आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनिअस क्रीडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो उपद्व्यापी त्याला फिल्मी भाषेत सुलेमानी किडा म्हणतात. तसा अभ्यासात जो हुशार त्याला पुस्तकी किडा असं आपण म्हणतो.  पण किडा जिनियसही असतो, हे जगभरातल्या ४० ते ५० चित्रपट महोत्सवात दाखवलेला गेलेल्या, अर्थातच भारतात गाजलेल्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘न्यूटन’च्या दिग्दर्शकाची झेप पाहिली की पटते. तेही दोनशे टक्के!   अमित मसूरकरचा आधीचा सिनेमा ‘सुलेमानी किडा’. आणि दुसऱ्याच सिनेमांत थेट ऑस्करच्या स्पर्धेत हा ‘न्यूटन’ घेऊन उभा. तरीही त्याची माध्यमांना दखल नाही.  तो मराठी आहे, हा निव्वळ योगायोग, महत्त्वाचं त्याचं कर्तृत्व, त्याची गुणवत्ता आणि गुणवत्तेला झळाळी देणारी विचारक्षमता. त्याचीच ही उकल खास वर्धापनदिनानिमित्त...

 

दोन सिनेमा जुन्या असणाऱ्या दिग्दर्शकावर लेख का लिहिण्यात यावा, असा प्रश्न अमित मसूरकरवरचा प्रस्तुत लेख वाचून अनेकांना पडू शकतो. पण वर्षानुवर्षे तेच रटाळ आणि एकसाची सिनेमे बनवणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकांना मराठी माध्यमं अति एक्स्पोजर का देतात, असा माझा प्रतिप्रश्न आहे. मागच्या वर्षी ऑस्करसाठी ज्याचा सिनेमा गेला, अशा गुणवान तरुण दिग्दर्शकावर मराठीत काहीही  लिखाण होत नाही, हे मला थोडं खटकत आहे. खरं तर  दिग्दर्शक म्हणून नावावर इन मीन दोन सिनेमे असणारा हा तरुण दिग्दर्शक आज काही तर वेगळं सांगू पाहणाऱ्या आणि आपल्या विस्कटलेल्या-भरकटलेल्या समाजावर भाष्य करू पाहणाऱ्या मोजक्या लोकांच्या यादीत अग्रभागी आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, वयाच्या अवघ्या छत्तिसाव्या वर्षी या माणसाकडे सांगण्यासारखं इतकं कसं काही आहे, हा अमितबद्दल आकर्षण वाटण्याचा माझा ट्रिगर पॉइंट आहे. 

 
 
अमित मसूरकर नावाचा कुणी एक दिग्दर्शक आहे, हे मला ‘सुलेमानी किडा' नावाच्या अतरंगी सिनेमाच्या ट्रेलरवरून कळलं. बम्बैया भाषेत सुलेमानी किडा म्हणजे स्वस्थ न बसता उचापती, उपद्व्याप करणारी व्यक्ती. चित्रपट लेखक  ही जमात कायमच उपेक्षित, अंडरपेड  आणि अन्याय झालेली. (सलीम -जावेदसारखे काही सन्माननीय अपवाद वगळता).  या लेखकांचं स्वतःचं एक जग असतं. ही जमात वर्सोव्यात (मुंबईतल्या अंधेरी उपनगरातली स्ट्रगलर लोकांसाठी ओळखली जाणारी वस्ती) राहते. तिथून त्यांना पुढची झेप सरळ बांद्र्यात (जिथे बडे बडे बंगलेधारी स्टार-सुपरस्टार राहतात.) घ्यायची असते. नोकरदार माणसांकडे हे लेखक तुच्छतेने बघतात आणि ते लोक यांच्याकडे प्राणिसंग्रहालयामध्ये ठेवलेल्या प्राण्यांकडे बघावे तसे काहीसे कुतुहलाने पाहतात. ते लोकांकडून उधार मागून सिगारेटी फुंकतात. घरमालकाला भाडे देताना यांची तारांबळ उडते. आरामनगरमधल्या बारमध्ये बसून स्वस्तातली दारू पिताना हे लोक "सौ करोड वाली  फिल्म बनवून बॉलीवूड पे छा जाने के' बेत बनवत असतात. आज खिसा फाटका असला आणि बूट चावत असला तरी आने वाला कल, आपलाच असेल असा आत्मविश्वास त्यांना असतो. अशा या चित्रपटलेखकूंचं जग अमितने या सिनेमामध्ये खूपच ऑथेंटिक आणि अप्रतिमपणे उतरवलं होतं.


