आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भौतिक आणि अध्यात्मिक समतोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांचं मूलभूत शिक्षण ज्या विषयात असतं, त्या क्षेत्रात कार्यरत राहून त्या कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असतात. नाटकं व चित्रपटांत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा व्यवसाय वेगळाच आहे. अशा कलाकारांची ओळख या सदरात करून देत असतो. डॉ. ओक यांच्यावरच्या लेखाचा हा उत्तरार्ध. 


औषधशास्त्र आणि संगीत या दोन्ही विषयांतला डॉ. ओक यांचा व्यासंग पाहता, ३० वर्षं दररोज १२ तासांची नोकरी आणि एकीकडे संगीत या दोन्ही गोष्टी एका वेळी सक्षमपणे सांभाळणं कठीण नाही का गेलं, हा साहजिक प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, “शनिवार आणि रविवार तर रियाज व्हायचाच, पण नोकरी करताना माझा जाताना आणि येतानाचा मिळून तीन तासांचा प्रवास असायचा. या तीन तासांमध्ये माझा रोज रियाज व्हायचा. यासाठी मी खास ‘लॅपटॉप पेटी’ बनवून घेतली होती. या पेटीला भाता नव्हता, पण सुरांची बटणं होती. त्यावर सकाळी आणि संध्याकाळी दीड तास माझा रियाज व्हायचा. त्याशिवाय पर्यायच नव्हता. गायक आणि वादकाचा रोजचा रियाज झालाच पाहिजे नाही तर गायकाला गळा आणि वादकाला हात साथ देत नाही. वेळेचं व्यवस्थापन करावंच लागतं.कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अटीतटीची स्पर्धा असते.

 

 सतत बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागतो, जर तुम्ही डेडलाईन नाही पाळली, तर तुम्हांला नोकरीवरून काढून टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे सतत परफॉर्मन्स प्रेशर असतं. पण जर तुम्ही उत्तम काम करत असाल तर कंपनी भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी असते. आता संगीताच्या क्षेत्रात तुमच्या पाठीशी कोणीही नसतं. पूर्वी भारतात १२०० राज्यं आणि त्या प्रत्येक राज्यात दरबारी राजगवई असे. त्यामुळे कलाकार तेव्हा श्रीमंतांच्या गटात मोडत असत आणि त्यामुळेच भारतात कलेचा उत्कृष्ट विकास झाला. कारण सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत असतील, तर त्या समाजाची भरभराट होतेच.

 

परंतु आता सर्वोत्तम पाच टक्के कलाकार वगळले, तर इतर कलाकारांना लोकाश्रय नाही आणि राजाश्रयही नाही. त्यामुळे फक्त संगीताच्या जोरावर गुजराण करणं आता कठीण आहे. मी संगीतात काम करणं निभावू शकलो कारण माझं त्याच्यावर पोट नव्हतं. माझ्यामागे नोकरीचं पाठबळ होतं. पण सध्या ‘पोट भरणं’ हेच संगीताच्या क्षेत्रातलं मोठं आव्हान आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत कलाकारांकडे उत्पन्नांचा दुसरा एक मार्ग असायलाच हवा.” 
 
 कुठल्याही क्षेत्रात माणूस दीर्घकाळ कार्य करीत असला तरी आता जागतिकीकरण, तंत्रज्ञानाची झपाट्याने होत असलेली प्रगती, स्पर्धा यांमुळे सर्वच क्षेत्रांचा चेहरामोहरा वेगाने बदलताना दिसतो. या वेगाबरोबर स्पर्धा करून सतत अद्ययावत राहणं कोणालाच चुकलेलं नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय करता? असं विचारताच ते लगेच म्हणाले, “ती माझ्यातली वृत्ती आहे असं समज. आजही प्रत्येक दिवशी जर काही ना काही नवीन शिकलं नाही तर मला दिवस फुकट गेल्यासारखा वाटतो. हिंदुस्थानी संगीतातल्या २२ श्रुतींचा शोध लावत असताना मला कर्नाटक संगीतातलं ज्ञान पण असायलाच हवं, म्हणून मी कर्नाटक संगीत शिकायला गेलो. पण त्यांच्या मनातही आपल्यासारखाच उत्तर भारतीय आणि कर्नाटक संगीत असा भेदभाव आहेच. त्यामुळे इतकी वर्षं उत्तर भारतीय संगीतामध्ये काढल्याने मला त्यांच्याकडून कर्नाटक संगीत शिकणं कठीण झालं. पण म्हणून थांबायचं नाही! एकदा मला प्रश्न पडला की, मुळात सूर बाराच आहेत तर कर्नाटक संगीतात ७२ थाट आणि उत्तर भारतीय संगीतात १० थाट असं कसं असू शकेल? मग वाचन, श्रवण, तौलनिक अभ्यास यातून स्वतःच मी उत्तर शोधून काढलं. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. प्रश्न मनात राहिला असेल तर मला झोप लागत नाही.महिन्यातून किमान १० वेळा तरी मी पहाटे साडेतीनला उठतो आणि ३.३० ते ४ या ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी बरोब्बर ती उत्तरं सापडतात. हा अनुभव कोणीही घेऊ शकतं. फक्त तेवढा प्रामाणिकपणा, तीव्र इच्छाशक्ती आणि जिद्द पाहिजे.”

