आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषेची नवसंजीवनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वच भाषांमध्ये अधिकृत नोंदणी न झालेल्या असंख्य शब्दांची रेलचेल असते. ताटातल्या लालभडक लोणच्याच्या फोडीप्रमाणे हे शब्द भाषेची चव वाढवतात. बोलण्यात रंगत आणतात. दर पिढीत असे कैक नवनवे शब्द बनवले आणि वापरले जातात.


के सांचा घट्ट बुचडा किंवा अंबाडा बांधणाऱ्या एका शिक्षिकेला आम्ही मुली बुचडेश्वरी म्हणत असू. आमच्या खेड्यात ऐंशी ते नव्वदच्या दशकात गावातली तमाम मंडळी एकमेकांना सॅटेलाइट म्हणून अभिवादन करत. नमस्कार, रामराम, जयभीम, सलाम आलेकुम, या शब्दांप्रमाणेच सॅटेलाइट हा शब्द प्रचलित झाला होता. लहान मुलंही एकमेकांना दिसली की हात उंचावून सॅटेलाइट असं म्हणत. मारुतीच्या पारावर, वारकाच्या दुकानी सगळीकडे एकमेकांना सॅटेलाइट घातला जाई. कुणाचं लक्ष नसे तर जोराने सॅटेलाइट ओ सॅटेलाइट  असं म्हटलं की समोरचा माणूसही गडबडीने सॅटेलाइट सॅटेलाइट म्हणत असे. याची सुरुवात बहुधा गावातल्या कथेकऱ्याने केली होती. लोकांना एखादा शब्द आवडला की तो हवा तसा वापरायची मुभा भाषा देते. कुठल्याही भाषेचा लवचिकपणा तिला जिवंत ठेवतो. पेन चालत नसल्यामुळे माझा मुलगा रिफिल काढून मागून फुंकत होता. काय करतोस, विचारल्यावर म्हणाला, याला फुकारी मारतो. फुकारी मारण्यावरून फुंकणी शब्द अाठवला. आमच्या लहानपणी घरोघरी चुली आणि फुंकण्या होत्या. धूर वाढू लागला की, आम्ही फुंकणीतून चुलीत अशाच फुकाऱ्या मारत असू.


घराच्या बांधकामासाठी येणारे बालाघाटी मजून सिमेंटच्या तात्पुरत्या चुली बनवतात आणि इकडेतिकडे पडलेल्या एखाद्या पीव्हीसी पाइपने चूल फुंकतात. आमच्या खेड्यात पाइपला पयत असं म्हणतात. आण तो पयप इकडे, पाणी वाया जाऊ राहिलं, असं बोललं जातं.


एखादं काम तासनतास चालत असेल तर त्याला आवर लवकर तुझा पादुखाना असं म्हणतात. दवाखाना माहीत होता पण पादुखाना या अजब शब्दाची व्युत्पत्ती काय ते मला सापडलेलं नाही. पादुखाना म्हणजे रटाळ, कंटाळवाणं काम. नांदुरा तालुक्यात वापरला जाणारा आणखी एक मजेदार शब्द म्हणजे पुंगीपेटारा. म्हणे घरभर असलेला पसारा. 


इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं राेज मराठीत नव्या शब्दांची भट टाकतात. सुदेष्णा टीचर फार कानपकडू आहे, किंवा राहुलसर रट्टेमारू आहेत.
शाळेच्या रिक्षाला यवतमाळात स्कूल यॅटो म्हटलं जातं. भाऊ काय करतात, असं विचारल्यावर ते यॅटो चालवतात, असंच सांगितलं जातं.
आमच्या लहानपणी आ दा टिंग लिंगदा असा खेळ कुणीतरी शोधून काढला होता. म्हणजे पकडापकडीचा खेळ. आ दा टिंग लिंगदा म्हणजे ये मला पकड. माझा मुलगा शाळेतून आल्यावर एकदा म्हणाला, रस्त्यात खूप हाणमार झाली, म्हणजे मारामारी झाली. त्यांच्या शाळेतला एक मुलगा फार खच्चड आहे, असं ते म्हणतात. म्हणजे तो फार हट्टी आहे. त्यांचे जेवण पेटफाडू असतं, म्हणजे भरपेट. लहान मुलं फार सुंदर बोलतात. कुठलाही भाषिक भेदाभेद न करता मजेदार शब्द बनवतात. वर्गात मोठ्याने रडणाऱ्या पोरीला ते गळाफाडू म्हणतात. शांत बसणाऱ्या लेकराला बापूजी म्हणतात. भाषातज्ज्ञ म्हणतील कदाचित की, ही मुलं भाषेचा मुडदा पाडत आहेत. पण मला वाटतं की, ती मुडदा होऊ पाहात असलेल्या भाषेला अशा नवनवीन शब्दप्रयोगांनी नवसंजीवनी देत आहेत.


(तुम्ही काय असे शब्द वापरता, खास तुमच्या कुटुंबात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये? किंवा तुमच्या गावात काही विशिष्ट शब्द तयार झालेले आहेत का? आम्हाला नक्की कळवा, इतर वाचकांनाही त्यांचा आनंद घेता येईल.)


- अमृता खंडेराव, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...