आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर नावाची बिनरस्‍त्‍याची चळवळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हाइंभटांनी मुलूख मुलूख फिरत चक्रधर स्वामींच्या लीळा गोळा केल्या; तसंच तर केलंय नामदेवने. म्हणून पाहता पाहता त्याची चळवळ साहित्यजगतात कमी अवधीत फोफावली. अन् या चळवळीचं नाव ठळक झालं, ते म्हणजे ‘वाघूर’... 
 

वाघूर एक नदी  
वाघासारखी घूरघूर करत वाहणारी  
शूर वाघालाही वाहून नेणारी  
वाघाचं ऊर असणारी  
तिने शब्दालाच दिलीय घूरघूर... 
वाघूर एक शस्त्र 
शब्दांनी अचूक नेम भेदणारं 
वाघूर एक चळवळ बिनरस्त्यावर उतरुन   
शब्दांचा धगधगता विस्तव चेतवणारी 
वाघूर तुमच्या माझ्यामधलं सत्त्व उजागर करणारं 
एक मिथक   
वाघूर सृजनाचं वारूळ 
शब्दांच्या मुंग्यांनी भईच्या गर्भात उतरून  
तिच्या काळजाचा कानोसा घेणारं!  
वाघूर अनंत परसाची विहीर  
शब्दांचा तळ ढवळून  
ओल्या पाण्याच्या पाख्या मोकळ्या करुन  
सकसतेचा ठाव घेणारी  
वाघूर एक वाट  
क्षितिजाचा अडसर भेदत  
ब्रह्मांडाला वळसा घालत  
सूर्याच्या पायरीशी स्थिरावत  
दुर्लक्षित गाव-गावठाणाला वेटाळून असलेली  
काट्याकुट्याचं बोरी-बाभळीचं बन दावणारी  
वाघूर अंधाराच्या पखाली  
वाहून टाकता टाकता 
उजेडाची निगुद्वार पेरणी करणारी  
अस्सल पांभर...! 
या पांभरीच्या चाड्यावर अथवा मोघडावर ज्याने  
शब्दांच्या बियाण्याची मूठ धरलीय  
ते नामदेव नावाचं पोरगं  
त्याच्याविषयी मला काही सांगायचंय... 
तोच तर या वाघूरच्या नदीचं पाणी प्यायलाय  
या नदीत सूर मारत तो पोह्लाय... 
वाघूरची घूरघूर ज्याने आपल्या छाताडात भरुन घेतलीय... 
तोच ही वाघूरची वाट चाललाय  
वाघूरच्या खोऱ्यात त्याने शब्दांच्या बिया पेरल्या... 
तोच या वाघूरच्या विहिरीत सहजी उतरलाय...  

 
तर नामदेव कोळी नावाचा एक पोरगा. कडगाव, ता. जि. जळगावमधील एका खेडेगावात जन्माला आला. तो जन्माला आला म्हणून ढोल-ताशे वाजवत, त्याच्या जन्माचं स्वागत झालं नाही! मात्र जे काही झालं, त्यानं हे पोरगं फार बाळसेदार झालं. खानदेशी बोलीने त्याचे कान फुंकले. बाळमुठीत इथली माती त्यानं सहज खेळवली. काट्याकुट्याच्या बनात तो रांगला.

 

इथल्या वाघूर नदीच्या पाण्यात तो डुबला. या नदीनेचं त्याच्या हातावर एक शब्द ठेवला. या पोरानेही तो जिवाचा जपता जपता समकालाच्या कवितेच्या कॅनव्हासवर जोरकस उमटवून दिला. अन् दमदार कवी म्हणून त्याचं नाव ठळक होऊ लागलं. मात्र, तो जात्याच लोकसंग्राहक; मग त्यांनं वाघूर नावाची शब्दांची चळवळच उभी केली. या मेरापासून त्या मेरापर्यंत पायाला वाटा बांधून नामदेव सकस शब्द धुंडीत फिरला; त्याने तो मिळवलाही अन् वाघूर नावाच्या चळवळीत तो सामील करुन घेतला. खरं तर मला इथे म्हाइंभटाचं उदाहरण आठवतं. म्हाइंभटांनी मुलूख मुलूख फिरत चक्रधर स्वामींच्या लीळा गोळा केल्या; तसंचं तर केलंय नामदेवने. एवढं खरं की, सकसतेचा आग्रह त्याने सोडला नव्हता; अन् तडजोड तर बिलकुलही नाही. जगभर नाही तरी कशाकशाला विरोध होतात, मात्र सकसतेला कोण विरोध करणार? म्हणून त्याच्या या चळवळीची अर्धी लढाई तो या सकसतेच्या आग्रहात जिंकला. नंतरची मेहनत त्याच्या स्वभावात आहे. त्याने ती वापरायला सुरुवात केली. म्हणून पाहता पाहता त्याची चळवळ साहित्यजगतात कमी अवधीत फोफावली. अन् या चळवळीचं नाव ठळक झालं, ते म्हणजे ‘वाघूर’. 


