Home | Magazine | Rasik | Abhijit Deshpande write on Indian cinemas

आपल्या कॅमेऱ्यातून जग...जगाच्या कॅमेऱ्यातून आपण!

प्रा. अभिजित देशपांडे | Update - May 13, 2018, 02:00 AM IST

मे १९१२ मध्ये दादासाहेब तोरण्यांचा ‘भक्त पुंडलिक’ आणि मे १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटांन

 • Abhijit Deshpande write on Indian cinemas

  मे १९१२ मध्ये दादासाहेब तोरण्यांचा ‘भक्त पुंडलिक’ आणि मे १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा पाया रचला. त्यानंतर मागील १०५ वर्षांत भारतीय चित्रपट इतका विस्तारला की, आजमितीला भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट बनवणारा आणि चित्रपट पाहणारा देश बनला आहे. परंतु, व्यामिश्र संस्कृतीचा देश असल्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टी ही संकल्पनादेखील तशीच व्यापक आणि गुंतागुंतीची ठरली आहे..

  ‘नॅशनल सिनेमा’ ही संकल्पना फिल्म स्टडिजमध्ये तुलनेने अगदी अलिकडची. १९८० च्या दशकात वापरली जाऊ लागली. तोवर ‘वर्ल्ड सिनेमा’ ही संकल्पना अधिक ठळकपणे प्रचलित होती. त्याचा वास्तविक अर्थ जगभरचा, विविध देशांमधला सिनेमा. पण हॉलिवूडबाहेरचा सिनेमा याच मर्यादित अर्थाने नॅशनल सिनेमा ही संकल्पना वापरली जात होती. १९८९ मध्ये अॅण्ड्रयू हिगसन (Andrew Higson) यांनी नॅशनल सिनेमा या संकल्पनेचा स्वतंत्रपणे विचार आरंभला. त्या-त्या देशातले सिनेमाचे स्वतंत्र अर्थकारण, इतिहास, सिनेमा संस्कृती, सिनेमातील प्रवाह, सिनेमाच्या जातकुळी व शैली, सिनेमाची संस्कृतिविशिष्ट आशय-विषय दृष्टी, लोकांच्या सिनेमाकडून अपेक्षा आणि त्यांची सिनेमाची अनुभव घेण्याची संस्कृतिविशिष्ट पद्धती.

  थोडक्यात, सिनेमाकर्मी, सिनेमा आणि प्रेक्षक या सर्वांतून प्रतीत होणारे, त्या देशाचे चरित्र आणि चारित्र्य यांना व्यापणारी ही संकल्पना आहे. यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘ए नेशन डज नॉट एक्स्प्रेस इटसेल्फ थ्रू कल्चर, इट इज कल्चर दॅट प्रोड्यूस द नेशन’. म्हणजेच, जिथे जिथे म्हणून चित्रपटसंस्कृती ठळकपणे विकसित झाली, त्या त्या देशाचा विशिष्ट सिनेमा... फ्रेंच, ब्रिटिश, जर्मन, रशियन, इटालियन सिनेमाचा, त्याच्या स्वरूप-संदर्भ-वैशिष्ट्यांचा. असा स्वतंत्रपणे विचार करता येईल.


  मे १९१२ मध्ये दादासाहेब तोरण्यांचा ‘भक्त पुंडलिक’ आणि मे १९१३ मध्ये दादासाहेब फाळक्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा पाया रचला. मागील १०५ वर्षांत भारतीय चित्रपट विलक्षण विस्तारला आहे. आता भारत हा जगात सर्वाधिक चित्रपटनिर्मिती करणारा देश आहे. २००७ मध्ये तर जगभरात सुमारे २४०० चित्रपट बनले, त्यापैकी ११६४ चित्रपट भारतातले होते. मागील २-३ वर्षांत १२०० ते १३०० पर्यंत ही संख्या पोहोचली आहे. सातत्याने वाढतेच आहे. इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या या चित्रपटांचे नेमके स्वरूप सांगणे म्हणूनच अवघड आहे.


