आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्त कलंदर !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोंगराएवढं काम करायचं, पण लोकांनी टाकलेल्या कौतुकाच्या जा‌ळ्यात अडकायचं नाही, आपला स्वभाव सोडायचा नाही, तडजोड करायची नाही, हे सारं साधायचं म्हणजे खायचं काम नाही. त्यातही अभिनयाच्या क्षेत्रात बंद्या रुपयासारखा खणखणीत असलेल्या एखाद्या नटासाठी तर हे आव्हानच असते. पण  जव‌ळपास तीसहून अधिक वर्षे अमराठी रंगभूमी गाजवणाऱ्या   मकरंद देशपांडे यांना हे लीलया साधले आहे. त्यामागे रंगभूमीशी असलेली अतूट निष्ठा हे कारण आहेच, पण माणूस नावाची प्रचंड मोठी गुंतवळ समजून घेण्याची त्यांची आसही खूप मोठी आहे....

 

 

मिरखान आणि आशुतोष गोवारीकर हे दोघे यारदोस्त ‘लगान’चा जंगी बेत आखत होते. जे काही करायचं ते परफेक्शनने करायचं हा दोघांचाही खाक्या असल्याने भूमिकांसाठी कलावंतांची निवड करताना हयगय न करता दोघांचंही "द बेस्ट' ठरतील अशी नावं निश्चित करणे चालले होते. रंगभूमीबद्दल ममत्व असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे  पारख असल्याने दोघांनी मकरंद देशपांडेचे नाव जवळपास नक्की केेले होते.  किंबहुना मकरंदला भूमिका मिळालेली हे, हे ठरूनच गेेले होते. हेच कशाला, ‘लगान’ची स्क्रिप्ट स्वतः आमिरखानने मकरंदला वाचून दाखवली होती. याचा अर्थ भूमिका पक्की झाली होती.पण, जेव्हा मकरंदला समजले की ‘लगान’साठी त्याला नाटकांपासून किमान सहा महिने दूर राहावे लागेल तेव्हा मकरंदने निर्णय देऊन टाकला. सॉरी बॉस! यह नही हो सकता! तेव्हा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने भूजमध्ये गावाचा भलामोठा सेट लागणार होता, तिथेच मकरंदला एक खास रूम उभारून देण्याची तयारी दर्शवली होती.

 

या रूममध्ये मकरंदने त्याच्या नाटकाचे लेखन करावे, भूमिकांची तयारी करावी, काय वाट्टेल ते करावे; पण सिनेमा सोडू नये, अशी आशुतोषची योजना होती. पण मकरंद तो मकरंद.  त्याने "ओम स्वाहा' म्हणत "लगान' वर पाणी सोडले आणि पृथ्वी थिएटरमध्ये आपला नेहमीप्रमाणे डेरा जमवला...


मकरंद देशपांडे उर्फ मॅक! डोईवर कुरळ्या केसांचे घनघोर छत्र, जाड्याभरड्या मिश्या, जॉलाइनला भिडणारे तितकेच जाडसर कल्ले, आवाजात एकाच वेळी जरब आणि मृदुता, उंचीसुद्धा जेमतेम. या अशा कलंदर अवतारामुळे  हा सद््गृहस्थ इतर कुठे दिसला तर त्यांच्या दिसण्यावरून नाना तर्क लावता येतात, पण हा माणूस अमराठी रंगभूमी दणाणून सोडत असेल हिंदी- मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांना हा वेड लावत असेल हा अंदाज काही केल्या लावता येत नाही. पण, हा जेव्हा रंगमंचावर अवतरतो तेव्हा मुंबईच्या बहुढंगी रंगभूमीला नवा आयाम मिळवून देतो. झपाटलेपण देऊन जातो. 


अर्थातच मुंबईतील रंगभूमी ही नेहमीच बहुभाषिक, बहुरंगी होती. मुंबई हे शहरच कॉस्मोपॉलिटन असल्यामुळे, शिवाय आंतरराष्ट्रीय किर्तीचे बंदर असल्यामुळे या शहराच्या संस्कृतीवर बहुभाषिकतेच्या खाणाखुणा प्रारंभापासूनच स्पष्ट होत्या. याला रंगभूमी अपवाद असणे शक्यच नव्हते. मुंबईत १९५०च्या दशकात मराठी रंगभूमीवर क्रांती करणारी ‘रंगायन’ ही संस्था उभी राहिली व पुढे १९७०च्या दशकात दादरच्या छबिलदास शाळेत समांतर रंगभूमीची चळवळ झाली. यामुळे आधुनिक मराठी रंगभूमीच्या इतिहासात मुंबई शहराचे योगदान मोठे ठरते.