 सुलेमानी किडा ही  दुलाल आणि मैनक या दोन ‘स्ट्रगलर' लेखकांची कहाणी होती. दुलाल आणि मैनक ही जोडगोळी लेखक म्हणून ब्रेक मिळवण्यासाठी धडपडत असते. मैनक हा उथळ, वाक्या-वाक्यांत शिव्या वापरणारा आणि यशासाठी कुठलीही तोडजोड करण्यास ना नसणारा व्यक्ती. दुलाल हा तुलनेने मवाळ, संवेदनशील आणि अंत नसलेला संघर्ष  करण्यात आपलं जीवन तर संपून जाणार नाही, ना या भीतीच्या छायेत जगणारा लेखक. ही जोडगोळी ‘एक मौके के  लिये' महेश भटपासून ते अमृता रावपर्यंत सगळ्यांचे उंबरठे झिजवतात. फावल्या वेळात पोरींना टापून ‘action' मिळवण्यासाठी पुस्तकांची दुकानं आणि फडतूस कवितांचे मुशायरे पावन करत असतात. अशाच एका ठिकाणी दुलाल रुमाला भेटतो. रुमाच्या सहवासात येऊन आयुष्याबद्दल वेगळा विचार करू लागतो. त्यांना पहिला ब्रेक मिळतो का? सलीम -जावेदसारखी दुलाल-मैनक जोडी बनते का? याची कहाणी म्हणजे सुलेमानी किडा. यातल्या दोघाही मुख्य कलाकारांनी या भूमिका भन्नाट केल्या आहेत. या सिनेमातला एक प्रसंग तर माझ्या आवडीचा. अमितच्या विनोदबुद्धीची साक्ष देणारा.
मैनक दुलालला घेऊन सलमान खानच्या घरासमोर जातो आणि विचारतो, "बता ये किस का घर है?’
"सलमान खान का.’ दुलाल .
"और किसका घर है?’
"सलीम खान का.’
"देखा writer हमेशा actor का बाप होता है.’
महेश भट यांच्यासोबतचा या लेखकांचा सीन असलाच भारी. हा माझ्यासारख्या चित्रपट लेखकांना आत्मचरित्रात्मक  संदर्भामुळे नक्की आवडतोच, पण "नऊ  ते पाच' मधल्या नोकरदार लोकांना एका वेगळ्या लेखकांच्या जगाची सैर घडवून आणतो. 


स्वतः अमित आयुष्याच्या एका टप्प्यावर लेखक होता. माहीममध्ये जन्म झालेला हा मुंबईकर तरुण आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून सिनेमा क्षेत्राकडे वळला होता. तेव्हा संघर्षाच्या काळात लेखनाच्या अनेक असाइनमेंट्स त्याने केल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन कॉमेडी सर्कस' या गाजलेल्या शोसाठी त्याने दोन वर्षं लिखाण केलं आहे. (त्याने ‘मर्डर'चा तिसरा भाग लिहिला आहे, तो पण त्याच्या विनोदी लिखाणात समाविष्ट करावा काय?)  सुलेमानी किडामध्ये त्याचे आत्मचरित्रात्मक संदर्भ असावेत, असं मला वाटायचं. पण अमितने असे काही संदर्भ सिनेमात नाहीत, असं स्पष्ट केलं. त्याने जे एक लेखकांचं जग जवळून बघितलं आहे, त्याचंच प्रतिबिंब सिनेमाच्या संहितेमध्ये उमटलं असावं . 