  इतर कुठल्याही देशाच्या सिनेमाची वैशिष्ट्ये, ज्या प्रकारे व ज्या निकषांआधारे दाखवता येतील, तसे भारतीय चित्रपटांबद्दल करता येणार नाही. भारत हा एक व्यामिश्र संस्कृती असलेला. अनेकविध धर्म-जाति-भाषा-प्रांत असलेला हा देश आहे. अनेकविध सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक-कलापरंपरांच्या प्रभावातून भारतीय चित्रपटसृष्टी आकाराला आलेली आहे. नवनवे प्रभाव पचवत-रिचवत ती घडतेच आहे. म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टी ही संकल्पना एकरेषीय, एकजिनसी नव्हे, तर व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी विवेचनाच्या सोयीसाठी पुढीलप्रमाणे, काही एक वर्गीकरण करता येणे शक्य आहे.

  * व्यावसायिक-लोकप्रिय हिंदी चित्रपट अर्थात बॉलिवूड
  हा भारतीय चित्रपटातला मुख्य, मध्यवर्ती प्रवाह आहे. पण फक्त तो म्हणजेच भारतीय सिनेमा नव्हे. परदेशी चष्म्यातून हिंदी चित्रपटसृष्टीलाच भारतीय चित्रपट मानले जाते. व्यावसायिक-लोकप्रिय हिंदी चित्रपटांना सर्वसाधारणपणे ‘बॉलिवूड’ या नावाने देखील ओळखले जाते. अमेरिकेतील हॉलिवूडच्या धर्तीवर बॉम्बे हॉलिवूड म्हणून ‘बॉलिवूड’ हा शब्द १९८०च्या दशकापासून वापरला जाऊ लागला. काहींना तो त्याचमुळे पटतही नाही. पटो अथवा न पटो, बॉलिवूड हा शब्द मागील तीस-पस्तीस वर्षांत जगभर रूढ झालाय. बॉलिवूडची ठळक वैशिष्ट्ये साधारणपणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. बिग बजेट, बिग स्टार्स आणि बिग एन्टरटेनमेन्ट व्हॅल्यू असणारे हे चित्रपट असतात. (अलिकडच्याच एका चित्रपटातला डायलॉग वापरायचा तर, फिल्मे सिर्फ तीन चिजोंसे हीट होती है... एन्टरटेनमेन्ट, एन्टरटेनमेन्ट और एन्टरटेनमेन्ट...) आणि हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सर्व प्रकारची व्यावसायिक गणिते डोळ्यासमोर ठेवूनच हा चित्रपट बनलेला असतो. नयनमनोहर अशी दृश्ये,नाच, सुश्राव्य संगीत, रंजनाला पोषक हरतऱ्हेचा मसाला (अभिजातच शब्द वापरायचा तर विविध रसांचा वापर) त्यात पुरेपूर असतो. संपूर्ण भारताचे मार्केट डोळ्यासमोर असल्याने कुठल्याही एका विशिष्ट प्रांताचा-भाषेचा प्रेक्षक अपेक्षित नसतो. त्यासाठी एका अखिल भारतीय चेहरेविहीन प्रेक्षकांची कल्पना करावी लागते. त्यामुळेच कथानकाला निश्चित कालावकाश नसतो. उदाहरणार्थ, चित्रपटातले रामपूर म्हंटले की ते तमिळनाडूपासून काश्मीरपर्यंत कुठलेही असू शकते. वास्तवात,काही मैलांगणिक गावाचे सामाजिक-सांस्कृतिक स्वरूप बदलेल. चित्रपटात मात्र असा विशिष्ट चेहरा टाळलेला असतो. एका अर्थाने, प्रेक्षक म्हणून आपणा सर्वांना एका चेहरेविहीन, भारतीय सूत्रात बांधण्याचा प्रयत्न त्यात असतो. अथवा एक खिचडी संस्कृती कृत्रिमरीतीने रचलेली असते. उदा. ‘शोले’ किंवा ‘लगान’मधले गाव आठवून पहा. त्यात विविध जाती-धर्माचे लोक आहेत, पण त्यांतील परस्परसंबंधांतील व्यामिश्रता टाळून एक सपाट सुलभ समाजवास्तवाचा आभास वीणलेला असतो. विविध प्रदेशांतील विविध संस्कार घेऊन त्यातून एक कृत्रिम संस्कृती रचलेली असते. असे चित्रपट वरकरणी सामाजिक विषयांचा चेहरा धारण करणारे असले, तरी मुळात त्याचे स्वरूप गुडी-गुडी सामाजिकतेचे, पलायनवारी (More Escapist) आणि निरूपद्रवी (Less Potentially Disturbing) असे असते. रंजनाच्या नानविध क्लृप्त्या शोधत तांत्रिकदृष्ट्या चकचकीत व अद्ययावत असणारा हा चित्रपट असतो. रंजनप्रधान-पलायनवादी दृष्टीचे हे चित्रपट असतात. व्यावसायिक दृष्टीकोनातून त्याला निश्चित मूल्य आहे. अधिकाधिक लोकांना (खेड्यातल्या अशिक्षितापासून ते शहरातल्या रिक्षावाला नि बेकार तरूणांपासून ते १२-१२ तास ऑफिसमध्ये राबणाऱ्या कॉरपोरेट कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना) ते कळावेत, आवडावेत, घटकाभर मनोरंजन करणारे ठरावेत, जमलाच तर काही संदेशही त्यातून द्यावा- इतकाच माफक विचार त्यामागे असतो. अशा चित्रपटांना भारतात आणि भारताबाहेरही मोठा प्रेक्षकवर्ग आहे.