तसेच भारतातील इंग्रजी व हिंदी रंगभूमीच्या संदर्भात मुंबई शहराचे योगदान लक्षणीय आहे. येथेच इब्राहिम अल्काझी यांनी (नॅशनल  स्कूल ऑफ ड्रामामध्ये स्वत:ला झोकून देण्याआधी) १९५० ते १९६२ च्या दरम्यान ‘िथएटर युनिट’ ही नाट्यसंस्था चालवली. नाट्यचळवळीला योग्य दिशा दिली. आजही मुंबईत जुहूचे पृथ्वी थिएटर व नरिमन पॉइंटचे एनसीपीए ही नाट्यगृहे महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. त्या अर्थाने मुंबई शहरातील अमराठी रंगभूमीला वैभवशाली इतिहास आहे.


त्या काळी मुंबईतील अमराठी रंगभूमीवर अल्काझींच्या नेतृत्वाखाली काही मराठी मंडळींनी महत्वाची कामगिरी बजावली होती. यातील महत्त्वाचे नाव होते,  विजया मेहता यांचे. सुखद योगायोग हा आहे की, आज ही परंपरा मकरंद देशपांडे (जन्म ः १९६६) हा मराठी माणूस चालवत आहे. असे मोठे काम करणारी मंडळी जशी अनेकदा मनस्वी असतात. वृत्ती-प्रवृत्तीने अवलिया असतात तसाच मकरंदही आहे. त्याने १९८८ मध्ये हिंदी चित्रपटांत भूमिका करायला सुरूवात केली. अर्थात त्यानंतर आजवर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांत (चटकन समोर येणारी नावं म्हणजे ‘सत्या’, ‘स्वदेस’) व मराठी चित्रपटात मुख्य भूमिका (‘दगडी चाळ’) केल्या असल्या तरी त्याचे खरे प्रेम तसेच त्याचे योगदान रंगभूमीवर आहे. मकरंदच्या नावावर सुमारे ५० नाटकं आहेत! त्याची स्वतःची नाट्यसंस्था ‘अंश’ (स्थापना ः १९९३) आहे. ही नाट्यसंस्था मकरंदने के. के. मेनन यांच्याबरोबर सुरू केली. 


पण ‘अंश’ची सुरुवात आपोआप झाली नाही. मकरंद १९८६ मध्ये पृथ्वी थिएटरमध्ये नाटके करायचा. त्या काळी तो दिवसभर "पृथ्वी'तच पडिक असायचा. त्यातून त्याने ‘हेडस टुगेदर’ असा अनौपचारिक ग्रुप तयार केला होता. ही संस्था ‘सडक नाटकं (स्ट्रीट थिएटर) सादर करत असे. हा धमाल प्रकार होता. येथे सगळे मिळून नाटक लिहीत असत. यात देशभरातील रंगकर्मी सहभागी होत असत. या दरम्यान मकरंदची के. के. मेननशी ओळख झाली व त्यांच्या मैत्रीतून ‘अंश’चा जन्म झाला. 


मकरंदच्या नाट्यसंस्थेचे नाव ‘अंश’च का? याचे उत्तर मकरंदने एका मुलाखतीत दिलेले आहे.तो म्हणतो,’ मी नाटक करायच्या आधीसुद्धा नाटके होती व मी गेल्यावरही नाटके असतीलच. मी या मोठ्या प्रवाहात माझा ‘अंश’ टाकत आहे...


म्हटले तर एका धुंदीत ‘अंश’चा प्रवास सुरू झाला. मकरंद स्वतः नाटकं लिहायचा, दिग्दर्शित करायचा. त्या काळी ‘अंश’ ही संस्था वर्षाला चार -चार ओरिजिनल नाटके सादर करायची. आजही यात फारसा फरक पडलेला नाही. ‘अंश’ स्थापन झाल्यावर २१ वर्षांनी म्हणजे २०१५ मध्ये मकरंदने स्वतःच्या नाट्यसंस्थेच्या नाटकांचा महोत्सव भरवला. मात्र,तोवर मकरंद स्वतःच्या नाटकांचा महोत्सव भरवायला तसा नाराज होता. त्याच्या मते,अशा महोत्सवांत जुनीच नाटके सादर करावी लागतात. अशा प्रकारे जुनी नाटके सादर करण्यापेक्षा नवीन नाटक लिहावे, ते दिग्दर्शित करावे हे जास्त आनंददायी आहे.


