Home | Magazine | Rasik | alka ranade write on sachin joshi's experimental school

फास्टर फेणेची खरीखुरी शाळा

अलका आगरकर रानडे | Update - Jun 03, 2018, 01:00 AM IST

आज गावा-शहरांत ‘इंटरनॅशनल' शाळा दिसतात, पण एक्स्परिमेंटल म्हणजेच प्रयोगशील शाळा आढळत नाहीत. आज गाव-शहरांत घोकंपट्टीला प्

 • alka ranade write on sachin joshi's experimental school

  आज गावा-शहरांत ‘इंटरनॅशनल' शाळा दिसतात, पण एक्स्परिमेंटल म्हणजेच प्रयोगशील शाळा आढळत नाहीत. आज गाव-शहरांत घोकंपट्टीला प्राधान्य देणाऱ्या शाळा दिसतात. पण विद्यार्थ्यांच्या कृती आणि विचारांना चालना देणाऱ्या शाळा शोधून सापडत नाहीत. या शैक्षणिक गदारोळात सचिन जोशी मात्र विद्यार्थ्यांना जीवनानुभव देणारी खरीखुरी शाळा साकारतात...

  "मैत्रेयीचे सर ना, तिच्याबरोबर खेळतात!’ पाचवीतली श्रेया तिला वाटणारे नवल मला सांगत होती. मैत्रेयीचे ते सर म्हणजे नाशिकचे सचिन जोशी. त्यांच्या शाळेचे नाव ‘इस्पॅलियर एक्स्परिमेंटल स्कूल’ (Espalier exprerimental school). ‘Espalier’ हा फ्रेंच भाषेतील शब्द. त्याचा अर्थ, झाडाला आकार देणे किंवा झाडाची गुणवत्ता वाढवणे. हेे नावच शाळेचा हेतू स्पष्ट करते.


  सचिन जोशी यांनी गांधी आणि आइन्स्टाइन यांच्या शिक्षणविषयक विचारांना आधारभूत मानून, व्यासंगातून प्रथम स्वतःला आणि मग पालकांना घडवत त्या शाळेची उभारणी केली आहे. त्यांना स्वतःला शालांत परीक्षेत केवळ एकोणचाळीस टक्के गुण मिळाले होते. नंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.कॉम, एम.पी.एम. टॅक्सेशन लॉ, लेबर लॉ, एम.बी.ए., सी.एस. अशा अनेक पदवी घेतल्या. मात्र जगण्याला एक अस्वस्थता वेढून राहिली होती. शिक्षणाचा पुनर्विचार गरजेचा वाटत होता. तेव्हा, विवेकानंद, महात्मा जोतिराव फुले इत्यादींच्या विचारांमध्ये त्यांना शिक्षणाची खरी नस सापडली. तशात त्यांची पु.ग. वैद्य यांच्यासोबत भेट झाली. वैद्य यांचे ‘नापासांची शाळा’ या विषयावर काम सुरू होते. सचिन जोशी त्यात सहभागी झाले. पुढे त्यांचा श्याम मानव यांच्याशीही परिचय झाला. सचिन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करू लागले. श्याम मानव यांच्याकडून बालमानसशास्त्र त्यांना समजून घेता अाले.


  मग सचिन यांनी स्वतःच शाळा सुरू करण्याचा चंग बांधला. पुण्यामध्ये सेनापती बापट रोडवर पासपोर्ट ऑफिसमोर इमारत भाड्याने घेऊन २००६ मध्ये पूर्व-प्राथमिक शाळा सुरू केली. तिचे नाव होते ‘नापासांची शाळा’! ती शाळा दोन वर्षे सुरळीतपणे चालली. सचिन यांना नाशिक शहरात शाळा सुरू करायची होती. त्यांनी त्याकरिता पुण्यातील शाळा बंद करून नाशिक येथे ‘ग्रीन इंडिया’ ही शाळा २००९ मध्ये सुरू केली. मात्र, ‘ग्रीन इंडिया’च्या कामकाजात काही अडचणी निर्माण झाल्या अाणि त्यांना ती शाळा बंद करावी लागली. दरम्यान, सचिन यांचा वेगवेगळ्या शिक्षण पद्धतींचा अभ्यास चालू होता. त्यांना महात्मा गांधी यांची ‘नई तालीम’ ही विचारप्रणाली सर्वाधिक पटली. त्यांनी आइन्स्टाइनचे शिक्षणविषयक धोरण अभ्यासले. मुलांना त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत लेखनापासून मुक्त ठेवायचे, असा धाडसी निर्णय घेत ‘अनुभवाधारित शिक्षण’ देणारी इस्पॅलियर २०११मध्ये सुरू झाली! शाळेतील इयत्ता नव्हे, तर बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरवत पुस्तके, वर्ग, कठोर शिस्त, दडपण, मार्कांची मोजदाद या सगळ्यांच्या पलीकडे जात कमालीच्या मैत्रीपूर्ण वातावरणात बहरत गेली. अाज इथे पूर्व प्राथमिक ते दहावी अशा इयत्तांमधून हजार मुले शाळेत शिक्षण घेत अाहेत.