  * प्रादेशिक चित्रपट
  भारतातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये चित्रपट बनत असले, तरी संख्येने सर्वाधिक (एकूण भारतीय चित्रपटांच्या अर्धेअधिक) चित्रपट दक्षिणेतल्या चार राज्यांत बनतात. यातही वरीलप्रमाणेच व्यावसायिक दृष्टी असणाऱ्या चित्रपटांचीच संख्या अधिक असते. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत त्यात भडकपणाही अधिक असतो. विशेषतः तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये. चित्रपटातील अभिनेते,अभिनेत्री इतके लोकप्रिय होतात, की त्यांना जवळपास देवाखालोखालचा दर्जा मिळतो. एन.टी. रामाराव, चिरंजीवी, रजनीकांत. ही काही वानगीदाखल नावे. त्यांचे फोटो देवघरात ठेवून आरतीही केली जाते. अशा लोकप्रियतेमुळेच हे अभिनेते राजकारणातही सहजपणे जम बसवताना दिसतात. (हिंदीतले लोकप्रिय अभिनेते मात्र निवडणुकीत जिंकतीलच याची ते स्वतःही खात्री देऊ शकत नाहीत.दक्षिणेची –विशेषतः या दोन राज्यांची बातच निराळी.) बरेचदा चित्रपट तमिळ आणि तेलुगु अशा दोन्ही भाषांत एकदमच बनवला जातो. तमिळ सिनेमाला तर मलेशिया, सिंगापूर असे परदेशी मार्केटही खूप मोठे आहे. ब्रिटिश चित्रपटांपेक्षाही हे मार्केट मोठे आहे. अनेक तमिळ चित्रपट बॉक्स ऑफिसबाबत हिंदी चित्रपटांनाही मागे टाकतात. उदा. रजनिकांतचे चित्रपट. अशा चित्रपटांचा हिंदी रिमेक (अगदीच नाही तर डब) करण्याचा स्वाभाविक मोह बॉलिवूडला होतो. पण तिकडचे हीट बॉलिवूडमध्ये जोरदार चालले असे होताना मात्र दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, प्रादेशिकतेची गणितेच पूर्ण वेगळी असतात. प्रदेशागणिक ती बदलतातही.

