Home | Magazine | Rasik | Anand wingkar write on Colombian writer Gabriel Garcia Marquez

मार्केजची 'भारतीय' कथा

आनंद विंगकर | Update - Jun 03, 2018, 01:00 AM IST

कौमार्य चाचणीसाठी मुलीवर आणि तिच्या आई-बापांवर दबाव टाकला जातो. वर्चस्वाची नशा भिनलेली पुरुषसत्ता टाकलेल्या मुलीला टोचत-

 • Anand wingkar write on Colombian writer Gabriel Garcia Marquez

  कौमार्य चाचणीसाठी मुलीवर आणि तिच्या आई-बापांवर दबाव टाकला जातो. वर्चस्वाची नशा भिनलेली पुरुषसत्ता टाकलेल्या मुलीला टोचत-भोसकत राहते आणि रक्तबंबाळ झालेली मुलगी आश्रिताचं जीणं वाट्याला आलेल्या समाजातल्या तरुणाचा नाहक बळी देते. भारतात अनुभवास येणारं हे वास्तव गॅब्रिएल गार्शिया मार्केजच्या कादंबरीत प्रतिबिंबित होतं, तेव्हा सुडाचं वैश्विक वर्तुळ पूर्ण झालेलं असतं...

  श्रेष्ठ कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्शिया मार्केजच्या बहुतांश कथा अन् कादंबऱ्याची कथानकं ‘मोकांदो’ नावाच्या काल्पनिक नगरीत आकाराला येत. भविष्यात ‘शहरात’ रूपांतरित झालेलं हे गाव बहुधा ‘गॅबो’चं आजोळ असावे. ‘ग्रॅबो’ हे एकट्या कोलंबियानेच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण अमेरिकेने आपल्या लाडक्या लेखकाला दिलेलं हे टोपणनाव. प्रस्तुत कादंबरीत ‘मोकांदो’चा तसा उल्लेख नाही, तरीही कथानक मोकांदो अन् मार्केजच्या वडिलांच्या गावात घडते, असे वाटण्यास काही जागा सोडलेल्या आहेत.

  मार्केजच्या कथा अन् कादंबरीतील मोकांदो अन् भवतालचा भूप्रदेश याला ‘बनाना झोन’ संबोधले जाते. काही अपवादात्मक कथांचे कथानक युरोपमधे घडते. वसाहतवादी अन् जागतिकीकरणाच्या अनिष्ट परिणामाच्या भीषण यादवी गृहयुद्धात भरडलेल्या कोलंबियाचे हे वास्तव धर्मांध दुष्मनीत जखडलेल्या तिसऱ्या जगातील कोणत्याही देशाच्या जनतेला आपले वाटावे, असेच आहे. त्या अर्थाने मार्केज जसा प्रादेशिक लेखक तसाच, तो कॉर्पोरेट कपंन्याच्या सर्वकष संहारात भरडल्या जाणाऱ्या जगाचेही प्रतिनिधित्व करतो म्हणून वैश्विकसुद्धा आहे.

  ‘क्रोनिकल ऑफ ए डेथ फोरटोल्ड’ ही मार्केजच्या एका जवळच्या मित्राच्या जीवातील सत्य घटनेवरची कादंबरी,आईच्या दबावामुळेच मार्केजला लगेच त्यावर लिहिता आले नव्हते, एक्याऐंशी साली, ती प्रकाशित झाली. आपल्या वार्ताहरीचे, कायद्याचे ज्ञानाचे, अन् कल्पनातीत अद््भुत वास्तवाचे कसब वापरून मार्केजने ही कादंबरी लिहिली. काही पिढ्यांचा स्खलनशील म्हणता येईल असा इतिहास असलेली ‘हंड्रेड इयर्स ऑफ सालिट्यूड’ या महाकाव्यात्मक कादंबरीतील काही पात्रं, या शिवाय त्याच्या इतर कादंबरी अन् कथेतील पात्र याही कादंबरीत येतात. ‘नो वन राइट्स कर्नल’ या दीर्घ कथेत पत्नीसोबत कमालीचे दैन्य अन् हलाखीचे जीवन जगणारा कर्नल या कादंबरीत पेड्रो अन् पाब्लो या विकारियो जुळ्या भावांनी नासरचा खून करू नये, म्हणून प्रयत्न करताना दिसतो.

  कादंबरीतील अँजेलो विकारियोचं लग्न ज्याच्या सोबत होतं अन् पहिल्या रात्रीच ती ‘कुमारिका’ नाही म्हणून जो तिला बापाच्या घरी फरपटत नेऊन सोडतो, त्या ‘बेयादा सान रोमां’चा बाप ‘जनरल पेट्रोनियो सान रोमां’ जो मागच्या पिढीत लढलेल्या गृहयुद्धातील क्रूरकर्मा आहे. ज्याने ‘हंड्रेड इयर्स ऑफ सालिट्यूड’ या कादंबरीतील नायक ‘कर्नल ऑरलिओनो बुऐंदाला’ तुकरिंकाच्या जंगलात मारलेलं होतं.


