आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणतेही व्यक्तिसापेक्ष आत्मचरित्र वा आत्मकथन हा काळाचा सामाजिक सांस्कृतिक आणि काही अशांने राजकीय इतिहासच असतो. त्याच अर्थाने ओमप्रकाश वाल्मीकीलिखित आणि डॉ. मंगेश बनसोड अनुवादित ‘उष्टं’ नावाने प्रकाशित आत्मकथन उत्तर भारतीय पुरुषसत्ताक सरंजामी जातीयवादी मानसिकतेचा पर्दाफाश करणारा काळाचा जाहीरनामा आहे...
शतकांच्या अन्याय अत्याचार, दासप्रथेहून लाजिरवाणी गुलामगिरी अन्् अनन्वित छळांच्या विरोधात ६०-६२ च्या दरम्यान अमेरिकेत आकाराला आलेली ‘ब्लॅक पँथर’ही कृष्णवर्णीयांची चळवळ. डीडीटीच्या अनिर्बंध वापरातून मानवी जीवन आणि पर्यावरणाच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकणारं राचेल कार्सनचं ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक, त्या प्रभावातून निर्माण झालेली ‘पर्यावरण चळवळ’,नंतरचे तिचे ग्रीनपार्टी या राजकीय पक्षात झालेले रूपातंर. नवसमाजवादाची स्वप्नं उरात बाळगून जगभरातून उफाळलेली बंडखोर युवकांची चळवळ. वसाहतवादी अमेरिकेने व्हिएतनाम या छोटया देशावर लादलेल्या प्रदीर्घ युद्धातून उदासिन बुध्दिजीवींचे जिप्सी चळवळीत झालेलं रूपातंर, यातून पाश्चात्त्य जगात आकाराला आलेली युध्दविरोधी शांततावादी चळवळ...
सततचा दुष्काळ, बेकारी, कुपोषण, शासनाची जनतेविषयीची अनास्था आणि अत्याचार जगभरातील नवसमाजवादा’विषयीचे आकर्षण, डाव्या पक्षातील वैचारिक अन्् धोरणात्मक मतभेद या सर्वांच्या प्रभावातून भारतातील संवेदनशील बुध्दिजीवी तरुणांवर प्रभाव टाकणारी नक्षलवादी चळवळ...
उलथापालथ घडवून आणणाऱ्या या सर्व घटनांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम,बाबासाहेबांच्या मानवमुक्ती लढ्यातून आलेले आत्मीय भान,नव्याने शिक्षित उन्नत होऊ इच्छिणाऱ्या दीनदुबळयांवर सरंजामशाही जातीयवादी मानसिकतेतून महाराष्ट्र, तामिळनाडू, हरियाणा, बिहार यासारख्या राज्यांत वाढते अन्याय- अत्याचार. या अमानुष आगडोंबाविरोधात महाराष्ट्रातील शिक्षित दलित युवकांतून लोकशाही समाजवादी विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात ‘दलित पँथर’ ही सांस्कृतिक- साहित्य चळवळ उदयास आणली...
प्रत्यक्ष शहर-गावांतून सुरू झालेल्या या कृतिशील दलित चळवळीतून शतकांच्या निद्रेत गर्क असलेल्या रूढीप्रिय जातीयवादी व्यवस्थेला केवळ जागं करण्याचे काम केलं नव्हे तर एकूण मराठी साहित्याला नवीन क्रांतिकारी आयाम दिले. एक नवीन परिभाषा, नवीन अभिव्यक्ती आणि आजवरच्या भक्तिसंप्रदायात निर्माण झालेल्या अमूर्त ‘अाध्यात्मिक लोकशाहीला’ प्रत्यक्ष सांप्रदायिक सद््भावनेचा जनाधार देण्याचे महान कार्य या दलित साहित्य चळवळीने केले.स्वातंत्र्य, समता, बंधुता हे अांतरराष्ट्रीय ठराव वा निव्वळ घोषणा नाहीत तर दैनंदिन जीवन व्यवहारातील महत्त्वाच्या बाबी आहेत याची जाणीव दलित मराठी साहित्याने निर्माण केली.
