आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अव्यक्त मनाची घुसमट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रगती आणि समृद्धीच्या या भरधाव रस्त्यावर धावताना बरंच काही मागे पडत चाललंय. रक्ताची माणसं, नात्याची माणसं, या माणसांना साथ देणारा निसर्ग, भाषा सारं निसटत चाललंय. पण हे निसटलेपण, त्यातून येणारं रितेपण सांगायला तरी कोण उरलंय? फेलिक्स डिसोजाची कविता त्याच घुसमटीचा आविष्कार आहे...

 

एकोणीसशे नव्वदनंतर मानवी जीवनाला व्यापून राहिलेल्या प्रत्येक घटकांवर जागतिकीकरणाचा चांगला-वाईट परिणाम झालेला आहे. ज्यात पृथ्वीच्या अस्तित्वाशीच निगडीत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास याचा सर्वाआधी उल्लेख करायला हवा. भारतातच नाही, तर जगभरात पारंपारिक शेतीचं उध्वस्तीकरण झालंय. शिक्षण अधिकाधिक खर्चिक आणि खाजगी झालेलं आहे. नोकरीत असुरक्षितता येऊन तिचं कंत्राटीकरण झालेलं आहे. जंगलांचा ऱ्हास, किटकनाशकाच्या वाढत्या वापराने पाणी दूषित झालंय आणि  महागडी न परवडणारी औषधं त्यामुळे सर्वसामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. माणसं  दवाखान्याऐवजी मृत्युला जवळ करीत आहेत. कमालीच्या अर्थिक विषमतेमुळे  कुपोषित, गरीबी वाढत चाललीय, सांप्रदायिक सद््भावना लयाला चालली आहे. माणसा-माणसांतील संवाद संपत चालला आहे. धर्म, जात, वंश लिंग या सांस्कृतिक पर्यावरणात अंर्तभूत होणाऱ्या गोष्टीसुद्धा जागतिकीकरणाच्या कराल पंज्यातून सुटलेल्या नाहीत. शहरं भणंग, रोगराईग्रस्त अन् दंगलखोर होत आहेत. गावात काम नसलेले बेकार धर्म अन् जातीच्या भेदभावात आपपसात लढत आहेत. गावातली माणसं पुरेशा अन्नाअभावी जगण्यास कुठलाच पर्याय नसल्याने शहराकडे स्थलांतर करत आहेत. या सर्व गोष्टींचा परिमाण, एरवी रंजनाच्या उद्देशासाठी निर्मित कला साहित्य-संगीत सिनेमावर प्रकर्षाने  जाणवत आहे.


फेलिक्स डिसोजा हा वसई परिसरातील कुठल्या एका पाड्यावर राहणारा एक सामान्य तरूण. आपल्या गावावर, तिथल्या माणसांवर, निसर्ग नि समुद्र भाषेवर, लोकगीतांवर, म्हणी अन् वाक्प्रचारावर स्वतःच्या श्वासाइतकेच निरातिशय प्रेम असलेला. ज्याने आजवर कुणाचा कधी द्वेष केलेला नाही, आयुष्याकडून फार मोठ्या समृद्धीची  त्याची स्वप्नं नाहीत.  वडिलोपार्जित  रितीरिवाज, गावात असेलेली एकमेकांना मदत करण्याची मानसिकता झाडझुडपांसारखीच त्याच्या आत सावलीसारखी वस्तीला आलेली आहे. ज्याने परक्या धर्माचा, जातीचा कधी तिरस्कार केलेला नाही. जसे झाडातून वारे वाहते, ओढ्यातून पाणी अन् कष्टाच्या उसंतीत ओठातून गाणे जन्मते अशी सुचते, त्याला कविता.


सामाजिक जाणीव अन् राजकारण त्याच्या दैनंदिन जगण्यापासून कोसो मैल दूर असले तरी एक संवेदनशील जबाबदार शिक्षक म्हणून गावाच्या बदलत्या स्थितंतराचा तो साक्षीदार  जरूर आहे. वस्तुत: माडापोपळीच्या वनात आजवरच्या हजारो वर्ष न बदलेल्या पूर्वापार गावात राहाणारा तो मुळचा ‘निसर्गवादी’ कवी. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात विहीर, बो, आणि बालश्यासारख्या गावपरिसरातील व्यक्ती अन् स्थळावर त्याने कविता लिहिल्या आहेत.