‘मित्र जिवाचा’, ‘मनोरंजक स्वभावशास्त्र’, गोविंदराव पटवर्धन यांच्या जीवनचित्रावर प्रकाश टाकणारं ‘गोविंद गुणदर्शन’, २२ श्रुती, श्रुती गीता, ‘ताजमहाल’ हे संगीत नाटक, ‘श्रुतीविज्ञान व रागसौंदर्य’ आणि नुकतंच प्रकाशित झालेलं ‘पुनर्जन्म - मिथ्य की तथ्य’ या पुस्तकांचं लेखन डॉ. विद्याधर ओक यांनी केलय.


डॉ. विद्याधर ओक यांच्या संगीत, औषधशास्त्र, संशोधन, लेखन आणि ज्योतिष या क्षेत्रांतल्या योगदानासाठी  राज्य सरकारतर्फे दिला जाणारा केशवराव भोसले पुरस्कार, उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे ‘पु. ल. देशपांडे पुरस्कार’, ठाणे महानगरपालिकेचा ‘ठाणे भूषण पुरस्कार’, सावरकर न्यासतर्फे ‘विनायक दामोदर सावरकर पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (नाटक) ज्ञानोबा माझा (म. टा. सन्मान) यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.   


आवडीच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या सुवर्णस्पर्शाने उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ. विद्याधर ओक यांची यशाची व्याख्या काय असेल याबाबत मला अतिशय कुतूहल होतं. त्यांना मी विचारलं की, तुमची यशाची व्याख्या काय? ते म्हणाले, ‘विद्याधर ओक नावाचा जो देह दिसतो, त्याचं यात काही श्रेय आहे असं वाटत नाही, ही परमेश्वरी योजनाच असावी आणि यशाच्या व्याख्येबद्दल बोलायचं, तर देहभानापेक्षा आत्मभान महत्त्वाचं. जोपर्यंत मला आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत मी स्वतःला यशस्वी म्हणू नये. कारण त्याच्याशिवाय सगळं फोल आहे. आपण जी सगळी भौतिक सुखं अनुभवतो, ती त्या त्या वेळची सांसारिक गरज असते. त्यामुळे या भौतिक गोष्टींचा आनंद घेण्यात चूक काही नाही, पण मी त्याला ‘यश’ असं नाही म्हणणार. आपल्या आत्म्याने देहाकडून काय करून घेतलं पाहिजे, हे जर कळलं तर त्यात आपलं यश आहे. आत्मशांतीसाठी आत्मज्ञान गरजेचं आहे. सगळं करून जर आतून शांतता मिळाली नसेल, तर सगळं व्यर्थ आहे.’ ‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि, न मनोरथै:’ या उक्तीप्रमाणे डॉ. ओक सतत कार्यमग्न तर असतात, पण त्याच वेळी ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ असंही ते मानतात. भौतिक आणि अाध्यात्मिक या दोन्ही गोष्टींचा समतोल राखता येणारे खऱ्या अर्थाने ‘यशस्वी’ असतात, याची साक्ष डॉ. विद्याधर ओक यांच्याकडे पाहून होते. (उत्तरार्ध)

 

लेखाचा पहिला भाग  श्रुतींचे डॉक्‍टर

 

भक्ती आठवले- भावे 

bhaktiathavalebhave@gmail.com

बातम्या आणखी आहेत...