  कादंबरीतील निवेदक स्वतः लेखक आहे. त्याची आई लेखक होणाऱ्या आपल्या मुलाला पत्रं पाठवीत असते. त्यात गावातील घटनांचे वर्णन करत असते. तिला पेट्रोनियो सान रोमां बिलकूल आवडत नाही. कारण तिचा सासराही या युद्धात उदारमतवाद्यांकडून लढून धारातीर्थी पडलेला असतो. गावात अागंतुक आलेल्या बेयादो सान रोमांविषयी सुरुवातीच्या पत्रात ती म्हणते, ‘तो एक इनामदार अन् दिलदार माणूस आहे.’ पण विधूर बियासने मृत पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेले टेकडीवरील आलिशान घर आपल्या प्रेमाचे अन् ऐश्वर्याचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्यासाठी प्रचंड रक्कम देऊन गिळंकृत करण्याचा घाट घालतो, तेव्हा मात्र तिचे बेयादोबाबतचे आपले मत बदलते. ती लिहिते, ‘मला त्याच्या वागण्यात एक सुप्त सैतान दिसतो, अर्थात, ही प्रत्यक्ष बोलण्याची गोष्ट आहे, पत्रात सांगण्याची गोष्ट नव्हे.’ कादंबरीतील खरा खलनायक तोच आहे. पेट्रो आणि पाब्लो हे जुळे भाऊ बिनडोक अनिष्ट रूढीचे केवळ वाहक आहेत.


  ‘पूर्वघोषित मृत्यूचा वृत्तांत’(हा वसंत आबाजी डहाके या आदरणीय कवीने केलेला या कादंबरीचा मराठी अनुवाद.) या कादंबरीचा दुर्दैवी नायक सांतियागो नासर, लेखक मार्केज, त्याचा भाऊ लुइस एनरिक, आणखी एक तरुण क्रिस्टो बेदिया , बेयादा सान रोमां अन् नवरीचे दोन जुळे भाऊ पेड्रो आणि पाब्लो लग्नाच्या रात्री दारू पिऊन नाचत आणि दंगामस्ती करत आहेत. यातला सांतियागो नासर लग्नातील पै अन् पैचा हिशेब ठेवत असतो, मार्केजच्या बहिणीवर असलेले त्याचे प्रेम जाहीर करताना म्हणतो, ‘माझंही लग्न असे धूमधडाक्यात करीन की लोक जन्मभर त्याची चर्चा करीत राहतील.’ पण लग्नाच्या खर्चावर बोलताबोलता तो म्हणतो, ‘चर्चमधील फुलांच्या सजावटीच्या खर्चात चार शवपेटिका सजवल्या जातील. बंद घरातील फुलांच्या दरवळाचा संबंध प्रत्यक्ष मृत्यूशी असतो. मला माझ्या शवपेटीला फुलांनी सजवायचं न्हाय.’ अन् त्याच रात्रीतून उगवणाऱ्या पहाटेला पाळीव कुत्र्याला भरवताना जसा ससा जसा कापला जातो, अगदी तसा विकारियो जुळ्या भावाच्या आंधळ्या क्रोधात अक्षरशः नासर हकनाक खपला जातो.


  मार्केजच्या कांदबरीतील ‘मृत्यू’ असा बोरातील सूक्ष्म अळीसारखा दबा धरून राहिलेला असतो. जो नंतर विराट भुजंगाचे रूप घेऊन आपल्यासमोर साक्षात उभा राहतो. ‘लिंब फेडण्यापुरताच’ नवरा झालेल्या बेयादों सान रोमांने निष्पाप एंजेलो विकारियोला माहेरच्या घरात ढकलल्यानंतर आईच्या मरणांतिक मारालाच तिला सामोरं जावं लागतं. रात्री दारू ढोसून बाजारू स्त्रियांबरोबर मौजमजा करून, तिचे जुळे भाऊ घरात येतात. तेही परत एंजेलोलाच मारतात. थोरला पेड्रो हवेत उचलून डायनिंग टेबलवर तिला बसवतो आणि विचारतो, ‘बस, मला फक्त त्याचं नाव समजू दे, आता सांग तो आहे कोण?’ भिंतीवर बसलेल्या फुलपाखराला चटदिशी जसे उडता येत नाही, कुणाच्या तरी खोडसाळ हातानं जवळपास निश्चित झालेलं असतं त्याचं मरणं, तसं एकदाचं संपावं, हे भयप्रद स्वप्न यासाठी रिमांडवरील अपराध्यासारखे आठवताना समोर आलेल्या नावातून ती एकाचा उच्चार करते. ‘सांतियागो नासर.’ आणि इथूनच सुरू होतो सांतियागो नासरच्या खुनाचा प्रवास...


