आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडेलोटच्‍या पूर्व संध्‍येचा वृत्‍तांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरुवातीपासून जनहिताची काळजी घेणारे चिंगिज आइत्मातोव यांनी सोव्हिएत पतनानंतर काळानुरूप आपल्या समूहकेंद्री भूमिकेला युद्ध विरोधी पर्यावरणवादी अन ‘वैश्विक नैतिकते’ची जोड देवून तिला अधिक व्यापक केलं आहे. या अर्थाने चराचर आस्थेचे त्यांचे संपूर्ण साहित्य मानवाच्या आत्मिक विकासासाठी  आहे. त्यातही  ‘कसांद्रा दाग’ ही त्यांची कादंबरी साहित्यिक अभिव्यक्तीचा सर्वोच्च आविष्कार आहे...

 

जागतिक अभिजात साहित्याला रशियाने फार मोठं योगदान दिले आहे. सर्वश्रेष्ठ कादंबरीकार दोस्तोवस्की, ‘वॉर अँड पीस’ या कादंबरीचे महान लेखक टॉलस्टॉय, कवी पुष्किन कथाकार अन् नाटककार चेखोव्ह, दुसरे एक प्रसिद्ध कादंबरीकार तुर्गनेव्ह, नोबेल पुरस्कार विजेते ‘डॉ झिवॅगो’ कादंबरीचे लेखक बोरिस पास्तरनाक. अश्लील कादंबरीकार म्हणून ज्यांचा उपमर्द केला जात असे, ते ‘लोलिता’चे व्लादिमीर नबोकोव्ह, जगभरातील भाषेत जिचा अनुवाद झाला, त्या ‘मदर’ या कादंबरीचे लेखक मॅक्झिम गॉर्की. क्रांतिकारी भविष्यवादी कवी मायकावस्की, मराठीत जिचा अ.ना.पेडणेकर यांनी ‘डॉन माय शांत वाहते’ या नावे भाषांतर होऊनही फारसे परिचित नसलेले मिखाईल शोलोखाव्ह.  प्लेखानोव आणि हरिश्चंद्र थोरात ज्यांचे संदर्भ देतात, ते मिखाईल बाख्तिन हे समीक्षक, असे किती तरी रशियन कवी-लेखक जगभरात प्रसिद्ध आहेत. सोव्हिएत रशियन क्रांतीचे हे ‘शतक महोत्सवी वर्ष.’ रशियन क्रांतीने जगाला काय दिले? यावर बोलण्याइतपत राजकीय प्रगल्भ माणूस मी नाही. पण सोव्हिएतांनी जगात पहिल्यांदा सार्वत्रिक साक्षरता मोहीम सुरू केली. अभिजात जागतिक वाङ््मय सोव्हिएत गणराज्यातील विविध भाषांत उपलब्ध करून दिले, रशियन लेखकांची पुस्तकं जगभरातील भाषेत अनुवादित केलीत. स्वस्त मुबलक पुस्तके जिथे वाचायला मिळतात, त्या भूमीत महान कवी-लेखक निर्माण होतात.


आज मी चिंगिज आइत्मातोव या मराठीत फारसे परिचित नसलेल्या तरीही साहित्य अकादमीने अनुवाद केलेल्या ‘कसांद्रा दाग’ या त्यांच्या वैज्ञानिक भविष्यवादी कादंबरीवर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. क्रांतीनंतर जन्मलेल्या आणि सोव्हिएत पतनाचे साक्षी असलेल्या, चिंगिज आइत्मातोव (१९२८-२००८) या प्रख्यात लेखकाच्या कादंबरीचा अनुवादसुद्धा असंख्य भाषांत झालेला आहे. त्यांच्या साहित्यात लोककथांचा वापर केवळ प्रागैतिहासिक गोष्टी म्हणून येत नाही, तर वर्तमानकाळाचे संदर्भ देत ते अाधुनिक काळाच्या दंतकथा निर्माण करतात. ज्यात वास्तवाचे रास्त भान आणि भविष्याविषयीचे सूचक आकलन असते.


त्यांच्या आस्थेचा अन् काळजीचा विषय मानवाकडून माणसांचे होणारे सर्वार्थांचे शोषण हा आहे. तशीच आस्था त्यांना मानवासोबत राहणाऱ्या जीवमात्रांविषयीसुद्धा आहे, ज्यात हजारो वर्षांपासून मानवी सहवासात असणारे कुत्रा, घोडा, उंट, याक हे प्राणीच नव्हे, तर मानवी वस्तीनजीक राहणारे हत्ती, अस्वल, लांडगा, चित्त्यासारखे प्राणी. कावळा, चिमणी, पोपट अन् सारससारखे पक्षीसुद्धा आहेत. तुकारामांसारखेच ते म्हणतात, शब्द हे मानवाचे देव आहेत. मेंदू हात-पायांच्या अव्याहत धडपडीतून नवीन निर्मिती आकाराला येते, ती आठवणीत राहण्यासाठी तिला सांकेतिक चिन्ह आणि नंतर त्या चिन्हाचा विशिष्ट उच्चार इथून तयार झाली भाषा, सुरू झाला संवाद, भाषा ही आपल्या अनुभवांचे संवादाचे संचित. शब्द आणि भाषेतून आपण जीवंत आहोत. भाषा अविनाशी अमर म्हणून शब्द हे ‘देव’ आहेत, आपले.


