध अर्थ माहिती असायला हवेत, आणि संदर्भानुसार त्यातला योग्य अर्थ कोणता हे ठरविण्याची समजही असायला हवी. ज्ञानाबरोबरच सारासार विवेकही हवा.


  वेरूळच्या लेण्यांमध्ये एक शिव-पार्वतीची शिल्पाकृती आहे. दोघे सारीपाटाचा डाव मांडून बसलेले आहेत. सोंगट्या इतस्ततः विखुरलेल्या आहेत. (म्हणजेच डाव संपलेला असावा) पार्वती प्रसन्नमुद्रेत आहे, तर शंकर केविलवाण्या चेहऱ्याने एक बोट वर करून पार्वतीला जणू काही सांगतो आहे. मुद्रेवरून तरी शंकर सारीपाटाचा डाव हरला असावा, असे अनुमान करता येते. मग तो पार्वतीला काय बरे सांगत असेल? एका प्रवादानुसार, शंकर पार्वतीला आणखी एक डाव खेळण्याची (संधी दे अशी) विनंती करतो आहे. तर दुसऱ्या एका मतानुसार, तो म्हणतो आहे, तू जिंकलीस काय किंवा मी जिंकलो काय, एकच. त्या एका बोटाचा हा अर्थही संभवतो. अद्वैत तत्त्वज्ञानाला हा अर्थ साजेसाही आहे. ‘शिव-शक्तीसमावेशनम्’ हे अद्वैत तत्त्वज्ञानाचे एक संभाषित आहेच. पाहण्याच्या क्रियेत अर्थ लावणेही अंतर्भूत असते. अर्थनिर्णयनाचे एक टोक असे व्यापक सांस्कृतिकतेला,तत्त्वज्ञानाला भिडणारे असते, असू शकते.


  एका प्रसिद्ध चित्रकाराची गोष्ट (मी तर ती अगदी पिकासोच्या नावावरही ऐकली आहे)सांगितली जाते. तो विख्यात होण्यापूर्वी त्याचे एक प्रदर्शन भरले होते. चेहऱ्याने कुणीच त्याला फारसे ओळखत नव्हते. पण त्याच्या चित्रकलेची सर्वत्र वाहवा मात्र सुरू झाली होती. त्या प्रदर्शनात एका चित्रासमोर उभे राहून मित्रांची एक जोडगोळी ते चित्र न्याहाळत होती. हॅ, हे काय चित्र आहे, अशी काहीशी आपापसांत प्रतिक्रिया देऊन ती जोडी पुढच्या चित्राकडे सरकली. चित्रकार नेमका त्यांच्या मागेच उभा होता, त्याने या मित्रद्वयांना विचारले, तुम्ही जर्मन भाषा जाणता का? मित्र म्हणाले, नाही. मग जपानी भाषा तुम्हाला येते का? त्यालाही मित्रांनी नकार दिला. मग निदान इटालियन तरी येते का? तीही येत नाही, मित्रांनी सांगितले. मग जर्मन, जपानीज आणि इटालियन यातली कुठली भाषा चांगली? चित्रकाराने त्यांना विचारले. या पूर्णतः असयुक्तिक वाटणाऱ्या प्रश्नांमुळे आता मात्र ते मित्र चांगलेच वैतागले. म्हणाले, हे बघा महाशय, आम्हाला यापैकी कुठलीच भाषा येत नाही, मग त्यातली कुठली चांगली, कुठली श्रेष्ठ, हे कसे सांगणार? त्यावर चित्रकार शांतपणे म्हणाला, पण मग तुम्हाला चित्रकलेची भाषा तरी येते का? चित्राला वाईट ठरवायलाही काही हरकत नाही, पण ते चित्रभाषेच्या निकषांना अनुसरून आहे असे वाटते का? व्यक्तिगत आवड-निवड असतेच, पण तुम्ही जी आधीच्या चित्राला प्रतिक्रिया दिलीत, ती चित्रभाषेच्या निकषांना अनुसरून नव्हती, एवढेच मला म्हणावयाचे आहे.


  अर्थनिर्णयन ही गोष्ट मूलतः भाषिक आहे. मानवी भाव-विचारविश्वच मुळात भाषाधिष्ठीत आहे. आणि भाषा ही संस्कृतीचे एक अभिन्न अंग असते. त्यामुळे आपला भोवताल आपण विशिष्ट भाषिक/सांस्कृतिक अर्थाच्या चष्म्यातूनच पाहत असतो. अमूर्त, आपल्या भावविश्वात वा भाषिक/सांस्कृतिकविश्वात नसणारी किंवा अनुपस्थितअसणारी गोष्ट (ती दृश्यमान असूनही) त्यामुळे आपण पाहूही शकत नाही. निर्भाषिक, चिन्हरहीत, संस्कृतिनिरपेक्ष, निव्वळ दृश्यमान , मानवी अर्थ-निरर्थाच्या चौकटीत न मावणारे, त्यापासून अलिप्त..असे निव्वळ दिसणे असे जवळपास नसतेच. जे असते ते वर उल्लेख केल्याप्रमाणे संस्कारीत, चिन्हयुक्त(चिन्हांची म्हणून स्वतंत्र भाषा असते. नव्हे, चिन्हशास्त्र (सिमिऑटिक्स) असा विषय विद्यापीठांतून शिकवला जातो. इटलीच्या बोलोना विद्यापीठात प्रसिद्ध तत्वज्ञ, इतिहासकार उर्बेतो इको हा चिन्हशास्त्राचा प्राध्यापक होता. सांस्कृतिक चिन्हांच्या तळाशी जात संस्कृतीच्या ठेकेदारांच्या दाव्यांना सुरुंग लावण्यात त्याचा हातखंडा होता - संदर्भ : सा. साधना २०१६), पूर्वग्रहाधिष्ठित पाहणे.


  पाहण्याची क्रिया शिकता येते. शिकवता येते. ती सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात संस्कारीत व पूर्वग्रहाधिष्ठीत झालेली असते. तिला व्यक्तिगत आकलन व अनुभवाचे परिमाणही असते. पाहण्याऱ्याची उद्दिष्टे, भूमिका यावरही ती बरीचशी अवलंबून असते. पाहण्याची क्रिया ही अशी कितीतरी घटकांवर बेतलेली असते. वरचे विधान पुनरूद्धृत करायला हरकत नाही, The more you KNOW, the more you can SEE. जेवढी तुमचे जाण अधिक, तेवढे तुमचे पाहणे अधिक व्यापक.

  - प्रा. अभिजित देशपांडे
  abhimedh@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९८१९५७४०५०

 • Abhijeet deshpande write on watching actions

Trending