  यथावकाश सचिन जोशी पालकांच्या रीतसर सभा घेऊन, शैक्षणिक क्रांतीची गरज ठामपणे पटवू लागले. ते स्वतःच्या अभ्यासातून पालकांना सांगतात, ‘शिक्षणाच्या केंद्रस्थानी स्मृती नको, तर कृती हवी. घोकंपट्टी नको. मुलांच्या प्रतिभेला वाव द्या. चुका करण्याची संधी द्या. त्यांना सेल्फ लर्नर बनवा. मेंदूत कोंबली जाणारी माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. जे आत आहे, ते बाहेर काढणे म्हणजे शिक्षण, म्हणजेच ज्ञान. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून काढणे हे शिक्षकांचे आणि पालकांचे काम आहे. माहितीवर आधारित उत्तरे तर गुगलवरही मिळतात. मात्र, सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवा. ज्ञानरचनावाद महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यास हवे. मुलांच्यात समस्या निवारण्याची ताकद निर्माण व्हायला हवी. ती स्वानुभवातून मिळते आणि ते सगळे आपणच करायचे आहे.’


  मुळात मेंदू, शिक्षण आणि मुलांची जडणघडण या विषयाची गुंतागुंत सचिन जोशी अत्यंत सोप्या पद्धतीने पालकांना समजावून सांगतात. कारण ‘पूर्व-प्राथमिक’मधील विद्यार्थ्यांचे वय मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यांच्या पुढील आयुष्याची दिशा त्या विकासबैठकीवर ठरते. ते म्हणतात, खरे अनुभव पुस्तकातून नव्हे, तर वर्गाबाहेर मिळतात, मैदानावर मिळतात. मुलांना खेळू द्या. वर्गात भीतीचे वातावरण असेल तर मुलांच्या मेंदूची सक्रियता बिघडते. बौद्धिक विकास थांबतो. हे समजणारे पालक आणि शिक्षक प्रथम घडायला हवेत. मुलांकडे आईवडील आणि शिक्षक जसे बघतील तशी मुले घडतील. सचिन यांनी डी.एड.च्या अभ्यासक्रमात प्रयत्नपूर्वक या सर्व बाबींचा समावेश करण्यास लावला आहे.


  हे विचार पालकांनाही अधिकाधिक पटू लागले आहेत. इस्पॅिलयरच्या पालक डॉ. ज्योती शुक्ल यांची मुलगी दुसरीत गेली आहे. त्या म्हणतात, आम्ही ‘सचिन जोशी यांच्याशी कधीही संपर्क साधून मतांची, विचारांची देवाणघेवाण करू शकतो. एखादी गोष्ट पटली नाही तर मोकळेपणे सांगू शकतो.’ एरवी, माँटेसरीची तत्त्वे स्वीकारून ‘पूर्व-प्राथमिक’च्या मुलांना घडवताना जी सहजता जोपासावी लागते, ती त्या शाळेला सहज साधली आहे. ‘स्मॉल’ आणि ‘बिग’मधील फरक दाखवण्यासाठी शाळेत हत्ती आणला गेला अाणि शेजारच्या पिंजऱ्यात उंदीर होता. मुले पुस्तकात चित्रे पाहण्याऐवजी मेंढी, गाढव, हत्ती, बेडूक अशा प्राण्यांना प्रत्यक्ष हात लावू शकतात.


