आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मवर्धन आबा : सहकार नायकाचा कर्तृत्ववेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अहमदनगरचं मोठं योगदान राहिलं आहे. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना, कम्युनिस्टांचं संघटन, पाणलोट चळवळ, आदर्श गाव संकल्पना, रयत संस्थेचा प्रसार ही या जिल्ह्याची देणगी होय. सहकारी साखर कारखाना म्हटलं की आपल्याला आठवतात, विठ्ठलराव विखे-पाटील अन् अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ. प्रवरेच्या साखर कारखान्यासाठी या दोघांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेली आणखी एक आसामी होती, तिचं नाव शंकरराव ऊर्फ आबासाहेब धुमाळ! श्रीरामपूर परिसरात घराघरांत ज्ञात असणारा हा महर्षी उर्वरित महाराष्ट्राला विशेष ज्ञात नाही. ती उणीव पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनाच्या डॉ. अश्विनी घोरपडेलिखित ‘कर्मवीर आबा’ या चरित्रात्मक ग्रंथाच्या रूपाने भरून काढली आहे.

 

धु माळ मंडळी मूळची सातारा जिल्ह्यातल्या करंजखोपची. कल्याणगडची किल्लेदारी यांच्या घराण्यात होती. शंकररावांनी पुण्याजवळच्या मांजरी शेतकी शाळेतून पदविका (१९२३) पूर्ण केली. पहिल्या महायुद्धात पराक्रम गाजवणारे अमृतराव मोहिते, त्यांचे मामा. मोहिते यांना पराक्रमाचे बक्षीस म्हणून ब्रिटिशांनी श्रीरामपूरजवळ शंभर एकर जमीन दिली. ती कसण्याची जबाबदारी १५ वर्षांच्या शंकरवर सोपवण्यात आली. शंकररावांनी शेतकी खात्यात काही काळ नाेकरी केली. दुसरे मामा जगताप यांच्याबरोबर भागीदारीत शेतीव्यवसाय केला. मतभेद झाले. म्हणून स्वत: भाडेतत्त्वावर शेतीचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी झाले. श्रीरामपूर तालुक्यात धनाढ्य ऊस बागायतदार म्हणून ते नावारूपास आले. जेव्हा ऊस शेती आतबट्ट्याची ठरली, तेव्हा त्यांनी धान्याच्या शेतीला प्रारंभ केला.


तलवार आणि तराजू या ब्रिटिशांच्या तत्त्वावर शंकररावांचा भरवसा होता. तलवारीची जागा आता नांगराने घेतलीय, पण तराजूचं काय? म्हणून मग त्यांनी गुऱ्हाळघरं भाड्याने घेऊन गुळाचं उत्पादन सुरू केलं. श्रीरामपूरमध्ये आडत व्यवसायासही प्रारंभ केला. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते पहिले चेअरमन झाले. त्यांच्यामुळे श्रीरामपूर गुळाची बाजारपेठ म्हणून नावारूपास आली. श्रीरामपूर नगर परिषदेवर शंकरराव निवडूनही आले. एकीकडे उद्योगी स्वभाव असलेल्या शंकरराव यांना शिक्षणाचीही आस होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘रयत’ला त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आणले. स्वत: बैलगाडी घेऊन ते गावोगावी दवंडी पिटून विद्यार्थी गोळा करत.


पुढे शंकरराव ‘रयत’चे उपाध्यक्ष बनले. जिल्ह्यातील बड्या शेतकऱ्यांकडून त्यांनी ‘रयत’ला जमिनी दान मिळवून दिल्या. सरकारने ‘रयत’चे अनुदान बंद केले, तेव्हा शंकरराव पुढे सरसावले. प्रवरेच्या साखर कारखान्याने ऊस टनामागे चारआणे रयतला देण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतला. शंकररावांना दहा अपत्ये. प्रत्येकाच्या शिक्षणाची त्यांनी जातीने व्यवस्था लावली. स्वावलंबी व्हा, असे त्यांचे सांगणे असे. विश्वास हा त्यांचा मुलगा आयएएस झाला. प्रस्तुत ग्रंथाच्या लेखिका व त्यांच्या कन्या अश्विनी यांनी पीएचडी केली. प्रवरा कारखाना शंकररावांच्या हयातीत भ्रष्टाचाराच्या गर्तेत सापडला. कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली. धनंजयराव गाडगीळ यांच्यावर जातीयवादाचे आराेप झाले. शंकरराव मात्र गाडगीळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.  सचोटी, विश्वास, धडाडी यांचं मूर्तिमंत उदाहरण होते शंकरराव. अर्थात, मराठा घराण्यातील भाऊबंदकी शंकररावांनाही चुकली नाही. मामा अन् सख्खे भाऊ यांच्याबरोबरच्या संघर्षात त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. नात्यातले सर्व मतभेद त्यांनी सामाेपचाराने सोडवले. शंकरराव भाडेपट्ट्याने कसण्यासाठी जमिनी घेत. जमिनीच्या किमतीपेक्षा खंड (मोबदला) म्हणून ते वर्षाला अधिक रक्कम देत असत. स्वातंत्र्यानंतर कुळकायदा लागू झाला. भाडेपट्ट्याच्या जमिनीचे शंकरराव शेकडो एकरांचे कायद्याने मालक झाले. पण, मूळ मालकांच्या नावावर त्यांनी कसत असलेल्या जमिनीचे ७/१२ करून टाकले. व्यापार सचोटीने केला पाहिजे, अशी त्यांची यामागची धारणा होती. पित्याचं चरित्र लिहिणं अवघड काम, कारण वस्तुनिष्ठ लिखाणाची कसोटी लागते. डाॅ. अश्विनी घोरपडे यांनी ती जबाबदारी उत्तम पार पाडलीय. हे चरित्र अकरा प्रकरणांत विभागलं आहे. यातल्या प्रत्येक नोंदीला संदर्भाची जोड आहे. लेखिकेने शंकररावांच्या संदर्भातील सर्व दस्तऐवज शोधले आहेत. शंकररावांच्या समकालीन मंडळींच्या मुलाखती घेतल्या आहेत. सहकार चळवळीच्या संदर्भातले ग्रंथ, वर्तमानपत्राची कात्रणे, अहवाल, इतिवृत्ते, खासगी पत्रव्यवहार यांचा या चरित्रलेखनासाठी वापर केलाय. प्रत्येक प्रकरणाला संदर्भ टिप्पणी आहे. त्यामुळे प्रस्तुत चरित्र केवळ आठवणीचं संकलन नाही. त्याला ऐतिहासिक ग्रंथाचे मोल आहे. पित्याचे चरित्र लिहितानाही वस्तुनिष्ठता कायम आहे. याचे कारण प्रस्तुत लेखिका या मानव्यविद्या शाखेच्या विद्यार्थिनी आहेत.