  भिन्न धर्म, अनेक जाती असलेल्या माझ्या देशात मी जेव्हा विचार करतो की तिने नासरचेच नाव निवडलं? विधवेच्या पोटी जन्मलेला तो बिन बापाचा होता म्हणून? की तिला आवडत होता अन् कुठल्या दुसऱ्याच मुलीचा तो मंगेतर होता म्हणून? की तो एक अल्पसंख्याक होता म्हणून? लेखक स्वत: सांगतो, या चौघांची दोस्ती खूप अतूट, प्रत्येकाच्या गुपित वार्ता सर्वानाच माहीत. नासरने तर बोलताना, कधी तिचा विषयही काढलेला नसतो. बरं, तिचा कोणी मंगेतर असल्याचेही कुणाच्या गावी नसते. वर आईच्या कडक निगराणीखाली तिचं आजवरचं आयुष्य गुजारलेलं होतं.


  खरं तर मार्केजच्या कांदबरीतील ‘मृत्यू’ आपण येत असल्याची पूर्व घोषणा करतात. उशिरा मध्यरात्री घरी गेलेला नासर अंगावरील कपड्यांसह झोपी जातो. उठण्यापूर्वी त्याने पाहिलेल्या स्वप्नात भुरभुर पाऊस पडत असलेल्या जंगलात, तो फिरत असतो. ही स्वप्नं प्लासिदा लिनोरा या त्याच्या आईला माहीत आहे. ‘त्याला नेहमीच झाडांची स्वप्नं पडायची’ असं ती निवेदकाला सांगते. पहाटे उठताना मात्र त्याला वाटते, त्याच्या शरीरावर हजारो पक्षी शिटलेले आहेत. पहाटे मोलकरीण त्याला कॉफी करून देतानाच नाष्ट्यासाठी कापलेल्या सशाचे पोट चिरून त्याची आतडी कुत्र्यापुढे टाकते, तेव्हा तो म्हणतो, "रानटी बनू नकोस... एवढे समज की तोही एक जीवच होता.' नेमक्या अशाच पद्धतीनं पुढे दीड तासात कोयत्याच्या वाराने नासरचा कोथळा चिरला जातो. उठून परत तो बंदरावर जाणार असतो, जाताजाता त्याच्या गावच्या रहिवाशांना भेटणाऱ्या बिशपच्या दर्शनासाठी निघतो, जिथे त्याच्या खुनासाठी पेड्रो आणि पाब्लो हे दोन भाऊ वाट पहात असतात. रूढार्थाने प्रस्तुत कादंबरी राजकीय आशयाची नसली तरीही पुरुषसत्ताक मानवी जीवनातील सामाजिक विसंगतीवर आणि धर्मांध मानसिकतेवर अाघात करते.

  खून करून कसलीही अपराधी मानसिकता न बाळगता दोघे भाऊ चर्चमध्ये बिशपला भेटायला जातात अन्् जाहीर करतात ‘आम्ही सर्वांच्या समोर त्याचा खून केलाय अन् आम्ही देवासमोर, लोकांसमोर बेगुनाह आहोत...’ बिशप आणि न्यायालयसुद्धा न बोलता त्यांच्या या विधानाला अनुमती देतात.योनिशुचिता नावाखाली मुलीने लग्न होईतो कुवारच राहिले पाहिजे, अन् पुरूषांना मात्र आपल्या वासना शमवण्यासाठी मोकळे सोडणं, ही केवढी मोठी विसंगती. जी आपल्या काही भटक्या विमुक्त समाजात जातपंचायतीच्या अाशीर्वादाने अजूनही चालत राहिलेली आहे. शिवाय एका गावातील म्हणून क्वचित कधी एकादा अल्पसंख्याक वा दलित तरुण केवळ बोलला, याचा डुख घरून त्याला जीवे मारण्याचा प्रघात आपण डोळे झाकून स्वीकारलेलाच असतो म्हणून, ही कादंबरी मला भारतीय वाटते. इथल्या कोणत्याही पूर्वापार संस्काराने ग्रस्त असलेली स्त्री जशी नवऱ्याला देवच मानते, तशी एंजेलो विकारियो आयुष्यभर सोडून निघून गेलेल्या नवऱ्याची वाट पाहाते.

  प्रस्तुत कादंबरी मार्केज विशेषांक ‘रचना समय’ या अंकात इंदगमणी उपाध्याय यांनी अनुवादित केलीय. वाचकांनी रचनाचा तो अंक जरूर वाचावा. अन्यथा कॉपर कॉइन पब्लिशिंग लकरच वसंत अबाजी डहाके सरांनी ‘पूर्वघोषित मृत्यूचा वृत्तांत’ या नावाने केलेल्या अनुवादित पुस्तकाची वाट पाहावी...


  - आनंद विंगकर

  anandwingkar533@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९८२३१५५७६८

 • Anand wingkar write on Colombian writer Gabriel Garcia Marquez

Trending