संवादक, विचारी बुद्धिमान मानवांचे व्यक्त जग. वनस्पती अन् प्राणिमात्रांचे दुसरे जग आहे, ते अव्यक्तांचे.  जगण्याच्या अन् टिकून राहण्याच्या स्वाभाविक गरजेतून आत्मिक स्तरावर भविष्यातील पूर्वसूचना ग्रहण करण्याची अद््भुत शक्ती या मानवेतर प्राणिमात्रांना लाभलेली आहे. त्याचे अगदी साधे उदाहरण हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशातून समशीतोष्ण वा उष्ण कटिबंधात दीर्घ अंतराचे स्थलांतर करणारे पक्षी, जहाज बुडण्याअगोदर जिवाच्या आकांताने समुद्रात समूहाने उड्या मारणारे उंदीर, भूकंपाची पूर्वकल्पना असलेले काही प्राणी, पक्षी. चेंगिज आइत्मातोव यांच्या मतानुसार जीवसृष्टीतील प्रत्येक सजीवाचे अस्तित्वात येण्यामागे काहीएक प्रयोजन आहे. त्या प्रयोजनाचा उलगडा करण्यासाठीच बहुधा आइत्मातोव यांनी आपल्या समूहकेंद्री भूमिकेला युद्धविरोधी पर्यावरणवादी अन् ‘वैश्विक नैतिकते’ची जोड देऊन तिला अधिक व्यापक केलं आहे.या अर्थाने चराचर आस्थेचे त्यांचे संपूर्ण साहित्य मानवाच्या आत्मिक विकासासाठी आहे. 


त्यांच्या ‘कसांद्रा दाग’ (मूळ रशियन भाषेतील ही कादंबरी साहित्य अकादमीने प्रकाशित केली आहे. हिंदीत तिचा सुंदर अनुवाद ए. चारुमती रामदास यांनी केला आहे.) हे कादंबरीचे शीर्षकसुद्धा अर्थपूर्ण आणि सूचक आहे. कसांद्रा ही ग्रीक पुराणातील ट्रॉयचा राजा प्रिआम आणि राणी हेकुबाची मुलगी. अपोलो या महान देवाची ती पुजारीण. कोणत्या एका चुकीमुळे तिला मिळालेल्या शापामुळे तिने वर्तवलेल्या भविष्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. कादंबरीतील कथानकाची मध्यवर्ती संकल्पनासुद्धा अशीच आहे. कादंबरीचा कालावधी विसाव्या शतकातील अखेरच्या दशकातील साधारण महिनाभराचा असला, तरी तिचा आशय चिंतन आणि आस्थेच्या अनुषंगाने आजअखेरपर्यंत लांबवता येऊ शकतो.कथानक एकाच कालावधीत अनेक स्तरावर अमेरिका, अटलांटिक महासागर अन् रशियातील लेनिनची समाधी असलेल्या क्रेमलिन या शहरात घडत राहते. भविष्यवादी विज्ञानाचे प्राध्यापक रॉबर्ट बोर्क फ्रँकफर्टच्या एका परिषदेतून विमानातून न्यूयार्कला जात असताना महासागरात व्हेल माश्यांचा प्रचंड जथा कालक्रमण करत असताना त्यांना दिसतो. त्यांच्या मते व्हेल हे समुद्रातील रडार आहेत, जे भविष्यकालीन  अरिष्टांचा संकेत समजावून घेतात. तो मानवाला समजावा म्हणून आपल्या प्राणाची बाजी लावून प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येवून समूहाने आत्महत्या करतात.  


बोर्क आपल्या पत्नीला व्हेल माशांचे प्रयाण सांगण्यासाठी फोन करत असताना त्यांना एक वेगळीच बातमी त्यांची पत्नी जेस्सीकडून समजते. सत्तरच्या दशकात सोव्हिएत रशियाने अंतराळ स्टेशनावर पाठवलेल्या आणि नंतर पृथ्वीवर परतण्यास ज्याने नकार दिला त्या स्वयंघोषित पाद्री फिलेफाई, जो जीवविज्ञानाचा शास्त्रज्ञ आहे याने व्हॅटिकनच्या पोपला एक सविस्तर पत्र पाठवले आहे, जे ‘ट्रिब्यून’ या जगविख्यात वर्तमानपत्राने छापलेले आहे. त्याच्या जीवशास्त्रीय शोधानुसार मातेच्या उदरात जन्माला येणाऱ्या भृणाला सुरुवातीच्या काही कालावधीत पृथ्वीवरील आपल्या भविष्याचा पूर्वाभास होतो आणि भूतलावर जन्म घेण्याचे तो नाकारतो. ही नकाराची सूचना देण्यासाठी मातेच्या माथ्यावर लक्षात न येणारा विरळ डाग उठतो. फिलेफाई शास्त्रज्ञाने निर्मित केलेल्या काही किरणाने काही अपाय न करता तो डाग अधिक ठळक दिसतो. या पादरी शास्त्रज्ञाचा उद्देश एवढाच की, पृथ्वीवर जन्म घेण्यास भृणांचे वाढणाऱ्या नकारांचे प्रमाण अलीकडच्या काळात प्रचंड वाढत असले तरी लोकांच्या ते लक्षात येत नाही. पृथ्वीवासीयांनी मात्र यावर गंभीर विचार करावा, यावरून जगभरात गोंधळ उडालेला आहे. बोर्कला जेस्सी सांगते, घरी आल्यावर ते पत्र तू सविस्तर वाच.