मकरंदने  १९९० मध्ये रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. सुरूवातीला तो पृथ्वी थिएटरचे व्यवस्थापन बघणाऱ्या संजना कपूरबरोबर होता. पण लवकरच त्याने स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. जुलै २०१७ मध्ये अंशतर्फे मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये एक नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद््घाटन नसिरुद्दीन शहांनी केले. हा नाट्यमहोत्सव मकरंदच्या स्वभावाला साजेसा ‘हटके’ होता. यात ‘अंश’तर्फे नाटके तर सादर केली गेलीच पण शिवाय पृथ्वी थिएटरसमोर असलेल्या पृथ्वी हाऊसमध्ये राजेश सिंह दिग्दर्शित ‘फाइव्ह स्टार’, दानिश हुसेन दिग्दर्शित ‘िकस्सेबाजी’, महेश केसकर आणि गगन देव रियर दिग्दर्शित ‘िरनोव्हेशन’, मेजर अली शाह दिग्दर्शित ‘द मेजर अॅक्टर्स अॅसॉर्टेड मोनोलॉग्ज’ आणि त्रिशाला पटेल दिग्दर्शित ‘मेडे’ हीसुद्धा इतर नाटके सादर झाली.


गेली दोन दशके अमराठी रंगभूमीवर मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्या मकरंदने अलिकडेच मराठी नाटक लिहिले आहे,‘शेक्सपियरचा म्हातारा’. जगभरच्या रंगकर्मींना शेक्सपियरच्या ‘िकंग लिअर’ चे फार म्हणजे फार आकर्षण वाटते. आपल्याकडे शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ने इतिहास घडवला होता. आता आला आहे, मकरंद देशपांडेंचा म्हातारा. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व म्हाताऱ्याची प्रमुख भूमिका एवढे सगळे मकरंद देशपांडे सादर करतो. मी हे नाटक बघितले आहे. मी या आधीसुद्धा मकरंदचा अभिनय बघितला आहे. पण ‘शेक्सपियरचा म्हातारा’ या नाटकात ज्याप्रकारे त्याने किंग लियरच्या निमित्ताने वार्धक्यात पोहोचलेल्यांची व्यथा व्यक्त केली आहे, ती केवळ लाजबाब आहे.


काही वर्षांपूर्वी मी असाच एका रात्री पृथ्वी थिएटरमध्ये मकरंदचे नाटक बघायला गेलो होतो. नाटक सुरू व्हायला बराच वेळ होता. मकरंद नेहमी असतो, तसा रिलॅक्स मूडमध्ये होता. नाटक सुरू व्हायला पंधरा-वीस मिनिटं होती. अशा स्थितीत नट मंडळी कशी ताणाखाली असतात याचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे. पण मकरंद माझ्याशी असा काही गप्पा करता होता की एखाद्याला वाटावे की तोसुद्धा माझ्यासारखाच नाटक बघायला आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, मकरंदला नाटक व जीवन यांच्यात भेद आहे हेच मुळी मान्य नाही. मकरंद गेली अनेक वर्षे मुंबईतल्या या अमराठी रंगभूमीवर वावरत आहे. मात्र त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तोच नाटके लिहितो, दिग्दर्शित करतो व अनेकदा प्रमुख भूमिकासुद्धा  करतो. शिवाय नाटकाची निर्मिती त्याचीच असते. मकरंदच्या मते, यामुळे नाटकाच्या सर्व घटकांवर त्याचे पूर्ण नियंत्रण असते. एकेकाळी मराठीत पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल असे होत असे. त्या काळी ‘सबकुछ पुल’ अशीच जाहिरात केली जात असे. त्या देशपांड्यांनंतर आता हा नवा देशपांडे आहे, ज्याच्या नाटकांची ‘सबकुछ मकरंद’ अशी जाहिरात सहज करता येईल. मकरंदचा रंगभूमीवरील वावर चैतन्याने व ऊर्जेने भरलेला असतो. तो भूमिकेत शिरत नाही तर तो नेहमी भूमिकेतच असतो, हेसुद्धा अंडरस्टेटमेंट ठरावं, असा सध्याचा त्याचा झपाटा आहे. एकाच दिवशी दोन किंवा तीन वेगळी नाटके सादर करणारा माणूस यथातथा नव्हे झपाटलेलाच असू शकतो, हा याचा अर्थ आहे. 