अमितचं नाव खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलं ते ‘न्यूटन'नंतर. राजकीय प्रहसन म्हणता येईल अशा "न्यूटन' या सिनेमाच्या नावातच वेगळेपण नाहीये, ते वेगळेपण सिनेमाच्या विषयात पण आहे. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात अवघे ७६ मतदार असणाऱ्या बूथवर एक निवडणूक अधिकारी सगळ्या प्रकारचे त्रास झेलून निवडणूक प्रक्रिया कशी राबवतो, याची धाडसी गोष्ट म्हणजे ‘न्यूटन'. छत्तीसगड हा आपल्याच देशाचा एक भाग असला तरी माझ्यासारख्या शहरी माणसासाठी अज्ञात. तरी मी फेसबुकवर बसून या भागावर, नक्षलवादावर बिंदास कॉमेंट करतो, हा भाग निराळा. अशी पण एक निवडणूक प्रक्रिया असू शकते, हे सिनेमाचं ट्रेलर बघून कळते. सिनेमात संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी आणि राजकुमार राव ही रत्नं आहेत. ‘आपको इमानदारी का घमंड है' असं निक्षून सांगणारा मिश्रा, कर्तव्यकठोर सीआरपीएफ अधिकारी पंकज त्रिपाठी आणि प्रामाणिक निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेत राजकुमार हा कास्टिंग कूल आहे. देशात ज्यांच्यामुळे लोकशाही टिकून आहे अशा निवडणूक प्रक्रियेत सामील असणाऱ्या हजारो अनाम नायकांना या सिनेमाने केंद्रस्थानी आणलं आहे. न्यूटन उर्फ नूतन कुमार हा बहुतेक दलित असावा. सिनेमात डॉ. आंबेडकरांच्या फ्रेमखाली न्यूटन काही तरी वाचत बसलाय, असा एक प्रसंग सिनेमात आहे म्हणून हा अंदाज. मला उत्सुकता होती, की न्यूटनचं पात्र दलित दाखवण्यामागे दिग्दर्शक अमितचे काय आडाखे असावेत? म्हणून मी अमितला न्यूटन हा दलित आहे का, असा सरळ प्रश्न विचारला. पण अमितला तो प्रश्न खटकला असावा. त्यानं छोटंसं पण थोडं धारदार उत्तर दिलं, "२०१८ सालात पण तुला हा प्रश्न विचारावासा वाटतोय, यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय.’

 
अमित मसूरकरचं आतापर्यंतच काम बघितलं असता त्याच्याबद्दल काही विधान करता येतात. अमितला जगावेगळ्या आणि जग ज्यांची नोंद घेत नाही, अशा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची नोंद घ्यायला आवडतं. "सुलेमानी किडा'मधले मुख्य पात्र चित्रपट लेखक आहेत, तर न्यूटन निवडणूक अधिकारी आहे. दोन्ही क्षेत्रांची नोंद चित्रपट म्हणूनच नाही, तर आपल्याकडे अभिव्यक्तीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये फारशी घेतली गेलेली नाही. या पात्रांसमोरचे संघर्ष त्यामुळेच युनिक ठरतात. ते इतर सिनेमांमध्ये तुम्हाला यापूर्वी कधीच दिसलेले नसतात. ‘सुलेमानी किडा'मधल्या दोन संघर्षरत लेखकांना पहिला ब्रेक मिळवायचा आहे. काहीही करून. एका निर्मात्याकडे त्यांना काम करण्याची संधी मिळू शकते, पण त्यांना त्यासाठी आपली तत्व आणि  महान सिनेमा बनवण्याची इच्छा गुंडाळून एक तद्दन व्यावसायिक सिनेमा लिहावा लागणार आहे. पण त्या निर्मात्याचा मुलगा, ज्यासाठी त्याला हा सिनेमा बनवायचा आहे तो मात्र जागतिक, परभाषिक सिनेमाने भारावून गेला आहे. या दोघांना सांभाळून सिनेमा लिहिण्याचा संघर्ष म्हणजे, ‘सुलेमानी किडा'. ‘न्यूटन' मधल्या कमांडर आत्माराम आणि न्यूटन या आदर्शवादाच्या दोन टोकांवरच्या माणसांचा संघर्ष हा असाच खूप प्रभावी आणि वेगळा. अमितच्या सिनेमात सिम्बॉलिझमचा वापर हा फार प्रभावीपणाने केल्याचा जाणवतो. ‘न्यूटन'मध्ये  आदिवासी पाड्यावर मतदानासाठी लोकांना उचलून आणायला लष्करी तुकडी जाते त्याचवेळेस एक म्हातारी कोंबडीच्या मागे लागले असते. लष्करी तुकडीने बळजोरी करून आदिवासी लोकांना मतदानासाठी घेऊन जाताना आणि ती म्हातारी कोंबडी पकडून, मारून, शिजवतानाचा प्रसंग समांतर घडत जातात. या प्रसंगाचं टेकिंग दिग्दर्शक अमित मसूरकरने फार जबरदस्त घेतलं आहे. ‘सुलेमानी किडा'मध्ये निर्मात्याचा वय वाढत चाललेला ड्रग अॅडिक्ट मुलगा जो आहे (ज्याला आदर्शवादी सिनेमा बनवायचा आहे) त्याच्याकडे एक मांजर आहे. त्याचं नाव फेलिनी. त्याचं प्रचंड लाडकं. त्या मांजराला तो जपत असतो. पण अशा काही घटना घडायला लागतात की सगळ्यांच्याच आदर्शवादाचे बुरुज ढासळायला लागतात. शेवटी एका दुर्दैवी क्षणी अपघातात ते मांजर मरतं. त्याच वेळेस गोंझो कपूरचा (निर्मात्याचा मुलगा) आदर्शवाद पण मरतो.  आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणे तो तद्दन व्यावसायिक सिनेमात काम करायला तयार होतो. ते मांजर गोंझोच्या आणि मैनक-दुलालच्या आदर्शवादाचं  रूपक म्हणून दाखवलं आहे. 