अमेरिकेत  याच दरम्यान अध्यक्षीय निवडणूक चालेली आहे. रॉबर्ट बोर्कचा विश्वविद्यालयीन सहपाठी मूळचा हंगेरियन ऑलिव्हर ओडॉर्क अध्यक्षपदासाठी उभा राहिलेला आहे. ओडार्क या शब्दाचा अर्थ आहे, ‘सैतान’. त्याचे व्यक्तिमत्त्व कुठल्याही हुकूमशहासारखेच आहे. देशांदेशात अंतर निर्माण करणाऱ्या सीमारेषा, धार्मिक, वंशिक आणि जातीजातींमधील  युद्ध, प्रगत जगातील दोन महायुद्धं, अणुबाँबमुळे होणारा जीवसंहार, भूगर्भातील पेट्रोलपाणी यांचा मुनाफेखोर वारेमाप अतिरिक्त वापर, जंगल-जमीन अन् सगळं जगच गिळंकृत करण्याचे जगभरातील कंपन्यांचे षडयंत्र आणि यातून नवजात अर्भकांचा जन्म घेण्याचा नकार, अशी अगाध समज येऊन रॉबर्ट बोर्क चिंतेत असतानाच, यावर तातडीचा उपाय काय? म्हणून ओडॉर्क बोर्कला फोन करतो.तुम्ही जनतेचे शत्रू म्हणून फिलेफाईसोबत बोर्कला दोषी ठरवतो. दोघांविरोधात जनक्षोभ उसळतो. यात क्रेमलिनचे लेनिनच्या समाधी परिसरातील दृश्य अन् अदृश्य जग पाहणारे एक घुबड आणि मध्यरात्री अवतीर्ण होणारी दोन भूतं यांचेही एक उपकथानक आहे.


आपली भूमिका सांगण्यासाठी रॉबर्ट बोर्क ट्रिब्यून या वृतपत्राला तातडीने लेख देतो, तो आपत्कालीन अंक म्हणून छापूनसुद्धा येतो. या कामात नवीन पिढीचा प्रतिनिधी संवेदनशील बुद्धिमान अँथोनी युंगर बोर्क दापंत्याच्या मदतीला धावतो, पण तत्पूर्वीच सत्याला सामोरे जाणाऱ्या सॉक्रेटिससारखेच प्रक्षुब्ध जमावांच्या क्रोधाला रॉबर्ट बोर्क बळी पडतात. याआधीच प्रगत विज्ञानाच्या मदतीने युंगरने फेलिफाईसोबत संपर्क साधलेला असतो. टेलिब्रिज या माध्यामाद्वारे त्यांच्या मुलाखतीचे आयोजनही केलेले असते. परंतु अंतराळ स्टेशनात पृथ्वीवरच्या घडामोडी पाहणारा फिलेफाई उद््विग्न होतो, जगभरातील लाइव्ह प्रसारणात आपले स्वगत मांडतो, डाग उजळ दिसण्याची किरण सोडणे बंद करतो. अन् दु:खी होऊन अंतराळाच्या विवरात उडी घेवून स्वतःला देहांताची शिक्षा देतो. 


तो खाली कोसळत असतानाचे प्रक्षेपण पाहणाऱ्या लोकांना अॅटलांटिकच्या किनाऱ्यावर हजारो व्हेल मासे, ज्यांना भारतीय भाषेत ‘देवमासा’ म्हणून आदराने संबोधले जाते आणि सागरी प्रदेशातातील माणसांच्या दंतकथेत मानवाचा आदिम पूर्वज म्हणून घोषित केले जाते, ते पर्वतप्राय मूक प्राणी मानवावर येऊ घातलेल्या अरिष्टाची पूर्वसूचना देण्यासाठी आत्महत्या करतात. मानवाने आत्महत्या करण्याचे मिळवलेले आत्यंतिक टोकाचे स्वातंत्र्य ही मानव आणि देवमासे यांच्या जीवनातील सर्वात मोठी शोकांतिका आहे, हे इथे जाणवते.


- आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com
लेखकाचा संपर्क :  ९८२३१५५७६८

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...