  चेन्नई हे दाक्षिणात्य चित्रपटांचे मुख्य केंद्र आहे. (त्यानंतर हैद्राबाद) तिथे तमिळबरोबरच तेलुगु, कन्नड व मल्याळी चित्रपटही बनतात. अलिकडच्या काळात तर भारतभरातली पोस्ट प्रोडक्शनची कामे चेन्नईत होऊ लागली आहेत. नजिकच्या काळात मुंबईऐवजी चेन्नई हीच भारताची फिल्म कॅपिटल अर्थात चित्रपट राजधानी ठरली तर आश्चर्य वाटायला नको.

  दक्षिणेखालोखाल बंगाली, मराठी, उत्तरेतील भोजपुरी चित्रपटसृष्टी मोठी आहे. इतर प्रदेश त्यामानाने खूपच क्षीण आहेत. कलात्मकतेच्या दृष्टीने पाहू गेल्यास, बंगाली, मल्याळी, कन्नड, मराठी चित्रपट लक्षणीय आहेत.

  * कलात्मक अथवा समांतर चित्रपट
  कलात्मक अथवा समांतर चित्रपट याचा अर्थच मुळी मुख्य व्यावसायिक चित्रपटप्रवाहाच्या बाहेरचा सिनेमा असा होतो. तंत्रज्ञान आणि भांडवल हे चित्रपटमाध्यमात अंगभूतच असल्याने व्यावसायिकता ही गोष्ट चित्रपटांना टाळताच येत नाही. हे खरे असले, तरी काही एक व्यावसायिक जोखीम पत्करून कलात्मक धाडस अशा चित्रपटांनी केलेले असते. चित्रपट हे एक कलामाध्यम आहे, म्हणून त्याची हाताळणी केलेली असते. अनेकदा तर, कमी खर्चाचे, बेताचेच तंत्रज्ञान असलेले, स्टारकास्ट नसलेले (पर्यायाने अपेक्षित संथ, कंटाळवाणे) चित्रपट म्हणून कलात्मक चित्रपटांकडे चेष्टेनेही पाहिले जाते. अशा चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग तुलनेने खूपच मर्यादित असतो. फिल्म सोसायटीज, फिल्म फेस्टिवल्स, गंभीर कलाचर्चा, उत्तम सामाजिक भान यांतून हा प्रेक्षक घडलेला असतो. असा चित्रपट प्रामुख्याने वास्तवदर्शी(More Realistic), समाजाभिमुख(Socially Relevant) आणि संवेदनाक्षम(Potentially Disturbing) असा असतो. याचा अर्थ प्रत्येकच सामाजिक चित्रपट कलात्मक असतो, असे नाही. पण बहुतेक कलात्मक, समांतर चित्रपटांमागे असलेली प्रबोधनाची प्रेरणाही दुर्लक्षित करता येत नाही. वैचारिकता, अधिक आशयघनता, चित्रभाषेचा समर्थ वापर, कलात्मक प्रयोगांचे धाडस, प्रबोधनाची प्रेरणा... ही कलात्मक अथवा समांतर चित्रपटांची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. हा खऱ्या अर्थाने ऑतेयर सिनेमा म्हणजे दिग्दर्शकाचा सिनेमा म्हणता येईल. हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटांतदेखील समांतर चित्रपटांची ही धारा दिसते. सत्यजित राय, ऋत्विक घटक, बुद्धदेव दासगुप्ता, मृणाल सेन, अपर्णा सेन, गौतम घोष, अदूर गोपालकृष्णन,गोविंदन अरविंदन,जॉन अब्राहम, शाजी करूण, गिरीश कासारवल्ली, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, मणी कौल, कुमार शाहनी, केतन मेहता, सईद मिर्झा, मनमोहन महापात्रा, निराद महापात्रा... या थोर दिग्दर्शकांनी ही धारा विकसित केली नि खळाळती ठेवली.

