आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वात्मकतेच्या आर्त करुणेचा सार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप आवटे यांची ‘या अनाम शहरात’ असं शीर्षक धारण करुन कविता दाखल झाली आहे. जिला स्वत:ची भाषा आहे. तिच्या विचारांचं व्याकरण आहे. ती झाडासारखी आपल्या मुळ्या मातीत घट्ट रोवून आहे...

 

दर काळ एका चांगल्या कवितेची आस बाळगून असतो. किंबहुना, तो पोटतिडकीने सशक्त कवितेची मागणी करत असतो. ती त्याची निकड बनते. मात्र काळाची ही निकड सर्वांनाच कळते, असे नाही. काळाची निकड आणि तुमच्या आतली कळ एक झाली पाहिजे. तसं झालं तर चांगल्या कवितेचा जन्म होतो. नाहीतर मग मागणी तसा पुरवठा होऊन, आपल्या  आसपास प्रचंड ढीग साचत जातात. त्यात आपली घुसमट होऊन आपण जीवाच्या आकांताने चांगली कविता शोधत राहतो. मात्र, समकालाने खूप चांगली कविता समोर ठेवली आहे. त्या चांगल्या कवितेत प्रदीप आवटे यांची ‘या अनाम शहरात’ असं शीर्षक धारण करुन कविता दाखल झाली आहे. जिला स्वत:ची भाषा आहे. 

 
तिच्या विचारांचं व्याकरण आहे. ती झाडासारखी आपल्या मुळ्या मातीत घट्ट रोवून आहे. अर्थात या कवितेपर्यंत पोहचायचं असेल, तर आधी एका अनाम शहरात तुम्हाला दाखल व्हावं लागेल. हे छिंद्रातून पहाणारं असुरक्षित आणि भित्रं शहर आहे. जगण्याचं वास्तुशास्त्र विसरलेलं शहर आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक विभक्त होत जाणारं एकाकी शहर आहे. शहराच्या नेणीवेत होत असलेले जात-धर्माचे स्फोट, भक्ष्यावर लक्ष ठेवणाऱ्या सैतानासारखा विद्रूप आणि प्रचंड भासतो, शहराचा डोळा, खोकतंय शहर टीबी झालेल्या म्हाताऱ्यासारखे, फुटलेल्या आरशाच्या असंख्य तुकड्यांत दिसणाऱ्या मल्टिफ्रेमिक इमेजसारखा हरवलाय शहराचा नेमका चेहरा, अफाट तुंबलेल्या रस्त्यांमध्ये अडकलंय शहर, त्यानं पोसलेला स्वकेंद्री हेडोनिझम, मुक्ततेच्या आभासाखाली वाहणारे गटार वास्तव; सारं सारं कवी पहातो आहे. शहराचं व्यामिश्र चरित्र त्याच्या शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करतो आहे.
 