थोडक्यात सांगायचं, तर लोक त्याच्या ‘वाघूर’ला दिवाळी अंक म्हणतात अन् मी चळवळ म्हणतो. चळवळ म्हटली की रस्त्यावर उतरणं आलं; पण काही चळवळी, अशा असतात की त्यांना रस्त्यावर जायची गरज नसते. रस्ताच चळवळीपर्यत पोहोचतो. अन्् चळवळीला सर्वांसमक्ष घेऊन येतो. चळवळच सर्वांची होऊन जाते. कवी म्हणून नामदेवला त्याचा चेहरा हवा तेवढा, देखणा करता आला असता; मात्र त्याने तसं केलं नाही, तो समूहाचा चेहरा देखणा करू पाहतोय. त्याला त्याच्या सत्त्वाची भाषा पुरवू पाहतोय. समूहाच्या व्यक्तिमत्त्वाला ठसठशीत करून त्याला समोर ठेवायचं आहे. एकट्याने मोठं होणं म्हटलं, तर तितकं अवघड नाही. मात्र समूहाला घेऊन चालणं, इतकं सोपं काम नाही. ते नामदेवला साध्य होतंय, त्यालाही कारण आहेच. मुळात कृषीवल पर्यावरणात वाढणारा कवी कलावंत हा बाह्यकेंद्री असतो. तो अप्पलपोट्या निपजत नाही. तो तिथला मातीचा गुणधर्म म्हणा, हवा तर! मातीवर पडलेलं शेण, जसं माती घेऊन उठतं; तसा या मातीत राहणारा, जगणारा कवी कलावंत हा संपूर्ण परिसर घेऊन उठतो. तिथल्या अभावांना, दु:खांना, समस्यांना शब्दरूप देतो. नामदेवची तऱ्हा हीच आहे. त्याची शब्दांवर गाढ श्रद्धा आणि विलक्षण जीव आहे, प्रचंड विश्वास तर आहेच; म्हणून त्या शब्दांसाठीच त्याने वाघूरची पताका हातात घेतली. साहित्याच्या रस्त्यावर उभा राहिला. बोलता बोलता अन् पाहता पाहता किती तरी हात त्याला येवून मिळाले. वाचनसंस्कृती कमी झाल्याचं ढुंमकंही त्यानं फोडून टाकलं; त्याच्या चळवळीचं हे पहिलं यश आहे. ते फार दमदार आहे. वाचक वाचतो आहे. त्याला सकस वाचायचं आहे. हे ‘वाघूर’ने दाखवून दिलं आहे.   

 
मधाच्या पोळव्यावर धाड टाकावी, तसा तो चांगल्या शब्दांवर धाड टाकतो अन्् त्याला वाघूरच्या चळवळीत घेऊन येतो. हा नामदेवचा गुण आहे. अर्थात हे गुण अंगी येण्यासाठी त्याची अपार मेहनत कामी येते आहे. त्याकडे डोळेझाक करताच येत नाही. त्यानं जेव्हा ‘खानदेश साहित्य मंच’ हा ग्रुप व्हॉटसअॅपवर सुरू केला, तेव्हाच जाणवलं की समन्वयक कसा असावा. ग्रुपवर साहित्यास पोषक असं काही तरी जोरकस घडावं, ही त्याची मनीषा. मात्र मनुष्य स्वभाव जातो कुठे? मात्र, अशा भांडणात-वादंगात पडून समेट घडवून तो आणतो. नाही तर किती ग्रुप केले जातात, अॅडमिनने काय म्हणून ग्रुप बनवला असतो, ते त्याच्या गावीही नसतं. मात्र, नामदेवचं लक्ष चौकस, त्याचा सोज्वळ स्वभाव लिहित्या हातांचं मन जिंकून घेतो. ‘वाघूर’ची चळवळ उभारण्याची रंगीत तालीम म्हणून ‘खानदेश साहित्य मंच’ त्यास कामी आलाय. असं म्हणता येईल. माणसाच्या काळजात उतरण्याचं तंत्र नामदेवला त्याच्या कवी, असण्याने बहाल केलं; ही चळवळ फोफावण्यासाठी तेच तर त्याचं बळ आहे.  


त्याला वाघूर दिवाळी अंक करताना आर्थिक चणचण भासत असेल, मात्र अस्सल साहित्याची वानवा त्याला बिलकुलही भासत नसावी, हे मी ठामपणे सांगू शकतो. यावर्षी शब्दब्रह्मांडाचं तिसरं आवर्तन त्याच्या ‘वाघूर’ने पूर्ण केलं. हे वाघूरचं पाणी चौखूर खेळू लागलंय. या पाण्याच्या जोरावर येत्या काळात साहित्याच्या वावरात खूप जोमदार पीक उगवून येईल, असं सूतोवाच करणारा नामदेवचा आशावाद फार कौतुकास्पद असला, तरी या चळवळीला आपल्या मदतीचा हात मोलाचा ठरेल!  


ग्रामीण भागात राहून साहित्याचा हा यज्ञ चालवणे सोपी गोष्ट नाहीच. शब्दांचं सोडा, पण माणूस म्हणून जगताना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं. सगळ्याच गोष्टींचा अभाव. पण नामदेवच्या कवीने या अभावाचेच शस्त्र केले आहे. ‘वाघूर’ नावाची चळवळ त्याने त्याच्या घामावर उभी केलीय. या क्षणी आपण त्यात नुसतं सामील तर होऊया...! 

 

- ऐश्वर्य पाटेकर,  लेखकाचा संपर्क : ९८२२२९५६७२

oviaishpate@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...