  शाळेतील मोठ्या मुलांनी पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमवून बोट तयार केली आणि गोदावरीत सोडली. सचिन जोशींनीदेखील त्या ‘नोहाच्या नौके’तून मुलांबरोबर सफर केली. मुलांना सूतकताई सातवीच्या अभ्यासक्रमात शिकवली जाते. त्यातून ५२-५३ मीटर कापड पहिल्या वर्षी तयार झाले. सचिन त्या कापडाचा शर्ट घालून मुलांचे कर्तृत्व अभिमानाने दाखवतात, तेव्हा कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. मुलांकडून वेगवेगळे प्रयोग दर महिन्याला तीन याप्रमाणे करून घेण्यात येतात. त्यातून ‘सोलार कार’सारख्या वस्तू त्यातून प्रत्यक्षात उतरल्या अाहेत. मुलांचे तशा धडपडीतून स्वतःचे म्युझियम त्यांच्या घरात दोन-तीन वर्षांत तयार होते. मुले कुंभारकाम, सुतारकाम, शिवणकाम, स्वयंपाक अशा कामात गढून जातात आणि वेगळा आत्मविश्वास कमावतात. मुले मातीकाम, मूर्तिकाम, शिल्पकला आनंदाने शिकतात. मुलांना मातीच्या संपर्कात ठेवणे, मातीशी नाते राखण्यासाठी महत्त्वाचे असते. शेतीपासून मूर्तीपर्यंतचे प्रयोग मुलांसाठी तेथे राबवले जातात.


  शाळांना स्वतःचा अभ्यासक्रम आठवीपर्यंत निवडण्याचे स्वातंत्र्य भारतात आहे. होमी भाभा इन्स्टिट्यूटची पुस्तके या शाळेत आठवीपर्यंत निवडली आहेत. त्यानंतर एस.एस.सी. बोर्डाचा अभ्यासक्रम. सचिन यांच्या मते, बोर्ड नाही, तर शिक्षक महत्त्वाचे असतात. सचिन जोशी यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमापैकी दहा टक्के अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडलेला असतो. मुलांची पथनाट्ये बसवली जातात. मुलांना वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना भेटण्यास नेले जाते. मुले तंबाखू निषेधदिनी टपऱ्यावरील गिऱ्हाईकांना गुलाबपुष्प देऊन व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करतात. मुलांनी भूत नसते हे जाणून घेण्यासाठी सचिन जोशींसोबत स्मशानाचा फेरफटका मारला आहे. शाळेनेच विद्यार्थ्याने स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लिहावे अशी पद्धत सुरू केली. स्वतः सचिन जोशीही स्वत:चे नाव ‘सचिन उषा विलास जोशी’ असे लिहितात.


  सचिन जोशी इतर तऱ्हेच्या सामाजिक कार्याशी संलग्न अाहेत. लैंगिक अत्याचारांपासून काही मुलींची सुटका, बालविवाह रोखणे ही वानगीदाखल काही उदाहरणे. सचिन जोशी यांचे अलीकडचे दोन परदेश दौरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांचे शिक्षणविषयक व्याख्यान अनेक देशांच्या प्रतिनिधींसमोर झाले. त्यांना युरोपियन पार्लमेंटमध्ये युरोपियन कौन्सिल आणि युरोपियन पार्लमेंट आयोजित ‘World forum for democracy’ या जागतिक लोकशाही परिसंवादासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘डिझाइन फॉर द चेंज’ या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट निवडण्यात आले. त्यासाठी सचिन जोशींबरोबर विद्यार्थी स्पेनला जाऊन आले.


  शाळेचा ‘चाक-शिक्षणाची’ हा उपक्रम कौतुकाचा ठरला. वस्ती-पाड्यांमधील मुले शाळेत येऊ शकत नाहीत, तर शाळाच त्यांच्यापर्यंत जाईल या कल्पनेतून अद्ययावत यंत्रणेसह एक बस शाळा होऊन नाशिकच्या दोन वस्त्यांमध्ये जाऊ लागली. दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर तेथील विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य झाले आहे.


  सचिन जोशी यांनी कोणताही व्यवसाय-नोकरी केली नाही. ‘अंनिस’सोबत सामाजिक कार्यात असताना त्यांना त्यांच्या अायुष्याचे ध्येय कळून अाले अाणि त्यांनी शिक्षणविषयक कामात झोकून दिले. त्याचेच फलित आज फास्टर फेणेची चित्रातली नव्हे, तर खरीखुरी शाळा इस्पॅलियर संस्थेच्या रूपाने सर्वांच्या नजरेसमोर आहे.

  - अलका आगरकर रानडे

  alka.ranade@gmail.com

  लेखिकेचा संपर्क : ९५१८५७५२४९

  - सचिन जोशींचा संपर्क : 9890002258

 • alka ranade write on sachin joshi's experimental school

Trending