ग्लोबलायझेशनच्या माऱ्याने सपाट होत चाललेली शहरं, आपली ओळख विसरून निनावी होत चालली आहे. या निनावी शहरात ‘तू एक मुंगी, मी एक मुंगी’चा साक्षात्कार घडोघडी घेत निनावी जगताना, हे अनामपण काळीज पोखरू लागतं. असं हे शहर धपकन आपल्या अंगावर येतं. आणि हेही जाणवतं की, आपण हे शहर हरघडी पाहिलं आहे. खरं आहे, मात्र कवीने जो निष्कर्ष काढला, तो आपण काढला नसता, इथेच कवीचं वेगळेपण नजरेत भरणारं आहे. कवी म्हणतो,
गावाने गहाण ठेवला आहे 
आपला सातबारा 
शहराच्या चकचकीत मॉलमध्ये 
आणि विकली आहे 
आपली कूस 
शहराला 
आता या उपजाऊ कुशीत 
काय उजवेल शहर?
चिंताक्रांत आठ्या 
पसरल्यात 
वावरभर 
शहाराच्या चकचकीत मॉलमध्ये गावाने आपली कूस विकलेली असणं, हे जे काही या कवीस सुचलं आहे, त्या सुचण्याला सलाम करावासा वाटतो. मला इथे कवीची भूमिका सांगावीशी वाटते, कवी म्हणतो, ‘शहर हा या कवितेचा केंद्रबिंदू असला तरी मानवी अस्तित्वाला पडणारे सारेच पेच मला अस्वस्थ करतात. बकाल होत जाणारी खेडी, शेतीची आणीबाणी, कॅन्सरच्या पेशींसारखा अनियंत्रित वाढणारा नवा एकपेशीय मार्केटी माणूस हे सारं गुदमरून टाकू लागतं. माणसाच्या रक्तपेशींवरील धर्म जातीचे लेबले ठळक होत जाताना पाहून, माणूस तुकड्या तुकड्यात विभागला जाताना, मला या साऱ्या लेबलापल्याड माणसाला साद घालावी वाटे. पावसाच्या थेंबासोबत अंगावरली सारी तकलादू आवरणं वाहून माझी कविता सिमेंट क्राँकिटलेल्या जगात पुन्हा रुजण्यासाठी कणभर माती शोधू लागते.’ कवीची अशी भूमिका जेव्हा समोर येते, तेव्हा स्पष्ट होत जातं, ते हे की कवीला ‘शहर’ आणि ‘गाव’ यांचा झगडा नाही मांडायचा, किंवा दोघांची तुलना नाही करायची. माणूस शहरातला असो की गाव खेड्यातला कवीला माणसाचं माणूसपण मांडायचं आहे. 
 
कणभर माती शोधण्याची कवीची आस ही केंद्रस्थानी येऊन उभी राहते आहे. विश्वात्मकतेची आर्त करुणा भाकते आहे. ती करुणा कवितेच्या स्वराला उंचीवर घेऊन जाण्यासही कारणीभूत ठरते. तीच जाणीव कवीकडून काही लिहून घेते. तेव्हा नुसते शब्द नाही येत, काहीएक विचार आपल्या पुढ्यात उभा ठाकतो. 
 
 
कोणतंच नाव नसतं झाडांना,
झाडांना कोणतीच जात नसते 
झाडं काढत नाहीत कसलाही मोर्चा,
थेंबभर उसन्या पाण्यासाठी 
झाडांचा अपरंपार विश्वास असतो,
मातीत खोलवर गेलेल्या स्वत:च्या मुळांवर 
आणि निळा गोल मिठीत घेऊ पाहणाऱ्या 
आपल्या वेड्यावाकड्या फांद्यांवर
गावमातीचा ज्याच्या पायांना स्पर्श झालेला असतो, त्याच्या अस्तित्वाला मुळ्या फुटलेल्या असतात. त्या मातीभर पसरत गेलेल्या असतात. ज्यास मूळ आहे, त्याला इथल्या प्रहरात तग धरता येते. त्याची संवेदनशीलता कधीच बोथट होत नाही. हेही तितकच खरं की त्याच्यातल्या माणसाला इथे तग धरतांना अनंत यातनांना सामोरं जावं लागतं. पण काही झालं तरी मूळ सोडायचं नाही, हा निर्धार त्याच्यातल्या चांगुलपणासकट जिवंत ठेवतो. म्हणून त्याच्यासमोर जे वास्तव वेडंविद्रं नाचत असतं, त्यास त्याला नीटनाट करायचं असतं. 
 
याचं उदाहरणच घ्यायचं झाल्यास, ‘प्रिय रोहित वेमुला’ ही कविता पाहता येईल. खरंतर रोहित वेमुलावर चिक्कार लिहिलं गेलं. सोशल मीडियाच्या आयत्या कोलितावर सहानुभूती सतत टांगली गेली. पण रोहित वेमुलाकडे कुणाला इतकं जवळकितेने पहाता आलं नाही. जे या कवीने पाहिलं म्हणूनच आवटेमधला कवी मला फार महत्वाचा वाटतो. तो असा काही आतड्यातला संवाद मांडतो. रोहित वेमुला कधी भेटलो होतो कारे आपण? आठवत नाही नीटसं पण वाटतंय की मी पाह्यलंय तुला,  खूप ओळखीचा वाटतोयस तू मला. 
 