महत्त्वाची बाब म्हणजे, लेखिका शंकररावाच्या जीवनातील अनेक घटनांची साक्षीदार आहे. सहकारी चळवळ, ऊसशेतीबरोबरच ग्रामीण भाषेशी चांगलीच अवगत आहे. त्यामुळं लिखाण चपखल झालंय. डोळ्यांसमोर हुबेहूब प्रसंग उभे राहतात. लिखाणात पाल्हाळ अजिबात नाही. शंकररावांच्या पत्नी शेवंताबाईंच्या योगदानाची ग्रंथात पुरेशी दखल घेतलीय. शंकरराव यांच्या घरी नित्य लोकांचा राबता असे. दहा अपत्यांना सांभाळत शेवंताबाईंनी हे सारं कसं पेललं, याची हकीकत ग्रंथात उत्तमरीत्या शब्दबद्ध झालीय. शंकरराव यांचे स्नेही भाई वैद्य यांची ग्रंथाला प्रस्तावना आहे. सहकारी साखर कारखाना काढण्याची मूळ कल्पना शंकररावांची होती, ही बाब भाऊसाहेब दुर्वे या शंकररावांच्या मित्राने आपल्याला सांगितल्याचे वैद्य यांनी प्रस्तावनेत नमूद केलंय. पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष धोंगडे यांनी चितारलं आहे. प्रस्तुत ग्रंथाचे दोन बाजू-दोन भाग आहेत. एका बाजूने तो चरित्र ग्रंथ आहे. मलपृष्ठाच्या बाजूने शंकरराव यांच्या समकालीन मंडळीनी आठवणी लिहिलेल्या आहेत. त्यात पद्मश्री विठ्ठलराव यांचे नातू राधाकृष्ण विखे-पाटील आहेत, अशोक सहकारी कारखान्याचे संचालक के. वाय. बनकर आहेत, राज्याचे निवृत्त कृषी संचालक युवराज साळुंखे आहेत. तसेच शंकररावांचे मुलगे, कन्या, स्नुषा यांचेही लेख आहेत. काही लेख इंग्रजीत आहेत. ग्रंथाला तीन परिशिष्टे असून त्यामध्ये शंकररावांच्या पत्रांचा समावेश आहे. प्रकाशक डाॅ. एल. व्ही. तावरे यांनी बिनचूक व देखणा ग्रंथ काढला आहे. या ग्रंथाच्या रूपाने सहकारी चळवळीचा मूकनायक स्नेहवर्धन प्रकाशनाने पुढे आणलाय.‘शेती कोणी येराबावळा करू शकत नाही, त्यासाठी आत्मविश्वास, प्रज्ञा आणि अभ्यासाची गरज आहे, शेतीचे व्यवस्थापन जातीनिशी करावे लागते, शेतात खपणारी माणसे- जनावरे यांच्यावर जिवापाड प्रेम करायला हवे, नांगराबरोबर तराजू (व्यापार, जोडधंदा) हाती धरायला हवा, स्थावर मालमत्ता करण्यापेक्षा मुलामुलींच्या शिक्षणावर पैसे खर्च करा...’ हे शंकररावांचं विचारधन आत्महत्येच्या उंबरठ्यावरच्या आजच्या शेतकरी बांधवांनी अंगीकारण्यासारखं आहे.


पुस्तकाचे नाव : कर्मवर्धन आबा 
लेखक : डाॅ. अश्विनी घोरपडे
प्रकाशन : स्नेहवर्धन, पुणे
पृष्ठे : २०४, किंमत : ४०० रुपये

 

- अशोक अडसूळ, मुंबई
adsul.ashok@gmail.com

बातम्या आणखी आहेत...