रंगभूमीच्या संदर्भात मकरंदचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या नाट्यसंस्थेत सतत नवनवीन चेहरे दिसत असतात. यामुळे त्याच्या नाटकात वेगळाच फ्रेेशनेस दिसतो. शिवाय त्याच्या प्रत्येक नाटकात तो भूमिका करतो. यामुळे इतर नटनटींशी सहज तारा जुळतात, असा त्याचा दावा आहे. यातील आणखी एक गंमत म्हणजे, इतर अनेक इंग्रजी व हिंदी नाट्यसंस्थांप्रमाणे मकरंदची ‘अंश’ ही संस्था आर्थिक मदतीसाठी कॉर्पोरेट जगतावर अवलंबून नाही. कॉर्पोरेट कंपन्यांची फिकीर न करणाऱ्या  मकरंदची एरवी सर्वच नाटकं या ना त्या कारणाने चर्चेत असतात. पण सध्या त्याचे ‘सर सर सरला’ हे नाटक खूपच चर्चेत आहे. या नाटकात त्याने प्रेमासारख्या एव्हरग्रीन विषयाला हात घातला आहे. मकरंदच्या मते,प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाच्या बाहेर प्रेम मिळते, ते शाळेतल्या शिक्षक/ शिक्षिकांकडून. त्यामुळे शिक्षक/ शिक्षिका व विद्यार्थी यांच्यातील नाते अनोखे असते. या नाटकात एक साहित्याची प्राध्यापिका व तिचा विद्यार्थी यांच्यातील गुंतागुंतीच्या नात्याची कथा आहे. मकरंदने या नाटकाचा पूर्वार्ध २००१ मध्ये लिहिला व २००४ मध्ये उत्तरार्ध. मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये पूर्वार्धाचा प्रयोग संध्याकाळी सहा वाजता असतो तर उत्तरार्ध त्याच रात्री नऊ वाजता. जेथे हे शक्य होत नाही, तेथे आज पूर्वार्ध व दुसरे दिवशी उत्तरार्ध अशी रचना असते. सुरूवातीला म्हणजे २००१ मध्ये जेव्हा या नाटकाचे प्रयोग सुरू झाले,तेव्हा यात सोनाली कुलकर्णी व अनुराग कश्यप यांच्यासारखे दिग्गज होते. आता मकरंद यात नवीन चेहरे घेतो. मकरंदची तुलना नाना पाटेकरशी अनेकदा केली जाते.

 मकरंद मात्र नानाच नव्हे तर त्या काळातील दिग्गज विनय आपटे, अमरीश पुरी वगैरेंचे ऋण मनापासून मान्य करत असतो. मकरंदच्या अनेक नाटकांवर ‘चक्रम’ असा आक्षेप घेण्यात येतो. मकरंद या आक्षेपाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या मते,आपल्याकडचे नाटक स्वयंपाकघर, दिवाणखाना, बसस्टॉपवरील चर्चेच्या स्वरूपात समोर येते. वास्तविक पाहता हे सर्व चित्रपटांनी करायचे आहे, नाटक हे व्यक्तींच्या अंतरंगात डोकावण्याचे माध्यम आहे. म्हणूनच त्याला वास्तववादी नाटके आवडत नाही. त्यापेक्षा नाटकात ‘मॅजिक रिअॅलिझम’ असावा, असा त्याचा आग्रह असतो असा हा वेडा नाट्यकर्मी. इतर लोक सिनेमात काम मिळावे म्हणून नाटकांत कामे करतात. हा वेडा सिनेमात काम करतो कारण त्यातून मिळणाऱ्या पैशातून याला थिएटर करायचे असते. मकरंद आजही स्वतःच्या वेडासाठी तितक्याच उत्कटतेने नाटके लिहतो, दिग्दर्शित करतो. तो नाटक अक्षरशः जगतो. मकरंदची नाटकं गल्लाभरू नसतात, त्यात त्याला जवळपास काहीही उत्पन्न होत नाही. तरीही मकरंद एवढी वर्षे रंगभूमीवर टिकून आहे. याचे कारण? पंडित सत्यदेव दुबे यांच्या शब्दांत Makarand exists only because of his madness. एरवी,  अतिशय उद्धट व गर्विष्ठ वाटणारा मकरंद नाट्यरसिकांसमोर मात्र कमालीचा नम्र असतो. २०१७ मध्ये मुंबईत झालेला ‘अंश’ चा नाट्यमहोत्सव मकरंदने प्रेक्षकांना अर्पित केला आहे. नाटककार, दिग्दर्शक, कलाकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार वगैरे सर्वांसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नाटक बघायला येणारा रसिक. नाट्यरसिकांबद्दलची ही कृतज्ञता बघून बालगंधर्वांची आठवण आल्यावाचून राहत नाही. तेसुद्धा रसिकांना ‘मायबाप’ म्हणत असत.
 
- प्रा. अविनाश कोल्हे
nashkohl@gmail.com

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...