असं जिव्हाळ्याचं बोलून तू मारुती कांबळेचा कुणी नातेवाईक होतास का? 
त्याचं काय झालं 
हे अजूनही आम्हाला समजलं नाही नीटसं 
आजही रोज उठते आवई 
तो दिसल्याची, तो आल्याची गावकुसात 
पण त्या प्रत्येक आवईसोबत 
आम्ही चिणतो, त्याला भिंतीत 
जाळतो त्याला फॅक्टरीच्या भट्टीत
हातपाय तोडून फेकून देतो त्याचे धड गावाबाहेर 
खैरलांजी, जवखेडा, सोनईत 
वेशीतून आत डोकावणारी त्याची 
सावलीही जाळून टाकतो  
थोडक्यात, वर्तमान वास्तवाला कवी आपल्यासमोर एखाद्या आरशासारखं ठेवतो. ते ठेवताना त्यात आपल्याला वर्तमान जगाचं तंतोतंत प्रतिबिंब कसं दिसेल, याचा जीवाच्या आकांताचा त्याचा प्रयत्न आहे. तुम्ही तो पहावा, हीसुद्धा आस तो बाळगून आहे. कारण त्याशिवाय वर्तमानाला लागलेली कीड नष्ट होणार नाही. हे कवीला ठाऊक आहे. हे करताना तो तुम्हाला भंडावून सोडत नाही. समंजसपणे तुमच्यासमोर वास्तव  ठेवतो. कुठलाही चांगला कवी हेच करील. आज जे सोशल मीडियाच्या आभासी दुनिया उभे राहात आहे, तेही कवीच्या नजरेत सुटत नाही. लोक ऑनलाईन जसे वागत आहे, तसे ऑफलाइन नाहीत. हे कवी जाणून आहे.   
 
आता स्क्रीनात्मके ज्ञाना । साक्षात्कारी क्षणा ।
नित्य फेबु लाइव्ह । प्रगटतो ।।
ॐइमोजी देवा । मम सुखदु:खावर ।
लाईकची मोहर । उठवा गा ।।
 
ही कविता उत्कृष्ट नमूना ठरावी, आजच्या फेसबुकी तकलादू समाजव्यवस्थेची. तिचा अतिशय अचूक शब्दांत कवीने वेध घेतला आहे. जाता जाता मला हेही नमूद करणं गरजेचं वाटतं; ते हे की प्रदीप आवटे यांच्यातला कवी आपल्याला अनाम शहराचा प्रवास याचसाठी घडवून आणतो, की तुम्ही तुमचं सत्व ओळखलं पाहिजे. मला वाटतं, त्यात ते यशस्वी झाले आहेत. आणि ज्या सत्यापर्यंत माणसाला न्यायचं आहे बरोबर त्या सत्यापाशी आणून सोडतो.
 
मातीतच गाडून घ्यावं लागतं स्वत:ला 
आभाळाला हात लावण्यासाठी 
मग शब्दांना पंखही फुटतात,
अवघी निळाई कवळण्यासाठी...! 
‘या अनाम शहरात’ हा काव्यसंग्रह मराठी काव्यप्रवाहात म्हणूनच खूप महत्वाचा ठरावा, असा झाला आहे. चित्रकार संजय साठे यांचे मुखपृष्ठ आणि रेखाटने कवितांच्या आशयाला ठसठ्शीत करण्यात साहाय्यभूत ठरतात. अशा या संग्रहाची मराठी काव्यरसिक दखल घेतील, याची मला पूर्ण खात्री आहे.
 
या अनाम शहरात (कवितासंग्रह)
कवी : प्रदीप आवटे 
मुखपृष्ठ : संजय साठे 
प्रकाशक : आटपाट प्रकाशन, पुणे 
पृष्ठ : ९२ किंमत : १०० रु.
 
 
ऐश्वर्य पाटेकर
oviaishpate@gmail.com

बातम्या आणखी आहेत...