मराठी दलित साहित्य सांस्कृतिक चळवळीचा महाराष्ट्रातील शिक्षित साक्षर अन् सुजाण समाजावर निश्चितच दीर्घकालीन सकारात्मक असा परिणाम झाला. मराठीत सामाजिक जाणीवेचे साहित्य निर्माण झाले, संवेदनशील शिक्षित तरूणांना ‘मानुषता’या व्यापक संकल्पनेवर नव्याने विचार करायला प्रवृत्त केले. इथल्या मराठी सारस्वतांनी खुल्या दिलाने दलित साहित्य चळवळीचे स्वागतच केले. मानवी गुलामगिरीविरोधात स्वातंत्र्याचा उद््घोष करणारी सत्तरच्या दशकात सुरू झालेली ही युगप्रवर्तक दलित साहित्य सांस्कृतिक चळवळ केवळ मराठीपुरतीच मर्यादित न राहता, झंजावातासारखी सर्वदूर पसरली. तमिळ, तेलगूू, कन्नड, गुजरात, पंजाब, आणि उत्तरेतील चार राज्यांच्या हिंदी भाषिक पट्ट्यात फोफावत गेली. इतकेच नव्हे तर पूर्वेच्या ओरिसा -बंगाल उत्तरपूर्व सर्व शोषित दलित,आदिवासी जनजातींच्या उरातून ती प्रस्फुटित होत राहिली. आज आत्मिक,सामाजिक विषमतेविरोधात मुक्तिगामी सूर आळवणारी ही ‘दलित अभिव्यक्तीची भाषिक चळवळ’ जनतेच्या विचारांत प्रवाहित हाऊन समग्र बदलाच्या जथ्यात गुजरात- हरियाणा- उत्तर प्रदेशात अग्रगामी होताना दिसत आहे.
कोणत्याही नवीन साहित्य प्रवाहाची सुरुवात अर्थातच कवितेपासून होते. नंतरचा तिचा टप्पा आत्मकथनाचा असतो. पावसाच्या थेंबाच्या प्रवासाप्रमाणे अंतमितः कविता, कथेचा प्रवास कादंबरीच्या सागराला जाऊन मिळतो. ऐंशीच्या दशकात लिहिल्या गेलेल्या दलित आत्मकथनांच्या प्रेरणेतूनच देशभरातल्या आदिवासी, ओबीसी, जनसमूहातील शिक्षित संवेदनशील लेखकांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाचा दारुण वृतांत सांगत जातीय सामाजिक अन्् हालाखीच्या वर्गीय वास्तवजीवनाचा निर्भीडपणे लेखाजोखा घेतलेला दिसून येतो. कोणतेही व्यक्तिसापेक्ष आत्मचरित्र वा आत्मकथन हा साहित्यप्रकार त्या काळाचा सामाजिक सांस्कृतिक आणि काही अशांने राजकीय इतिहासच असतो. तामिळ बंडखोर लेखक कांचा इलाही यांचे ‘व्हाय आय एम नॉट हिंदू’ हा ग्रंथ भारतीय आदिम जनजातींचा रूढीपरंपरांतून प्रवाहित झालेला सांस्कृतिक इतिहास आहे. हिंदीमध्ये आधार प्रकाशनाच्या वतीने ‘वो गुजरा जमाना’हे जगप्रसिध्द ऑस्ट्रियन लेखक स्टीफन स्वाइगचे ‘द वर्ल्ड ऑफ यशस्टरडे’ हे आत्मचरित्र फॅसिझमच्या उगमापूर्वीच्या ऑस्ट्रियातील सांस्कृतिक अन्् सामाजिक जीवन त्यातील ताणेबाणे यांचा दस्तऐवज आहे. अथवा डॉ. तुलशीरामचे ‘मुर्दहिया’ ही आत्मकथनं लेखक जगत असलेल्या काळातील ऐतिहासिक मूल्यमापन आहेत.
याच प्रवाहातले ओमप्रकाश वाल्मीकीचे मूळ हिंदी भाषेतील ‘जुठन’, ज्याचा मराठीत डॉ. मंगेश बनसोड यांनी ‘उष्टं’ अनुवाद केला, तेे आत्मकथन उत्तर भारतीय पुरुषसत्ताक सरंजामी जातीयवादी मानसिकतेचा पर्दाफाश करणारा जाहीरनामाच होऊन जाते. एरवी, प्रतिष्ठितांनी सार्वजनिक पंक्तीत हादडून उरलेलं खरकटे जे कोंबड्या-कुकड्यांचे, कुत्रेमांजरे, डुक्कर अाणि बिनदाव्यांच्या गुरांचे अन्न होते, अंतिमतः उकिरड्याचे जे धन,ते गरीब सामाजिकदृष्ट्या उपेक्षित अपमानित माणसांना खायला भाग पडणाऱ्या समाजात डॉ. ओमप्रकाशाचा जन्म झाला आहे. हाक मारताना विशेषनाम उच्चारायचे नाही, ‘भंग्या’ अथवा भंग्याच्या’असा सर्रास उपमर्द करायचा, त्या वाल्मिकी समाजाचे प्रतिनिधित्व ओमप्रकाश करत आहेत. पावसात, उन्हात रस्त्याच्या मॅनहोलमधे काम करणारी या समाजातली माणसं रस्त्यातून जाता येता आपण कधी पाहत नाही... जणू ती आहेत, राल्फ एलिसन या महान कृष्णवर्णीय लेखकाच्या ‘इनव्हिजिबल मॅन’या कादंबरीतील अदृश्य पात्रं.