‘विहीर’ ही कविता मला न समजलेली, तरीही तिच्यातील प्रतीक-प्रतिमांनी वाचकाला मोहित करून भारवलेल्या शब्द आणि आशय सूत्राने लक्ष वेधून घेणारी आहे. ही कविता कळतनकळत एका अबोध, गूढ वातावरणाकडे घेवून जात असली, तरीही मानवी जीवनाशी जैविक  नाते, असणारी ही कविता  मला निबिड जंगलात अज्ञातवासात राहिलेला, क्रांती आणि प्रेमाचे वास्तवदर्शी काव्य रचणारा चिलीचा राष्ट्रकवी पाब्लो नेरूदाची आठवण करून देते. पाणी-जमीन अन् भोवतालच्या प्रदेशाशी एवढे एकजीनशी नाते असणारा, हा कवी मराठीतील, बालकवी, अजय कांडार, अन कल्पना दुधाळ या कवींशी आपले नाते जोडून राहतो.


या संग्रहातली फेलिक्सची आजीवर लिहिलेली बो’ ही कविता तेवढीच श्रेष्ठ. एकाद्या लोकमान्य विभुतीवर लिहिलेल्या कवितेत विषयवस्तू असलेल्या सामान्य माणसाला उचीत न्याय देणारे प्रत्ययकारी चित्रण क्वचितच कुठे दिसते. बहुतांश वेळी माणसावर कविता लिहिणारा कवी आपल्या इच्छाअाकांक्षा अपेक्षा त्याच्यावर लादतो. कैकदा व्यक्तीमधील दोष दाखवतो अथवा आपल्या मनासारखे जी वावरली नाही, म्हणून  आरोपही करतो. एक माणूस म्हणून व्यक्तीचे वैयक्तिक जगणं आपण सहसा मान्य करीत नाही. मृत्युच्या दारात असेतोवर माणसाचे म्हणून एक जागृत,अजागृत जग असते, याची दखल आपण घेत नाही. म्हणूनच व्यक्तीच्या आठवणींच्या अव्यक्त प्रातांत अभावानेच आपण कधी प्रवेश करतो. फेलिक्स या कवितेत म्हणतो, ‘तिला दिसत नाहीत माणसं, दिसतात माणसाचे आकार... ऐकू येत नाहीत शब्द, ऐकू येतात भाषेत गुदमरलेल्या तिच्या शब्दांच्या हाका...’


माणसांत अन निसर्गात रमणारा हा कवी भोवतालच्या बदलणाऱ्या वास्तवाने हळूहळू अंर्तमुख होतो. ‘गावातल्या वातावरणातील स्तब्धता’ या आपल्या कवितेत सहज म्हणून जातो,
त्यांना गाता येत नाही
आणि जे सकाळी भरभर कुठे कुठे निघून गेले आहेत
ते ओढाताणीच्या आणि स्पर्धेच्या पिंजऱ्यात अडकले आहेत.
त्यांच्या डोळ्यात भविष्य खातंय हेलकावे...
आजवर कष्ट करीत सांजेच्या उसंतीत कधी कुटुंबात वा पारावर गजाली ठोकीत, हिरव्या गवताच्या रानात कधी खोंडाने उंडरताना जसे आपले शेपूट हवेत उंचवावे, तसा जत्रेत आनंदात आपल्या टोप्या अन् डोकीचा फेटा उधळणारा माणूस. सहज चालताना स्वत:भोवती गिरकी घेणारी तरूणी, पांदीतून एकटं निघून जाताना गाणं गाणारा माणूस आता कुठं दिसत नाही. फेलिक्स म्हणतो, त्यांच्या लयी विस्कटलेल्या आहेत. भाषेच्या युद्धात, त्यांना गाणं गाता येत नाही. जागतिकीकरणानंतर झपाट्याने बदलत जाणारे गाव कामासाठी बाहेरगावात परागंद झालेली माणसं ज्यांना आपल्या भावना अन् विचार सहजपणे कुठं व्यक्त करता येत नाहीत. साथीच्या रोगासारखी विस्मृती पसरलीय सर्वत्र. गावात दुपारच्या उन्हात घर नाहीत,ती ‘निर्जीव खोकी’ आहेत नि:शब्द उभी असलेली! एरवी, दुपारी बायका ज्या ओटीवर जमायच्या, म्हणायच्या गाणी, झुलायचा िहंदोळा, विहिरीच्या काठावर बसून शोधायच्या, आपण गतकाळात गायलेली गाणी, हे सगळं कुठं नष्ट होत चाललेलं, कवी हे संचित शब्दांत जतन करू ठेवू इच्छित आहे. आजी विषयी लिहिताना तो म्हणतो,


मी पाहिलीय निमराकडे पाठ करून बसलेली  लाल लुगड्यातील आजी
कितीदा तरी पाहिलंय, तिला आठवणींना रवंथ करताना
आणि आठवणींना पाझरू देणं अधिक चांगला पर्याय होवून बसलाय
तिला जिवंत राहण्यासाठी.