अमितचा बॉलीवूडच्या ओढून ताणून आणलेल्या  ‘हॅपी एंडिंग' प्रथेवर विश्वास नसावा. त्याच्या सिनेमाचे शेवट हे फार वास्तववादी असतात. ‘सुलेमानी किडा'मध्ये मैनक-दुलालची जोडी फुटते. दोघंही आपल्या वेगळ्या रस्त्यांनी निघून जातात. मैनक आपल्या तत्त्वांना मुरड घालून व्यावसायिक चित्रपट लेखक बनतो. दुलाल पुस्तक लिहायला लागतो. सिनेमाच्या शेवटच्या प्रसंगात एका कालखंडांनंतर मैनक आणि दुलाल एकमेकांना पुन्हा भेटतात. मैनक एक यशस्वी चित्रपट लेखक बनला आहे. त्या दृश्यात मैनक दुलालला विचारतो, "तुला आयुष्याचा अर्थ कळलाय का? मी सांगतो.’ असं म्हणून एक हातरुमाल एका विशेष आकारात घेऊन दुलालला दाखवतो. तो आकार जसा तुम्हाला दिसेल, तसा सिनेमा तुम्हाला आकळला. ‘न्यूटन'चा शेवट कसा आहे याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही समीक्षकांना तो फार लवकर संपल्यासारखा वाटतो. काही जण नेमका शेवट काय याबद्दल संभ्रमात आहेत. पण स्वतः अमितला ‘न्यूटन'चा शेवट संदिग्ध आहे, असं वाटत नाही. त्याच्या मते त्यात गोंधळण्यासारखं काही नाहीये. पण एक गोष्ट मात्र अमित आवर्जून सांगतो, ‘न्यूटन' ही कुठली प्रेमकहाणी नाहीये. अमितचे दोन्ही सिनेमे ज्या अवकाशात आणि प्रतलात घडतात ते एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. ‘सुलेमानी किडा' ‘इंडिया'मध्ये घडतो, तर ‘न्यूटन’ ‘भारता'मध्ये. हा अवकाशातला फरक अमितची दिग्दर्शकीय रेंज दाखवतो. 


‘न्यूटन'मध्ये संजय मिश्रा आणि राजकुमार राव या दोघांवर चित्रित झालेला एक फार सुंदर सीन आहे. पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया सांभाळणारा न्यूटन अशा अनेक प्रक्रिया कोळून प्यायलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत एका कळकट हॉटेलात बसला आहे. मिश्रा न्यूटनला विचारतो, "तुला काय वाटत न्यूटनचं महानपण कशात आहे "न्यूटन नेहमीचंच त्याने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध असं उत्तर देतो. मिश्रा म्हणतो, "इतके वर्षं ज्याचं नाव लावून तो फिरतोयस त्यांचं मोठेपण तुला अजून कळलंच नाही. विषमतेने भरलेल्या जगात राजे, सरदार, रंक, गरीब या सगळ्यांना न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडून एकाच पातळीवर आणलं हेच न्यूटनचं मोठेपण.’ असलं जबरी आणि जगावेगळं तत्त्वज्ञान आपल्या सिनेमातून मांडायला तुमच्यात काही तरी आतून जाळणारं असावं लागतं किंवा एखादा सुलेमानी किडा. इतक्या लहान वयात सांगण्यासारखं इतकं सगळं येतं कुठून, हा प्रश्न अमितचे सिनेमे पाहताना पुन:पुन्हा पडतो. तेसुद्धा संजय मिश्रा म्हणतो, तसं ‘इमानदारी का घमंड' न ठेवता. 

 

अमोल उदगीरकर
amoludgirkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...