एवढ्या विदारक अनुभवांची कहाणी सांगताना, ओमप्रकाश वाल्मीकींची भाषा कधी धुवांधार वादळासारखी ,तर कधी झाडांझुडपांतून वाहणाऱ्या निरायम झऱ्यासारखी मुलायम आहे. ती मूलतः निसरड्या कल्पनांपासून अन्् अमूर्तवादापासून दूर आहे. त्यांचे कथन वास्तवातील घटनांशी घनिष्ठ संबंध साधत गतकाळातील कडूगोड आठवणींतून नितळ व्यक्त होत रहाते. वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. गावातील जातीय उतरंडीतील एकमेकांशी तुटलेल्या जैविक नात्यांचा एखाद्या समाजशास्त्रीय विचारवंतासारखा उलगडा करून दाखवते. दलित अन्् इतर मागास समाजातील आर्थिक स्थिती कमीजास्त फरकाने सारखीच, सामाजिक अपमानजनक वागणूकही ओबीसींना मिळतेच.तरीही केवळ वरच्या जातींच्या दबावाने एकादा परिटसमाजातील मित्र पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्या वाल्मीकी समाजाच्या मित्राचा धुतलेला शर्ट इस्त्री करून देवू शकत नाही,ही जैविक अन्् आत्मिक नाते तुटलेली समाज व्यवस्था, यातून पुढे येते.
ओमप्रकाश वाल्मीकींच्या आत्मकथनातील प्रत्येक पान जातीय आणि हलाखीच्या वर्णनाने वाचकाला बधीर करून सोडणारे आहे.शाळेत प्रवेश घेतलेल्या वाल्मीकी समाजातल्या पोराला संपूर्ण शाळा अन्् भोवतालचे आवार झाडून काढण्यासाठी प्रत्यक्ष हेडमास्तरांने भाग पाडणं,दूर कुठं वीसपंचवीस किलोमीटरवरच्या गावातून उपाशी पोटाने दुचाकी सायकलवरून गव्हाचे पोत आणायाला पाठवणं,लहानग्या जीवानं भुकेसाठी आपली जात लपवून त्यांच्या “पवित्र’भांड्यात जेवल्याने कुत्र्याच्या मौतीचा मार मिळणं... हे सगळं वाचतानाही नि:शब्द आक्रोश भरलेल्या आत्म्याचे आक्रंदन आपल्या कानावर येते.‘कोण माझा करील परिहार’चा चोखोबाचा आकांत आठवतो. तरीही वाल्मीकीसारखी उतुंग आकांक्षांची माणसं जातीच्या पराभवांचे आडथळे पार करीत महाराष्ट्रात सुरू झालेल्या मुक्तीच्या लढ्यापर्यंत पोहोचतात. उत्तर भारतात मुक्तिगामी साहित्याची वीट रचतात. मंगेश बनसोड यांनी हे पुस्तक मराठीत अनुवादित करून आणि “लोकवाङ््मय’ने प्रकाशित करून फारचे मोलाचे काम केले आहे.संजय मोरेंचं मुखपृष्ठ आणि श्रीधर अंभोरेंची रेखटानं अप्रतिम आहेत.
पहिल्या पंचवार्षिक योजनेनंतर दलित आणि इतर मागासवर्गीय समूहांचा अक्षरांच्या दुनियेत येणारा जो अपमानजनक प्रवास आहे, त्यातील प्रत्येक जातीच्या तरुणाचे चरित्र म्हणजे अाधुनिक महाभारताचे समांतर अाख्यान आहे. पाथेरपांचली, धग, फेसाटी आणि ओमप्रकाश वाल्मीकींची जुठन ज्याला मराठीत आपण म्हणूयात ‘उष्टं’ ही केवळ छुटपुट उदाहरणं आहेत.अशा असंख्य आत्मचरित्रांची,आत्मकथनांचे सर्ग आणि अख्यानं या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत येतच राहतील.नंतरच जात-पात स्त्री-पुरुष धर्म -वंश विषमताविरहित महाकाव्याची सामूहिक निर्मिती होईल.पण खूप आव्हाने आहेत, आपल्यापुढे वैश्विक. तोवर वाचनातूनच आपणाला माणूस म्हणून प्रगल्भ व्हायला हवे आहे...
- आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क - 9823155768
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.