शतकांनुशतके संवादातून ज्यांनी आपल्या स्थावरजंगम इस्टेटीसारखी बोलण्यातून भाषा जिवंत ठेवली, त्या मरणग्रस्त भाषेच्या सांप्रत एकांताचा इतिहास कवी इथे सांगत आहे. मरत जाणाऱ्या भाषेचे संदर्भ जागोजाग येत आहेत. ‘विहीर’ या कवितेत तो भाषेचा उल्लेख प्रेमळ भुतं असा करतो. पुढे तो बायकांकरवी पोहराभर विणलेल्या ओव्यांची भेट देतो. वडिलोपार्जित वापरात असलेल्या ओळखीचे शब्द तुटत गेल्याची तो खंत व्यक्त करतो. संगणकाच्या आगमनाने शब्दांचे चिन्हात झालेल्या रूपातंराने भावनांचे अर्थांतरण होत नाही, याची त्याला मनस्वी खंत आहे.


भाषेविषयीची त्याची आस्था आपण पर्यावरणावर बोलतो, तशी वरवरची नाही. खरंतर आपल्या मर्यादित प्रयत्नाने तो तिचे संवर्धन करू पाहतो आहे. आणि मराठी साहित्यात वसई परिसरात बोलल्या जाणाऱ्या ‘सामवेदी बोलीभाषे’तील (स्त्रियांकरवी गहिवरात गायलेल्या) ‘वर्णुका’चा ऐवज सादर करतो आहे. मृत व्यक्तीच्या प्रामुख्याने लहान मुलांच्या,त्यातही मेलेल्या मुलींच्या आठवणीत गायलेल्या या वर्णुका शब्दातून व्यक्त झालेल्या स्त्रीच्या वेदनेचा अनमोल ठेवा आहे. टोनी मोरिसन यांच्या ‘बिलव्ड’ या कादंबरीत एका निग्रो स्त्रीने स्वतः मारलेल्या मुलीचे भूत आहे. वर्णुकातील मृत मुलांसोबतच्या संवादाचे साधर्म्य दक्षिण अमेरिकेतील गुलामीशी असावे? बायकांचे असीम दुःख स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून कसे वैश्विक होतं याचा हा अस्सल नमुना आहेत, ‘वर्णुका.’


असा हा निरागस, निर्मळ कवी उगा टिपेच्या कोलाहलाच्या काळात जन्माला आलाय. ज्याला अजूनही लहानपणातील आठ-आठ कुटुंब एकत्र जगत असलेल्या घरातील लांबच लंब ओटा आठवत आहे. जिथे पणजीच्या गोष्टीतील असंख्य पात्रं लहान मुलांच्या स्वप्नात येवून हसायची. अन् बायका एकमेकींचं दु:ख वाटून घ्यायच्या. त्याने अनुभवलेल्या भाईचारा सांस्कृतिक विरासतीला, आज कोपऱ्यातील अडगळीत मृत्युची वाट पहात बसावे लागले आहे. जगण्यासाठीच स्वीकारायला लागलेल्या परक्या भाषेत प्रेम व्यक्त करण्याचे कसब त्याला येत नाही, आता. ही अव्यक्त मनाची घसुमट आहे, फेलिक्स डिसोजाची कविता! दिवसरात्रीच्या या दगदगीत काळाला पकडण्याच्या घालमेलीत, तो बंदिस्त झाला आहे. काय मिळाले या जागतिकीकरणाने? फेलिक्स म्हणतो, ‘कुठलं तलम कापड विणणार आहोत, इथल्या जमिनीच्या उघड्या पडलेल्या ढुंगणावर पांघरायला?’ या भयावह बदलाचा खूप खोलवर परिणाम झाला आहे, त्याच्या व्यक्तिमत्वावर.


 शेवटी, हताश अन् उद्वेगानं ‘तुम्ही, आम्ही आणि आमचं गाणं’ या कवितेत तो सरळसरळ म्हणतोच, ‘पण तुमच्या खोटेपणाच्या आणि आमिषाच्या कटात आमचं गाणं फितूर होणार नाही. काळाच्या हाका ऐकण्याची हीच ती वेळ आहे, दार उघड्याआधीच आत शिरणाऱ्या भीतीला न जुमानता, कवितेची दारं सताड उघडायला हवीत. आणि कवीचं हृदयसुद्धा! ही पसरत जाणारी भीती परतवण्यासाठी...’ 


फेलिक्स डिसोजाची ‘नोंदानोंदी’ या पहिल्याच संग्रहातील साधी सरळ कविता समजण्याआधी वाचकाने सर्वप्रथम आपसी भाईचाऱ्याची आपली संस्कृतिक विरासत आणि आजचं भयाण बदललेलं भोवतालचं वास्तव समजून घ्यायला हवं...

 

- आनंद विंगकर
anandwingkar533@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

बातम्या आणखी आहेत...