  * मध्यममार्गी चित्रपट
  मागील काही वर्षांत व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपटांच्या दरम्यानचा एक मध्यममार्गी चित्रपटही विकसित झाला आहे. रंजनमूल्य असूनही विचारप्रवण करणारा हा सिनेमा आहे. गुरूदत्त हा या प्रकारच्या सिनेमांचा पूर्वसुरी म्हणता येईल. अलीकडच्या काळातील कुंदन शाह, अनुराग कश्यप, सुजित सरकार, अमिर खान, मधुर भांडारकर, ...यांचे चित्रपट, पिपली लाईव्ह, धोबी घाट. ते मराठीतला सैराट वा अलीकडचा हिंदीतील न्यूटन हे निश्चितपणे मध्यममार्गी चित्रपट आहेत.

  * अनिवासी भारतीयांचा चित्रपट
  मीरा नायर, दीपा मेहता, गुरींदर चढ्ढा... आदी जगभर पसरलेल्या भारतीयांनी भारतीय विषय व कथानकांवर बनवलेला चित्रपट संख्येने आजघडीला इतका आहे की, अनिवासी भारतीयांचा चित्रपट असा वेगळा स्वतंत्र प्रवाहच दाखवता येईल. या चित्रपटांवर वरकरणी कलात्मक चित्रपटांचा प्रभाव जाणवत असला, तरी हे सर्वच्या सर्व चित्रपट कलात्मक,समांतर जातकुळीतले नाहीत. भारतीय कथावस्तू असली तरी काहीशा अंतरावरून, अनेकदा परक्या वा तटस्थ नजरेने स्वतःकडे पाहण्याचा हा प्रकार आहे. समांतरच्या तुलनेत एक व्यवसायिक चकचकीतपणा व सफाईदारपणा त्याच्या हाताळणीत दिसतो.

  * परदेशीयांचे भारतीय चित्रपट
  परदेशी चष्म्यांतून, काहीवेळा परक्या वा तटस्थ नजरेने तर कधी अंतरंगात खोलवर शिरून पाहण्याचा हा प्रयत्न आहे. परदेशी लोकांनी अलिकडेच भारतीय कथाविषयांवर चित्रपट बनवले आहेत, असे मात्र मुळीच नाही. १९३६ सालचा फ्रान्झ ओस्टिन दिग्दर्शित व अशोक कुमार-देविका राणी अभिनित ‘अछूत कन्या’ हा सुरूवातीच्या काळांतला असा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. ओस्टीन यांनी थोडेथोडके नाही, तर तब्बल १४ चित्रपट बॉम्बे टॉकीजसाठी दिग्दर्शित केले होते. ज्याचे कोलकात्यातील चित्रिकरण पाहण्यासाठी सत्यजित राय आणि चिदान्द दासगुप्ता आवर्जून जात असत, तो ज्याँ रेन्वां दिग्दर्शित रिव्हर (१९५१), रिचर्ड एटनबरो दिग्दर्शित गांधी (१९८२), डेव्हिड लीन दिग्दर्शित ए पॅसेज टू इंडिया (१९८४), डॅनी बॉयल दिग्दर्शित स्लमडॉग मिलियेनिएर (२००८), लाइफ ऑफ पाय, लॉयन ही याप्रकारातली काही ठळक उदाहरणे.


  भारतीय चित्रपट असा अनेक प्रवाहांनी घडला आहे. प्रत्येक प्रवाहातून वेगळा भारत समोर आला, नव्याने रचला गेला. भारतीय समाज जसा व्यामिश्र आहे, तसाच भारतीय प्रेक्षक आणि म्हणून भारतीय चित्रपटही. जागतिकीकरणाने आपण एकीकडे जगाशी जोडलो गेलो आहोत, तर दुसरीकडे आपल्या सांस्कृतिक मुळांना घट्ट बिलगून आहोत. आपल्या चष्म्यातून जग आणि जगाच्या चष्म्यातून स्वतःचा वेध घेत आहोत. सर्वच कलांतून ते दिसते. चित्रपटासारख्या जनमाध्यमांतून तर ते अधिकच. त्यातूनच भारतीय चित्रपटसृष्टी आणि त्याविषयीची संकल्पना समृद्ध होत जाईल.

  - प्रा. अभिजित देशपांडे
  abhimedh@gmail.com

Trending